Mahananda Tompe : पीक संरक्षणासाठी रात्री जागलीवर जाण्याचे काम अत्यंत जोखमीचे राहते. वन्यप्राण्यांच्या हल्ला कधी जिवावर बेतणारा ठरतो. गेल्या बारा वर्षांपासून शेतीमध्ये जागलीचे काम टेंभी (ता. नेर, जि. यवतमाळ) येथील महानंदा टोम्पे निडरपणे करीत आहेत. वडिलोपार्जित कोरडवाहू शेती बागायती करत पीक उत्पादन वाढ साधली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतीमध्ये आत्मविश्वास पेरण्याचे काम महानंदाताईंनी केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील खोलापुरी गट ग्रामपंचायती अंतर्गत टेंभी गावाचा समावेश होतो. या गावाची लोकसंख्या अवघी ५५० इतकी आहे. या गावातील टोम्पे कुटुंबातील महानंदा या प्रयोगशील शेतकरी. त्यांच्या दोन मोठ्या बहिणींची लग्न झालेली आहेत. महानंदा यांचा विवाह २००६ मध्ये झाला होता. परंतु महिनाभरातच सासरी असह्य जाच सुरू झाला. या धक्क्यानंतर त्यांनी माहेर जवळ केले ते कायमचेच ! त्यानंतर दुसऱ्या लग्नासाठी टोम्पे कुटुंबीयांकडून त्यांची मनधरणी करण्यात आली. मात्र पहिला अनुभव वाईट आल्याने महानंदाताईंनी दुसरे लग्न न करण्याचा निश्चय केला. मात्र असे करताना वडिलांनी तुला तुझ्या पायांवर उभे राहावे लागेल, असे ठणकावले. परिणामी, आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी महानंदा यांनी घरच्या शेतीमध्ये राबण्याचा निर्णय घेतला.
शेती नियोजनाकडे लक्ष ः
महानंदा टोम्पे यांची वडिलोपार्जित सहा एकर शेती. त्यासोबतच वडिलांनी अजून सहा एकर शेती खरेदी केली. या बारा एकर शेतीमध्ये कापूस, मूग, ज्वारी लागवड असते. महानंदा यांचे वडील देविदास हे कोरडवाहू पिके घेत होते. सहा एकर क्षेत्रातून अवघे २० क्विंटल कापूस आणि पाच एकरांतून १५ क्विंटल ज्वारी उत्पादन हाती लागायचे. ही परिस्थिती बदलण्याची गरज असल्याचे महानंद यांच्या लक्षात आले. त्यांच्या शेतालगत शिरजगाव लघू प्रकल्प आहे. या प्रकल्पातून पाणी उपशासाठी पाइपलाइनची गरज होती. यासाठी त्यांनी बॅंकेत ८० हजार रुपये कर्जासाठी प्रस्ताव दाखल केला. बॅंकेने कर्ज मंजूर केल्याने त्यांचा उत्साह वाढला. २००८ मध्ये पाइपलाइनचे काम पूर्ण झाले. शाश्वत पाण्याची सोय झाल्याने महानंदा यांनी सुधारित तंत्राने शेती नियोजनास प्रारंभ केला. पाण्याच्या उपलब्धतेनंतर रब्बी हंगामात गहू, हरभरा तसेच उन्हाळी भुईमूग, मूग लागवडीवर भर दिला.
पीक उत्पादनात सातत्य ः
पीक उत्पादन वाढीसाठी महानंदा यांनी परिसरातील प्रयोगशील शेतकरी तसेच कृषी सेवा केंद्रचालकांशी संपर्क साधत उत्पादन वाढीसाठी नवीन जाती, खत व्यवस्थापन, कीड, रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार पीक लागवड पद्धतीत बदल केले. टप्प्याटप्प्याने त्यांना यश मिळत गेले. गेल्या काही वर्षांपासून त्यांना कापसाचे एकरी १० क्विंटल उत्पादन मिळते. गेल्या वर्षी प्रति क्विंटल ८ हजार रुपये दर मिळाला. सोयाबीनचे एकरी ८ क्विंटल उत्पादन मिळते. गेल्या वर्षी प्रति क्विंटल ५,४०० रुपयांचा दर मिळाला होता. गव्हाचे एकरी १८ क्विंटल उत्पादन मिळते. गेल्या वर्षी प्रति क्विंटल २५०० रुपये दर मिळाला होता. उन्हाळी भुईमुगाचे एकरी ७ क्विंटल उत्पादन मिळते. गेल्या वर्षी प्रति क्विंटल सहा हजार रुपये दर मिळाला होता. पिकांचे योग्य व्यवस्थापन आणि काटेकोर आर्थिक नियोजन केल्यामुळे समाधानकारक नफा त्यांना मिळतो. मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी शेतामध्ये नवीन पाइपलाइन केली आहे.
