
Agriculture Success Story : अहिल्यानगर जिल्ह्याच्या पूर्वेला भालगाव परिसरात मागील तीस वर्षांपासून कापसाचे क्षेत्र वाढले आहे. याच भालगाव येथील गोवर्धन प्रल्हाद खेडकर यांनी कपाशी, आंतरपिके व बटाटा यातून अभ्यासू शेतकरी अशी ओळख तयार केली आहे. त्यांच्या एकत्रित कुटुंबाची सुमारे २२ एकर शेती आहे. त्यांचे काका
जयहिंद हे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यामुळे त्यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळते. वडील प्रल्हाद, आई गुलबस, काकी ताराबाई यांची शेतीत मदत होते. गोवर्धन यांच्या पत्नी मीना यांचाही शेतीत मोठा वाटा आहे. ट्रॅक्टर चालवण्यापासून ते फवारणी व अन्य महत्त्वाची कामे त्या करतात. खेडकर कुटुंबाने २५ वर्षांपूर्वी दोन एकरांपासून कापूस घेण्यास सुरवात केली. आता दरवर्षी दहा- बारा एकरांत कापूस असतो.
कापूस व आंतरपीक पद्धती- ठळक बाबी
भालगाव परिसरात बटाटा पीक घेतले जाते. खेडकर देखील बटाटा घेतात. फेब्रुवारीत काढणी झाल्यानंतर पाणी उपलब्ध राहत नसल्याने शेत मोकळे असते. नांगरट केलेले शेत तीन महिने उन्हात तापते. मेमध्ये पूर्वमशागत करून जूनमध्ये सहा ते आठ इंचाच्या दरम्यान ओलावा तयार करणारा पाऊस झाल्यावर कपाशी लागवड करतात.
वेचणीस मजुरांना सोपे जावे, किडी-रोगांना प्रतिकारक असावे, उत्पादकता चांगली असावी अशी वैशिष्ट्ये पाहून वाणाची निवड होते.
पूर्वमशागत झाल्यावर लागवडीपूर्वी आठ ते दहा दिवस एकरी २०० लिटर पाण्यात एक किलो ट्रायकोडर्मा या मित्रबुरशीची फवारणी केली जाते. त्यामुळे बुरशीजन्य रोगांना अटकाव होत असल्याचा खेडकर यांचा अनुभव आहे.
पूर्वी पारंपरिक पद्धतीचे लागवड अंतर होते. चार वर्षांपासून लागवड पद्धतीत बदल करत सहा बाय दीड फूट असे लागवडीचे अंतर आता ठेवले जाते. त्यामुळे आंतरमशागत करणे व आंतरपीक घेण्यासाठी चांगली मदत होत आहे. झाडांभोवती मोकळी हवा खेळत असल्याने वाढ चांगली होते. बोंडे पोसण्यास, त्यांची वाढ होण्यास मदत होऊन कापूस वेचणीतही सुटसुटीतपणा आला आहे.
ट्रॅक्टरचलित टोकण यंत्राच्या साहाय्याने कपाशीची लागवड होते. सुमारे पाच एकरांतील कपाशीत मूग तर अन्य पाच एकरांतील कपाशीत भुईमूग अशी आंतरपीक पध्दत असते.
कपाशीला देऊ केलेली खते व पाणी हे घटक आंतरपिकांनाही लागू होतात.
कमी कालावधीची आंतरपिके असल्याने त्यांची काढणी झाल्यानंतर त्यांचे अवशेष रोटावेटरच्या साह्याने पुन्हा मातीत मिसळले जातात. त्यांचे खत तयार होऊन जमिनीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होत आहे.
कापसावर अलीकडील काळात गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. अनेक किडींच्या माद्या अमावस्येच्या काळात अंडी घालतात. हे लक्षात घेऊन त्या काळात कीटकनाशकाची फवारणी करण्यावर भर असतो. त्यातून ७० ते ८० टक्के नियंत्रण मिळवून नुकसान टाळणे शक्य झाले आहे.
कपाशीच्या लागवडीच्या १५ दिवसांनंतर झेंडूच्या एकरी ५० ते १०० झाडांची लागवड होते. या झेंडूमुळे सूत्रकृमीला अटकाव करता येतो. फुलांच्या गंधामुळे किडी मुख्य पिकाऐवजी किडी त्याकडे आकर्षित होतात. शिवाय फुलांच्या विक्रीतून एकरी तीन हजारांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत उत्पन्नाचा आधार मिळतो.
अर्थकारण उंचावले
खेडकर यांनी मूग, भुईमूग, उडीद यांसारख्या आंतरपिकांमधून कापसाचा उत्पादन खर्च कमी केला आहे. मूग व भुईमुगाचे एकरी प्रत्येकी चार क्विंटल तर उडदाचे पाच क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. निघते. कापसाचे १२ ते १४ क्विंटलपर्यत उत्पादन खेडकर यांनी साध्य केले आहे. डिसेंबरच्या दरम्यान त्यांचा कापूस वेचणीस येतो. कपाशीला जागेवर क्विंटलला ७००० ते ७२०० रुपये तर मूग व उडीद यांना क्विंटलला ७५०० रुपये दर मिळतो.
एकूण पीक पद्धतीतून सुमारे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो. शेतीच्या आधारेच गोवर्धन यांचा मुलगा कार्तिकने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. तर दुसरा मुलगा गणेश बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण घेत आहे. गोवर्धन यांचे बंधू हनुमान व भावजय रेवती पुणे भागात नोकरीस आहेत. घरातील सर्व सदस्य उच्चशिक्षित असल्याचा कुटुंबाला अभिमान आहे.
बटाटा उत्पादनातून ओळख
पाण्याचा कायमचा स्रोत नसल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील पूर्व भागातील पाथर्डी तालुक्यातील व बीड जिल्ह्याच्या सीमेवरील गावांना पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. या भागात पावसाच्या पाण्यावर तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर कापूस, तूर, मूग, बाजरी, मका, रब्बी कांदा, गहू अशी पिके घेतली जातात.
अलीकडील काळात प्रामुख्याने बटाट्याचे उत्पादन घेणारा पट्टा म्हणून भालगाव परिसराची ओळख झाली आहे. येथे दीड हजार एकरांपर्यत त्याचे क्षेत्र असावे. खेडकर सुरुवातीला केवळ दोन एकरांत हे पीक घ्यायचे. आता दहा एकरांपर्यंत त्याचे क्षेत्र असते. खरिपातील मका, सोयाबीननंतर पाण्याच्या उपलब्धतेवर त्याचे नियोजन असते. व्यवस्थापन व अभ्यासातून एकरी ८ टनांवरून १२ ते साडेचौदा टनांपर्यंत त्यांनी आपली उत्पादकता नेली आहे.
बटाट्याची नगर येथे विक्री होते. त्यास किलोला १० ते १५ रुपये दर मिळतो. गोवर्धन यांचे काका जयहिंद म्हणाले, की भालगाव, कासळवाडी व परिसरात डिसेंबर- जानेवारी अखेरपर्यंतच पुरेसे पाणी उपलब्ध असायचे. सन २०१७ मध्ये जलयुक्त शिवार अभियानातून दगडीबांध, सलग समतल चर, गॅबियन व नदीवर साखळी बंधारे उभारले. शेततळी झाली. दोन-तीन वर्षांपासून पाऊस चांगला झाला. परिणामी बटाटा, गहू, हरभरा क्षेत्र वाढण्यास मदत झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध पिके घेऊन उत्पन्नवाढीस चालना मिळाली.
गोवर्धन खेडकर ९०२१२०५०६०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.