Human Psychology : टेन्सोमीटर वापरायचा कसा?

Tensometer Use : फूल टेंशनकडे जाणारा काटा कूल टेंशनकडे कसा वळवायचा? तीव्र काळजी वाटणे ते यथायोग्य काळजी घेणे हा बदल कसा करायचा?
Tensometer
TensometerAgrowon
Published on
Updated on

डॉ. आनंद नाडकर्णी

Dr. Anand Nadkarni Article : मागील लेखात आपण टेन्सोमीटर म्हणजेच मनातले टेंशन मोजायचे तबकडीसारखे यंत्र पहिले. फूल टेंशन, कूल टेंशन आणि नील टेंशन म्हणजे काय हेही समजून घेतले. आज आपण बघूया- फूल टेंशनकडे जाणारा काटा कूल टेंशनकडे कसा वळवायचा? तीव्र काळजी वाटणे ते यथायोग्य काळजी घेणे हा बदल कसा करायचा?

गणपती बाप्पा मोरया! गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्व वाचकांना खूप खूप शुभेच्छा. विवेकी विचारांचे बळ गणरायाच्या आशीर्वादाने सर्वांनाच लाभू दे. मागील लेखात आपण टेन्सोमीटर म्हणजेच मनातले टेंशन मोजायचे तबकडीसारखे यंत्र पहिले. फूल टेंशन, कूल टेंशन आणि नील टेंशन म्हणजे काय हेही समजून घेतले. आज आपण बघूया- फूल टेंशनकडे जाणारा काटा कूल टेंशनकडे कसा वळवायचा? तीव्र काळजी वाटणे ते यथायोग्य काळजी घेणे हा बदल कसा करायचा?

फूल टेंशनमुळे अनेक दुष्परिणाम होतात. उदाहरणार्थ, शंकांचे प्रमाण वाढते, उपाय / पर्याय यांचे प्रमाण कमी होते. काळजी वाढू लागते आणि तिचे रूपांतर चिंतेतही होऊ शकते. शरीरावर हळूहळू परिणाम दिसू लागतात. धडधड वाढते, हातपाय कापायला लागतात, अस्वस्थपणा जाणवतो. फूल टेंशन झोनवर आपण असतो तेव्हा मोठ्या प्रमाणात मनाला शंका भेडसावत असतात. अशा वेळी या शंकांचे निरसन करण्यासाठी विवेकी विचारांची कास धरावी लागते. विवेकी विचारांचा ट्रॅक सुरू करण्यासाठी उपयोगी पडू शकतील असे काही प्रश्‍न पुढीलप्रमाणे आहेतः

माझ्या मनात येणारी शंका वास्तवाला धरून आहे का?

माझ्या मनातील शंका माझ्या उद्दिष्टाकडे घेऊन जाणारी आहे का?

जर उत्तर नाही असे असेल, तर मग त्याऐवजी मला उद्दिष्टापर्यंत नेण्यास कोणते विचार मदत करतील?

Tensometer
Human Psychology : भावनांचा टेन्सोमीटर

या प्रश्‍नांच्या अनुषंगाने पर्यायांचा विचार सुरू होतो. उदाहरणादाखल समजा ऐनवेळी वातावरण बदललं आणि पिकांचं नुकसान होण्याची नौबत आली तर अशा वेळी पुढील विचार मदत करतील.

मी वेळच्या वेळी फवारणी करेन.

हवामानाच्या अंदाजासाठी सह्याद्रीच्या व्हॉट्‍सॲप ग्रुपला जॉइन होतो आता.

माझ्याकडून काही सुटलं असेल तर मित्रांशी चर्चा करून एकदा बघून तर घेतो.

यालाच आपण आवश्यक आणि यथायोग्य काळजी घेणे असे म्हणतो. असा विचार जाणीवपूर्वक केल्याने फूल टेंशनकडे जाणारा काटा कूल टेंशनकडे वळविण्यास मदत होते.

Tensometer
Human Psychology : विवेकी विचारपद्धती म्हणजे काय?

