
Rural Success Story: भगूर (ता.जि. नाशिक) येथील करंजकर कुटुंबीयांची अल्पभूधारक अशीच ओळख होती. सिंचन सुविधा नसल्याने सव्वादोन एकर जिरायती पिकांवर मिळणारे उत्पन्न मर्यादित होते. त्यामुळे रामदास विठोबा करंजकर यांच्या समोर संघर्ष होता. पदरमोड करून या कुटुंबाने शेतीमध्ये सिंचन सुविधा निर्माण केली. मेथी, पालक अशा पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जायचे. मात्र उत्पन्न मर्यादित असल्याने पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करण्यासाठी म्हशी खरेदी केल्या. मात्र त्यातील अर्थकारण जुळेना.
रामदास करंजकर यांचा मोठा मुलगा विलास हा जवळच असलेल्या सहकारी साखर कारखान्यात हंगामी स्वरूपात नोकरीला होता. त्यांचा विवाह सविता यांच्याशी झाला. साखर कारखान्यात नोकरीला असल्याने शाश्वत रोजगाराची हमी नव्हती. त्यामुळे नोकरी सोडून विलास हे पूर्ण वेळ शेतीत आले. तेव्हापासून त्यांच्यासोबत सविताताई शेतीत राबत आहेत.
स्वतःच्या शेतीबरोबरीने त्यांनी आखणी दोन एकर शेती खंडाने करायला घेतली आहे. अल्पभूधारक शेतीत संधी कमी असल्याने त्यांनी दूध व्यवसाय करण्याचे निश्चित करून सुरुवातीला दोन गाईंची खरेदी केली. त्यातूनच शेती आणि पूरक व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात अनेक आव्हाने होती. मात्र त्यांनी त्यावर मात करत वाटचाल यशस्वीरीत्या केली आहे.
गेल्या काही वर्षांत सविताताईंनी शेती, पशुपालनाची जबाबदारी स्वीकारली. गेल्या दोन दशकांत सातत्यपूर्ण मेहनत, प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य विकास आणि शेतीकामातील प्रयोगशीलतेमुळे सविताताई आता परिसरात आदर्श शेतकरी म्हणून ओळखल्या जातात. पतीच्या सोबतीने काम करताना प्रत्येक समस्येवर स्वतः उपाय शोधून कार्यमग्न राहण्याची वृत्ती शेतीत सकारात्मकता पेरणारी आहे.
नव्या संधीतून प्रगतीकडे...
सुरुवातीला दोन गाई खरेदी केल्यानंतर पशुपालन करताना पशुवैद्यकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या नातेवाइकांकडून सविताताईंनी पतीच्या मदतीने शास्त्रीय ज्ञान अवगत केले. त्यामध्ये जातिवंत पैदास, चारा नियोजन, गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन यासंबंधी कामकाज समजून घेतले. गाईंच्या संगोपनापासून ते दूधविक्रीपर्यंतचे सर्व बारकावे अभ्यासल्याने व्यवस्थापन पद्धत सुधारत गेली. भगूर येथे शेतावर सुसज्ज गोठा तयार केला. चारा, पाणी व्यवस्थापन, कुट्टी मशिनसह आवश्यक सुविधा उभारल्या.
पुढे हा व्यवसाय विस्तारात गेला. गेल्या १७ वर्षांत कष्ट करण्याची तयारी, कामात वक्तशीरपणा, अचूक नियोजन व काटेकोर व्यवस्थापन ही त्यांच्या कामाची बलस्थाने आहेत. अवघ्या ४ गायींवरून संख्या ३५ वर गेली होती. मात्र गेल्या चार वर्षांपूर्वी उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाला दर मिळत नसल्याने त्यांनी गायींची संख्या कमी केली. सध्या गोठ्यात सहा गायी आहेत. यातून दररोज तीस लिटर दुधाचे संकलन होते. दूध काढणी पश्चात ग्राहकांना थेट विक्री आणि शिल्लक दुधाची संकलन केंद्रांवर विक्री असे त्यांचे नियोजन आहे. जागेवर ५० रुपये लिटर प्रमाणे दुधाची विक्री केली जाते. या व्यवसायाने कुटुंबाचे अर्थकारण सक्षम झाले आहे.
शेळीपालनातून नवी संधी
दूध व्यवसाय परवडत नसल्याने सविताताईंनी पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालनाची निवड केली. गेल्या चार वर्षांपूर्वी त्यांनी दहा शेळ्या आणि एका बोकडाची खरेदी केली. यासह उपलब्ध वस्तूंपासून स्वतः घरच्या घरी शेळी संगोपनासाठी शेड निर्मिती केली. सध्या त्यांच्याकडे ४५ शेळ्या आहेत, तर लहान मोठे असे ३५ बोकड आहेत.
