
इंद्रजित भालेराव
Alandi Temple Visit Spiritual Experience: १८ एप्रिल २०२५ रोजी आळंदीला जायचं ठरलं होतं. ह. भ. प. सचिन महाराज काल देहू सोडताना म्हणाले होते, सर काही अडचण आली तर मला फोन करा. पण मी आळंदीला जाणार म्हटल्यावर स्नेहवनचे अशोक देशमाने म्हणाले, सर मीही तुमच्यासोबत येतो. त्यांना खरं तर पुष्कळ कामं होती. स्नेहवनच्या इमारतींसमोर गट्टू बसवायचं काम सुरू होतं. खूप माणसं कामाला होती. त्यामुळे मी म्हणालो, अशोक आम्ही आळंदीला जाऊन येतो, तुम्ही थांबा इथंच, तुम्ही इथं थांबणं आवश्यक आहे. तर ते म्हणाले, नाही सर, येतो मीही. मी म्हटलं तुमच्या मागं खूप व्याप आहेत, तुम्ही कशाला त्रास घेता ?
ते म्हणाले, 'सर मीही आळंदीला खूप दिवस झाले गेलो नाही. तुमच्या निमित्तानं माझंही आळंदीला येणं होईल. माऊलींचं दर्शन होईल.' मी म्हणालो, मग ठीक आहे, हरकत नाही, जाऊयात आपण. अशोक म्हणाले, 'सर, मी सगळ्यांना फोन करून ठेवतो. म्हणजे आपणाला नीट दर्शन होईल' काल देहूला दर्शनासाठी काही रांगा वगैरे नव्हत्या. त्यामुळे अडचण नव्हती. पण आळंदीला खूप गर्दी असते. पंढरपूर सारखीच तिथंही आता कायमच रांग असते. त्यामुळे अशोक यांनी तिथले एक पुजारी श्री. आनंद विनायक जोशी यांना फोन करून ठेवला.
अशोक मला म्हणाले, 'सर, मंदिरात तर आपण जाऊयातच पण तुम्हाला ह. भ. प. कुरेकर बाबांना भेटायचय का ? मी म्हटलं, हे कुरे बाबा कोण ? तर ते म्हणाले, 'सर, कुरेकर बाबा म्हणजे फार नैष्ठीक वारकरी माणूस आहे. वारकऱ्यांपैकी सर्वश्रेष्ठ वारकरी आहे तो. आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचे एकेकाळी ते अध्यक्ष होते. आता तिथले ते सर्वात वरिष्ठ शिक्षक आहेत. ९५ वर्षे वय आहे त्यांचं. पण इतका निरलस, इतका निरपेक्ष आणि इतका निष्ठावंत माणूस माझ्या पाहण्यात नाही.' मी म्हणालो, मग आपण नक्की भेटूयात. त्यांना त्रास होणार नाही अशा वेळी भेटायला जाण्यासाठी अशोकनी तिथल्या ह. भ. प. तुकाराम रामचंद्र मुळीक यांना फोन करून ठेवला. वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक ठरलेली वारकरी शिक्षण संस्था मला एरवीही पाहायचीच होती. या निमित्तानं ती पाहून होईल याचा आनंद वाटला.
