
-निशिकांत भालेराव
मला आठवतेय शशीची माझी भेट औरंगाबादेत झाली. तेव्हा तो औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षात होता. १९७२ चं दलित विद्यार्थी शिष्यवृत्ती आंदोलन झालेले होतं. थोड्या सामाजिक जाणिवा अंकुरत होत्या. आणि औरंगाबादेत हॉटेल कॅन्टीनमधील पदार्थांच्या भाववाढीविरुद्ध विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. गुलमंडीवर हुल्लडबाजी झाली होती. ज्यात मी आणि शशी होतोत. हाच धागा पकडून पुढे आम्ही युवक क्रांती दलात आलो. १९७४ च्या विकास आंदोलनाने आमच्या राजकिय-सामाजिक जाणिवा घट्ट केल्या आणि आमची गॅंगसुद्धा मोठी झाली.
मेडिकल कॉलेमध्ये आमच्या गॅंगचा बोलबाला होता. मनसुख आचलिया, शशांक जोशी, रामदास अंबुलगेकर, भालचंद्र कांगो सिनियर होते आणि अनेक प्रश्नात लक्ष घालत होते. शशी हा सिंसीयर विद्यार्थी होता. इतर कोणालाच न आवडणारा Preventive and Social Medecine हा त्याचा आवडता विषय. आणि एम बी घारपुरे हे त्या विषयाचे प्रोफेसर होते. त्यांचा सामाजिक दृष्टिकोन पक्का होता.
साहजिकच शशी अहंकारी यांच्या बॅचमध्ये या गोष्टी पाझरत असणार. शशी प्रारंभापासूनच लक्षकेंद्री होता. आरोग्य सेवा, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण, पॅरामेडिक अभ्यासक्रम सोपा करणे, औषधे स्वस्त असणे,असे त्याचे विषय असायचे. आमच्यापैकी बहुतेक नॉन मेडिको होते, त्यांना या विषयात फारसा रस नसे. सगळे शशीला म्हणायचे ' तू सुधारणावादी आहेस आम्ही क्रांतीकारी. पण शशी त्यावर व्यक्त नाही व्हायचा!
बाबा आमटे आणि आनंदवन हे शशीचे आवडते विषय. अनेकदा तो तिथे जाऊन आलेला असे. आनंदवन मित्रमंडळ त्याने काढले होते. मनसुख आचलिया त्यावेळी रक्तदान मोहिमेत होता. त्या दोघांनी मिळून औरंगाबाद जवळच्या लिंबे जळगाव या गावी एक आरोग्य शिबिर घेतले होतं. त्या शिबिराला बाबा आणि विकास आमटे आले होते. खूप औषधे त्यांनी गोळा करून या गावात वाटले होते.
शशी आणि शांताराम पनदेरे नेहमी डेव्हिड वेर्नरच्या Where there is no Doctor या हेल्थ केअर मॅन्युअल विषयी बोलत असत. या धर्तीवर पुस्तके मराठीत आली पाहिजेत असे तो म्हणे. इतका लक्षकेंद्री असून ही अन्य राजकीय-सामाजिक प्रश्नात तो पुढे असायचा.नामांतर आंदोलनात तो होता सर्वांसोबत. युक्रांदच्या शिबिरात देखील सक्रिय असायचा. आमच्या संघटनेत जेव्हा राजकीय पक्षात विलीन व्हावे की प्रवेश करावा? यावरून जेव्हा मतभेद झाले आणि तुकडेही! तेव्हा तो आमच्याच बरोबर म्हणजे, पक्षीय राजकारणाविरुद्ध गटाबरोबर राहिला. त्याचे कारणच तो आरोग्य केंद्रित दबाव गट निर्माण करण्याच्या विचारांचा होता.
मला वाटते १९८० मध्ये त्याने मेडिकल विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले आणि त्यात प्रश्न विचारला होता की, "तुमच्या पैकी किती जणांची नाळ आधुनिक शास्त्रानुसार कापली गेली किंवा दगडाने ठेचून कापली? तुमच्या आईचे बाळंतपण कोणत्या दवाखान्यात झाले?" या अशा प्रश्नांनी मेडिकलचे विद्यार्थी हैराण झाले, चर्चा झडू लागल्या, सामाजिक दृष्टिकोन असणारे बाहेरचे कार्यकर्ते शशीने मदतीला घेतले आणि मग एका मुद्यावर सारे येऊन अडले.
मला आठवते की (१९८०) शशीने मला फोन केला. आम्ही मेडिकलचे 40 विद्यार्थी औरंगाबाद जवळील 'गांधेली' गावी जाणार आहोत. तू पत्रकार म्हणून यावेस. मी तेव्हा मराठवाडा दैनिकात रविवार पुरवणीचे काम पहात होतो. मी गेलो त्यांच्या सोबत. गावात प्रत्येक झोपडीत जाऊन मुले प्रश्न विचारायची. बहुतेकांची तक्रार होती सायंकाळ झाली की कमी दिसते याची. या कॉमन रोगावर मग सामूहिक चर्चा झाली. मध्यमवर्गीय मुला मुलींनी गावकऱ्यांना सांगितले रात आंधळेपणा घालवायचा असेल तर मेथी, पालक माठ अशा भाज्या,फळे खात जा! गावकरी म्हणाले कुठे मिळणार भाज्या?आणि त्यासाठीचे पैसे आणायचे कुठून? मग पुन्हा चर्चा, देशाचे अर्थशास्त्र, परवडणारी औषधे, अभ्यासक्रमाच्या मर्यादा वैगेरे! आणि मग त्यातून आकारली HALO (Health Auto Learning Organisation) संघटना.
