
Environmental Impact: मी २२ मे ते ६ जून २०२२ या काळात आशितोष जोशी या मित्रासोबत गडचिरोली जिल्ह्यात पदयात्रा केली होती. त्या वेळी सुराजागडचं नाव मी पहिल्यांदा ऐकलं होतं. तिथल्या लाल मातीतीली खनिजं वाहून नेणाऱ्या वीस टायरी वाहनांच्या रांगा आम्ही बघितल्या होत्या. अभयारण्य, पशू-पक्ष्यांसाठी संरक्षित जंगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातून ही वाहतूक सुरू होती. त्यामुळं परिसरातील कुठल्याच जंगलात आम्हाला एकही पक्षी बघायला मिळाला नाही.
सगळीकडं लाल धुळ पसरवणारी ही अवजड वाहनांची वाहतूक हेच याचं कारण असावं. शेकडो वर्षांची झाडं तोडली जात होती. जंगलांचं मोकळ्या मैदानात रूपांतर होताना दिसत होतं. ही काही अवैध जंगलतोड नव्हती. सरकारच्या वन खात्याकडूनच हे राजरोस केलं जात होतं. जैवविविधतेची जंगलं संपवून केवळ सागवान झाडांची लागवड केली जात होती. ते ही केवळ दिखावा म्हणून. याबद्दल ना कोणाला खेद होता ना खंत. याची समाजात कुठं प्रतिक्रिया उमटताना दिसत नव्हती. हे निराशाजनक होतं. निसर्गरम्य विदर्भाचं माझ्या मनातलं चित्र हळुहळू संपत जाणार असं तेव्हा जे जाणवलं, त्याची प्रचिती परवाच्या विदर्भ दौऱ्यात आली.
मला ५ जानेवारी २०२५ ला एका कार्यक्रमानिमित्त मित्रासमवेत विदर्भातील वरोरा येथे जाण्याची संधी मिळाली. निघताना सुरजागडला जायचंच, असं मनोमन ठरवलं होतं. योगायोगाने तेव्हा तिथे यात्रा सुरू होती. ती बघायला मुद्दाम गेलो. ही यात्रा सुरजगड पर्वतराजींच्या अलिकडं एका मंदिराजवळ भरते. आदिवासींची यात्रा म्हणून तिथं काही वेगळं बघायला मिळेल, ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या आदिवासी नृत्यांच्या स्पर्धा हे माझ्यासाठी एकमेव आकर्षण ठरलं. यात्रेत जागोजागी खनिज काढणाऱ्या कंपन्यांनी यात्रेकरूंच्या स्वागताचे बॅनर लावले होते. कोणी फुकटची जेवणावळ, पाणपोई तर कोणी प्रसाद म्हणून नाश्त्याची सोय केली होती. मला यात्रेत आपली मूळ ओळख विसरलेले आदिवासी दिसले. रस्त्यावर, यात्रेमध्ये शेकडोंच्या संख्येने शस्त्रधारी सुरक्षारक्षक होते.
खाणींसाठी खोदकाम
या यात्रेत येण्याआधीच गडचिरोलीतील एका पत्रकार मित्राशी सुरजागड खाणीसंदर्भात बोललो होतो. माध्यमातही काही वाचलं होतं. प्रत्यक्ष स्वरुप भयंकर अस्वस्थ करणारं होतं. सुरजागडची पर्वतराजी ही विविध खनिजांनी संपन्न आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध उद्योगपतींचा यावर डोळा होता. जिंदाल नावाच्या उद्योगपतीने २०२०-२१ मध्ये ही पर्वतराजी ताब्यात घेतली. तेव्हापासून खनिज खोदून त्याची वाहतूक केली जातेय. त्यांच्या परवानगीशिवाय आतमध्ये कोणालाही जाता येत नाही. मी फिरत त्यांच्या मुख्य गेटपर्यंत जाऊन आलो. पुढे डोंगरावर खोदकाम चालू असल्याचं कळतं. यंत्रांचे आवाज कानावर येतात. सगळा परिसर लाल मातीने माखून गेलाय. काही वर्षांत ही पर्वतराजी सपाट मैदानात, कदाचित खंदकात रूपांतरित होईल, याबद्दल कोणालाही शंका नाही.
