Intellectual Property Rights : जाणून घेऊ बौद्धिक संपदा अधिकार!

Right of Intellectual property : बौद्धिक संपदा अधिकाराचे कोणकोणते प्रकार आहेत. ते या लेखातून पाहुयात.
Intellectual Property
Intellectual PropertyAgrowon
Published on
Updated on

डॉ. अंबालिका चौधरी, डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख

Different Types of Intellectual Property Rights : संपत्ती ही विविध प्रकारची असते. उदा. सोने, चांदी, जमीन, शेती, पैसा, गाडी इ. ही डोळ्यांनी दिसणारी, जिचा उपभोग घेता येतो, अशी संपत्ती आहे. त्याच प्रमाणे एक न दिसणारी, स्पर्श न करता येणारी अशीही एक संपत्ती असते.

ही संपत्ती मानवाची बुद्धी, कल्पकता, नवसंशोधन, प्रतिभा यांच्या संयोगातून तयार होत असते. त्याला म्हणतात बौद्धिक संपत्ती किंवा बौद्धिक संपदा! (Intellectual propoerty) ज्या प्रमाणे सामान्य संपत्तीचा लाभ माणसाला घेता येतो, त्याच प्रमाणे या बौद्धिक संपदेचा व मेहनतीचा मोबदला मिळायला हवा. ही बौद्धिक संपदा सुरक्षित राहण्यासाठी काही अधिकार देण्यात आले आहेत.

बौद्धिक संपदा अधिकाराचे विविध प्रकार असू शकतात. उदा. पेटंट, व्यापारी चिन्ह (ट्रेडमार्क), कॉपिराइट्स, भौगोलिक मानांकन (जीआय), संघटित सर्किट्‌स, व्यापारी रहस्य (ट्रेड सिक्रेट्स), पीक संरक्षण अधिकार इ. एखाद्या व्यक्तीने नवसंशोधन करून एखादी वस्तू किंवा वस्तू बनविण्याची नवीन पद्धत निर्माण केली असेल तर त्याला पेटंट मिळू शकते.

कुणी स्वतःच्या व्यापाराकरिता व्यापार चिन्ह किंवा लोगो वापरत असेल तर त्यास ट्रेडमार्क मिळू शकतो. कुणी एखादे कथा, कविता, साहित्य लिहिले असेल किंवा एखादे सॉफ्टवेअर बनविले असेल तर त्याला कॉपिराइट्स मिळू शकतात.

भौगोलिक वैशिष्ट्यामुळे एखादी गोष्ट प्रसिद्ध असल्यास, त्यात काही वेगळे गुणधर्म असल्यास त्याला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळू शकतो. एखाद्या कंपनीने व्यवसायाकरिता ठेवलेल्या रहस्यांना ट्रेड सिक्रेट मिळतो.

अशा सर्व प्रकारच्या बौद्धिक संपदांचा लेखाजोखा जागतिक पातळीवर ठेवणारी संस्था जिनेव्हा मध्ये आहे. तिचे नाव ‘जागतिक बौद्धिक संपदा संस्था’ (wipo). ही संस्था बौद्धिक संपदेशी निगडित वार्षिक अहवाल तयार करत असते. या अहवालात सदस्य राष्ट्रांकडून बौद्धिक संपदा नोंदी किती झाल्या, यांची दखल घेतली जाते.

एखाद्या राष्ट्राच्या बौद्धिक संपदा नोंदणी संख्येवर त्या राष्ट्राच्या प्रगतीचा आलेख आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडला जातो. कुठल्याही राष्ट्राची प्रगती ही त्या राष्ट्राकडे असणाऱ्या बौद्धिक संपदा अधिकारांवर अवलंबून असते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अनेक दशके पेटंटबाबतीत प्रथम क्रमांकावर असणाऱ्या अमेरिकेला चीन या देशाने आता मागे टाकले आहे.

मागील काही वर्षांत चीनने लाखोंच्या संख्येने बौद्धिक संपदा अर्ज सादर केले आहेत. संख्येच्या बाबतीत भारत पिछाडीवर असला तरी तुलनात्मक दृष्टीने भारतामध्ये पेटंट दाखल करण्याच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झालेली दिसते.

