
Pune News : साखर कारखान्यांचे गाळप दिवस १५० दिवसांच्या पुढे नेण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने केला आहे. त्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ऊस लागवडीसाठी संघाने राज्यस्तरीय मोहीम चालू केली आहे. साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी सांगितले की, राज्याचा गाळप हंगाम सरासरी अवघ्या ८३ दिवसांवर आला आहे.
साखर उद्योगातील अर्थशास्त्रानुसार गाळप दिवस किमान दीडशे दिवसांपर्यंत हवेत. गाळप दिवस घटल्याने यंदा सर्व कारखान्यांचे ताळेबंद तोट्यात गेले आहेत. दुसऱ्या बाजूला एफआरपी देण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. या दुष्टचक्रातून सोडविण्याची ताकद केवळ एआयमध्ये आहे.
सध्याचे ऊस लागवड तंत्र जुनाट असल्याने उत्पादकता घटली आहे. त्यामुळे गाळपाचे दिवस पुन्हा किमान १६५ दिवसांच्या पुढे नेण्याचा संकल्प संघाने सोडला आहे. एआय तंत्र जलदपणे स्वीकारण्याचा आग्रह साखर संघाने कारखान्यांकडे धरला आहे.
कारखाने आता थेट ‘एआय’च्या प्रक्षेत्रावर
दरम्यान, कारखान्यांना या तंत्राची ओळख होण्यासाठी प्रक्षेत्रावर जाऊन एआयची प्रत्यक्ष ओळख व माहिती दिली जात आहे. यासाठी अलीकडेच तीन दिवस मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले.
बारामती कृषी विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पहिल्या टप्प्यात निवडक जिल्ह्यांमधील ४२ साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक असे १४० प्रतिनिधी; तर प्रशासनातील २१५ कार्यकारी संचालकांसह अधिकारी सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे ५३३ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही या उपक्रमात सामील करून घेण्यात आले. या वेळी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष व अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी मार्गदर्शन केले.
राज्याची पुन्हा आघाडी शक्य
साखर संघाच्या म्हणण्यानुसार, राज्यात सध्या १३ लाख ७३ हजार हेक्टरवर ऊस लागवड होते. मात्र, गाळप घटल्यामुळे महाराष्ट्र पिछाडीवर गेला असून उत्तर प्रदेशने आघाडी घेतली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील किमान सहा लाख हेक्टर ऊस क्षेत्र एआयखाली आल्यास राज्याला पुन्हा आघाडी घेता येईल.
एआय तंत्राचा वापर केल्यामुळे ऊस उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ व मोठ्या प्रमाणात खते व पाण्याची बचत होत असल्याचे सिद्ध झाले आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्र नेण्यासाठी साखर कारखान्यांचा पुढाकार प्रभावी ठरू शकतो. त्यामुळेच देण्याचे साखर संघाने मोहीम स्वरूपात प्रयत्न सुरू केले आहे.
प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा १३ मेपासून
‘एआय’ संकल्पनेत तांत्रिक मुद्दे असूनही मार्गदर्शन वर्गांना साखर कारखान्यांसह शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ ते १४ मे रोजी उर्वरित जिल्ह्यांचे प्रशिक्षण होणार आहे. यात अहिल्यानगर, धाराशिव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर या भागांतील कारखाने सहभागी होत आहेत, असे साखर संघाकडून सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.