Human Psychology : आपल्या मनाचा सेल्फी

Human Soul : मोबाइलच्या कॅमेरामध्ये आपला बाह्यरूपाचा सेल्फी आपण सराईतपणे काढतो. आज मनाचा सेल्फी कसा काढायचा ते बघूया.
Human Psychology
Human Psychology Agrowon

~ डॉ. आनंद नाडकर्णी
Human Mental Health : मोबाइलच्या कॅमेरामध्ये आपला बाह्यरूपाचा सेल्फी आपण सराईतपणे काढतो. आज मनाचा सेल्फी कसा काढायचा ते बघूया. मनाचा सेल्फी आपल्याला माणसामाणसांतील वैविध्य समजून घ्यायला, स्वत:चा आणि इतरांचा स्वीकार करायला उपयोगी ठरेल.

इतक्यात सेल्फी कधी काढला बरं तुम्ही? मोबाइल फोन हातात आल्यापासून आपण सगळेच सेल्फी काढायला सरावलो आहोत. आपली छबी, आपल्या आठवणी फोटोत पकडायचा एक सोपा मार्ग म्हणजे सेल्फी. आपला सेल्फी एकदम परफेक्ट असावा असं वाटत असतं.

हे परफेक्ट असणं म्हणजे नक्की काय? तर प्रत्येक गोष्ट नेहमी उत्तमच व्हायला हवी. जे ठरवलं आहे ते तसं आणि तेवढं, तितकं छान व्हायलाच हवं. मी दरवेळी अगदी अचूक वागायला, बोलायला हवं. पण कितीही प्रयत्न केले, कष्ट घेतले तरी प्रत्येकवेळी अशी परिपूर्णता साधता येतेच असं नाही.

परिपूर्णता हवी म्हणणे म्हणजे माझ्याकडून आज एवढं काम व्हायलाच हवं आणि ते माझ्या मनास येईल असं व्हायला हवं असा हट्ट करणे. तर उत्कृष्टता (excellence) म्हणजे मी आज माझं काम अधिक चांगलं कसं करू याचा सातत्याने ध्यास. परिस्थितीचा सामना करत वेगवेगळे पर्याय शोधणं, नियंत्रणाखाली असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं यातूनच उत्कृष्टता साधता येते. पॅटर्न ३ म्हणजेच आग्रही व्यक्ती हे जाणून असते आणि परिपूर्ण असण्याचा हट्ट न ठेवता उत्कृष्टतेचा ध्यास ठेवते.

माणूस म्हणून कोणीही कधीच परफेक्ट किंवा परिपूर्ण असू शकत नाही. स्वत:चा माणूस म्हणून स्वीकार म्हणजे ह्याच अपरिपूर्णतेचा स्वीकार. आपल्यातील क्षमता, कमतरता आणि वैविध्याचा स्वीकार. प्रत्येक जण वेगळा आहे, याची जाणीव असणे.

Human Psychology
Human Psychology : आग्रही नेतृत्व

वैविध्य म्हणजे काय? एक उदाहरण बघूया. एका टोपलीत केळी, सफरचंद, आंबा, नारळ, सीताफळ, लिंबू आहेत. तर ही झाली फळांची टोपली. सगळी जरी फळंच असली तरी त्यांची स्वत:ची गुणवैशिष्ट्यदेखील आहेत. फळाफळांमध्ये वेगळेपण आहेच. पण अगदी आंबा म्हटलं तरी प्रत्येक आंबा वेगळा. चव, आकार, रंग, गंध यात वेगळेपण आहेच की. सगळे चिकू सारखेच गोड नाहीत. काही लिंबांची सालं जाड तर काहींची पातळ.

म्हणजे निसर्गही एकतेमध्ये खूप सारी विविधता आणतो. पण त्याच्या लेखी लहान महान हा भेदभाव नसतो. आंबा भारी, चिकू दुय्यम असं निसर्ग ठरवत नाही. नारळ पवित्र आणि लिंबू अशुभ हे माणसांनी ठरवलं, निसर्गाने नाही. म्हणजे वैविध्य नैसर्गिक आहे, विषमता माणसाने निर्माण केली आहे.