Intellectual Property
Monsoon 2024 : एल निनोचा प्रभाव ओसरतोय! पण यंदा मॉन्सूनमध्ये पाऊस कसा राहील?

एक विशेष बाब म्हणजे जगभरात पेटंट अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये विविध देशांत काम करणाऱ्या भारतीयांची संख्या जास्त आहे. आपल्या राष्ट्राच्या प्रगतीचा आलेख जर आपल्याला वाढवायचा असेल, तर बौद्धिक संपदा संख्येत वाढ होणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता बौद्धिक संपदा अधिकारांविषयी जनजागृती करण्याची गरज आहे.

बौद्धिक संपदेविषयी असलेल्या अज्ञानामुळे हळदीचे पेटंट परत मिळवायला आपल्या देशाला दहा हजार डॉलर खर्चावे लागले, तर दार्जिलिंग चहा या भौगोलिक मानांकनाचा अमेरिका व युरोपीय देशांत होणारा चुकीचा व अकायदेशीर वापर थांबविण्याकरिता आपल्याला जवळपास बारा न्यायालयीन लढाया लढाव्या लागल्या.

चीनने पुदिन्याचे पेटंट मिळवलेही म्हणूनच विविध क्षेत्रात काम करणारे संशोधक, विद्यार्थी, तरुण वर्ग, शेतकरी या सर्वांना बौद्धिक संपदा अधिकाराविषयी माहिती असणे अत्यावश्यक आहे.

सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या बौद्धिक संपदेचे स्थान फार महत्त्वाचे आहे. पेटंट या बौद्धिक संपदेचा थेट संबंध उद्योग व्यवसाय विस्ताराशी येतो. एक संशोधन एका पेटंटला जन्म देते, तर एक पेटंट एका उद्योगास जन्म देऊ शकते. कृषी क्षेत्राशी निगडित पेटंट हे कृषी व्यवसायाला नक्कीच उभारी देऊ शकतात.

पेटंटसाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्ज करता येतात. ते एका किंवा अनेक देशात करता येतात. पेटंट मिळाल्यानंतर पेटंट निगडित उत्पादन तसेच विक्रीसंबंधी सर्व निर्णय पेटंटधारक घेऊ शकतात. जर पेटंटचा कुणी गैरवापर करत असेल तर त्याला कायदेशीर शिक्षा मिळावी, यासाठी कायदेशीर लढाईही लढता येते.

आणि अशा कायदेशीर लढाईतून गैरवापर करणाऱ्या शिक्षा झाल्याच्याही अनेक घटना आहेत. पेटंट कायदा, १९७० नुसार कृषी व उद्यानविद्या संबंधित गोष्टी पेटंटमधून वगळण्यात आल्या असल्या तरी कृषी क्षेत्राशी निगडित यंत्रे व साधने किंवा कृषी संबंधित रसायने यांना पेटंट दिले जाते.

उदा. कैरी कापण्यासाठी विकसित केलेले मोटारचलित कटर किंवा स्लायसर, टोकण यंत्र, दालमिल, स्प्रिंकलरचे नवनवीन डिझाइन्स, विशिष्ट प्रकारे कामगंध सापळे, बायोएजन्ट्‍स, जैविक कीटकनाशके, पीकनिहाय सूक्ष्म खते इ.

आपल्या देशाने ‘पिकाच्या नवीन वाणाचे संरक्षण संघ’ (UPOV) अंतर्गत स्वयंनिर्मित (Sui genesis) कायदा पद्धतीचा स्वीकार केला आहे.

त्यामुळे पिकांवरील संशोधनावर किंवा पीक वाण निर्मिती व पिकांच्या विविध वाणांचे संवर्धन याकरिता विशेष असे पीक पैदासकार अधिकार व शेतकरी अधिकार देण्यात आले आहेत. पीक पैदासकार व शेतकरी यांच्यासाठी ‘पीक वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क कायदा-२००१’ (PPVER act २००१) संमत करण्यात आला.

