Sugarcane Farming: ऊस पुर्नःरोप लागण पद्धत अन् व्यवस्थापन

Sugarcane Farming Technique: रोपाद्वारे ऊस लागण केल्यास बेणे आणि लागण खर्चात बचत होते. तसेच किमान एक महिना वेळेमध्ये बचत होते. एक डोळा रोप निर्मितीच्या विविध पद्धती आहेत.
Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgrowon
Published on
Updated on

रमेश गायकवाड,डॉ.अशोक कडलग

Agriculture Innovation: राज्यात लागण हंगामाप्रमाणे जून ते मार्च या कालावधीत मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड होत असते. शेतकरी हंगाम निहाय विविध प्रसारित व पूर्व प्रसारित जातींचा वापर करून बेण्याद्वारे किंवा एक डोळा रोपाद्वारे लागण करतात. शेतकरी बेण्याएेवजी एक डोळा रोप लागणीस प्राधान्य देत आहेत, कारण रोपाद्वारे लागण केल्यास बेणे,लागण खर्चात बचत होते. तसेच एक महिना वेळेमध्ये बचत होते. एक डोळा रोप निर्मितीच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये सुपर केन नर्सरी, गादी वाफा पध्दत आणि ४२, ६० व ७० कप प्रो ट्रे तसेच एक डोळा पद्धतीचा वापरकरून रोप निर्मिती केली जाते.

गादी वाफा पध्दत

१ मीटर रुंद आणि १० मीटर लांबीचे वाफे तयार करावेत. गादी वाफे तयार करताना तळाशी प्लॅस्टिक पेपर किंवा खतांच्या रिकाम्या पिशव्या अंथरून त्यावर चांगले कुजलेले शेणखत व मातीचा मिश्रणाचा सहा इंच जाडीचा थर द्यावा. त्यावर बुरशीनाशक, कीटकनाशकाची बेणे प्रक्रिया केलेल्या दोन इंचाच्या एक डोळा कांड्या लावाव्यात. यासाठी कांडीतील अंतर एक ते दोन इंच आणि दोन ओळीतील अंतर एक इंच याप्रमाणे मांडणी करावी. त्यावर दोन ते अडीच सेंमी मातीचा थर दिल्यास अर्ध्या गुंठा क्षेत्रात (५० चौमी) एक हेक्टर क्षेत्राला पुरतील एवढी रोपे तयार होतात.

रोपे काढताना गादी वाफ्यास पाणी देवून रोपे काढल्यास मुळ्या तुटत नाहीत आणि सुकत नाहीत. काढलेल्या रोपांची लागवड लवकर केल्यास रोपे मरीचे प्रमाण कमी होते. यासाठी खर्च सुध्दा कमी येऊन बेणे वाहतुकीचा खर्च कमी होतो.

Sugarcane Farming
Sugarcane Farming : एकरी ११० टन ध्येयातून ऊस उत्पादन

प्लॅस्टिक प्रो-ट्रे पध्दत

प्लॅस्टिक प्रो ट्रे ४२ आणि ६० कप, ५६० मि.मी. ३६० मि.मी. ७० मि.मी. आकार, ७५० मायक्रॉन जाडीचे वापरावेत. कोकोपीट हे चांगले निर्जंतुक केलेले असावे. त्याचा सामू ६.५ ते ७.५ असावा. नत्रः कर्बाचे प्रमाण २०:१, ईसी. ०.६ ते १०७ डेसिसायमन प्रति मिटरपर्यंत असावा, धाग्यांचे प्रमाण १० ते १५ टक्के व ओलावा २० टक्के पर्यंत असावा.

एका ट्रे चे मिश्रण तयार करण्यासाठी कोकोपीट १ ते १.५ किलो, तांबडी माती ०.२५ किलो आणि रेती ०.२५ किलो या प्रमाणात घेऊन मिश्रणास बुरशीनाशक व सूत्रकृमी नियंत्रणासाठी प्रक्रिया करावी. प्रक्रिया युक्त मिश्रण ट्रेमध्ये भरून बेणे प्रक्रिया केलेली एक डोळा टिपरी वापरून ट्रे पूर्णपणे भरावा. हलके पाणी देऊन २०० किंवा ५०० मायक्रॉन प्लॅस्टिक पेपरने हवामानानुसार ७ ते ९ दिवसापर्यंत झाकून ठेवावा. त्यामुळे रोपे लवकर तयार होण्यास मदत होते.

