
Solar Pump Complaint : राज्यांतील सौर कृषी पंपधारकांसाठी तक्रारीची सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. सौर कृषी पंपात बिघाड झाल्यास शेतकऱ्यांना महावितरणच्या मोबाईल अॅपवरून तक्रार दाखल करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट तक्रार आता करता येणार आहे.
राज्यात विविध योजनांच्या माध्यमातून ५ लाख ६५ हजार सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. परंतु विविध कारणांमुळे कृषी पंपात बिघाड होते. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होती. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका सहन करावा लागतो. कारण पुरवठादार कंपन्या तत्काळ तक्रारीची नोंद घेत नाहीत.
यापूर्वी महावितरणने लाभार्थी शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बिघडल्यास तक्रार करण्यासाठी वेबसाईटवर तक्रार, पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार आणि महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रारीचे पर्याय दिले होते. यावर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यामुळे आता मोबाईलवरही महावितरणच्या अॅपद्वारे शेतकऱ्यांना तक्रारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महावितरणच्या अॅपमध्ये वीज ग्राहक त्याचे वीज बील जाणून घेऊ शकतो. तसेच वीज बील भरणे, मीटर रीडिंग नोंदणी, वीज चोरी सूचना, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची माहिती देणे यासाठी शेतकरी वापर करत होते. आता मात्र शेतकऱ्यांना या अॅपमध्ये 'सौर पंप तक्रार' पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
तक्रार कशी करावी?
महावितरण अॅपमध्ये सौर पंप तक्रार पर्याय दिला आहे. शेतकरी या पर्यायावर क्लिक करून सौर कृषी पंपाची तक्रार करू शकतात. तक्रार नोंद करताना शेतकऱ्याला सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक नोंद करणे अनिवार्य आहे.
कोणत्या तक्रारी करता येणार?
सौर कृषी पंप शेतकऱ्यांने बसवल्यानंतर त्यामध्ये बिघाड होऊ शकते. त्यामुळे पंप चालत नसणे, सौर पॅनलची नासधूस होणे, सौरऊर्जा संच बिघाड, सौर पॅनल्सची वा पंपाची चोरी होणं वा पंपातून कमी दाबाने पाणी येणं, या प्रकारच्या तक्रारी शेतकरी महावितरणच्या अॅपद्वारे करू शकतात.
शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर तीन दिवसांत तक्रारीचं निवारण करणं, पुरवठादार कंपन्यांवर बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच सर्व कंत्राटदारांना ज्या जिल्ह्यात सौर कृषी पंप बसवला आहे, अशा सर्व जिल्ह्यात सेवा केंद्र उभारणं बंधनकारक आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीचं निराकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोबाईलवर मेसेज पाठवण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.