
Chh. Sambhajinagar News : खरीप हंगाम २०२५ साठी जिल्ह्याकरिता युरिया ८००० मेट्रिक टन, तर डी. ए. पी १५०० मेट्रिक टन इतका संरक्षित साठा करावयाचा आहे. त्यासाठी नियुक्त पुरवठादार संस्थांनी दिलेल्या कालमर्यादेत खत पुरवठा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
जिल्हास्तरीय संरक्षित खत साठा संनियंत्रण समितीची सोमवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, कृषी उपसंचालक दीपक गवळी, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ रवींद्र पाटील, जिल्हा पणन अधिकारी शशांक पडघन, प्रकल्प संचालक आत्मा धनश्री जाधव, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रशिक्षण संस्थेचे डॉ. सूर्यकांत पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय फुन्से, उपविभागीय कृषी अधिकारी अश्विनी पठारे तसेच खते निर्मिती व पुरवठादार संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय संरक्षित खत साठा संनियंत्रणाकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत कृषी विकास अधिकारी, नियुक्त नोडल एजन्सीचे प्रतिनिधी, खत विक्रेत्यांचे प्रतिनिधी हे सदस्य तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
या समितीच्या मंजुरीनंतर महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महामंडळ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या मार्फत संरक्षित खत साठा विक्रीसाठी उपलब्ध करावयाचा आहे.
वृक्ष लागवडीसाठी अभियान राबवा...
याच बैठकीत कृषी विभागामार्फत कृषी क्षेत्रात विविध प्रयोगशील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराबाबत निवड समितीची ही बैठक घेण्यात आली.
...अशी आहे शिल्लक खतसाठ्याची स्थिती
२०२४-२५ च्या खरीप हंगामात सर्वप्रकारची खते मिळून ३ लाख ९१ हजार १८७ मे.टन इतकी मागणी होती.तर २ लाख ८८ हजार ७०० टन इतके आवंटन मंजूर झाले होते. गत हंगामात जिल्ह्यात २ लाख ८० हजार २६४ टन इतकी खत विक्री झाली असून, ६८ हजार ६२४ टन इतका खत साठा शिल्लक होता.
रब्बी हंगामात १ लाख ६७ हजार ५०० टन खतांची मागणी होती. तर १ लाख ४० हजार इतके आवंटन मंजूर होते. तर शिल्लक खत साठा १ लाख १४ हजार ३५९ टन इतका आहे. मार्च २०२५ अखेर युरिया ३६ हजार ५०७ टन, तर डी. ए. पी. २३३१ टन इतका खतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नियुक्त संस्थांनी मे अखेर हा खतसाठा उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.