Intellectual Property
Pune Bangalore Highway : कोल्हापुरातील अंगणवाडी सेविका पुणे -बंगळुरू महामार्ग रोखणार, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

शेतकरी हक्क कायद्याची महत्त्वाची उद्दिष्टे

शेतकऱ्यांच्या व कृषी शास्त्रज्ञांच्या हक्काचे संरक्षण करणे. पीक वाण जतन करण्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोलाच्या कार्याची जाणीव ठेवणे. पीक पैदासकाराच्या हक्काचे संरक्षण करणे. शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार व शुद्ध बियाण्यांची उपलब्धता करून देणे. बियाणे उद्योगाची भरभराट होण्यास प्रोत्साहन देणे.

बरेच प्रयोगशील शेतकरी किंवा शेतकरी गट शेतात विविध प्रयोगांसोबतच वाण निर्मितीसाठी देखील प्रयत्नशील असतात. शेतकऱ्यांनी विकसित किंवा तयार केलेल्या वाणांना पीक पैदासकाराने निर्माण केलेल्या वाणांप्रमाणेच संरक्षण मिळते. शेतकरी निर्मित वाणाचे उत्पादन ते विक्री हे सर्व निर्णय शेतकरी स्वतः घेऊ शकतात. त्यापासून नफाही मिळवू शकतात.

आपल्या देशात काही शेतकरी पिकांच्या जुन्या व पारंपरिक वाणांचे जतन करण्याचे काम करत आहेत. अशा शेतकऱ्यांना सुद्धा विशेष असे अधिकार या कायद्यांतर्गत देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील याचे उत्तम उदाहरण म्हणजे राहीबाई पोपेरे. अशा प्रकारे पारंपरिक पीक वाणांचे जतन आणि वाण निर्मिती करण्यात व्यस्त असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या बौद्धिक संपदा अधिकाराचा उपयोग स्वतःच्या आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी करता येईल.

भौगोलिक मानांकन (जीआय)

आपल्या शेती क्षेत्राशी निगडित असणारा आणखी एक महत्त्वाचा बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे भौगोलिक मानांकन (जीआय). एखादा विशिष्ट गुणधर्म असलेले, विशिष्ट भागात येणारे किंवा तयार होणारे उत्पादन किंवा पदार्थ हा एखाद्या विशिष्ट भागाचेच प्रतिनिधित्व करिता असेल तर त्यास बौद्धिक संपदेचे विशिष्ट मानांकन दिले जाते. त्यास भौगोलिक मानांकन (जीआय) असे म्हणतात.

उदा. मधुबनी पेंटिंग, कोकण हापूस, महाबळेश्‍वर स्ट्रॉबेरी, दार्जिलिंग चहा, जळगाव केळी, पैठणी साडी, काश्मिरी पश्मीना शाल, कोल्हापुरी चप्पल इ. यात विशिष्ट भागात येणाऱ्या कृषी उत्पादनांचाही समावेश होतो. जसे महाबळेश्‍वर स्ट्रॉबेरी, नाशिक द्राक्षे, जळगाव केळी, कोकण हापूस, दार्जिलिंग चहा, मराठवाडा केसर आंबा, पुरंदर अंजीर, घोडवळ चिकू, जालना मोसंबी इ.

कोणत्याही कृषी उत्पादनांना मानांकन मिळाले तर उत्पादनास क्वालिटी टॅग मिळतो. त्यावरून त्या उत्पादनाचे ब्रॅंडिंग करता येते. उत्पादनाला काही प्रमाणात अधिकचा दर (प्रिमियम) मिळू शकतो. शिवाय जागतिक बाजापेठेतही त्या नावाने उत्पादन उपलब्ध करता येते. मानांकन मिळाल्यामुळे उत्पादनास कायदेशीर संरक्षणही मिळते.

शेती उत्पादनास भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे त्या विशिष्ट भागातील सर्वच शेतकऱ्यांचा फायदा होतो. त्यामुळे अशी प्रादेशिक गुणधर्म असणारी उत्पादने शेतकऱ्यांनी ओळखून त्यासाठी भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे कृषी क्षेत्राशी निगडित असणारे बौद्धिक संपदा अधिकार शेतकऱ्यांच्या पर्यायाने राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग नक्कीच बनू शकतो. गरज आहे ती बौद्धिक संपदा अधिकारांबाबत शेतकऱ्यांनी साक्षर होण्याची!

- डॉ. अंबालिका चौधरी, ९८३४६६५९६५, (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com