Sustainable Farming: जपूयात जमिनीचे फूल...

Soil Health: जुजबी मशागत आणि निसर्गाशी समतोल साधत पीक लागवडीचे नियोजन हा शेती विकासाचा पाया आहे. शेतात योग्य गुणवत्तेचे खत, बाजारात पत आणि घरात एकमत असल्याखेरीज शेतकऱ्यांची प्रगती शक्य नाही.
Farmer
Farmer Agrowon
Published on
Updated on

विश्‍वासभाऊ पाटील

Rural Agriculture Planning: जुजबी मशागत आणि निसर्गाशी समतोल साधत पीक लागवडीचे नियोजन हा शेती विकासाचा पाया आहे. शेतात योग्य गुणवत्तेचे खत, बाजारात पत आणि घरात एकमत असल्याखेरीज शेतकऱ्यांची प्रगती शक्य नाही. जमिनीचे फूल जपले तरच शेतीमध्ये शाश्‍वतता टिकून राहणार आहे.

सोनद नदीकाठी वसलेल्या लोहारा (ता. पाचोरा, जि. जळगाव) गावशिवारात आम्हा पाटील कुटुंबीयांची एकत्रित १२५ एकर शेती. यामध्ये बहुतांश क्षेत्र हे कोरडवाहू तर काही क्षेत्र विहीर बागायती आहे. आमचे कापूस हे जरी मुख्य पीक असले, तरी त्यामध्ये सापळा पीक, आंतरपीक म्हणून जवळपास दहा प्रकारच्या पिकांची लागवड असते. याला आम्ही ‘दहा मजली’ शेती म्हणतो. कोरडवाहू शेतीमध्ये जल- मृदा संधारण, बांधावर वनश्री, सेंद्रिय निविष्ठांचा वापर, पीक फेरपालट, मिश्रपीक पद्धती आणि पीक उत्पादनाचे अर्थशास्त्र ही माझ्या शाश्‍वत शेतीची सूत्रे आहेत.

आपले शेती पर्यावरण मनुष्य, पशुपक्षी, वनस्पती आणि सुपीक जमिनीसोबत जोडलेले आहे. या चारही सजीवांभोवती इतर सजीवांची जीवनप्रणाली केंद्रित आहे. ही जीवनप्रणाली नैसर्गिक पंचमहाभूतांशी (पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश) जोडलेली आहेत. शेतकऱ्यांची पंचमहाभूते म्हणजे जमीन, पाणी, बियाणे, खते आणि पीक संरक्षण. जशी पाचही बोटांची एकसंध मूठ असते,त्याच पद्धतीने शेतकऱ्याच्या पंचमहाभूतांचे व्यवस्थापन एकसंध असावे.

Farmer
Sustainable Agriculture: एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन : शाश्‍वत शेतीचा पाया

जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला असणे ही जमीन जिवंत असल्याची खूण. सेंद्रिय शेती म्हणजे केवळ रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वापराला बंदी असे नाही, तर शेती आणि निसर्गाशी समरस होऊन जगणे आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या भौगोलिक रचनेनुसार मूलस्थानी पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब रुजवावा. यामुळे पावसाचे पाणी आणि माती शेतातून वाहून जाणार नाही. शेतातील काडी कचरा कुजवावा, ते जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचे अन्न आहे. शेती बांधावर वनभिंती तयार कराव्यात. भारतीय शेती पद्धतीमधील विज्ञान आणि इस्रायल दौऱ्यामध्ये आधुनिक शेती पद्धतींचा अभ्यास करून मी शेतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.

वडिलांनी आम्हाला शेती सोबत आर्थिक नियोजनही शिकविले, वायफळ खर्च आम्ही कधी केला नाही. वडिलांनी प्रत्येकाच्या वाट्याला दिलेली शेती आणि रक्कम आम्ही पुढे वाढविली. भावांमध्ये विश्‍वास असल्याने आर्थिक कटुता कोठे आली नाही. सर्व व्यवहार पारदर्शकच राहिले. शेतकऱ्याच्या कौटुंबिक गरजा पूर्ततेसाठी त्यास निव्वळ हंगामाच्या शेवटी मिळणाऱ्या उत्पन्नाऐवजी टप्प्यावर आधारित कालमर्यादेत उत्पन्नदायी शेती करणे गरजेचे आहे.

यासाठी आपल्या भागातील हवामान, जमीन, पीक पद्धती आणि बाजारपेठेचा विचार करून नियोजन करावे. आम्ही पाटील बंधूंनी उपलब्ध जमिनीनुसार तीन महिन्यांची शेती म्हणजेच खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामी पिकांची लागवड, चार महिन्यांची शेती, सहा ते आठ महिन्यांची शेती, दहा ते बारा महिन्यांची शेती, दीड ते दोन वर्षांची शेती (केळी, पपईसारखी पिके), पंधरा वर्षांची शेती (बोर, डाळिंब, पेरू सारखी फळबाग), वीस-पंचवीस वर्षांची शेती (संत्रा, मोसंबी, लिंबू फळबाग) आणि ३५ ते ४० वर्षांची शेती (चिंच, आंबा, चिकू, कवठ, जांभूळ आदी फळपिके) अशा प्रकारे पीकपद्धतीचे नियोजन केले आहे.

