
Nashik News: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत सरदार पटेल सहकारी दूध महासंघाची स्थापना करण्यात आली. हा महासंघ बहुराज्य सहकारी संस्था अशा स्वरूपाचा असून, भारतातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी चक्रीय आणि समावेशक अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने संघाची स्थापना करण्यात आली आहे.
दुधाची खरेदी तसेच संलग्न सेवांपासून ते योग्य किंमत आणि बाजारपेठेत स्थान मिळेपर्यंत संपूर्ण साखळी तयार करण्याची या माध्यमातून संकल्पना आहे. ३ जुलै रोजी या महासंघाची स्थापना करण्यात आली. ही सहकारी संस्था बहुराज्य सहकारी संस्था कायदा, २००२ च्या कलम ७ अंतर्गत गांधीनगर येथे नोंदणीकृत आहे.
आणंद (गुजरात) येथे आयोजित विशेष सहकार संमेलनात या बहुराज्य दूध संघाची घोषणा व बोधचिन्हाचे अनावरण मंत्री शाह यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात विधानसभेचे अध्यक्ष शंकरचौधरी, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री कृष्णपाल, जॉर्ज कुरियन, प्रा. एस. पी. सिंह बघेल, गुजरातचे कृषिमंत्री राघव पटेल, सहकार मंत्री जगदीश विश्वकर्मा, गुजरात विधानसभेचे उपाध्यक्ष जेठाभाई आहिर, केंद्रीय सहकार सचिव डॉ. आशीष कुमार भूटानी, ‘अमूल’चे अध्यक्ष श्यामलभाई पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
संघाच्या माध्यमातून २० राज्य व २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये दूध संकलन प्रक्रिया प्रस्तावित आहे. यामध्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू आणि तेलंगणा यासह दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव यांचा समावेश आहे.
गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ (अमूल) मुख्य प्रवर्तक असून २०० कोटी रुपयांच्या प्रारंभिक निधीद्वारे नियोजित आहे. गुजरातबाहेरील लहान आणि नोंदणीकृत नसलेल्या दुग्ध उत्पादकांना एकत्र आणणे, सहकारी सदस्य बनण्यास आणि सामूहिक सहभागाद्वारे त्यांचे जीवनमान सुधारण्यास सक्षम करणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. यात अमूलची मुख्य भूमिका आहे.
राज्य संघाशी संलग्न नसलेल्या दूधसंस्था जोडणार
स्थापन झालेला हा महासंघ अमूल मॉडेलवर काम करणार आहे. ज्यामध्ये गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ, गुजरातबाहेरील दूध खरेदी करणारे दूध संघ आणि सहभागी राज्यांमधील ग्रामीण सहकारी संस्था यांसारखे सदस्य समाविष्ट असतील. या निर्णयामुळे दुग्धजन्य मूल्य साखळी मजबूत होईल, रास्त किंमत आणि सहकारी चळवळीद्वारे ग्रामीण समृद्धीला चालना मिळेल, असे सांगण्यात आले आहे. देशात गाव पातळीवरील ज्या सहकारी संस्था राज्यस्तरीय सहकारी दूध संघाशी संलग्न नाहीत, अशा सहकारी दूध संस्था जोडण्याचा मानस आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.