विचारातून भावना जाणवतात आणि एकाच भावनेच्या वेगवेगळ्या छटा असतात. जशा रंगांच्या असतात तशाच. जसे विचार बदलतात त्या अनुषंगाने भावना पण बदलतात. हेच आपण टेन्सोमीटरच्या मदतीने पाहिले. याची काही उदाहरणे बघूया – संताप – बेभान – परिणाम आणि पर्याय यांचे भान जाणे. संताप – व्यक्तीचा राग, मुठी वळणे. राग – व्यक्तीचा राग न येता त्याच्या वागण्याचा राग येणे.

त्रागा – एखाद्याच्या वागण्याचे विचार डोक्यातून जातच नाहीत, स्वतःला त्रास करून घेणे. चिडचिड – एखाद्याच्या वागण्याचे विश्‍लेषण, त्या मागची शक्य असलेली कारणे यांचा विचार सुरू होतो. शांत – एखादी व्यक्ती नेमकी तशी का वागली असेल, याचा विचार करणे. असेल काही तरी परिस्थिती म्हणून वागली असेल तसे, या अनुषंगाने विचार करणे. त्या व्यक्तीची मनःस्थिती, स्वभाव, अपरिहार्यता समजून घेणे.

हाच प्रवास उलट दिशेने पण होऊ शकतो – उलटा टेन्सोमीटर शांत – त्याने माझ्यावर कमेन्ट / शेरा दिला. लेबलांकडे दुर्लक्ष करून मी संदेश घेतला, त्यावर विचार / चिंतन करून बोध घेतला. चिडचिड – पण का बरं असे बोलावे मला? त्रागा – हा माणूस नेहमी असाच बोलतो. राग – हा मलाच असे बोलत असतो, माझ्या मनाचा विचारच नाही. संताप – याला चांगली अद्दल घडवली पाहिजे. बेभान – काहीही झालं तरी आता मी याला सोडणार नाही.

आपल्या भावनांच्या तीव्रतेचे नियमन करण्यासाठी टेन्सोमीटर कसा वापरायचा हे काही उदाहरणातून आणि थोर व्यक्तींच्या प्रेरणादायी चरित्रातून आपण बघूया. शेतकऱ्याचा देश कुठलाही असू दे, त्याची शेतीप्रती असणारी निष्ठा ही एकसमान असते. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे शेती आणि शेतीविषयक संशोधनातील एक प्रेरणादायी चरित्र. खूप बिकट परिस्थितीला तोंड देत शिक्षण पूर्ण करत असताना कार्व्हर यांना बुकर टी वॉशिंग्टन नावाचे गुरू मिळाले.

त्यातून कार्व्हर यांना शेतीविषयक सर्व ज्ञान मिळाले. हातचं काहीही राखून न ठेवता, काही भेदाभेद न करता कार्व्हर यांनी स्वत:चं सगळं ज्ञान व तंत्रज्ञान शेतकऱ्यांना वाटलं. त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग. शेतकऱ्याला भुईमुगापासून अनेक गोष्टी करून, त्याच्या टरफलापासून दाण्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर वापर करून ते पीक कसं फायदेशीर करता येईल यावर त्यांनी अहोरात्र संशोधन केले, अनेक कृती करून पाहिल्या.

त्यांनी बनवलेले सगळे पदार्थ शिकवायला, प्रात्यक्षिक करून दाखवायला त्यांना जागोजागी बोलावले जायचे. अशाच एका ठिकाणी त्यांना आमंत्रण होते. त्या सभेला बहुसंख्येने गोरे लोक आले होते. कार्व्हर स्वत: तर कृष्णवर्णीय. तीव्र वंशभेदाचा तो काळ. आपणच आमंत्रण दिलेल्या या विद्वान, तज्ज्ञ अतिथी वक्त्यांचा पाहुणचार आणि सन्मान करणे तर दूरच! तिथे कार्व्हर यांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नव्हती. त्यांना सभागृहाच्या बाहेर, कृष्णवर्णीयांसाठी असलेल्या सार्वजनिक नळाच्या ठिकाणी जाऊन ओंजळीने प्यावे लागले.