जगाच्या टोपलीत अशीच वेगवेगळी दिसणारी, वागणारी, असणारी माणसं आहेत. बऱ्याचदा, आपण स्वत:ला किंवा इतरांना एका विशिष्ट जातीधर्माची, देशाची, लिंगाची, व्यवसायातली व्यक्ती असं बघतो. त्या व्यक्तीने कसं असायला हवं, काय करायला हवं, त्याची मतं काय आणि ती कशी पूर्ण व्हायला हवी हे आपल्या डोक्यात पक्के असते. पण मूळात ‘एक माणूस’ असं आपण स्वत:कडे बघू तेव्हा काय वाटेल?

कोणताच माणूस परफेक्ट नसतो. काही गोष्टी माझ्या इच्छा आणि मताला धरून होणार नाहीत ही लवचिकता आपण विचारात ठेवू. माझ्या मनाप्रमाणे आणि मताप्रमाणे घडावं यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन पण त्याचा हेका धरणार नाही. प्रत्येकातील वैविध्याचा श्रेष्ठ-कनिष्ठ असे मूल्यमापन न करता स्वीकार करू तेव्हाच आपण स्वत:च्या आणि इतरांच्या माणूसपणाचा स्वीकार करू.

Human Psychology
Psychological Self : निरोगी आत्मस्वीकार

विविधता का महत्त्वाची?
- विविधता आली की एकसुरीपण जातं, नवनवीन अनुभवाचं दालन उघडतं.
- विविधतेचा आदर करतो त्या वेळी आपण विषमतेला दूर करतो.
- वैयक्तिक आवडी निवडी असू शकतात. पण माणूस त्यात श्रेष्ठ कनिष्ठ, शुभ अशुभ ठरवतो. उदा. नारळाला श्रीफळाचा मान आणि लिंबू नजर उतरवायला.
- आपण पॅटर्न ३ वर असतो तेव्हा ही उच्च नीचता गळून पडते. समतेचं तत्व उमगतं आणि आपण स्वतःचा आणि इतरांचा त्यांच्या गुण दोषांसकट सहज आणि सक्रिय स्वीकार करतो.

जगण्याचा बोध
- समता कळली की सहजीवन कळते.
- सहजीवन कळले की परस्परानुबंध कळतात.
- परस्परानुबंध कळले की परस्परावलंबन कळते.

मोबाइलच्या कॅमेरामध्ये आपला बाह्यरुपाचा सेल्फी आपण सराईतपणे काढतो. आज मनाचा सेल्फी कसा काढायचा ते बघूया. मनाचा सेल्फी आपल्याला माणसामाणसांतील वैविध्य समजून घ्यायला, स्वत:चा आणि इतरांचा स्वीकार करायला उपयोगी ठरेल.
- या मनाच्या सेल्फीमध्ये आहे एक मोठ्ठं वर्तुळ म्हणजे मी. (आकृती १)
- त्यातील एक भाग म्हणजे माझ्या क्षमता, माझी कौशल्ये. मला काय कामं चांगली जमतात? उदाहरणार्थ, कोणी सुतारकाम तर कोणी पेरणी चांगली करतं, कोणी अभंग गातं तर कोणी ढोलकी चांगली वाजवतं.
- दुसरा भाग दाखवतो माझ्यातल्या कमतरता. एखाद्याला बँकेचे व्यवहार जमत नाहीत, एखाद्याची अभ्यासात गती नसते. कोणाला लोकांसमोर बोलायला जमत नाही.
- तिसरा भाग म्हणजे माझ्या वैयक्तिक आवडी. खायला गोड आवडतं का तिखट, सिनेमातला कुठला हिरो आवडतो, कुठली गाणी आवडतात, फावल्या वेळात काय करायला आवडतं या झाल्या वैयक्तिक आवडी.

