Women's Property Rights: संपत्तीमधील महिला हक्कविषयक कायद्यांची माहिती

Hindu Succession Act: आपल्या देशात वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या अधिकाराशी संबंधित नियमांबद्दल फारच कमी माहिती आहे. खरे तर वडिलांच्या संपत्तीवर मुलाप्रमाणेच मुलींचाही हक्क असतो आणि तो मुलांच्या प्रमाणात समान हक्क असतो. याबाबत कोणत्या कायदेशीर तरतुदी आहेत, हे आपण माहिती करून घेत आहोत.
Property Right
Property RightAgrowon
Published on
Updated on

भीमाशंकर बेरुळे

Marital Property Rights: पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा पूर्ण अधिकार असतो असं सामान्यतः मानलं जातं, परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. लग्नानंतर स्त्रीला तिच्या आई-वडिलांचे घर सोडून पतीच्या घरी जावं लागतं, त्याच ठिकाणी राहावं लागतं. पतीच्या घराला आपलं घर मानावं लागतं आणि त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. अशा परिस्थितीत पती आणि सासरच्या संपत्तीत आपला किती अधिकार आहे याची जाणीव महिलांनी ठेवायला हवी.

पतीच्या संपत्तीवर पत्नीचा हक्क :

पतीच्या संपत्तीवर पत्नीचा पूर्ण अधिकार असतो असं सामान्यतः मानलं जातं, परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. याचे दोन पैलू आहेत जे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, आपल्याकडे पत्नी ही पतीची अर्धांगिनी समजली जाते. त्यामुळे जर पतीने स्वतः ती संपत्ती कमावली असेल तर त्यावर पत्नी आणि त्यांच्या मुलांचा त्यावर पहिला अधिकार असतो. जर एखादी व्यक्ती इच्छापत्राशिवाय मरण पावली, तर त्याची संपत्ती ही त्याची पत्नी आणि मुलांमध्ये समान वाटली जाते. जर एखाद्या व्यक्तीने मृत्युपत्रात एखाद्याला आपला वारस बनवले तर संपत्ती त्याच्या त्याच वारसांकडेच जाईल.

सासरच्या संपत्तीवर स्त्रीचा हक्क :

जर संपत्ती वडिलोपार्जित असेल आणि पतीचा मृत्यू झाला, तर त्या संपत्तीवर महिलेचा अधिकार राहणार नाही. पतीच्या निधनानंतर स्त्रीला सासरच्या घरातून घालवून देता येत नाही. पतीच्या मृत्यूनंतर सासरच्या मंडळींना त्या महिलेला पोटगी द्यावी लागेल. पोटगी किती असावी हे न्यायालय, ती महिला आणि तिच्या सासरच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारे ठरवले जाते. जर त्या महिलेला मुले असतील तर त्यांना वडिलांच्या वाट्याची संपूर्ण मालमत्ता मिळेल. विधवा महिलेने दुसरे लग्न केले, तर तिला सासरच्या मंडळीकडून मिळणारी पोटगी थांबते.

महिलांचा संपत्तीचा अधिकार :

हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम १४ आणि हिंदू विवाह कायद्याच्या कलम २७ अंतर्गत, महिलेला लग्नापूर्वी, त्या दरम्यान आणि लग्नानंतर भेटवस्तू म्हणून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीवर (दागिने आणि रोख रकमेसह) पूर्ण अधिकार आहेत.

Property Right
Property Rights: मिळकतीमध्ये समान वाटणी, हक्कासाठी कायदा

घटस्फोट झाल्यानंतरचे अधिकार :

पतीपासून विभक्त झाल्यास, एखादी महिला तिच्या पतीकडून पोटगी मागू शकते.पती-पत्नी दोघांच्याही आर्थिक स्थितीच्या आधारावर पोटगीचा निर्णय घेतला जातो. घटस्फोटावेळी एकरकमी तडजोड करता येते. त्यामध्ये मासिक भत्त्याचाही समावेश होऊ शकतो. घटस्फोटानंतर जर मुले आईसोबत राहत असतील तर पतीला त्याची अधिकची पोटगी द्यावी लागेल. घटस्फोट झाल्यास पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा अधिकार नसतो. महिलेच्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर पूर्ण अधिकार असेल. जर पती-पत्नी संयुक्तपणे मालमत्तेचे मालक असतील, तर त्या प्रकरणात मालमत्ता समान प्रमाणात विभागली जाईल.

वडिलांच्या संपत्तीत मुलीचा वाटा कधी नसतो :

आपल्या देशात वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या अधिकाराशी संबंधित नियमांबद्दल फारच कमी माहिती आहे. या मालमत्तेशी त्यांचा काहीही संबंध नाही असे अनेक महिला गृहीत धरतात. मालमत्तेत मुलींच्या वाट्यावरून आपल्या देशात नेहमीच वाद होत आले आहेत. मुलीला मालमत्तेत किती अधिकार मिळतात याबाबत अनेक जण अनभिज्ञ असतात. काही लोक म्हणतात, की मुलीला मुलापेक्षा कमी अधिकार असतात, काही म्हणतात, की मुलीला अधिकार नसतात, तसेच काही म्हणतात, की मुलीला समान अधिकार असतात. अशाप्रकारे समाजात विविध प्रकारचे गैरसमज पसरलेले दिसून येतात.

