
सुहासिनी केदारे, डॉ.आर.बी. क्षीरसागर
Muskmelon Nutrition: खरबुजाची गोडसर चवी, उच्च जलांश आणिताजेतवाने गुणधर्मांमुळे हे फळ अत्यंत लोकप्रिय आहे. रस, सॅलड आणि गोड पदार्थांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. खरबुजामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते (सुमारे ९० टक्के), त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते.
तसेच, हे फळ जीवनसत्त्वे (विशेषतः जीवनसत्त्व अ आणि क), अँटिऑक्सिडंट्स आणि तंतुमय घटकांनी भरलेले असते, जे पचनसंस्थेसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असते.खरबूज पूर्णपणे पिकल्यावर सैल होते आणि वेलीपासून सहज निघते. त्यामुळे योग्य वेळेत काढणी करणे गरजेचे आहे. सकाळी किंवा संध्याकाळी काढणी करावी. गरम तापमानात काढणी केल्यास फळांची प्रत घटते.
फळांना मार बसणार नाही याची काळजी घ्यावी. फुटलेली आणि अति पिकलेली फळे वेगळी करावीत, कारण ही फळे लगेच खराब होतात. आकारानुसार प्रतवारी करावी. जेणेकरून विक्रीसाठी योग्य नियोजन करता येईल. जमिनीवर सरळ ठेवल्यास फळे पटकन खराब होतात. त्यामुळे गवत, पालापाचोळ्यावर फळे ठेवावीत. मातीच्या विटा, वाळू आणि पाणी वापरून साठवणूक कक्ष तयार करता येतो. यात हवा खेळती राहते आणि बाहेरील वातावरणापेक्षा तापमान कमी होते.
आरोग्यदायी फायदे खरबूज हे पोषणमूल्यांनी समृद्ध आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे. यामध्ये भरपूर पाणी, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराच्या अनेक कार्यांसाठी उपयुक्त ठरतात. ९० टक्के पाण्याच्या प्रमाणामुळे शरीराला पुरेशी आर्द्रता मिळते. उन्हाळ्यात उष्णतेपासून संरक्षण होते.भरपूर जीवनसत्त्व क असल्यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होते.
संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.जीवनसत्त्व अ (बेटा-कॅरोटीन) यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत करते. पोटॅशिअम रक्तदाब नियंत्रित ठेवतो, ज्यामुळे हृदयाचे कार्य सुधारते. हृदयरोगाचा धोका कमी होतो.तंतुमय घटकांच्यामुळे पचनसंस्था सुधारते, बद्धकोष्ठता होत नाही. आतड्यांचे कार्य सुरळीत राहते.अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्व क यामुळे त्वचेचा निसर्गरम्य उजळपणा वाढतो. केसांचे आरोग्य सुधारतात. फोलेट (जीवनसत्त्व बी- ९) हे गर्भातील बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे.
गरोदर स्त्रियांसाठी उपयुक्त ठरते.कमी कॅलरी आणि जास्त पाण्याच्या प्रमाणामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. उन्हाळ्यात गॅस्ट्रिक समस्या, डिहायड्रेशन आणि उष्णतेच्या झटक्यांपासून संरक्षणासाठी उपयुक्त आहे.
प्रमुख पोषणतत्त्वे
पोषणतत्त्व महत्त्व व फायदे
पाणी शरीर हायड्रेट ठेवते, उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करते.
जीवनसत्त्व क रोगप्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेसाठी उपयुक्त.
जीवनसत्त्व अ (बिटाकॅरोटीन) डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त, त्वचेला चमकदार बनवते.
पोटॅशिअम रक्तदाब नियंत्रित ठेवतो, हृदयासाठी फायदेशीर.
तंतूमय घटक पचनसंस्था सुधारते, बद्धकोष्ठतेपासून बचाव करते.
फोलेट लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी मदत करते, गर्भवती महिलांसाठी उपयुक्त.
अँटिऑक्सिडंट्स हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढा देतात, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारतात.
-सुहासिनी केदारे, ९३५९००१९२८
(अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.