बचत गटातून तंत्रज्ञान प्रसार
महानंदा ताई गावातील जय गजानन महिला शेतकरी बचत गटाच्या पाच वर्षांपासून सदस्या आहेत. सध्या त्या बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. या गटाच्या माध्यमातून शेतीमधील नवीन तंत्रज्ञान महिलांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. याचबरोबरीने पूरक उद्योगालाही त्यांनी चालना देण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे.
शेती संरक्षणाकरिता श्वान ः
महानंदा शेतामध्ये जागलीवर जाताना सोबत तीन श्वान नेतात. शेती संरक्षणासाठी त्यांनी जर्मन शेफर्ड मादी श्वानाची त्यांनी खरेदी केली होती. या मादीस पुढे दोन पिले झाली. आता हे तीनही श्वान दिवस, रात्र शेतामध्ये त्यांच्या सोबतीला असतात. वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी श्वानांचा चांगला फायदा होत असल्याचे त्या सांगतात.
शेतामध्ये होते जागली ः
रात्रीच्या वेळी पिकांचे वन्यप्राण्यांसून संरक्षण करणे हे काम जोखमीचे. पुरुषच हे आव्हानात्मक काम करतात. मात्र पुरुषांची या क्षेत्रातील मक्तेदारी महानंदाताईंनी मोडून काढली. २००८ ते २०११ या कालावधीत जागलीवर महानंदा यांच्यासोबत त्यांचे वडील राहायचे. परंतु आपली मुलगी सर्वच आव्हानांचा सामना करण्यास सक्षम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिणामी, त्यांनी एकटीलाच जागलीवर पाठविण्यास सुरुवात केली.
रात्री आठ वाजता महानंदा यांची पावले जागलीसाठी शेताकडे वळतात. शेतात निवाऱ्यासाठी त्यांनी टीनपत्र्याची झोपडी बांधली आहे. रात्री शेतीवर राखण करून पहाटे साडेपाच वाजता त्या घरी परततात. घरी परतल्यानंतर धुणी-भांडी, स्वयंपाक अशी कामे करून पुन्हा अकरा वाजता त्या शेताकडे जातात. घरच्या कामामध्ये महानंदा यांना आई चंद्रकला यांचे सहकार्य मिळते. वडिलांचे नोव्हेंबर २०२२ मध्ये निधन झाल्यानंतर आता शेतीची सर्व सूत्रे महानंदा यांच्याकडे आली आहेत.
२०११ पासून महानंदा पीक संरक्षणासोबतच रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देण्याचेही काम करतात. शेतीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर शिरजगाव लघू प्रकल्पस्थळी मोटारपंप बसविलेला आहे. ऑटोस्विच यंत्रणेमुळे वारंवार त्या ठिकाणी पंप सुरू करण्यास जावे लागत नसले तरी काही बिघाड झाल्यास मात्र रात्रीच्या अंधारात शेतातून प्रकल्पापर्यंत पायी जावे लागते. रोही, रानडुक्कर त्यासोबतच विषारी सापांचाही अनेकदा सामना करावा लागला, असेही त्या सांगतात. त्यांच्या शिवारालगत काही शेतकऱ्यांची शेती आहे. सुरुवातीला हे शेतकरी जागलीवर जात होते. परंतु महानंदा शेतात राहत असल्याचे पाहून आणि तिच्याच माध्यमातून आपल्या शेतीचे संरक्षण होणार असल्याने त्यांनी जागलीवर जाणे बंद केले.
विविध संस्थांकडून सन्मान ः
शेती व्यवस्थापनामधील कार्याची दखल घेऊन यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते महानंदाताईंचा सन्मान करण्यात आला. बेटर कॉटन इनिशिएटिव्ह (बीसीआय) संस्थेद्वारे दर्जेदार कापूस उत्पादनासाठी गौरविण्यात आले. नेर येथील बळिराजा चेतना अभियानामध्ये त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.
संपर्क ः महानंदा टोम्पे, ९५२९९६५५६१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.