Cotton Farming: उत्पादन खर्च कमी करणाऱ्या पर्यायांकडे वळणे गरजेचे...

Cotton Farm Management: कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना वाढते उत्पादन खर्च आणि घटती उत्पादकता यामुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सेंद्रिय खते, नैसर्गिक कीडनाशक, पीक फेरपालट आणि आच्छादन अशा पर्यायी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना उत्पादन खर्चात ४५% पर्यंत घट करता येते आणि नफा वाढवता येतो.
Cotton Farming
Cotton FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. स्मिता देशमुख, डॉ. सोनम जाधव

Indian Agriculture: महाराष्ट्रामध्ये कापूस हे नगदी आणि महत्त्वाचे पीक आहे. मात्र गेल्या वर्षापासून या पिकामध्ये अनेक आव्हाने निर्माण झाल्याचे चित्र आहे. कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना सामान्यतः बियाणांसह सर्वच निविष्ठांच्या खर्चात झालेली वाढ, कीड - रोगांचा वाढत प्रादुर्भाव आणि रासायनिक खतांच्या वाढत्या किमती यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अंतिमतः उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली असून, त्या तुलनेमध्ये उत्पादनामध्ये अपेक्षित वाढ झालेली दिसत नाही. त्यामुळे उत्पादकता वाढीवर काम करत असताना पर्यायी कमी किमतीच्या निविष्ठांचा वापरावर भर देत उत्पादन खर्च किमान पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

कोणत्याही पिकाची उत्पादकता जितकी महत्त्वाची असते, तितकाच त्यासाठी झालेला उत्पादन खर्च मर्यादित ठेवणे गरजेचे असते. कारण त्यावरच निव्वळ नफ्याचे प्रमाण ठरत असते. त्यामुळे पिकाची उत्पादकता वाढविण्याचा विचार करत असतानाच उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी पिकाच्या व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करत कमी खर्चाच्या पर्यायी निविष्ठांच्या वापरावर भर द्यावा लागतो. त्यातच खरी व्यावहारिकता असते. नैसर्गिक साधनसंपत्तीचाही अत्यंत कार्यक्षम वापर करण्यावर भर देण्याची गरज आहे.

कमी खर्चाचे पर्यायी उपाय

अन्नद्रव्य व्यवस्थापन

कपाशी पिकासाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन हे सर्वात महत्त्वाचे असते. त्याचा थेट परिणाम पिकाची वाढ, उत्पादन आणि गुणवत्तेवर होत असतो. रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. शेतकरी मुख्य अन्नद्रव्ये उदा. नत्र, स्फुरद, पालाश यांच्या पूर्ततेकडे लक्ष देतात. मात्र त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. त्यांची कार्यक्षमता ही सेंद्रिय खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापरातून वाढत असते.

Cotton Farming
Intensive Cotton Farming: सघन कापूस लागवड प्रकल्प कागदावरच

सूक्ष्म अन्नद्रव्ये : लोह (Fe), जस्त (Zn), मॅग्नेशिअम (Mg), आणि कॅल्शिअम (Ca) हे कापसाच्या वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. याचेही विविध महागडी रासायनिक फॉर्म्यूलेशन्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र स्वस्त सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी पर्यायी मार्ग शोधले पाहिजे. उदा. झिंकसाठी कडूनिंब पेंडीचा वापर करता येईल, तर मॅग्नेशिअमसाठी जिप्सम वापरता येते.

सेंद्रिय खत : जमिनीत सेंद्रिय खतांचा नियमित आणि योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे असते. उत्तम कुजलेले कंपोस्ट खत जमिनीची सुपीकता वाढवते. सेंद्रिय पदार्थ व त्यातील अन्नद्रव्ये ही पिकांना सावकाश उपलब्ध होतात. वापरलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढतात. सेंद्रिय पदार्थांमुळे मातीची रचना, जलधारणक्षमता आणि सुपीकता वाढते.

पीक अवशेष : मागील पिकाची काढणी केल्यानंतर शिल्लक राहिलेले अवशेष किंवा सेंद्रिय पदार्थ शेतातच राहू द्यावेत. ते जागेवर कुजण्यासाठी आणि त्यातून मागील पिकावरील कीड- रोगांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. त्यामुळे जागेवरच मोफत किंवा फारच अल्प खर्चामध्ये सेंद्रिय खतांची उपलब्धता होते. रासायनिक खतांवरील खर्चात बचत करता येते.

पीक फेरपालट

शेतामध्ये पिकांची फेरपालट करताना त्यात शेंगावर्गीय पिकांचा समावेश करावा. (उदा. सोयाबीन किंवा मसूर या पिकामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू वाढतात. ते वातावरणातील नत्र मातीमध्ये पिकांना उपलब्ध करण्याचे काम करतात. हिरवळीच्या खत पिकांमध्ये क्लोव्हर किंवा अल्फाअल्फा या सारख्या आच्छादन पिकांची लागवड फायदेशीर ठरते. योग्य काळानंतर ही पिके जमिनीत गाडली जातात. त्यातून पुढील पिकाला पोषक अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होतात.