Farmer
Sustainable Agriculture Future: ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादनात शाश्‍वत शेतीचे भवितव्य

जमीन करा समृद्ध

सतत वाहत्या वाऱ्यामुळे ओल कमी होते. हे टाळण्यासाठी आम्ही शेती बांधावर पश्‍चिम व दक्षिणेकडे वनभिंती उभ्या केल्या. यात बांबू, लिंब, बेहडा, शेवगा, जांभूळ, उंबर, सीताफळ, रामफळ, बोर अशी विविध प्रकारची झाडे जोपासली. या झाडांवरील पक्षी पिकांवरील कीड नियंत्रण करतात. शेती बांधाकडेने पडलेली पक्ष्यांची विष्ठा, अर्धवट खाऊन टाकलेल्या खाद्यावर असंख्य उपयुक्त जिवाणू जगतात. ते मातीत मिसळतात आणि ती सुपीक होते. वनभिंतीमुळे जमिनीची धूप थांबली, पाणी मुरले. बांबूचे बेट म्हणजे एक प्रकारचा भूमिगत बंधारा म्हणावा लागेल.

मिश्रपीक पद्धती, सेंद्रिय खतांचा पुरेपूरा वापर, आच्छादन, बीज संस्कार, वाफसा आणि सूर्यप्रकाश ही सूत्रे माझ्या सेंद्रिय शेती पद्धतीचा आत्मा आहेत. ओल टिकवण्यासाठी उताराला आडवी बांधबंदिस्ती, नांगरट, वखरणी, पेरणीवर भर दिला आहे. सरी- वरंबा पद्धतीने लागवड केली जाते. सेंद्रिय खतांमुळे पोत सुधारला. आंतरपिकांमुळे निंदणीचा खर्च वाचला. मुख्य पीक, आंतरपीक, सापळा पीक या साखळीमुळे कीड नियंत्रण सोपे झाले.

शेतावर तयार केलेले गांडूळ खत, निंबोळी खत, जीवामृत, दशपर्णी अर्क, नीम अर्क या सेंद्रिय निविष्ठांमुळे पीक व्यवस्थापन खर्चात बचत झाली. सापळा पिके, पक्षी, मित्र कीटकांमुळे पीक संरक्षणावरील खर्च निम्म्यावर आला. जमीन जिवंत झाली आणि पिकाची गुणवत्तादेखील सुधारली. माझ्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण १.१० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तसेच उपयुक्त जिवाणूंचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जमीन सुपीक असेल तरच पीक गुणवत्तापूर्ण येते.

आपली शेती ही गोधनावर आधारित आहे. गाईचे पाय म्हणजेच विठ्ठलाचे पाय दररोज आपल्या शेतीला लागतात, असे मी मानतो. शेतातील गवतावरच जनावरांचे पोषण होते. त्यांच्यापासून सकस दुग्धोत्पादन मिळते. गोठा, शेतीमधील वातावरण नेहमी आनंददायी राहते. खरीप पीक काढणीनंतर मी मोकळ्या शेतात जनावरांचे आखर बसवतो. तेथेच त्यांना चारा, पाणी दिले जाते. दररोज जनावरे बांधण्याची जागा बदलली जाते. फक्त दुधाच्या गाई घरच्या गोठ्यात बांधतो. आखर केल्यामुळे संपूर्ण शेतीमध्ये शेण,मूत्र मिसळले जाते. शेतात बाहेरून शेण आणून मिसळण्याची गरज राहत नाही.

Farmer
Sustainable Agriculture: शाश्वत शेती आव्हाने आणि संधी

प्रयोगांच्या नोंदीतून शिकतोय...

स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेत आम्ही पाटील बंधूंनी शेती प्रयोगांना दिशा दिली. पूर्वीच्या काळी जवळपास ४२ पिकांची लागवड करत होतो. त्यावेळी शेतकरी आम्हाला विचारायचे, हे काय नवीन करताय ? १९८८-८९ मध्ये तालुक्यात पहिले ठिबक सिंचन आम्ही केले. मोसंबी, केळी बागेत ठिबक बसविल्यावर परिसरातील लोक म्हणायचे, थेंब थेंब पाणी देऊन कुठं केळीचे झाड वाढते का ? पण हळूहळू लोकांना आमचे म्हणणे पटत गेले. गावामध्ये लोकसहभागातून जल,मृदा संधारणाला चालना दिली.