अशा प्रसंगी कार्व्हर यांना नक्कीच खूप दु:ख झाले असणार, अपमानित वाटले असणार! पण कार्व्हर त्या दु:खाला कुरुवाळत बसून नैराश्याकडे गेले नाहीत. (आकृती १) कार्व्हर यांनी काय विचार केला असेल? “मी इथे कोणत्या उद्दिष्टासाठी आलो आहे, तर या शेतकऱ्यांची शेतीविषयक समज वाढविण्यासाठी, आदरातिथ्य स्वीकारण्यासाठी नाही.

माझ्या शिकवणीचा त्यांना फायदा झाला तर कदाचित भविष्यात त्यांचा माझ्याविषयीचा आदर वाढेल, अशी शक्यता आहे. पण आता तो माझा मुख्य उद्देश नसून माझ्या देशातल्या सर्व शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणं हा आहे. त्यामुळे माझे आदरातिथ्य झाले नाही याला मी किती प्राधान्य द्यावे?” अशा प्रकारच्या विचारांमुळे कार्व्हर स्वत:ला नैराश्याकडे जाण्यापासून रोखू शकले.

आपला टेन्सोमीटर मध्यभागी ठेवू शकले! मन कशाला महत्त्व देतं त्यावर ठरतं की आपण कूल राहणार का फुल टेन्शनमध्ये राहणार. होणाऱ्या दु:खाचं रूपांतर नैराश्यामध्ये करायचं की वेगळा पर्याय शोधायचा हे स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं. सावित्राबाई फुले यांना त्या काळात समाजाने जो त्रास दिला त्यामुळे त्यांना आणि जोतिबांना नक्कीच दु:ख झालं असेल. पण त्यांनी त्यांच्या टेन्सोमीटरला नैराश्य या फूल टेंशनच्या टोकाला जाऊ दिले नाही.

त्यांनी तसे केले असते, तर कदाचित एकट्या सावित्रीबाई शिकल्या असत्या. पण आपल्या पलीकडे जाऊन काम करायचं या विचाराने दोघांनी आपला टेन्सोमीटरचा काटा प्रयत्नपूर्वक मध्यभागी ठेवला. त्यामुळेच स्त्री शिक्षणाची चळवळ पुढे जाऊ शकली. फुले, आंबेडकर, कार्व्हर अशा अनेक व्यक्तींची चारित्रे, त्यातील बिकट प्रसंग आपण अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल, की स्वत:च्या टेन्सोमीटरबद्दल त्यांची जाण खूप चांगली होती.

आपल्या भावना आणि त्या ओळखून टेन्सोमीटरचा काटा मधोमध ठेवणे हे त्यांना सरावाने जमात होते. या सामाजिक नेत्यांची आव्हाने मनोसामाजिक होती. मात्र शिवाजी महाराजांसारखे राजे, लढवय्ये, नेते यांना कित्येक वेळेस जीवशास्त्रीय धोक्यांशीही सामना करावा लागत होता. या सर्वांना आपले ध्येय आणि त्याचे महत्त्व पुरते ठाऊक होते. ध्येयाला पोषक असे दृष्टिकोन ते निवडत होते.

त्यांचे परिस्थितीकडे बघण्याचे हे दृष्टिकोन त्यांना त्यांच्या टेन्सोमीटरची स्थिती मध्यभागी ठेवायला मदत करत होते. ध्येयाबद्दल स्पष्टता असली की कसोटीच्या प्रसंगी आपला टेन्सोमीटर फूल टेंशनला जाऊ द्यायचा नाही आणि यश मिळालं तरी नील टेंशनला येऊ द्यायचा नाही! स्वत:च्या टेन्सोमीटरची योग्य जाण असणं आणि त्याचा यथोचित वापर करणं हे आपल्याला शिकायला हवं आहे.

कसोटीच्या प्रसंगी कूल टेंशन वर रहायचं तर टेन्सोमीटरवर सतत काम करत राहायला हवं. आपल्या विचारांबद्दल जाणीव असणं, त्यातले विवेकी विचार ओळखणं, भावना आणि त्यांची तीव्रता ओळखणं यातूनच आपल्याला टेन्सोमीटरचा योग्य वापर करायला जमणार आहे.

संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी

kartashetkari@gmail.com आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com