३० ते ३५ दिवसाची रोपे लागणीस योग्य असतात. ही रोपे सुध्दा जोमाने वाढतात. फुटव्यांची संख्या जास्त मिळते. त्यामुळे बेणे उसाची संख्या आणि कांड्यांची संख्या जास्त मिळते. ४२ कप प्लॅस्टिक ट्रे मधील रोपांचे मरीचे प्रमाण कमी आहे. ६० ते ७० कपाच्या ट्रे मधील रोपांची विशेष काळजी घेतल्यास मर कमी होते.

एक डोळा चकती पध्दत

प्रो-ट्रे मध्ये एक डोळा चकतीचा वापर केल्यास साधारणपणे २५ ते ३० किलो वजनाच्या चकतीमध्ये एका एकरासाठी लागणारी रोपे तयार होतात. चकती काढून राहिलेल्या उसाचा चाऱ्यासाठी किंवा गाळपासाठी वापर होतो.

उसापासून डोळ्याची चकती काढण्यासाठी कुशल व अनुभवी मनुष्यबळ लागते. डोळे उगवणीचे प्रमाण ८० ते ८५ टक्के असते. रोपे मरण्याचे प्रमाण १० ते १५ टक्के असते. या पद्धतीत सुध्दा उसाची वाढ जोमाने होऊन बेणे संख्या जास्त मिळते.

Sugarcane Farming
Sugarcane Farming: उसाला तुरा येण्याची कारणे, उपाय

रोप लागवडीनंतरचे व्यवस्थापन

लागणीनंतर रोपास जोम धरण्यास १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. लागणीपासून ७५ दिवसांपर्यंत हलके व वरचेवर पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास रोप नीट वाढत नाही. मुळ्या खोलवर जात नाहीत, ऊस मोठा झाल्यावर लोळण्याची शक्यता असते.

लागवडीनंतर ८ ते १० दिवसांनी वापसा असताना शिफारस केलेल्या निवडक तणनाशकाची फवारणी करावी. लागणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी फुटवे फुटण्यास सुरवात होते, अशा अवस्थेत शेत तणविरहित असावे.

पिकाची ५० ते ५५ दिवसांनी पाहणीकरून जेठा कोंबाची वाढ व फुटव्यांची वाढ एक समान असल्यास जेठा कोंब काढू नये. त्यानंतर सुक्ष्म अन्नद्रव्यांची आठ दिवसांनी पहिली फवारणी करावी.

रोप लावल्यानंतर जमीन वापशावर असताना जिवाणू खत २.५ लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात पहिली आळवणी आणि पुढील प्रत्येक महिन्यात २.५ लिटर प्रति हेक्टर या प्रमाणे तीन वेळेस आळवणी करावी.

लागणीच्या वेळी रोपाचे वय ४५ दिवसांपेक्षा जास्त असल्यास लागणीनंतर फुटवे येण्यास सुरुवात होते.

जेठा कोंब आणि बुडातून येणारे फुटवे यांची वाढ एक

समान नसेल तर जेठा कोंब हलका हिसका देऊन काढावा, म्हणजे येणाऱ्या सर्व फुटव्यांची वाढ एक समान होईल.

ऊस कांडीवर येण्यापूर्वी सूक्ष्म अन्नद्रव्याची दुसरी फवारणी केल्यास वाढ जोमाने व एक समान होते.

मोठ्या बांधणीच्या वेळी एका बेटास सरासरी १२ ते १८ फुटवे सरीच्यावर आल्यानंतर शिफारशीत खत मात्रा देवून मोठी बांधणी करावी. म्हणजे मरणाऱ्या फुटव्यांची संख्या कमी होते. खोडकीड, कांडी कीड व शेंडे किडीचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करावे.

ठिबक सिंचन असल्यास पाण्यात विरघळणाऱ्या रासायनिक खतांचा (उदा. युरिया, पांढरे पोटॅश) वापर केल्यास कमी खर्चात खत सिंचन करता येते. या करिता शिफारशीत खत मात्रांचा अवलंब करावा.

