Pest-Disease Control : सीताफळातील एकात्मिक कीड-रोग नियंत्रण

Sitaphal Disease : सीताफळ हे कोरडवाहू भागातील महत्त्वाचे फळपीक आहे. या वर्षी उन्हाळा फार कडक राहून राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती होती. मात्र मॉन्सूनचे आगमन वेळेवर झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी नैसर्गिक बहर धरलेला आहे.
Sitaphal Pest-Disease
Sitaphal Pest-DiseaseAgrowon
Published on
Updated on

नीतिश घोडके, डॉ. युवराज बालगुडे, डॉ. प्रदीप दळवे

Sitaphal Disease Management : सीताफळ हे कोरडवाहू भागातील महत्त्वाचे फळपीक आहे. या वर्षी उन्हाळा फार कडक राहून राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती होती. मात्र मॉन्सूनचे आगमन वेळेवर झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी नैसर्गिक बहर धरलेला आहे. सध्या राज्यातील सीताफळ लागवड क्षेत्रात चांगला पाऊस पडत असून, फळधारणेस अनुकूल परिस्थिती आहे. मात्र सततच्या पावसाने बागांमध्ये आर्द्रता टिकून राहत असल्याने रोग व किडींच्या प्रादुर्भावास पोषक वातावरण तयार झाले आहे. सध्या पूर्णपणे उमललेल्या कळ्या व लहान आकाराच्या फळांवर तपकिरी काळपट डाग आढळून येत आहेत. हे डाग नेमक्या कोणत्या कीड किंवा रोगामुळे आहेत, हे जाणून घेऊन त्यानुसार वेळीच योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

थ्रिप्स (फुलकिडी)

फुलकिडीचे प्रौढ आणि पिले आकाराने लहान असून, ते नवीन आलेल्या कळ्या, नुकतीच फलधारणा झालेली फळे, पानाच्या पाठीमागील बाजूची मुख्य शिरा येथील पृष्ठभाग खरवडून बाहेर पडणारा द्रव शोषतात. परिणामी, नुकसान झालेला भाग तपकिरी रंगाचा होतो. कालांतराने तो काळपट पडतो. पाने वेडीवाकडी होतात. मोठ्या फळांवर देखील खरवडल्याचे डाग दिसून येतात. फळ वाढेल तसे खरवडल्याचे डाग वाढत जातात. प्रादुर्भावग्रस्त भाग कठीण होतो. फळांचा आकार वेडावाकडा होतो. परिणामी फळांना बाजारात अपेक्षित दर मिळत नाही.

मावा

मावा किडीचे प्रौढ आणि पिले नवीन आलेल्या कळ्यांमधून रस शोषून घेतात. ही कीड शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ स्रवते. त्यावर काळी बुरशी वाढते. या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास फळधारणेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

थ्रिप्स व मावा किडीसाठी उपाययोजना -

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आंतरप्रवाही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.

टी मॉस्किटो बग

‘टी मॉस्किटो बग’ या रसशोषक किडीची पिले व प्रौढ सीताफळाच्या झाडांची कोवळी फूट, कळ्यांचा व फुलांचा देठ, कोवळी व पक्व फळे या भागामधून रस शोषून घेतात. ती सोंड घुसवून रस शोषत असल्याने त्या ठिकाणच्या पेशी काळ्या पडून कठीण होतात. तयार झालेल्या ठिपक्यांचा आकार पुढे मोठा होतो. तिथे करपल्यासारखा काळा डाग पडतो. या किडीमुळे होणाऱ्या जखमांमधून फळसड रोगाच्या बुरशीचा प्रवेश होऊन पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार शेंडेमर, शेंडे करपणे, कळ्या जळणे, फळे देठाजवळ काळी पडणे यासारखी लक्षणे दिसून येतात.

Sitaphal Pest-Disease
Sitaphal Orchard Management : सीताफळ बागेचे नियोजन, व्यवस्थापन

उपाययोजना

ही कीड सीताफळ बागेत सध्या कमी प्रमाणात आढळत असली तरी तिची आर्थिक नुकसान पोहोचविण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे या किडीबाबत सध्या सर्वेक्षण करून वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

सीताफळाच्या बागेत स्वच्छता राखावी.

नियोजनबद्ध एकात्मिक आणि संतुलित प्रमाणात खत व पाणी व्यवस्थापन करणे.

किडीने आर्थिक नुकसानीची पातळी (५ टक्के नुकसानग्रस्त फळे) गाठल्यास किंवा या पेक्षा किडींची संख्या अधिक झाल्यास फवारणी करावी. (प्रमाण ः प्रति १० लिटर पाणी) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ६ मिलि किंवा बायफेन्थ्रीन (८ टक्के एससी) १२.५ मिलि किंवा थायाक्लोप्रिड (२१.७० टक्के एससी) १० मिलि.

कीटकनाशकाची फवारणी करण्यापूर्वी काढणी पश्चात कालावधी तपासून फळकाढणीचा निर्णय घ्यावा.

(टीप : सीताफळामध्ये टी मॉस्किटो बग या किडीच्या नियंत्रणासाठी दिलेल्या रासायनिक कीटकनाशकांचे लेबल क्लेम नाहीत. तथापि, चहा पिकामध्ये या किडीसाठी वरील रासायनिक कीटकनाशकांना लेबल क्लेम आहे. तातडीच्या स्थितीमध्ये हा संदर्भ महत्त्वाचा ठरेल.)