तुमच्या घरातल्या एका एका व्यक्तीचा विचार केलात तरी लक्षात येईल की ह्या तिन्ही गोष्टी – क्षमता, कमतरता आणि आवडी – प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. अगदी जुळी भावंडं घेतली तरी त्यांचे हे सेल्फी एकसारखे असणार नाहीत.

हे सगळे झाले अंतर्घटक. आपल्याला जरा लक्ष देऊन विचार केला की ओळखता येतील असे. इतरांना निरीक्षणातून थोडेफार दिसतील, पण सगळे नाही कळायचे. हे घटक आपल्या नियंत्रणात असतात. मनाने लक्षात घ्यायला हवे असे बाह्य घटक कुठले तेही बघूया. (आकृती २)
- आजूबाजूला उपलब्ध संधी ः वैयक्तिक किंवा व्यावसायिक.
उदाहरणार्थ, शेजारच्याने मळा विकायला काढलाय, माझी बाग वाढवायची ही संधी आहे का? गावात कॉलेजमध्ये एक नवा अभ्यासक्रम सुरू होतोय,
त्याचा माझ्या व्यवसायाला फायदा होईल का?
- समोर असलेली आव्हानंः वैयक्तिक, आर्थिक, नैसर्गिक
शेजाऱ्याचा मळा विकत घ्यायचा तर आहे, पण त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद कशी करायची? आणि मेहनत खूप करायला लागेल. परत नव्याने शिकायचं तर रोजच्या कामातून वेळ काढायला लागेल. ठरवलं तरी चांगला पाउस होईस्तोवर पेरणी करता येणार नाही.

संधी आणि आव्हानं नीट बघितल्यावर लक्षात येईल, की प्रत्येक संधीत एक आव्हान आहे आणि प्रत्येक आव्हानात एक संधी.
म्हणजे शेजाऱ्याचा मळा घेऊन आपलं क्षेत्र वाढवायचं या संधीत, पैशाची तजवीज करणं हे आव्हान. आणि ते आव्हान पार पडताना, बँकेचे लोनचे व्यवहार समजून घ्यायची, पुढल्या चार-दोन वर्षांचं पैशाचं नियोजन काटेकोरपणे करायला शिकायची संधी असेल.

आपल्या क्षमता आणि कमतरता सतत बदलत असतात. काही गोष्टी सरावाने तर कधी जरूर ते प्रशिक्षण घेतलं की त्या आपल्याला अधिक चांगल्या जमायला लागतात. म्हणजे त्या कामांमध्ये आपली क्षमता वाढली. काही आपण नव्याने शिकतो म्हणजे नवी क्षमता आपण मिळवतो. काही गोष्टी सराव सुटला की जमेनाशा होतात. आवश्यकता असूनही काही गोष्टी आपण शिकल्या नाहीत, तर कमतरता वाढते. म्हणजे काळासोबत हा मनाचा सेल्फीदेखील सतत बदलत राहणार.

आपण आधी आताच्या आपल्या क्षमता, कमतरता आणि आवडी यांचा एक सेल्फी काढूया. एकदा काढून झाला की तिथेच न थांबता, दर महिन्याला नवीन सेल्फी काढायचा. तो अगोदरच्या सेल्फीशी ताडून बघायचा. मग आपल्याला कळेल, की कशाकशात फरक पडला आहे? काय आणि किती बदललो आहोत आपण? त्यासाठी मदत करणारे काही प्रश्‍न पुढीलप्रमाणे ः
- माझ्या क्षमता वाढवू शकलो का? कुठल्या?
- कुठल्या कमतरता कमी करू शकलो?
- कुठल्या संधी होत्या? आणि त्यांचा फायदा घेऊ शकलो का?
- आव्हानं पेलू शकलो का?
- नवीन संधी किंवा आव्हानं कुठली आहेत?
अशा आत्मपरीक्षणाचा आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणायला फायदा होईल. आग्रही, ठाम राहायला मदत होईल. स्वत:चा स्वीकार अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल.
----------------------------------------
संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी
kartashetkari@gmail.com
आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –
https://www.youtube.com/watch?v=1Oj8-w-0rRg

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com