
Musk Melon Crop : उन्हाळ्यात खरबुजाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. खरबूज पिकाची लागवड पूर्वी फक्त नदीच्या पात्रातच होत होती. मात्र आता या पिकाची लागवड व्यापारी तत्त्वावर खूप प्रमाणात केली जाते.
दुष्काळी भागात येणारे पीक म्हणून खरबूज पीक ओळखले जाते. खरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च महिन्यात केली जाते. लागवड गादी वाफ्यावर करून ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. ८०-१०० दिवसात पीक काढणीस तयार होते.
खरबूज लागवडीसाठी रेताड, मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा. चोपण व पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये. भारी जमिनीत पिकांना नियमित पाणी दिले नाही, तर फळे तडकतात. या पिकाला उष्ण आणि कोरडे हवामान मानवते. म्हणून या पिकाची लागवड उन्हाळ्यात करतात. वेलीच्या चांगल्या वाढीसाठी २४ ते २६ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त आहे.
सुधारित जाती
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुसा सरबती, हरामधू, पंजाब सुनहरी व दुर्गापुरा मधू या जाती शिफारशीत केल्या आहेत. एकरी ३५०-४०० ग्रॅम बियाणं लागतं.
रोपवाटिका व्यवस्थापन पूर्वी खरबूजाची थेट बियाणे टोकून लागवड केली जात होती. मात्र सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार प्लॅस्टिक ट्रेमध्ये म्हणजेच प्रो ट्रे मध्ये वाढविलेल्या रोपांची पुनर्लागवड केली जाते. यामुळे वेलांचे योग्य प्रमाण, मजूर, पाणी आणि इतर निविष्ठांवर होणारा खर्च वाचतो. आणि वेळेचीही बचत होते.
रोपे तयार करण्यासाठी साधारणतः ९८ कप्पे असलेला प्रो ट्रे वापरतात. यामध्ये कोकोपीट भरुन बियाणे लागवड केली जाते. १.५ ते २ किलो बियाणे प्रति हेक्टरी लागते. लागवडीनंतर पाणी द्यावे. लागवड केल्यानंतर ८-१० ट्रे एकावर एक ठेवून काळ्या पॉलिथीन पेपरने झाकून घ्यावेत. झाकल्यामुळे उबदारपणा टिकून राहतो.
यामुळे बी लवकर उगवते. रोपे उगवल्यानंतर ३-४ दिवसांनंतर पेपर काढावा व ट्रे खाली उतरवून ठेवावेत. रोपे सडू नयेत म्हणून पेरणीनंतर दहाव्या दिवशी कॉपर ऑक्झीक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईडची दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. १४ ते १६ दिवसांत म्हणजेच पहिले फुटवे फुटल्यानंतर रोपांची पुनर्लागवड करावी. लागवड १.५ बाय १ मीटर अंतरावर किंवा १.५ बाय ०.५ मीटर अंतरावर करावी.
लागवडीचं तंत्र काय आहे?
लागवडीसाठी ७५ सेमी. रुंद आणि १५ सेमी उंच गादी वाफे तयार करावेत. लागवडीपूर्वी ५०ः५०ः५० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी व लागवडीनंतर एक महिन्याने ५० किलो नत्र प्रति हेक्टर मात्रा द्यावी.
बेसल डोसमध्ये एकरी ५ टन शेणखत अधिक ५० किलो डीएपी अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश + ५० किलो १०ः२६ः२६ + २०० किलो निंबोळी पेंड + १० किलो झिंक सल्फेट मिसळावं. दोन गादी वाफ्याच्या मधोमध लॅटरल येते. याचे अंतर ७ फूट असावे. वाफ्याच्या वरचा माथा ७५ सेमी असावा.
वाफ्याच्या मधोमध लॅटरल टाकून यावर ४ फुट रुंदीचा मल्चिंग पेपर अथंरुन दोन्ही बाजूंनी पेपरवर माती झाकावी. जेणेकरून पेपर वाऱ्यामुळे फाटणार नाही. मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर दोन इंच पाईपच्या तुकड्याच्या सहाय्याने ड्रिपरच्या दोन्ही बाजूंना १० सेमी अंतरावर छिद्रे पाडावीत. ड्रीप लाईनच्या एकाच बाजूच्या दोन छिद्रामधील अंतर १.५ फूट ठेवावं. छिद्रे पाडून झाल्यावर गादीवाफा ओलवून वाफसा आल्यानंतर लागवड करावी.
रोपं लावताना रोप व्यवस्थित दाबून, पेपरला चिकटणार नाही याची काळजी घेऊन लावावं. जेणेकरून रोपांची मर होणार नाही. अशा पद्धतीत एकरी सुमारे ७२५० रोपं लागतात. लागवडीपूर्वी ५०ः५०ः५० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी द्यावे व लागवडीनंतर एक महिन्याने ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.