स्नेहवनमधून आळंदीकडं निघताना अशोक म्हणाले, 'सर, आपण थोडं काहीतरी खाऊयात. परत येऊन आपण इथंच जेवण करणार आहोत. पण उशीर झाला तर पोटात काही असावं, म्हणून नाश्ता करूयात.' मग आम्ही मटकीची उसळ खाल्ली आणि आळंदीकडं निघालो. स्नेहवनपासून आळंदी नऊ किलो मिटरवर आहे. पण तरीही आळंदीपर्यंत पोहोचायला अर्धापाऊण तास तरी लागतोच. कारण सगळीकडच्याच रस्त्यांनी आता खूप वाहतूक झालेली आहे. तोच प्रकार आळंदीभोवतीही झालेला आहे. आळंदी भोवती तर इतक्या इमारती झालेल्या आहेत, वस्त्या वाढलेल्या आहेत, की आळंदी आता पुण्याला भिडायला आलेली आहे
आळंदीतल्या माऊली देवस्थानच्या वाहनतळावर गाडी ठेवून आम्ही माऊलींच्या मंदिराकडं निघालो. अर्थात इंद्रायणीच्या काठाकाठानंच तो रस्ता आहे. अशोक म्हणाले बाई आधी इंद्रायणीत पाय धुऊन घ्यायचे का ? बाई लगेच म्हणाली, हो. मग ते दोघं घाटावरून इंद्रायणीत उतरले आणि त्यांनी पाय सोवळे केले. तिथलं पाणी पाहून माझी काही हिम्मत झाली नाही. तरी मागच्या वेळेपेक्षा यावेळी पाणी बर होतं. मागच्या वेळी आलो तेव्हा सगळ्या पाण्यावर फेसच आलेला होता. कुठल्यातरी कंपनीची रसायनं पाण्यात मिसळलेली होती. शिवाय सगळ्या इंद्रायणी गावच्या नाल्याही नदीत सोडलेल्या आहेत.
मंबाजी आहेत, नाही इंद्रायणी
गंगा मैली कोणी, केली तुक्या
असं मीच माझ्या एका कवितेत तीस वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं आहे. आता खरं तर हा प्रश्न विचारायचीही गरज नाही. ही गंगा आपणच मैली केलेली आहे, याविषयी शंका उरलेली नाही. ही गंगा पूर्ववत पवित्र कशी करायची हा मोठा प्रश्न आहे. कारण आता आपण प्लास्टिकचा कचरा एवढा वाढवून ठेवलेला आहे की आता अख्खी पृथ्वीच प्रदूषित आणि मैली होऊन गेलेली आहे. नुसत्या गंगेचं काय घेऊन बसलोत आपण.
घाटावरून मंदिराकडं जाताना, घाटावरच्या अनाथांना स्नेहवनच्या वतीनं काय मदत करता येईल याचा विचार करून पाहिला, पण मी अयशस्वी झालो, असं अशोक सांगत होते. घाटावरची अनागोंदी माझ्या लक्षात आणून देत होते. कुठल्यातरी दुकानावर चप्पल ठेवावेत असं मला वाटत होतं. पण अशोक म्हणाले, 'सर चप्पलसाठी एक स्वतंत्र स्टॅन्ड आहे. तिथूनच मंदिरात जाण्यासाठी एक लहानसा रस्ता आहे. आपण चप्पल तिथंच ठेवूयात. आणि त्याच रस्त्यानं मंदिरात जाऊयात.' आम्ही तसं केलं आणि पूर्वदिशेच्या छोट्या दाराने मंदिरात पोहोचलो. तिथं खाली उतरताच हातपाय धुण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था होती. मी बाईला म्हटलं, बाई हातपाय धुवून घे. तिचं इंद्रायणीत हातपाय धुणं मला आवडलं नव्हतं. पण तिच्या श्रद्धेला मला धक्का लावायचा नव्हता. मग आम्ही सगळ्यांनीच तिथं हातपाय धुवून घेतले.
मंदिरात गर्दी होतीच. कुण्यातरी महाराजांचं कीर्तनही सुरू होतं. तिथूनच मंदिरात जाणाऱ्यांची रांग लागली होती. रांगेत उभं राहणाऱ्यांना कीर्तनही नीट ऐकता येत होतं. ही एक बरी सोय होती. आता ज्ञानेश्वरांच्या साडेसातशेव्या जयंतीची गडबड सुरू झाल्यासारखीच आहे. मंदिरात काही ठिकाणी तशी पोस्टरं लावलेली दिसत होती. मे महिन्याच्या सात तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी इथं येण्याची शक्यता आहेच. ते नाही आले तरी त्या दिवशीचा कार्यक्रम खूपच भव्य आणि मोठा असणार, हे गृहीतच आहे. त्यामुळे आळंदी आता सजू लागलेली आहे. मला आठवलं, पन्नास वर्षांपूर्वी मी आठवीला असताना ज्ञानेश्वर महाराजांची सप्तशताब्दी झाली होती. तेव्हा मी हयातनगरच्या शाळेत होतो. महाराष्ट्र शासनानं काढलेला लोकराज्य या पाक्षिकाचा संत ज्ञानेश्वर विशेषांक गावोगावच्या ग्रामपंचायतीला आलेला होता. त्या अंकाच्या वाचनातूनच ज्ञानेश्वरांची पहिली ठळक प्रतिमा माझ्या मनावर बिंबलेली होती. तो अंक मी कितीतरी दिवस जपून ठेवलेला होता.