नैसर्गिक कीड रोग नियंत्रण

सध्या प्रत्येक कीड रोगांसाठी तातडीने रासायनिक कीडनाशकांची फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या आरोग्यासोबतच पर्यावरणास हानिकारक ठरू शकते. त्यांच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादनखर्चही वाढत आहे. नैसर्गिक आणि शाश्‍वत अशा एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीकडे वळण्याची गरज आहे. पिकावरील किडींच्या नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या शत्रूचे संवर्धन आणि प्रसारण करता येते. आपल्या शेतातील मित्रकीटकांची ओळख पटवून त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करावेत.

Cotton Farming
Cotton Farming : अभ्यासपूर्ण, तंत्रशुद्ध कापूस- आंतरपीक शेती

शेतामध्ये पक्षिथांब्यांच्या सोई कराव्यात. यातून किडींचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीपेक्षा कमी ठेवणे शक्य होते. तसेच कापूस पिकामध्ये विविध बुरशीजन्य किंवा जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यांच्या नियंत्रणासाठी आपल्या परिसरात उपलब्ध होणाऱ्या विविध वनस्पती वापरता येते. उदा. कडुलिंबाचे तेल, लसूण-आधारित द्रावण इ. वनस्पतींचे प्रादुर्भावग्रस्त भाग त्वरित काढून त्यांची वेळीच विल्हेवाट लावल्यास संभाव्य प्रादुर्भाव कमी करता येतो.

आच्छादन (मल्चिंग)

जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन हे अनेकार्थाने फायदेशीर राहते. आपल्याकडे उपलब्ध पिकांचे अवशेष, पेंढा, कोंडा, पाने या सारखे सेंद्रिय पदार्थ आच्छादनासाठी वापरावेत. अलीकडे प्लॅस्टिक पेपर आच्छादनाकडे शेतकरी वळत आहेत. पण त्याचेही आर्थिक विश्लेषण करून एकदा अंथरलेला पेपर सलग दोन किंवा तीन पिकांसाठी वापरता आल्यास

त्यातून खर्चात बचत साधू शकेल. आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. तणांची वाढ रोखली जाते. मातीचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते. मातीतून निचरा होणाऱ्या अन्नद्रव्येही रोखण्याचे काम करते.

आर्थिक विश्‍लेषण करणे

शाश्‍वत कापूस उत्पादनासाठी व्यवस्थापनामध्ये योग्य व पर्यायी पद्धतींचा समावेश करत राहणे गरजेचे आहे. आपण वापरत असलेल्या प्रत्येक उपाययोजनेचेही पुनर्मूल्यांकन दर काही काळानंतर जरूर करावे. त्यामुळे पद्धतीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करणे शक्य होते. व्यवस्थापनामध्ये वापरत असलेल्या प्रत्येक निविष्ठा आणि पद्धतींसाठी लागलेला खर्च व त्यातून झालेल्या फायद्यांचे किंवा तोट्याचे मोजमाप केले पाहिजे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपयोगी ठरू शकते. त्यातून माहिती जमा करणे, त्यांचे विश्‍लेषण करण्यासाठी विविध ॲप उपलब्ध आहेत.

फायद्यात लक्षणीय वाढ शक्य

पारंपरिक पीक पद्धतीपेक्षा कापूस उत्पादनात नैसर्गिक व कमी खर्चिक उपायांचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना उत्पादन खर्चात मोठा दिलासा मिळू शकतो.

रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खत, कंपोस्ट व शेणखत यांचा वापर केल्यास खतांवरील खर्चात ३० ते ३५ टक्क्यांची बचत होते.

कीड व रोग नियंत्रणासाठी लसूण, हळद व निंबोळी अर्क यासारख्या नैसर्गिक कीडनाशकांचा वापर केल्यास महागड्या रासायनिक कीडनाशकांचा वापर कमी करावा लागतो. त्यावरील खर्चात साधारणतः २५ ते ३० टक्क्यांपर्यंत बचत होते.

ठिबक सिंचन व आच्छादन या दोन्ही घटकांचा वापर केल्यास पाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापनासोबत पाणी पाळी देण्याचा मजूर खर्च वाचतो.

पीक पद्धतीमध्ये फेरपालट करताना शेंगवर्गीय पिकांचा समावेश केल्यास पुढील पिकाच्या नत्रयुक्त खतांचा वापर शिफारशीपेक्षा कमी करता येतो. जमिनीची सुपीकता वाढल्याने दिलेल्या खतांचा कार्यक्षम वापर होतो.

एकंदरीत वरील सर्व उपाययोजना शेतकऱ्याने केल्यास त्याच्या एकूण उत्पादन खर्चात पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये ३५ ते ४५ टक्के इतकी घट दिसून आली आहे. निविष्ठांची कार्यक्षमता वाढल्यामुळे उत्पादनामध्येही वाढ शक्य होते. ही उत्पादनातील वाढ आणि खर्चातील घट यामुळे शेतकऱ्यांचे नफ्याचे प्रमाण १० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. (यात आपण बाजारभावातील चढ-उतार स्थिर मानले आहेत.)

डॉ. सोनम जाधव, ९९२२५०८३९७

सहायक प्राध्यापक, राजीव गांधी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com