पूर्वहंगामीसाठी ३४० किलो नत्र आणि सुरू हंगामासाठी २५० किलो नत्र प्रति हेक्टरी चार हप्त्यात द्यावे. स्फुरद १७० किलो प्रति हेक्टर आणि पालाश ११५ किलो प्रति हेक्टरी प्रत्येकी ५० टक्के लागणीच्यावेळी आणि ५० टक्के हप्ता मोठ्या बांधणीच्या वेळी विभागून द्यावा.

लागणीच्यावेळी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास प्रती हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो

झिंक सल्फेट आणि १० किलो मँगेनीज सल्फेट आणि ५ किलो बोरॉन सेंद्रिय खतामध्ये मिसळून द्यावे.

Sugarcane Farming
Sugarcane Management : वाढत्या तापमानात ऊस पिकाचे व्यवस्थापन

रोप लागणीचे फायदे

बेणे बचत होते. नवीन प्रसारित जात कमी कालावधीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचते.

सर्व फुटव्यांची वाढ एकसमान झाल्याने प्रति एकरी ऊस संख्या जास्त मिळाल्याने उत्पादनात वाढ.

खोडवा पीक चांगले येऊन उत्पादनात वाढ.

ऊस लोळणे, पडण्याचे प्रमाण कमी होऊन रोग व किडींचा उपद्रव कमी होतो.

मोठ्या बांधणीपर्यंत प्रत्येक रोपांची देखभाल करता येते, त्यामुळे नांग्या पडण्याचे प्रमाण कमी होते.

फुटव्यांची संख्या, जास्त होऊन मोठ्या बांधणीपर्यंत अपेक्षीत पक्व ऊस संख्या ठेवण्यास मदत होते.

रोप पुर्नःलागण करताना घ्यावयाची काळजी

रोप ३० ते ३५ दिवसांचे असताना लागण करावी.

लागणी अगोदर रोपाची पाने शेंड्याकडून १ ते १.५ इंचापर्यंत कापावीत.

जास्त वयाच्या रोपांचा वापर केल्यास फुटव्यांवर परिणाम होतो.

लागणी अगोदर रोपांना पाणी द्यावे. लागण करताना ट्रे मधील मिश्रणाचा गोळा फुटणारा नाही याची दक्षता घ्यावी.

लागणी अगोदर सरीस पाणी घ्यावे. पावसाळ्यात पाणी साठत असल्यास वापसा झाल्यानंतर सरीच्या बगलेत रोपांची लागण करावी.

शिफारशीत रासायनिक खत मात्रेपैकी ५० टक्के मात्रा खड्ड्यात मातीत मिसळून आणि त्याबरोबरच दाणेदार कीटकनाशकाचा वापर रोप लागणीच्या वेळी करावा.

रोपांची लागण सरीत जास्त खोलवर करू नये, कारण यामुळे फूट कमी होते.

लागणीनंतर पाण्याचा प्रवाह कमी ठेऊन हलके पाणी द्यावे.

दोन रोपातील अंतरावर रोपांची संख्या निश्चित करावी.

रोपांना मर आल्यास वापसा असताना कार्बेन्डाझिमची (२ टक्के) आळवणी करावी.

नांग्या भरण्यासाठी ५ ते १० टक्के जादा रोपे राखून ठेवावीत.

सरी आणि रोपातील अंतराप्रमाणे प्रती एकरी लागणारी रोपे

दोन रोपांतील अंतर सरीमधील अंतर जोड ओळ पट्टा पध्दत

४ फूट ४.५ फूट ५ फूट २.५ x ५ फूट ३x६ फूट

१.५० फूट ७,२६० ६,४५३ ५,८०८ ७,७५० ६,४५३

२ फूट ५,४४५ ४,८४० ४,३५६ ५,८०८ ४,४४०

२.५० फूट ४,३५६ ३,८७२ ३,४८५ ४,६४८ ३,८७२

- रमेश गायकवाड, ९८८१३२७३५५

(शास्त्रज्ञ आणि प्रक्षेत्र व्यवस्थापक)

- डॉ.अशोक कडलग, ८२७५०३३८२३

(प्रमुख शास्त्रज्ञ, पीक उत्पादन व संरक्षण विभाग)

(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट,मांजरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com