पिठ्या ढेकूण (मिलीबग)

पिठ्या ढेकूण ही कीड पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि कोवळी फळे यातून रस शोषते. परिणामी, पानांचा, फळांचा आकार वेडावाकडा होतो. झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. नवीन फुटींची व पानांची वाढ खुंटते. फळांची वाढ अयोग्य होऊन आकार वेडावाकडा होतो. या किडीच्या शरीरातून स्रवणाऱ्या मधासारखा चिकट पदार्थावर काळी बुरशी वाढते. परिणामी पाने, फळे काळी पडतात. फळांना बाजारभाव मिळत नाही.

उपाययोजना

प्रतिबंधात्मक :

पिठ्या ढेकणाची पिले खोडावरून झाडावर चढतात. यासाठी उपाय म्हणून ५ सेंटिमीटर रुंदीची प्लॅस्टिक चिकट पट्टी खोडाला चिकट बाजू वर ठेवून लावावी. त्याला पिले चिकटून मरतात. या किडीच्या पुढील प्रसाराला वेळीच आळा बसतो.

परभक्षी मित्रकीटक क्रिटोलिमस मॉन्ट्रोझायरी प्रति एकरी ६०० या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा बागेत झाडावर सायंकाळच्या वेळी सोडावेत. भुंगेरे सोडल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकाची बागेवर फवारणी करू नये.

लेकॅनोसिलिअम लेकानी (व्हर्टिसिलिअम लेकॅनी) हे जैविक बुरशीनाशक ५ ग्रॅम अधिक फिश ऑइल रोझीन सोप ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आर्द्रतायुक्त हवामानामध्ये जैविक बुरशीनाशक उत्तम काम करते. त्यामुळे सध्या ही फवारणी फायदेशीर ठरेल.

Sitaphal Pest-Disease
Sitaphal Management : चांगल्या बहारासाठी अशी करा सिताफळाची छाटणी

उपचारात्मक

पिठ्या ढेकूण किडीचा प्रादुर्भाव दिसताच, त्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी पुढील वेळापत्रकाप्रमाणे फवारणीचे नियोजन करावे.

प्रथम बुप्रोफेजिन १.५ मिलि, त्यानंतर दहा दिवसांनी बिव्हेरिया बॅसियाना हे जैविक कीटकनाशक ६ ग्रॅम, त्यानंतर १० दिवसांनी, ॲझाडिरेक्टीन (१० हजार) पीपीएम ३ मिलि व त्यांनंतर १० दिवसांनी लेकॅनोसिलिअम लेकानी (व्हर्टिसिलियम लेकॅनी) ६ ग्रॅम अधिक गाईचे दूध ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून चार फवारण्या पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव दिसल्यानंतर दहा दिवसांच्या अंतराने कराव्यात.

फळसड

हा रोग कोलेटोट्रीकम ग्लिओस्पोराइडेस या बुरशीमुळे होतो. हा रोग आर्द्रतायुक्त दमट हवामानात अधिक दिसून येतो. मात्र कोरड्या हवामानात रोगाचे प्रमाण कमी असते. रोगाच्या वाढीसाठी साधारणतः उष्ण हवामान २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आणि भरपूर आर्द्रता (८० टक्क्यांपेक्षा जास्त) आवश्यकता असते. बुरशीचे बीज अंकुरण्यासाठी कमीत कमी ४ ते ६ तास झाडाच्या पृष्ठभागावर पाण्याच्या थेंबांची राहणे आवश्यक असते. फळसड हा रोग फळवाढीच्या कुठल्याही अवस्थेत येऊ शकतो. मात्र कळ्या आणि लहान फळे रोगास जास्त प्रमाणात बळी पडतात. या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कळ्या, लहान फळे आणि त्यांचे देठ काळे होऊन गळून पडतात. फळे मध्यम सुपारीच्या आकाराची (१५ ते २० मि.मी. व्यास) झाल्यावर प्रादुर्भाव झालेली फळे गळून न पडता लटकून राहतात. अशी रोगग्रस्त फळे न पिकता वाळून जातात व कडक होतात. अशाप्रकारे या रोगामुळे जवळजवळ ६० ते ७० टक्के नुकसान होण्याची शक्यता असते.

उपाययोजना

रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने बागेत वेळोवेळी नांगरट, जमीन तापू देणे आणि स्वच्छता या बाबी महत्त्वाच्या आहेत.

छाटणी करतेवेळी गर्दी होत असलेल्या फांद्यांसोबतच झाडावर शिल्लक राहिलेली रोगग्रस्त फळे, फांद्या, पाने छाटून टाकावीत. छाटणीनंतर सर्व रोगग्रस्त अवशेष गोळा करून जाळून नष्ट करावे.

बहराचे पाणी देण्यापूर्वी किंवा पावसाळ्यापूर्वी पाणी देण्यासाठी झाडांभोवती वाफे करून सेंद्रीय व रासायनिक खताचा हप्ता द्यावा. त्यामुळे रोग किडीविरुद्ध झाडाची प्रतिकारशक्ती वाढते.

फळे सुपारीच्या आकारापेक्षा मोठी झालेली असल्यास १ टक्का बोर्डो मिश्रणाच्या (१ किलो चुना अधिक १ किलो मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) किंवा मॅन्कोझेब २० ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम १० ग्रॅम (टॅंक मिक्स) प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार २ ते ३ फवारण्या घ्याव्यात.

नीतिश घोडके, ९९६०९८१५४८,

डॉ. युवराज बालगुडे,९८९०३८०६५४ ,

(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके -अंजीर व सीताफळ संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com