
Farm Management:
शेतकरी नियोजन । पशुपालन
शेतकरी : सौरभ गोवर्धन शिंदे
गाव : पानसवाडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर
एकूण शेती : ९ एकर
एकूण जनावरे गाई १०, म्हशी २, ८ वासरे
अहिल्यानगर जिल्ह्यातील पानसवाडी (ता. नेवासे) येथील सौरभ गोवर्धन शिंदे यांनी बारावीनंतर डेअरी डिप्लोमाचा कोर्स पूर्ण करून घरची शेती आणि दुग्ध व्यवसायाची जबाबदारी सांभाळली. पशुपालन व्यवसायामध्ये दर्जेदार चाऱ्याची उपलब्धता करून उत्तम दूध उत्पादन असा मंत्र त्यांना जपला आहे. गोठ्यातील उपलब्ध शेणखताची चारा पिकांच्या लागवडीमध्ये वापर करून दर्जेदार चारा उत्पादन घेत पशुपालन व्यवसाय यशस्वी केला आहे.
शिंदे कुटुंबाची आठ एकर शेती आहे. आधी त्यांच्याकडे दोन गाई होत्या. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ केली. सध्या गोठ्यात १० गाई, २ म्हशी आणि ८ वासरे आहेत. गोठ्यातील कालवडींची विक्री न करता पशुपालन व्यवसाय वृद्धिंगत केला आहे.
जनावरांच्या संगोपनासाठी त्यांनी चार वर्षांपूर्वी मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली आहे. त्यात पाण्यासाठी हौद बांधला आहे. शेतामध्ये जनावरांना दर्जेदार आणि पौष्टिक चारा, हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी गिन्नी गवत, घास यासह अन्य चारा पिकांसाठी २ एकर क्षेत्र राखीव ठेवले आहे. उर्वरित क्षेत्रावर कांदा, गहू, कापूस, तूर, ऊस आदी पिकांची लागवड आहे. सध्या गोठ्यातून प्रतिदिन १०३ लिटरपर्यंत दूध संकलन होते. दुग्ध व्यवसायात सौरभ यांना वडील गोवर्धन, आई मनीषा यांचीही मदत मिळते. दुग्ध व्यवसायामध्ये सुयोग बेहळे यांचे त्यांना मार्गदर्शन मिळते.
व्यवस्थापनातील बाबी
गोठ्यातील दैनंदिन कामांना सकाळी पाच वाजता सुरुवात होते. प्रथम मुक्त गोठ्यातील गाई दूध काढणीसाठी दावणीला आणून बांधल्या जातात. त्यानंतर दूध काढणी यंत्राद्वारे दूध काढणी केली जाते. त्यानंतर चारा व खुराक दिला जातो. दूध काढणी आणि खाद्य खाऊन झाल्यानंतर गाई दिवसभर मुक्त संचार गोठ्यात मोकळ्या सोडल्या जातात.
दररोज सकाळी एका गाईला साधारण २० ते २२ किलोपर्यंत कुट्टी केलेला चारा दिला जातो. त्यात प्रामुख्याने गिन्नी गवत, ऊस, मुरघास यांचा वापर असतो. सकाळी द्यावयाची कुट्टी ही रात्रीच करून ठेवलेली असते.
दुभत्या गाईला तिच्या दूध देण्याच्या क्षमतेनुसार दररोज सकाळी व संध्याकाळी अडीच किलोपर्यंत पशुखाद्य दिले जाते. त्यात गोळीपेंड, वालीस, सरकी पेंड यांचा समावेश असतो. पावसाळा व हिवाळ्यात थंडीच्या काळात मका, गहू, तूर, सोयाबीन भुस्सा यांचा वापर चाऱ्यात केला जातो.
संध्याकाळी चार वाजता पुन्हा दूध काढणी, चारा व अन्य कामे नियमित केली जातात. सकाळप्रमाणेच सायंकाळी चारा, खुराक दिला जातो. खुराक भिजवून दिल्याने दूध वाढीला फायदा होत असल्याचा शिंदे कुटुंबाचा अनुभव आहे.
नवजात वासरांची काळजी
जन्मानंतर नवजात वासरांची विशेष काळजी घेतली जाते. त्यांना ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था केलली आहे. तेथे त्यांचे स्वतंत्र संगोपन केले जाते. जन्मल्यानंतर साधारण महिनाभराने वासरांना जंताची मात्रा दिली जाते. लहान वासरांना साधारणपणे तीन महिन्यांपर्यंत गाईलाच दूध पिऊ दिले जाते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दूध पाजण्याचे प्रमाण कमी करून खाद्य खाण्याची सवय लावली जाते. तीन महिन्यांपर्यंत दूध पाजणे पूर्णतः थांबविले जाते. त्यानंतर लहान वासरांना त्यांच्या वयानुसार खाद्य, आहार दिला जातो. लहान वासरांचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे पुढील वाढीला चालना मिळते.
आरोग्य व्यवस्थापन
गोठ्यातील प्रत्येक जनावराचे नियमितपणे लसीकरण करण्यावर भर दिला जातो. प्रतिबंधात्मक म्हणून लाळ्या खुरकूत, लम्पी त्वचा आजार यांचे प्राधान्याने लसीकरण केले जाते, तसेच गोचीड तापाचे देखील लसीकरण केले जाते. लसीकरणासाठी स्थानिक सरकारी पशुवैद्यकांची मदत व मार्गदर्शन घेण्यावर भर दिला जातो. गाईंना सिमेन्स भरताना दर्जेदार व अधिक उत्पादन देणाऱ्या गाई तयार होतील, असे सिमेन्स भरण्यावर भर दिला जातो. आतापर्यत पाच ते सहा गाई अशा तयार झाल्या आहेत.
मुरघास निर्मिती
चाराटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी घरच्या मक्यापासून दरवर्षी १३ ते १५ टनांपर्यंत मुरघास तयार केला जातो. त्यासाठी मक्याच्या सुधारित वाणाची घरच्या शेतामध्ये पेरणी केली जाते. मुरघास निर्मितीसाठी मक्याचे उत्पादन घेताना शेणखतासह टोकण पद्धतीने लागवड, लागवडीत ठिबकचा वापर यामुळे उत्पादनात वाढ मिळण्यास मदत झाली. शेणखताच्या वापरामुळे दर्जेदार चारा पिकांच्या उत्पादनासह इतर पिकांच्या उत्पादनातही वाढ झाली आहे. मुरघासामुळे टंचाईच्या चाराटंचाईवर मात करता येते, तसेच दूध उत्पादनात सातत्य राखणे शक्य होत असल्याचे सौरभ शिंदे सांगतात.
शेतातील चारा पिकांचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतामध्ये शेणखतासह सेंद्रिय खतांच्या वापरावर भर दिला जातो.
दरवर्षी गोठ्यामधून सुमारे ४० टनांपर्यंत शेणखत उपलब्ध होते. उपलब्ध सर्व शेणखत चारा पिकांसह इतर पिकांच्या लागवडीत वापरले जाते. शेणखताच्या वापरामुळे शेती सुपीक होण्यास मदत झाली आहे.
- सौरभ शिंदे, ९३५६१३५६६१
(शब्दांकन : सूर्यकांत नेटके)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.