पत्रकार मित्राने दिलेली माहिती माझ्यासाठी धक्कादायक होती. सुरजगडपासून बल्लारपूरपर्यंत दररोज ६०० ते ७०० मालमोटारी या खनिजांची वाहतूक करतात. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा दुप्पट वजनाच्या ट्रक्स या रस्त्यांवरुन जात असल्याने रस्त्यांची वाट लागलीय. आता सगळीकडं लाल धुळ पसरलीय. पावसाळ्यात सगळ्या रस्त्यावर लाल चिखल होतो. यातील बहुतांश ट्रक्स विदर्भातील दोन राजकीय नेत्यांच्या मालकीच्या आहेत. इतर ट्रकमालकांत सर्वपक्षीय पुढारी आहेत. त्यांना या माध्यमातून दररोज करोडो रुपये मिळत असल्याने, पर्वतराजीच्या नाशाबद्दल, पर्यावरण हानीबद्दल कोणी बोलायला तयार नाही. पैसा कसा चमत्कार करतो, याचं हेही एक बोलकं उदाहरण. स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याच पर्वतराजींचा बळी द्यायला राजकीय नेत्यांनी संमती दिलीय. आगामी काळात याचे दुष्परिणाम याच लोकांना भोगावे लागणार आहेत.
या प्रकल्पामुळे हजारो आदिवासींवर विस्थापित होण्याची वेळ आलीय. जंगल हे आदिवासींचं जगण्याचं साधन होतं. तिथून त्यांना हुसकावून लावलंय. या आदिवासींनी या प्रकल्पाविरुद्ध शांततामय आंदोलनही सुरू केलंय. ते बऱ्यापैकी संघटित आहे. पण एकाही राजकीय पक्षाचा, नेत्याचा या आंदोलनाला पाठिंबा नाही. माध्यमंही या आंदोलनाची म्हणावी तशी दखल घेत नाहीत. सगळेच पैशाने विकले गेले आहेत.
उद्योगपती, सरकार, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी यांच्या बलाढ्य युतीसमोर या आंदोलनाचा किती टिकाव लागणार? ज्यांची पिढ्यान् पिढ्या जंगलावर मालकी होती, त्यांना बेदखल केलं गेलं आहे. त्यांना आयुष्यातून उठवलंय, पण त्यांच्याबद्दल दु:ख व्यक्त करणारं कोणी नाही. सगळ्यांना विकास हवाय. विकासाच्या नावाखाली विदर्भात जे रस्त्यांचं जाळं निर्माण केलं गेलंय, ते या उद्योगपतींना खनिजं वाहून नेण्यासाठी, हे कळायला बराच काळ जावा लागला.
विकास आदिवासींच्या मुळावर
विरोध विकासाला नाही. खरं तर सुरजागड ते बल्लारपूर खनिज वाहून नेण्यासाठी रेल्वेलाइन टाकणं सहज शक्य होतं. ते सोयीचंही आहे. पण ट्रकमालक पुढाऱ्यांना हे होऊ द्यायचे नाही. सुरजागड यात्रेच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पोलाद कंपनीचे बँनर झळकत होते. त्यावर कुठल्या तरी तलावातील गाळ काढला, कोणत्या तरी पुलाला कठडे लावले, रस्त्याचे सुशोभीकरण केले... असा मजकूर वाचायला मिळत होता. ही महान समाजसेवा बघून मी मनोमन हसलो. यात्रेत फिरताना तीन-चार तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
परंतु कोणालाही या परिस्थितीचं गांभीर्य कळालेलं नाही. स्थानिक आदिवासींची जगण्याची साधनं संपवून त्यांना मजूर, ट्रक ड्रायव्हर, सुरक्षारक्षक अशा नोकऱ्या दिल्या आहेत. ‘जंगलचे राजे’ म्हणून ओळखले जाणारे आदिवासी आज रोजंदारी मजूर बनले आहेत. आम्ही ज्या रस्त्याने प्रवास केला त्या रस्त्यावरील सगळी झाडं या लाल धुळीने माखून गेलीत. मित्र सांगत होता, की सुरजागड ही सुरुवात आहे. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारच्या २५ खाणी प्रस्तावित आहेत. गडचिरोलीत एक पोलाद कारखाना झालेला आहेच. येत्या काही वर्षांत इथं एवढे प्रकल्प सुरू होतील, की गडचिरोली हा खाणींचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल. तेव्हा गडचिरोलीतील आदिवासींची अवस्था अधिकच बिकट असेल.
या खाण उद्योगाचा देशाला नेमका किती फायदा होतोय व उद्योगपतींना किती, हे आपल्याला कळणं शक्य नाही. ते देश चालवणाऱ्यांनाच ठाऊक. मात्र हा विकास पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून होतोय यात शंका नाही. निसर्गाचा, जंगलाचा, वन्य पशू-पक्ष्यांचा यात अजिबात विचार केला गेलेला नाही. निसर्गाला संपवून केला जात असलेला हा विकास आदिवासीचं जगणं हराम करणारा, त्यांना आयुष्यातून उठवणारा आहे. माझ्या मनात हा प्रश्न कितीतरी वेळा आला. विकास, विकास म्हणजे नेमकं काय? याचा लाभ किती लोकांना होतोय? लाभधारक कोण? याची उत्तरं शोधली तर सगळं लक्षात येतं. हा विकास केवळ आदिवासींना संपवणारा नाही तर भविष्यात एकूणच विदर्भाला भकास करणारा आहे.