आतापर्यंत ३० बोकडांची विक्री केली आहे. बोकडांची योग्य वाढ करून जिवंत वजन ४५० ते ५०० रुपये प्रति किलो प्रमाणे जागेवर केली जाते. स्थानिक मटण विक्रेते त्यांच्याकडे थेट खरेदीसाठी येतात. शेळ्यांसाठी लागणारा हिरवा, कोरडा चारा यांची उपलब्धता स्वतःच्या शेतीतून होते. शेळ्यांचे लसीकरण, चारा व्यवस्थापन या सर्व बाबी कुटुंबातील सदस्य करतात.
प्रशिक्षणातून मिळाली गती
पूर्वी पारंपरिक पद्धतीने काम करताना संधी मर्यादित होत्या; मात्र कुटुंबाने प्रोत्साहित केल्याने सविता यांनी कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र येथे कृषिविषयक प्रशिक्षण कार्यक्रमात आजवर सहभाग नोंदविला आहे. त्यातूनच कौशल्य प्राप्त केले आहे. ‘शेतीचे शास्त्र समजून घेतल्याशिवाय शेतीत प्रगती नाही’ असे त्या आवर्जून सांगतात.
त्यामुळेच एक महिला म्हणून काम करताना अगदी पीक संरक्षणापासून ते कापणीपर्यंत, कापणीपासून काढणीपश्चात विक्रीपर्यंत या सर्वच कामकाजात सविताताई रमलेल्या आहेत. शेती उत्पादन खर्च आवाक्यात आणण्यासाठी सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा त्या प्राधान्याने वापर करतात. सेंद्रिय निविष्ठा, जिवामृत, बीजामृत, गांडूळ खत निर्मिती करतात. अलीकडेच त्यांनी कृषी विज्ञान केंद्र, नाशिक येथे गृहविज्ञान विषय विशेषज्ञ अर्चना देशमुख यांच्याकडे मशरूम उत्पादन संबंधी प्रशिक्षण घेऊन धिंगरी अळंबी उत्पादन सुरू केले आहे.
नियोजनातील ठळक बाबी
शेती बांधावर आंबा, पेरू, लिंबू, चिकू, आवळा लागवड.
अॅझोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबी, ट्रायकोडर्मा वापरावर भर. दरवर्षी माती परीक्षण करून शिफारशीनुसार खतांचा वापर.
एकात्मिक पीक संरक्षण तंत्रज्ञानाचा अवलंब.
चिकट सापळे, सौरचलित सापळे, सौरदिव्यांचा वापर.
टोकण पद्धतीने लागवड करून पीक उत्पादन वाढ.
शेती उत्पादनातून काटेकोर गुंतवणूक व आर्थिक शिस्तीचे पालन.
गाईंचे दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन, आदी सुविधा.
नियोजनानुसारच शेतीचे व्यवस्थापन.
कुटुंबाच्या पाठबळातून वाटचाल
करंजकर कुटुंबीय एकत्रितरीत्या गुण्यागोविंदाने नांदते. पती विलास यांच्यासोबत सविता यांनी शेतीत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. सविताताईंना सासरे रामदास, सासूबाई सावित्री, दीर हरिदास, जाऊबाई उज्वला यांची समर्थ साथ त्यांना मिळते. मोठा मुलगा सौरव औषधनिर्माण शास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे, तर लहान मुलगी श्रुतिका सीए परीक्षेची तयारी करत आहे.
पुतणी वेदिका व वेदांत हे देखील शिक्षणात चुणूक दाखवीत आहे. कुटुंबातील प्रयोगशील वृत्तीमुळे २०२३-२४ या वर्षात राज्यस्तरीय पीक स्पर्धेत गहू उत्पादनात तिसरा क्रमांक त्यांना मिळाला होता. टोकण पद्धतीने गहू लागवडीतून त्यांनी हे यश मिळवले आहे. सविता यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्याकडून ‘आदर्श महिला शेतकरी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महिला शेतकरी गटाची स्थापना
सविताताईंना कृषी विभागाच्या अधिकारी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले . त्यांनी गावातील २५ महिलांना एकत्रित करून कृषी सखी महिला शेतकरी गटाची स्थापना केली. कृषी विभागामार्फत विविध चर्चासत्रांमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान व कृषी विषयक योजनांची माहिती पोहोचविण्याचे काम करतात. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नाशिक, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत प्रात्यक्षिके त्यांच्या शेतावर घेतली जातात.
शेतकरी चर्चासत्र, मेळावे, परिसंवाद, गावबैठकांमध्ये सहभाग घेत सेंद्रिय शेतीचे थेट प्रक्षेत्रावर जाऊन मार्गदर्शन करतात. कृषी सखी महिला शेतकरी गटामार्फत आंबा, लिंबू आणि आवळा या फळांपासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. सविताताई दैनिक ॲग्रोवनच्या पहिल्या दिवसांपासूनच्या वाचक आहेत. गटातील महिला सदस्यांना दैनिकातील लेख, यशोगाथा, योजनांविषयी सातत्याने माहिती देतात,तसेच शेतीमध्ये अनुकरण करतात.
सविता करंजकर ७०२०२६४९३७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.