साधारणपणे १९८५ ते ९५ पीक उत्पादन स्थिरावले होते. पण व्यवस्थापन खर्च वाढला होता.त्यावेळी सेंद्रिय शेती व्यवस्थापनाची चर्चा सुरू झाली होती. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटी दिल्या, चर्चा केली. तंत्र समजाऊन घेतले. त्यानंतर १९९७-९८ मध्ये आम्ही सेंद्रिय पद्धतीने पीक व्यवस्थापनाकडे वळलो. जमिनीची बांध बंदिस्ती, आच्छादन तंत्र, शेण,गोमूत्राचा वापर, दशपर्णी अर्क, तणांचे आच्छादन, पालापाचोळ्याचे जागेवरच खत, मिश्र पिकांची लागवड, सापळा पिके असे आमचे प्रयोग सुरू झाले. हळूहळू शिकत यशही मिळू लागले.

खर्चामध्ये बचत झाली. महत्त्वाचे म्हणजे जमीन सुपीक होऊ लागली. सेंद्रिय कर्ब वाढीस लागला. हे करत असताना लोकांच्या उलट सुलट प्रतिक्रिया येत होत्या. पण आम्ही शास्त्रीय पद्धतींचा आधार घेत पुढे जाऊ लागलो. जमिनीच्या प्रकारानुसार पीक पद्धतीची रचना तयार झाल्यावर लोकांना पटू लागले. शेतामध्ये शिवारफेरी सुरू झाली. प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञांच्या चर्चेतून आणि प्रत्यक्ष प्रयोगातून दिशा स्पष्ट होत गेली आणि एक शाश्वत पीक पद्धती विकसित होत गेली. शेतकऱ्यांनो, प्रत्येक वर्षी यशस्वी तसेच फसलेल्या प्रयोगांच्या नोंदी ठेवा, त्याच तुम्हाला दिशा दाखवतात, हे कायम लक्षात ठेवा...

कोरडवाहू शेतीची तंत्रे

बांध बंदिस्तीतून शेतात पावसाच्या पाण्याची अडवणूक. जमीन सुपीकतेवर भर देत उताराला आडवी मशागत आणि पेरणी.

शेती बांधावर विविध प्रकारच्या झाडांची लागवड. जैविक बांध बंदिस्ती.पालापाचोळा तसेच पीक, काढणीनंतरची धसकटे, पऱ्हाट्या, तुराट्या न जाळता किंवा बांधावर न टाकता शेतात कुजवून सुपीकता वाढविण्यावर भर.

ठरावीक वर्षांनंतर एप्रिल महिन्यात

शेतात धरणाचा गाळ मिसळून पोत वाढविण्यावर भर.

हवामान खात्याचा अंदाज तसेच आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक परिस्थितीकडे ठेवावे. मुंग्या वारूळ तयार करतात, पक्षी घरटे करतात, पक्षांची किलबिल सुरू होते. या निसर्गाच्या संकेतांचा वेध घेऊन शेतात मृग नक्षत्राच्या पूर्वी धूळ पेरणी करावी. धूळ पेरणीमुळे पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब पिकाच्या वाढीसाठी उपयोगात आणला जातो. एकसारखी पिकाची उगवण होऊन जोम चांगला राहतो. पीक निरोगी राहते.

पेरणीसाठी अवर्षण प्रतिकारक, सरळ वाणांची लागवड.आंतरपीक पद्धतीचा अवलंब. लागवड करताना आंतरपीक हे मुख्य पिकाशी स्पर्धा करणारे नसावे. उदा. तूर-बाजरी (२:३), कपाशी-उडीद (१:१), कपाशी-राळा (१:१), तीळ-तूर (३:२).

मिश्रपिक पद्धती तसेच पट्टापेर पद्धतीचा अवलंब. पट्टा पेर उदा. तीळ-बाजरी (एक आड एक पाभर), ज्वारी-उडीद (एक आड एक पाभर). मिश्रपिक पद्धतीचा वापर.

पिकातील तण काढून ओळीत आच्छादन करावे. जमिनीची सुपीकता आणि उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढविण्यासाठी जीवामृताचा दर पंधरा दिवसांनी वापर. सुपीक जमिनीमुळे अवर्षण काळात पीक टिकून राहते.

फळपिकामध्ये आच्छादन, ठिबक सिंचनाचा वापर.

निमार्क, गोमूत्र, दशपर्णी अर्क, तंबाखू अर्क, वस्त्रगाळ शेण गोमूत्र अर्क अशी अल्पखर्ची घरच्याघरी तयार केलेली कीटकनाशके. फवारणीकरिता उपलब्धतेनुसार तीन ते चार वेळा वापरावीत.

- विश्वासभाऊ पाटील ९७६३४७५७६४

( शब्दांकन : अमित गद्रे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com