विकासाचे पर्यायी मॉडेल
हे सगळं बघून खिन्न मनःस्थितीत प्रवास सुरू असतानाच एटापट्टी तालुक्यातील जीवनगट्टा गावच्या आदिवासी लक्ष्मी महिला बचत गटाला भेट देण्याची संधी मिळाली. या गटाच्या अध्यक्षा वंदना अशोक गावडे यांच्याशी सविस्तर बोललो. या गटाच्या माध्यमातून आदिवासींच्या विकासाचं एक आदर्श मॉडेलच त्यांनी उभं केलंय. महिलांनी २००४ मध्ये दरमहा शंभर रुपयांच्या बचतीने हा गट सुरू केला. वंदना गावडे फक्त आठवीपर्यंत शिकलेल्या. मात्र त्यांचं संघटन व विक्री कौशल्य जबरदस्त आहे.
आदिवासींमध्ये प्रत्येक सण, उत्सवात मोहाच्या फुलाला मोठा मान आहे. पोळ्याला मोहफुल बैलांना चारतात. शिवाय मोह हे पौष्टिक अन्न आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी मोहफुलांवर काम सुरू केलं. बचत गटाच्या माध्यमातून मोहफुलांची खरेदी सुरू केली. यातून मार्च ते एप्रिल या हंगामात १५० कुटुंबांना रोजगार मिळाला. मोहफुलं जमिनीवर पडली, की त्यांना माती लागून ती खराब होतात. ते टाळण्यासाठी कृषी व वनविभागाने आदिवासींना नेटच्या जाळ्या पुरवल्या. त्या मोहाच्या झाडाला बांधल्याने स्वच्छ मोहफुलं मिळू लागली. मातीवर पडलेल्या फुलांपेक्षा यांना दुप्पट भाव मिळू लागला.
या बचत गटामार्फत मोहाच्या फुलांपासून लाडू, बर्फी, पेढा, सरबत हे उपपदार्थ बनवून विकणं सुरू केलं. या पाठोपाठ अंबाडीच्या पानांचं लोणचं, डिंक लाडू, जवस, तीळ चटणी, आंबा लोणचं, हिरव्या मिरगीचा ठेचा, नाचणी, ज्वारी, बाजरीचे लाडू ही उत्पादनं सुरू केली. शासकीय मदत व स्वनिधीतून त्यांनी ड्रायर, ग्राइंडर, एल्व्हारायझर, पॅकिंग मशिन, बॉटलिंग सील मशिन अशी विविध यंत्र घेऊन सगळी उत्पादनं दर्जेदार बनवली. या बचत गटाच्या माध्यमातून नियमितपणे आठ-दहा महिलांना रोजगार मिळतो. वाढीव मागणीच्या काळात ३०-३५ महिला या कामात सहभागी होतात. जिल्हास्तरीय प्रदर्शनासोबत मुंबई, हैदराबाद, दिल्ली, कोल्हापूर, पुणे येथील प्रदर्शनातही त्यांनी भाग घेतलाय. दिवसेंदिवस या उत्पादनांचा ग्राहक वर्ग वाढतोय.
वनोजपांपासून मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीबद्दल केंद्र सरकारकडून वंदना गावडे यांचा सत्कार झाला. वुमेन बिझनेस ॲवॉर्ड, हिरकणी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. गतवर्षी त्यांच्या बचतगटाची उलाढाल २३ लाख रुपये होती. या वर्षी ती ४० लाखांवर पोहोचलीय. आदिवासी लक्ष्मी महिला बचत गटाचा हा प्रवास थक्क करणारा आहे. या यशात शासकीय संस्थांचाही वाटा आहेच. विदर्भातील आदिवासींसाठीच्या विकासासाठी हे खरं मॉडेल आहे. यात निसर्गाचं संरक्षण, संवर्धन होतंय आणि आदिवासींना योग्य रोजगारही मिळतोय.
सरकारची प्रामाणिक इच्छा असती तर गावोगाव असे प्रभावी बचत गट चालवून या प्रयोगाचं सार्वत्रिकीकरण करता आलं असतं. यातून आदिवासींचं सर्वंकष भलं करता आलं असतं. जंगलं शिल्लक राहिली असती, पण विकासाचं हे मॉडेल राबविलं जाईल, ही आशा भाबडी वाटावी असं जमिनीवरचं वास्तव आहे. सरकार, राजकीय नेते, उद्योगपती व प्रशासकीय अधिकारी हे आदिवासींच्या, निसर्गाच्या मुळावर उठले आहेत. त्यांचं आपल्या मातीशी कसलंही नातं राहिलेलं नाही. सगळे पैशाच्या मोहाने आंधळे झालेत. त्यांच्या दृष्टीने विनाश हाच विकास बनलाय. याचे दूरगामी परिणाम भावी पिढ्यांना भोगावे लागतील.
९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९, (लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.