मी त्यावेळी महाराष्ट्र टाइम्स आणि मराठवाडामध्ये 'ग्रामस्थांना हॅलो करणारे डॉक्टर' असे लेख लिहिले आणि त्याला प्रतिसाद मिळाला. शशीकांत यावेळी स्पष्ट होता. शिक्षण संपताच त्याला पुढचा मार्ग दिसू लागला. वढू बुद्रुकला तो काही दिवस जायचा आरोग्य सेवेसाठी.
त्यातून त्याचा वैद्यकिय शिक्षण, त्यानंतरची इंटरशीप, रोग निदान, हिप्पोक्रेटिक ओथ याबद्दलचा दृष्टिकोन तयार झाला. त्याचे समकालीन मित्र क्रांती रायमाने, निकाळजे, दमकोंडवार, बेलखोडे, पीडी जोशी, मलोसे, गायकवाड यांनीही त्यात भर घातली आणि हॅलो फौंडेशनने आकार घेतला.
राणी शशीच्या जीवनात आली आणि त्याला मग त्याची स्वप्ने पूर्ण करण्याचा आधारच मिळाला. राणीने तर ग्रामीण वैद्यकीय सेवेला अणदूरसारख्या ठिकाणी राहून झोकूनच दिले. अनेक कल्पक उपक्रम दोघांनी राबवले, शासन धोरणावर अभ्यास करून सूचना केल्या. अणदूर हे हॅलोचे मुख्यालायच बनले. डॉ अरुण लिमये यांच्या क्लोरोफॉर्ममधून झालेले वैद्यकीय क्षेत्राचे दिव्यदर्शन, डॉ श्याम अष्टेकरच्या वैद्यकसत्तेने मांडलेला दृष्टिकोन, आमटे आणि बंग यांच्या वैद्यकीय मॉडेलमध्ये सहभागी होत, डॉ रजनीकांत आरोळे यांच्यापासून स्फूर्ती घेत हॅलोला वेगळे काय करता येईल यावर कित्येकदा शशी बोलायचा, चर्चा करायचा.
२००९ मध्ये शशी-राणी, अतुल देऊळगावकर आणि सुषमा-सानिया आम्ही मिळून ४ दिवस उरळीच्या निसर्गोपचार आश्रमात मुक्काम केला. सगळ्या आयुर्वेद उपचार घेत राहिलो. शशी एव्हढा अलोपॅथीवाला पण दुसऱ्या पॅथी समजून घ्यायचा आणि त्याचा Cost Effectiveness तपासायचा. हॅलोने कोविड काळात जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्क बनवले ते तर कौतुकास्पदच होते. वैद्यकीय सेवेकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन मूलगामी आणि ग्रामकेंद्रित होता. हे मॉडेल व्यवहार्य करण्यासाठी तो कित्येक प्रयोग करायचा. राणीने त्याला उत्तम साथ दिली. तिला असाध्य व्याधीने गेल्या काही वर्षांपासून घेरले, त्यामुळे तो चिंतीत होता. पण त्याने कधी तसे दाखवले नाही. खूप कष्ट घेतले शशी ने तिला Back to Life आणण्यासाठी. आणि आज तोच नाहीय.
मोठे दुःख आलेय तिच्या वाट्याला. मुक्ता आणि आनंद तुम्हाला आता तिच्याकडे आणि हॅलोकडे लक्ष द्यावे लागणार. क्रांती, नंदू, अशोक, विजय तुम्ही गेले तीन महिने शशी साठी जे अथक प्रयत्न केले,उपचार पद्धती शोधल्या तसेच सहजपणे सर्वांना उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागतील. बरोबर ना!
राणीची माझी पहिली भेट झाली ती पुणे-औरंगाबाद बसमध्ये. तेव्हा आमची ओळख नव्हती. व. पू. काळे यांचे पुस्तक ती वाचत होती. 'मला राहवले नाही आणि मी म्हणालो इतके काय आवडतात व. पु. तुम्हाला?' 'त्यांची भाषा, अलंकारिक सुभाषितवजा वाक्य आवडतात. उदा. पाण्यात राहणाऱ्या माशाचे अश्रू कधी दिसत नाहीत तो दिसूही देत नाही'!-राणी
खरंय ! शशीने दिसू दिले नाही, तुझेही कधीही दिसले नाहीत, दिसु दिले नाहीत तू!
पण मला आणि हॅलोच्या अनेकांना फिराखच्या इच्छेनुसार आज म्हणावेसे वाटतेय की,
खोते है अगर जान तो खो लेने दे
ऎसे मे जो हो जाये वो हो लेने दे
एक उम्र पडी है सब्र भी कर लेंगे
इस वक्त जी भर के रो लेने दो !!
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.