
भीमाशंकर बेरुळे
भाग ः १
Family Property Legal Rights : भारतात मालमत्तेच्या विभाजनाबाबत वेगवेगळे कायदे आहेत. वडिलांच्या संपत्तीवर मुलीच्या हक्कासंबंधी काय तरतुदी आहेत याची अनेकांना माहिती नसते. विशेषत: महिलांना याबाबत माहिती कमी असते. वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या हक्काशी संबंधित कायदेविषयक तरतुदी आणि मुलींना वडिलांच्या संपत्तीत कधी वाटा मिळत नाही, याबाबत कायदा काय म्हणतो, हे आपण आजच्या लेखात माहिती करून घेऊयात.
काळ बदलला तसे विचार बदलले आहेत, पण आजही अनेक मुली आहेत ज्यांना त्यांचे हक्क मिळालेले नाहीत, किंबहुना त्यांना त्यांच्या हक्क आणि अधिकारांची माहिती नाही. भारतात मुलींच्या बाजूने अनेक कायदे करण्यात आले आहेत, परंतु ज्ञानाच्या अभावामुळे मुलींना आवाज उठवता येत नाही. वडिलांची मालमत्ता आणि त्यांच्या संपत्तीवर मुलींच्या हक्कासंबंधी काय तरतुदी आहेत याची अनेकांना माहिती नसते. विशेषत: महिलांना याबाबत माहिती कमी असल्याचे समाजात दिसून येते.
एक स्त्री म्हणून महिला अनेक भूमिका निभावते. एक मुलगी म्हणून कायद्यानुसार तुम्हाला कोणते अधिकार आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? संपत्तीतील वाटा हा मुलींचा समावेश असलेल्या सर्वांत वादग्रस्त प्रकरणांपैकी एक आहे.
वडिलांच्या संपत्तीत मुलीचे अधिकार याबाबतीत कायदा ः
२००५ मध्ये हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ मध्ये सुधारणा करून मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत मुलाइतकाच समान हिस्सा मिळण्याचा कायदेशीर अधिकार देण्यात आला. संपत्तीवरील दावे आणि हक्काच्या तरतुदींसाठी हा कायदा १९५६ मध्ये करण्यात आला होता. ज्यानुसार वडिलांच्या संपत्तीवर मुलीचाही तितकाच अधिकार आहे, जेवढा हक्क मुलाचा आहे.
हिंदू वारसा कायदा :
हिंदू कोड बिल (हिंदू कायद्याची संहिता) १९५६ मध्ये दुरुस्ती मंजूर होऊन त्यानुसार हिंदू वारसा कायदा, हिंदू अज्ञान पालन कायदा, हिंदू दत्तक विधान व पोषणाचा कायदा असे कायदे अस्तित्वात आले. १९५६ च्या हिंदू वारसा कायद्यानुसार एखाद्या कुटुंबाची वडिलोपार्जित संपत्ती असेल तर या संपत्तीत कुटुंबातील मुलांना जन्मत:च त्यांचे वडील, काका यांच्या बरोबरीने हिस्सा देण्यात आला. म्हणजेच या कायद्यानुसार एखाद्या कुटुंबातील मुलगे वडिलोपार्जित मिळकतीत जन्मत:च सहहिस्सेदार मानले जाऊ लागले.१९५६ च्या कायद्यानुसार कुटुंबातील मुलींना मात्र जन्मत:च सहदायक असा अधिकार दिला गेला नव्हता.
लग्नानंतरही मुलींचा मालमत्तेवर हक्क राहणार :
- २००५ आधी हिंदू वारसाहक्क कायद्यानुसार, फक्त अविवाहित मुलींना हिंदू अविभाजित कुटुंबाचे सदस्य मानले जायचे, तर लग्नानंतर त्यांना हिंदू अविभाजित कुटुंबाचा सदस्य मानले जात नव्हते. म्हणजेच लग्नानंतर त्यांना वडिलांच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नव्हता. ९ सप्टेंबर २००५ मध्ये हिंदू वारसाहक्क कायद्यात सुधारणा झाल्यानंतर मुलीला लग्नानंतरही देखील वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुला एवढाच समान हिस्सा देण्यात आला आहे.
- वडिलांच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागण्यासाठी वेळेच्या मर्यादेबद्दल बोलायचे तर लग्नानंतर वडील किंवा वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलीचा किती वर्षे हक्क राहील, याची कायद्यात कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. म्हणजेच मुलींना नेहमीच त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर मुलांप्रमाणेच समान हक्क असेल.
