
Pune News: राज्यातील मुंबई, पुणे या भागांत मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस होत आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे मागील काही वर्षातील रेकॉर्डब्रेक १९४.८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. सोलापूर, सातारा जिल्ह्यांतील माण, फलटण, खटाव, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी भागांतही जोरदार पाऊस झाल्याने दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोकणात अतिवृष्टीसदृश्य पाऊस
मागील काही दिवसांपासून ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच चिपळूण येथे मासेमारीसाठी गेलेले तिघेजण पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यानंतर रेस्क्यू करण्यात आले. सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू आहे.
मध्य महाराष्ट्रात मुसळधार
पुणे जिल्ह्यातील प्रामुख्याने बारामती, इंदापूर, दौंड या भागांसह जिल्ह्यातील २१ मंडलांत मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळीच नुकसानीची पाहणी सुरू होती. साताऱ्यातील माण, फलटण, खटाव, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे. इतर तालुक्यांत संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात सरासरी ३५.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. माण तालुक्यातील आंधळी तर फलटण तालुक्यातील बाणगंगा धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो झाले आहे. सांगली जिल्ह्यात पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
मराठवाड्यात जोर वाढला
मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत बहुतांश भागात कमी अधिक प्रमाणात पूर्व मौसमी पावसाचा जोर कायम होता. जिल्ह्यातील पैठण तालुक्यासह जालना जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर, बदनापूर, घनसावंगी, मंठा, बीड जिल्ह्यातील बीड, पाटोदा, आष्टी, माजलगाव, गेवराई, धारूर, वडवणी व शिरूर कासार या तालुक्यांमध्ये सरासरी पावसाने दुहेरी आकडा गाठला होता.
विदर्भात मध्यम पाऊस
विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असले तरी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सध्या या भागात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी शेतीकामांना वेग आला आहे.
नाशिकमध्ये पावसाचे थैमान
गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच आहे. जवळपास ६ हजार जेव्हर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात रविवार(ता.२५) रोजी नाशिक, सिन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यात मोठे नुकसान समोर आले आहे. यांसह नांदगाव तालुक्यात नुकसान आहे. यामध्ये जवळपास १५० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या माहितीवरून समोर आले आहे.
डुबेरे येथे झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने ढोकी नदीला पूर आला. दुपारी कोरडीठाक असलेली नदी दोन तासांत ओसंडून वाहू लागली. शेती जमिनीचे बांध फुटून गेल्याने जमिनींचे नुकसान झाले आहे. तर टोमॅटो, कोबी, मिरची, कलिंगड आदी पिकांचे नुकसान झाले आहे. नदीला पूर आल्यामुळे कोरडा पडलेला अटकवडे येथील बंधारा भरला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.