खरे तर वडिलांच्या संपत्तीवर मुलाप्रमाणेच मुलींचाही हक्क असतो आणि तो मुलांच्या प्रमाणात समान हक्क असतो. आपल्या देशात वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या अधिकाराशी संबंधित नियमांबद्दल फारच कमी माहिती आहे. या मालमत्तेशी त्यांचा काहीही संबंध नाही, असे अनेक महिला गृहीत धरतात.

हिंदू वारसा हक्क कायदा :

मालमत्तेवरील हक्क आणि हक्काच्या तरतुदींसाठी हा कायदा १९५६ मध्ये लागू करण्यात आला. यानुसार वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा जितका अधिकार आहे तितकाच मुलाचाही आहे. हा उत्तराधिकारी कायदा २००५ मध्ये बदलून मुलींच्या हक्कांचे बळकटीकरण करण्यात आले. ज्यामध्ये वडिलांच्या मालमत्तेवर मुलीच्या हक्काबाबत असलेल्या शंका दूर करण्यात आल्या.

Property Right
Intellectual Property Rights : जाणून घेऊ बौद्धिक संपदा अधिकार!

वडिलांच्या संपत्तीवर मुलगी कधी दावा करू शकत नाही :

१) वडिलांनी स्वतःच्या पैशातून निर्माण केलेल्या संपत्ती मालमत्तेबाबत मुलीची बाजू काही प्रकरणात कमकुवत पडू शकते. ते म्हणजे वडिलांनी स्वतःच्या पैशाने जमीन विकत घेतली असेल, घर विकत घेतले असेल, तर त्यांनी ती संपत्ती स्वतःच्या इच्छेने कोणालाही देणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. याचा दुसरा अर्थ असाही आहे, की वडिलांनी मुलीला स्वतःच्या मालमत्तेत वाटा देण्यास नकार दिला तर मुलगी काहीही करू शकत नाही. तिला संपत्तीत अधिकार राहत नाही.

२) २००५ च्या घटनादुरुस्तीनंतर मुलीला समान वारस म्हणून गणले गेले आहे. आता मुलीच्या लग्नानंतरही वडिलांना संपत्तीचा वारसा हक्क आहे. त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. म्हणजेच लग्नानंतरही वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क असतो.

३) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वाच्या निकालानुसार, एखाद्या हिंदू पुरुषाने मृत्युपत्र केलेले नसेल आणि तशा स्थितीत तो मरण पावला, तर त्याच्या मुलींना त्यांच्या वडिलांच्या स्वकष्टार्जित व इतर मालमत्तेमध्ये समान वाटा मिळेल आणि मालमत्तेच्या विभागणीमध्ये इतर दुय्यम कुटुंब सदस्यांपेक्षा त्यांना प्राधान्य मिळेल. त्यामुळे एखादा हिंदू पुरुष मृत्युपत्र तयार न करताच मरण पावला, तर त्याच्या मुलींना स्वतःच्या वडिलांच्या स्वकष्टार्जित व इतर मालमत्तांवर हक्क सांगता येईल. तसेच चुलते किंवा चुलत भाऊ यांच्याऐवजी संबंधित मृताच्या मुलींना मालमत्तेच्या विभाजनामध्ये प्राधान्य दिलं जाईल.

निकालातील ३ महत्त्वाचे मुद्दे :

१) मृत्युपत्र न करता मरण पावलेल्या हिंदू पुरुषाच्या मुलींना त्या पुरुषाला त्याच्या वडिलांकडून विभाजित वारसाहक्काद्वारे मिळालेल्या मालमत्तेमध्ये आणि त्या पुरुषाने (म्हणजे संबंधित मुलींच्या वडिलांनी) मिळवलेल्या स्वकष्टार्जित मालमत्तेमध्ये वारसाहक्क असेल. तसेच या मालमत्तेच्या वाटपामध्ये मृत पुरुषाच्या मुलींना दुय्यम कुटुंब सदस्यांपेक्षा प्राधान्य दिले जाईल.

२) १९५६ पूर्वीच्या मालमत्तांचा वारसाहक्क निश्‍चित करतानासुद्धा मुलींच्या अधिकाराचा विचार केला जाईल.

३) मृत्युपत्र न करता एखादी हिंदू स्त्री मरण पावली आणि तिला मूल नसेल, तर तिच्याकडे तिच्या वडिलांकडून वा आईकडून वारसाहक्काने आलेली मालमत्ता तिच्या वडिलांच्या वारसांकडे जाईल, तर पतीकडून वा सासऱ्याकडून वारसाहक्काने तिच्याकडे आलेली मालमत्ता तिच्या नवऱ्याच्या वारसांकडे जाईल.

पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत विवाहित मुलीचा हक्क :

१) सामान्य वडिलोपार्जित मालमत्तेचे विभाजन वारसा कायद्याने स्थापित केलेल्या नियमांना लक्षात घेऊन केले जाते. ते स्वतः मिळविलेल्या मालमत्तेसारखे नाही. येथे, पालकांना त्यांच्या अविभाजित वडिलोपार्जित मालमत्तेतील त्यांचा वाटा त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही व्यक्तीला देण्याचा अधिकार नाही. मुलींनाही त्यांच्या भावांइतकेच अविभाजित वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क आहेत.

२) वारसा किंवा वारसाहक्क कायदा मृताच्या इतर कायदेशीर वारसांनाही मालमत्तेचे हक्क देत असल्याने, विभागणी प्रत्येक वारसाच्या वाट्यावर आधारित असेल. परंतु तुम्हाला हे माहिती असले पाहिजे, की विवाहित मुलींना देखील त्यांच्या पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत त्यांच्या भावांइतकाच वाटा मिळेल.

Property Right
Property Right: मालमत्तेमध्ये वाटणी मागण्याचा हक्क

हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, २००५.

१) हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा २००५ हा मुलींना समान मालमत्तेचा अधिकार देण्यासाठी पूर्वीच्या कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला. कायद्यात स्पष्टपणे म्हटले आहे, की जर वडील मृत्युपत्र न लिहिता मरण पावले तर मुलगी देखील मालमत्तेची वारस होईल. मुलीला जन्मापासूनच कायदेशीर अधिकार आपोआप मिळेल. शिवाय, त्यांना कोणत्याही पुरुष नातेवाइकाच्या परवानगीची आवश्यकता नाही. २००५ च्या हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायद्यानुसार, मुली आणि मुलगा दोघांनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान वाटा आहे.

तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे, की कायद्याने वडिलांच्या मालमत्तेत विवाहित मुलीचा वाटा मान्य केला असला, तरी तो लग्नाद्वारे कुटुंबाचा भाग असलेल्या सुनेचा वाटा वाढणार नाही. सून ही कुटुंबातील सदस्य आहे, परंतु या कायद्यानुसार त्यांना त्यांच्या सासरच्या मालमत्तेत समान वाटा असल्याचा दावा करता येणार नाही.

हिंदू उत्तराधिकार कायद्याचा उद्देश काय आहे?

१) १९५६ च्या कायद्याशी संबंधित, हिंदू उत्तराधिकार कायद्याचे मुख्य उद्दिष्ट मर्यादित मालमत्तेच्या सर्व कल्पना पूर्णपणे काढून टाकणे होते. पुरुष आणि स्त्री यांच्यातील मालमत्तेच्या हक्कांमध्ये परिपूर्ण समानता सुनिश्‍चित करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. कायद्याने महिलांना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत हक्क देखील जाहीर केले. पुढे, न्यायालयाने २००५ च्या कायद्यातील सुधारणांशी संबंधित कलम १४ आणि कलम १५ वर निरीक्षणे नोंदवली आहेत, ज्यामध्ये हिंदू महिलांच्या बाबतीत सामान्य उत्तराधिकार नियमांचा समावेश आहे. हिंदू वारसाहक्क कायद्याच्या कलम १५(१) नुसार, मृत्युपत्र न करता मृत्युमुखी पडणाऱ्या हिंदू महिलेच्या मालमत्तेच्या वारसासाठी फक्त पुत्र आणि मुलीच पात्र असतील.

वडिलोपार्जित मालमत्तेच्या विभाजनासाठी मुलीचा दावा :

पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेचे वाटणीचा दावा मुली करू शकतात किंवा त्यांची वैवाहिक स्थिती काहीही असो मुलींना दावा करण्याचा अधिकार आहे.

हिंदू वारसाहक्क अधिनियम :

१) १९५६ मध्ये हिंदू वारसाहक्क अधिनियम करण्यात आला. हिंदूंच्या मालमत्तेशीसंबंधित वारसाहक्कांची प्रकरणे या कायद्यानुसार हाताळली जात होती.

२) हिंदू वारसाहक्क (दुरुस्ती) अधिनियम, २००५ अनुसार, एखादा हिंदू पुरुष मृत्युपत्र न करताच मरण पावला, तर त्याच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर त्याच्या मुलांइतकाच मुलींचाही हक्क असेल. यात मुलगी विवाहित आहे अथवा नाही, याचा विचार करण्याची गरज नाही.

३) १९५६ मधील हिंदू कायद्यांच्या संहितांनुसार, मुलींना वडिलांच्या, आजोबांच्या आणि पणजोबांच्या मालमत्तेमध्ये मुलांइतकाच वारसाहक्क आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.या निकालाने महिलांना वडिलांच्या स्वकष्टार्जित व इतर मालमत्तांमध्ये समान वाट्याचा हक्क दिला. या संदर्भात काही वाद उद्‍भवल्यास आता महिलांना दिवाणी न्यायालयात दाद मागता येईल. मुलगी म्हणून आपल्याला आपल्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये वाटा मिळण्याचा अधिकार आहे. हा निकाल महिला सबलीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकणारा आहे. तसेच हा निर्णय चांगला असून आपल्या समाजावर त्याचा दीर्घकालीन परिणाम होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com