महिलांचा संपत्तीचा अधिकार ः
- हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम १४ आणि हिंदू विवाह कायद्याच्या कलम २७ अंतर्गत, महिलेला लग्नापूर्वी, लग्नात आणि लग्नानंतर भेटवस्तू म्हणून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीवर (दागिने आणि रोख रकमेसह) तिचा वैयक्तिक आणि एकाधिकार आहे.
मुलींचा केवळ वडिलोपार्जित मालमत्तेवर अधिकार आहे का?
- हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार मालमत्तेचे वर्गीकरण वडिलोपार्जित आणि स्व-कष्टार्जित या दोन प्रकारांत केले आहे. वडिलोपार्जित म्हणजे पिढ्यान् पिढ्या राहिलेली मालमत्ता, ज्यावर मुलगा आणि मुलींचा जन्मसिद्ध अधिकार असतो. पण वडिलांनी स्वतः कमावलेली म्हणजेच स्वतःच्या कमाईतून खरेदी केलेल्या मालमत्तेवर मुलगा आणि मुलींचा जन्मसिद्ध अधिकार नसतो.
लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या मालमत्तेवर हक्क आणि मुली नेमकं कधी करू शकतात दावा ः
- मालमत्तेच्या विभाजनासाठी १९५६ मध्ये हिंदू उत्तराधिकार कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यांतर्गत हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख यांच्यातील मालमत्तेचे विभाजन, उत्तराधिकार आणि वारसा यासंबंधी कायदे निश्चित करण्यात आले आहेत.
- ९ सप्टेंबर २००५ पूर्वी मुलींना लग्नानंतर वडिलांच्या मालमत्तेवर हक्क मिळत नव्हता, पण २००५ मध्ये हिंदू वारसाहक्क कायद्यात सुधारणा करण्यात आली. त्यानंतर मुलींना त्यांच्या लग्नानंतर देखील वडिलांच्या मालमत्तेवर मुलांएवढाच समान वाटणी हिस्सा आहे. तो न दिल्यास मुलीस न्यायालयात दावा करून तो मिळविण्याचा हक्क मिळाला आहे.
संपत्तीत वाट न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा अधिकार ः
- वडिलोपार्जित मिळकतीत मुलीस तिचा असलेला समान हिस्सा न दिल्यास वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगण्यासाठी मुलगी (मग ती विवाहित असो की अविवाहित) न्यायालयाचे दार ठोठावू शकते. त्यासाठी तिला दिवाणी न्यायालयात वाटणीसाठी दावा दाखल करावा लागेल आणि दिवाणी न्यायालयात दावा खरा ठरला तर मुलीला वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळेल.
- मालमत्तेवर कोणतेही गैरकृत्य होत असेल, एखाद्या गुन्ह्यासाठी कारवाई सरकार कार्यवाही करीत असेल तर मुलीला वडिलांच्या सदर मालमत्तेत वाटा मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत, न्यायालय किंवा संबंधित अधिकाऱ्यांना योग्य वाटल्यास मालमत्तेचे विलीनीकरण होऊ शकते आणि त्यावर मुलीचा अधिकार राहणार नाही.
- वडिलांनी भेट म्हणून मालमत्ता हस्तांतरित केली आणि पारिवारिक कारणांसाठी बँक, संस्था किंवा इतर व्यक्तीकडे दिली असल्यास मुलीचा सदर मालमत्तेवर कोणताही अधिकार राहणार नाही.
हिंदू वारसा (दुरुस्ती) कायद्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असल्यासही मुलीला मालमत्तेत वाटा, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय ः
- वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना समान हक्क प्रदान करणारा हिंदू वारसा (दुरुस्ती) कायदा ९ सप्टेंबर २००५ चा पूर्वलक्षी प्रभावाने आहे का, या मुद्द्यावर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी निकाल सुनावला.
हिंदू वारसा (दुरुस्ती) अधिनियम २००५ (Hindu Succession (Amendment) Act २००५) अस्तित्वात आला, त्या वेळी वडील हयात असोत किंवा नसो, मुलींना त्यांच्या संपत्तीमध्ये मुलाप्रमाणे समान वाटा मिळणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
- सदर निकालानुसार ९ सप्टेंबर २००५ रोजी हयात असलेल्या सर्व मुलींना (Daughters) सुधारित कायद्याचे अधिकार लागू होतील. संबंधित मुलीचा जन्म कधी झाला, याने फरक पडणार नाही. (Daughters have right over parental property even if coparcener died before Hindu Succession Amendment Act) हिंदू वारसा कायद्याच्या कलम ६ मध्ये ९ सप्टेंबर २००५ रोजी महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी दुरुस्ती केंद्र शासनाकडून करण्यात आली होती.
