Agriculture Success Story : सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी या मोठ्या धरणांसह अनेक लहान-मोठे जल प्रकल्प आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचे पुनर्वसन झाले आहे. जिल्ह्यातील जावळी तालुक्यात काळोशी हे २५० लोकसंख्या असलेले गाव आहे. कण्हेर धरणामुळे या गावाचेही पुनर्वसन झाले. तेथील शेतकऱ्यांपैकी आनंद शंकर शेलार हे धडाडीचे शेतकरी आहेत. आपली पिकाऊ शेतजमीन व राहते घर
शेलार यांना धरणात गमवावे लागले. त्यांचे मोठे बंधू संतोष याचे पुनर्वसन गोडोली येथे झाले. तर डोंगरालगतची पडीक जमीन शिल्लक राहिल्याने आनंदा गावातच राहिले. येथेच त्यांनी घर बांधले. काही वर्षे मुंबईत त्यांनी रिक्षा वाहतुकीचा व्यवसाय केला. सन १९९५ दरम्यान ते गावी परतले व पूर्णवेळ शेती करू लागले.
शेतीतील संघर्ष
महाबळेश्वरनंतर सर्वाधिक पाऊस जावळी तालुक्यात होतो. त्यामुळे नवी पिके व प्रयोगांना मर्यादा येतात. एकेकाळी ज्या जमिनीत केवळ जनावरे चरत ती पिकाऊ करण्याचे आव्हान शेलार यांच्या समोर होते. कृषी विभागाच्या योजनेतून तेथे केशर आंब्याची १०० रोपे लावली. धरण उशाला असले तरी पाणी शेतात पोहोचले नव्हते.
त्यामुळे झाडे जगविण्यासाठी डोक्यावरून पाणी वाहून झाडे जगविली. शंभरपैकी ९९ झाडे कष्टाच्या जोरावर जगविल्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. यातून उत्साह वाढला. मग सहा हजार फूट पाइपलाइन करून धरणातून पाणी शेतात आणले.
चढ-उताराच्या जमिनीचे सपाटीकरण करत टप्पे केले. खडक असल्याने काही ठिकाणी गाळ पसरून जमीन तयार केली. ऊस, भात, भाजीपाला घेण्यासही सुरुवात केली. सोयाबीनही घेऊन पाहिले. चार- पाच वर्षे जिद्दीने ऊस घेतला. पण पावसाचे जास्त प्रमाण तसेच मोर, गवे, कोल्हे आदींच्या त्रासातून शेती करणे अवघड होत होते. तरीही संघर्ष सुरू ठेवला.
प्रतिकूलतेत प्रयोग
प्रतिकूलतेत सकारात्मक दृष्टिकोन व खंबीरपणे शेती करणे सोपे नसते. शेलार यांनी समस्यांपुढे हार पत्करली नाही. सन २०१९ मध्ये १६ गुंठ्यांत ओडिसी-३ या वाणाच्या शेवग्याचा प्रयोग केला.
दोन वर्षे चांगले उत्पादन मिळाले. पण पावसात कळी- फूलगळ मोट्या प्रमाणात होऊन उत्पादन कमी होऊ लागले. नुकसानच जास्त होऊ लागले. आता शेवग्यात भुईमुगासारखे आंतरपीक घेण्यात येते.
मधल्या जागेत कुक्कुटपालनही ते करणार आहेत. घराजवळ छोटे शेड उभारून १०० कोंबड्यांची निगा राखण्यास सुरुवातही केली आहे.
पेरू, केळीची लागवड
नवी व पैसे देणारी पिके घेण्याचा शेलार यांचा विचार होता. त्यातूनच २०२० मध्ये तैवान पिंक पेरूची एक एकरात नऊ बाय सहा फूट अंतरावर लागवड केली. झाडे लहान असताना गहू, भुईमूग ही आंतरपिके घेतली. सूत्रकृमींचा त्रास कमी करण्यासाठी त्यात झेंडूही घेतला. फळाचा दर्जा व संरक्षणसाठी फोम बॅगेचा वापर केला.
पहिल्या वर्षी एक टन तर दुसऱ्या वर्षी तीन ते चार टनांपर्यंत उत्पादन मिळवले, जागेवरून ३० ते ४० रुपये प्रति किलो दराने विक्री साधली. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने वर्षातून एकच बहर घेतला जातो. जोडीला एक एकरात ग्रॅंडनैन केळीचीही लागवड केली. त्यात मेथी, पोकळा. कोथिंबीर आदी आंतरपिके घेऊन मुख्य पिकाचा खर्च कमी केला. सध्या केळीची काढणी केली आहे. सध्या दोन एकर ऊस असून, त्याचे अति पावसाळी हंगामातही एकरी ४५ ते ५० टन उत्पादन मिळते. सोबतीला भाताचाही आर्थिक आधार आहे.
शेततळे व मासेपालन
क्षेत्राच्या शेवटाकडील जमिनीत खडक होता. त्यात पिके घेणे कठीण होते. दुसरीकडे पाण्याची शाश्वतीही हवी होती. अशावेळी कृषी विभागाच्या योजनेतून शेततळे घेतले. कृषी पंपासाठी फक्त आठ तास वीज असल्याने सायफन पद्धतीने शेतीला पाणी दिले आहे. यामुळे दिवसा विजेशिवाय पाणी देता येत आहे. शेततळ्यात कटला, राहू सायप्रिनस या जातींचे मत्स्यपालन सुरू केले आहे.
शेतीत उभारलेल्या सुविधा
निसर्गाशी झुंजताना शेलार यांनी शेतीत विविध प्रकारच्या सुविधा उभारल्या आहेत. वन्यप्राण्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी शेती व घरास तीन तारेचे सौर ऊर्जेवर आधारित कुंपण केले. त्यात झटका यंत्राचा वापर केला आहे. डोंगर जवळ असल्याने वन्य प्राण्यांपासून बचावासाठी सौर ऊर्जेवर आधारित सायरनही बसविला आहे. दर दहा मिनिटांनी त्यातून ध्वनी येतो. फळबागेत सौर सापळा तर
शेततळ्यात बेडूक, साप, पक्ष्यांचा उपद्रव टाळण्यासाठी ‘बर्ड नेट’चा वापर केला आहे. सौर ऊर्जेवरील सीसीटीव्ही कॅमेराही आहे. ट्रॅक्टर, पॉवर टिलरसह अन्य अवजारे घेतली आहेत. पाण्याची मुबलकता असूनही ठिबकचा वापर केला जातो. दूध व शेणखतासाठी प्रत्येकी दोन गीर व देशी गायींचे संगोपन होते. शेतीत आई जनाबाई, पत्नी सुवर्णा व धनश्री, भाग्यश्री, सार्थक या मुलांची मोठी मदत शेलार यांना होते. कृषी सहायक उमेश संकपाळ, अजय पवार यांचेही सहकार्य व मार्गदर्शन होते.
आनंद शेलार, ९८३४५३९९९४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.