
Solapur News: राज्यातील दूध उत्पादन जवळपास ३० टक्क्यांनी घटले आहे. उत्पादन कमी होऊनही खरेदी दरातील घसरण मात्र सुरूच आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रति लिटर ३८ ते ४० रुपयांवर पोहोचलेला दूधदर, गेल्या दीड महिन्यापासून मात्र थेट ३० ते ३२ रुपयांवर आला आहे. उत्पादन खर्च आणि मिळणारा दर याचा मेळ बसत नसल्याने दूध उत्पादकांची आर्थिक कोंडी झाल्याचे चित्र आहे.
पशुखाद्याचे वाढते दर, चाराटंचाई आणि दुधाला मिळणारा जेमतेम दर यामुळे दूध उत्पादक आर्थिक अडचणीत आले आहेत. परिणामी, दूध उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. राज्याच्या एकूण दूध उत्पादनात जवळपास ३० टक्क्यांनी घट झाली आहे. राज्याचे दूध संकलन प्रतिदिन सुमारे दोन ते सव्वादोन कोटी लिटरपर्यंत होते. त्यात सर्वाधिक जवळपास ७० टक्के गाईच्या दुधाचा समावेश आहे.
परंतु सध्याची दूधदराची स्थिती शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. सध्या गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३० ते ३२ रुपये दर मिळत आहे. तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ४५ रुपये दर मिळत आहे. मागच्या महिन्यातच १ जूनला गाईच्या दुधाच्या दरात १ रुपया आणि म्हशीच्या दुधाच्या दरात २ रुपयांनी कपात केली आहे. आज दीड महिन्यानंतरही हे दर जैसे थेच आहेत. शिवाय फॅटनुसार तो कमी-अधिक होतो, त्यामुळे त्यात पुन्हा १-२ रुपयांची घसरण होतेच, त्यामुळे दूध उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
नफेखोरीचे वास्तव
शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या गाईच्या दुधाचा खरेदी दर ३०-३२ रुपयांवर आणण्यात आला. पण खासगी संघ आणि संस्थांकडून पुढे हेच दूध ग्राहकांना पॅकिंग पिशव्यांमधून ४५ ते ४८ रुपयांपर्यंत विक्री होते, म्हशीचे दूध ७० ते ७२ रुपयांपर्यंत विक्री होते. त्यामध्ये मात्र कोणतीही कपात केली गेलेली नाही. विशेष म्हणजे दूध पावडर, बटर यासाठी एकूण दुधापैकी ३५ ते ४० टक्के दूध वापरले जाते, उर्वरित ६०-६५ टक्क्यांपर्यंतचे दूध पिशव्यांमधून विकले जाते, प्रक्रियायुक्त दुग्धजन्य पदार्थांसाठी साधारण प्रतिलिटर १ ते २ रुपयांचा खर्च गृहीत धरला, तरी शेतकऱ्यांकडून कमी दरात दूध घेऊन पुढे प्रतिलिटर १५ ते २० रुपयांचा अधिकचा नफा मिळवत नफेखोरी केली जाते, हे वास्तव आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.