- वडिलोपार्जित संपत्तीत (स्थावर मालमत्तेतही) मुलांच्या बरोबरीने मुलींनाही जन्मत:च समान भागीदार म्हणून हक्क प्राप्त करून देण्याबाबतची ही दुरुस्ती आहे. परंतु, कायदा दुरुस्ती अस्तित्वात आली त्यापूर्वी म्हणजेच ९ सप्टेंबर २००५ च्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असेल, तर मुलींना याचा लाभ मिळेल की नाही, हे स्पष्ट नव्हते.
निकाल काय?
- हिंदू वारसा (दुरुस्ती) कायदा २००५ हा ९ सप्टेंबर २००५ रोजी अस्तित्वात आला, त्या वेळी वडील हयात होते किंवा नव्हते, त्याने फरक पडणार नाही. ९ सप्टेंबर २००५ रोजी हयात असलेल्या सर्व मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाप्रमाणे समान वाटा मिळणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
“मुलींना मुलांप्रमाणे समान हक्क दिलेच पाहिजेत. मुलगा हा लग्न होईपर्यंत मुलगा असतो. मात्र मुलगी आयुष्यभर एक प्रेमळ कन्या असते. वडील जिवंत असो वा नसो, मुलगी आयुष्यभर समान भागीदार (कोपार्सनर) राहील”, असे न्यायमूर्ती मिश्रा यांनी सदर निकाल देताना म्हटले आहे.
मुलगी वडिलांच्या मालमत्तेवर कधी हक्क सांगू शकत नाही?
- स्वतः कमावलेल्या म्हणजेच स्वकष्टार्जित मालमत्तेच्या बाबतीत मुलीची बाजू कमकुवत असते. वडिलांनी स्वत:च्या पैशाने जमीन खरेदी केली, घर बांधले किंवा घर खरेदी केले असेल तर वडील आपल्या इच्छेनुसार ते कोणालाही सदर स्वकष्टार्जित मालमत्ता देऊ शकतो.
- स्वत:च्या इच्छेनुसार कोणालाही स्वकष्टार्जित स्वत:ची संपत्ती देण्याचा वडिलांचा कायदेशीर अधिकार आहे, म्हणजेच वडिलांनी मुलीला मालमत्तेत हिस्सा देण्यास नकार दिला तर मुलगी काहीही करू शकत नाही.
पती आणि सासरच्या संपत्तीवर महिलेचा अधिकार किती?
पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा पूर्ण अधिकार असतो असे सामान्यतः मानले जाते, परंतु हे पूर्णपणे सत्य नाही.
लग्नानंतर स्त्रीला तिच्या आई-वडिलांचे घर सोडून पतीच्या घरी जावं लागतं, त्याच ठिकाणी रहावं लागतं. पतीच्या घराला आपलं घर मानावं लागतं आणि त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. अशा परिस्थितीत पती आणि सासरच्या संपत्तीत आपला किती अधिकार आहे याची जाणीव महिलांनी ठेवायला हवी.
पतीच्या संपत्तीवर पत्नीचा हक्क ः
- आपल्याकडे पत्नी ही पतीची अर्धांगिनी समजली जाते. त्यामळे जर पतीने स्वतः ती संपत्ती कमावली असेल तर त्यावर पत्नी आणि त्याच्या मुलांचा त्यावर पहिला अधिकार असतो.
- जर एखादी व्यक्ती इच्छापत्राशिवाय मरण पावली, तर त्याची संपत्ती ही त्याची पत्नी आणि मुलांमध्ये समान वाटली जाते. जर एखाद्या व्यक्तीने मृत्युपत्रात एखाद्याला आपला वारस बनवले तर संपत्ती त्याच्या त्याच वारसांकडेच जाईल.
सासरच्या संपत्तीवर स्त्रीचा हक्क ः
- पतीच्या निधनानंतर स्त्रीला सासरच्या घरातून हाकलून देता येत नाही.पतीच्या मृत्यूनंतर सासरच्या मंडळींना त्या महिलेला पोटगी द्यावी लागेल. पोटगी किती असावा. हे न्यायालय, ती महिला आणि तिच्या सासरच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारे ठरवले जाते. जर त्या महिलेला मुले असतील तर त्यांना वडिलांच्या वाट्याची संपूर्ण मालमत्ता मिळेल. विधवा महिलेने दुसरे लग्न केले तर तिला सासरच्या मंडळीकडून मिळणारी पोटगी थांबते.
(लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.