
High Sugarcane Production: सांगली जिल्ह्यातील सधन तालुका म्हणून वाळव्याची ओळख आहे. तालुक्यातील शेतकरी ऊस, हळद शेतीत मास्टर आहेत. तालुक्यातील इस्लामपूर या प्रमुख शहराच्या हाकेच्या अंतरावर साखराळे गाव आहे. राज्यातील प्रसिद्ध कै. राजारामबापू सहकारी साखर कारखाना याच ठिकाणी आहे. याच गावातील विनोद राजाराम बाबर यांची साडेपाच एकर माळरान मध्यम शेती आहे. पूर्वी त्यांची द्राक्ष बाग होती. आज ऊस हे मुख्य पीक आहे. वडील साखर कारखान्यात नोकरी करायचे.
लहान असतानाच त्यांचे निधन झाले. विनोद कुटुंबात सर्वांत मोठे. पाठी दोन बहिणी व भाऊ. त्यामुळे शेती आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी आई अनिता यांच्यासह विनोद यांच्यावर आली. लहान वयात शेतीच्या जबाबदारीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागले. मात्र त्यांनी बहीण- भावांचे शिक्षण जिद्दीने पूर्ण केले. परंतु शेतीतील शिक्षणाचा मात्र त्यांनी ध्यास घेतला. उसाची शास्त्रीय शेती करायची, उत्पादकता वाढवायची असे पक्के ठरवले.
मार्गदर्शनातून शेतीत बदल
सांगली जिल्ह्यातीलच आष्टा येथील सुरेश कबाडे उसातील प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. विनोद यांनी त्यांचे मार्गदर्शन घेण्याचे ठरवले. त्यासाठी ते थेट कबाडे यांच्या मळ्यात पोहोचले. लागवडीपासून ते ऊस गाळपाला जाईपर्यंत सर्व बारकावे समजून घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी साखराळे ते आष्टा अशा सतत फेऱ्यांद्वारे वर्षभर अभ्यास सुरू होता. एकरी शंभर टन उत्पादनाचे उद्दिष्ट सन २०११ मध्ये डोळ्यासमोर ठेवले.
कबाडे यांच्याकडे पाहिलेले एकेक तंत्र वापरण्यास सुरुवात केली. एकरी उत्पादकतेसह जमिनीची सुपीकताही तितकीच महत्त्वाची असते हे विनोद यांना उमगले. जमिनीला पहिलवान करताना पाचट न जाळता ते मातीआड करणे, हिरवळीची खते, पीक अवशेष या बाबींचा वापर सुरू केला. लागवडीसाठी साडेतीन फूट सरीपासून सहा फूट सरीपर्यंत पद्धतीचा अवलंब केला. प्रत्येक वेळी अडचणी आल्या. मात्र ज्ञान, अनुभव व स्वअभ्यासातून उत्तर शोधले.
लागवडीसाठी पाच फूट सरीचा वापर (Organic Sugarcane Farming)
अनुभवातून पाच फूट सरीचा वापर निश्चित केला. त्यातून खते, पाणी यांचा योग्य वापर होण्यासह त्यांची बचत होते. पिकाला सूर्यप्रकाश चांगला मिळतो. उसाची संख्या, पानांची रुंदी चांगली राहते. शेतीतील कष्ट कमी होऊन आंतरमशागतही करणे सोपे होते असे अनुभवण्यास आले. एकरी ३९ हजार ते ४० हजारांपर्यंत उसाची संख्या मिळते.
रोपनिर्मितीकडे कल
सन २०२२ पर्यंत लागवडीसाठी एक डोळा पद्धतीचा अवलंब केला जायचा. त्यामुळे उगवणीसाठी एक महिन्याचा कालावधी जायचा. त्यामुळे रोप निर्मितीचे नियोजन केले. त्यासाठी समविचारी ऊस उत्पादक मित्रांना सोबत घेऊन कोइमतूर येथून को ८६०३२ या वाणाची रोपे आणली. सर्वांनी बेणे प्लॉट तयार करून बेणे वाटून घेतले. उसाचे वय दहा महिने झाल्यानंतर रोपे तयार झाली.
ऊस व्यवस्थापनातील ठळक बाबी
-पुढील कामांचे किमान दहा दिवस आधी नियोजन. मेमध्येच लागणारी सर्व खते, निविष्ठा आणून ठेवतात. त्यामुळे खरेदीची पुढील सर्व धावपळ वाचते.
-बेण्यासाठी दर्जेदार, खात्रीशीर, निकोप उसाची निवड. त्यासाठी दहा महिने वयाच्या उसाचा वापर. एक डोळा पद्धतीचाही लागवडीसाठी वापर.
लागवड व खोडवा ऊस तुटून गेल्यानंतर रोटर वापरून पाचट मातीआड केले जाते.
- खोडवा ऊस तुटून गेल्यानंतर त्यात रोटर वापरून ताग टोकणी होते. ४५ दिवसांनी फुलोऱ्यावर
आल्यानंतर तो मातीआड करतात. त्यानंतर रोटरचा वापर करून जमिनीला विश्रांती. त्यानंतर आडसाली ऊस लागवडीचे नियोजन.
-- आडसाली पद्धतीने एक ते पाच जूनपर्यंत लागवड. पाच बाय दोन फूट अंतरावर लागवड.
- प्रति बेटात सहा ते सातपर्यंत उसाची संख्या. त्यामुळे उसाची जाडी, पेऱ्याची उंची मिळण्यास मदत होते. सूर्यप्रकाश भरपूर मिळून प्रकाश संश्लेषण चांगले होते.
-रोप लावणीनंतर तिसऱ्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि युरियाची आळवणी.
-लागवडीनंतर १३५ ते १४० व्या दिवशी ऊस पाच ते सहा कांड्यावर असतो, त्या वेळी पाला काढून एकाड एक सरीत त्याचा वापर. यात जी सरी मोकळी ठेवली त्याच्या दोन्ही बाजूला कुदळीच्या साह्याने चळ घेऊन पोटॅशिअम शोनाईट एकरी २५ किलो, १२-३२-१६ दोन बॅग मातीआड केले जाते.
-२५० व्या दिवशी दुसऱ्यांदा उसाचा पाला काढून दोन्ही सरीत वापर. यामुळे उन्हाळ्यात दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
-वाफसा पद्धतीने पाणी. त्यामुळे मुळ्यांची कार्यक्षमता चांगली राहते.
-तीन वर्षांपासून रोप पद्धतीने लागवड. एकरी रोपांची संख्या- ५७०० ते ५८००
-प्रति रोप तयार करण्याचा खर्च- १.२० ते १.३० रुपये.
उत्पादन
मागील सहा वर्षांपासून लागवडीच्या उसाचे एकरी १०० टन तर खोडव्याचे ६५ ते ७० टनांच्या दरम्यान उत्पादन विनोद घेतात. मागील वर्षी लागवडीच्या उसाचे एकरी ११७ टन ५३४ किलो, त्या मागील वर्षी एकरी १०५ टन तर २०२१ मध्ये १२४ टन ४३ किलो उत्पादन घेतले. एकरी एक लाखापर्यंत उत्पादन खर्च येतो. कारखान्याकडून प्रति टन ३२०० दर मिळतो. पुढील हंगामात एकरी १४० टन उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
विनोद बाबर, ८८३०९३३०५०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.