अशोक म्हणाले, मी पुजाऱ्यांना फोन करतो. ते थोड्या वेळात बाहेर येतील. अशोकनी फोन केला तर ते शेजारीच उभे होते. अशोक त्यांना म्हणाले, हे आमचे सर आहेत. मग माझा त्यांना परिचय करून दिला. सोबत बहीण आहे तर आम्हाला निवांत दर्शन मिळावं अशी अपेक्षा आहे, असं अशोक पुजाऱ्यांना म्हणाले. हे पुजारी श्री. आनंद जोशी खूप चांगल्या स्वभावाचे होते. ते आळंदीचे क्षेत्रोपाध्ये आणि श्री. ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. अशोक म्हणाले, हे जोशीबुवा आपल्या स्नेहवनला दर महिन्याला एक कट्टा तांदूळ देतात. त्यांची ही सामाजिक जाणीव मला फार महत्त्वाची वाटली.
मंदिरातून बाहेर पडल्यावर आम्ही वारकरी शिक्षण संस्थेच्या जुन्या इमारतीत गेलो. कारण ह. भ. प. मारुतीबाबा कुरेकर तिथंच राहतात. ती इमारत मंदिराच्या अगदी जवळ आहे. जुन्या पद्धतीचं दगडी बांधकाम असलेली ही जुनी इमारत आहे. वारकरी शिक्षण संस्थेची नवी आणि भव्य इमारत गावाबाहेर बांधलेली आहे. तिथं सर्व सोयीसुविधा आहेत. ईथं या जुन्या इमारतीत बाबांना भेटायला आणि दर्शनाला येणाऱ्यांची गर्दी होतीच. त्यामुळे अशोक यांच्या ओळखीच्या श्री. तुकाराम रामचंद्र मुळीक महाराजांनी थोडा वेळ थांबायला सांगितलं. कार्यालयात आम्ही मुळीक महाराजांशी गप्पा मारत बसलो, तर तिथं मला काही बांधून ठेवलेल्या ग्रंथांच्या चवडी दिसल्या. म्हटलं हे काय आहे ? तर ते म्हणाले वारकरी शिक्षण संस्थेला शंभर वर्षे झाली तेव्हा आणि वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. विष्णुपंत जोग महाराज यांची शताब्दी झाली तेव्हा काढलेल्या या स्मरणिका आहेत. म्हटलं ह्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत का ? तर ते म्हणाले आम्ही तुम्हाला कुरेकर बाबांच्या हस्ते भेटच देणार आहोत.
त्यांनी फार प्रेमानं आम्हाला आत नेलं आणि निवांत दर्शन घडवलं. अशोक यांचा आणि माझा सत्कारही केला बाईला. माऊलीच्या समाधीवरचा हार माझ्या गळ्यात घातला आणि पदरात नारळ ठेवलं. केवळ महाराजांमुळे आम्हाला निवांत दर्शन घेता आलं. महाराजांनी तशी व्यवस्थाच केलेली होती. त्यासाठी दाराला हात लावून एक माणूस भक्त जणांची रांग अडवायला उभाच होता. रांग अडवणं मला वाईट वाटलं. पण अर्थातच बहिणीसाठी मला हे सगळं करावं लागलं. नाही तर मी एकटा असल्यावर कधीच असं करत नाही. रांगेत उभे राहतो, नाहीतर मुखदर्शनावर समाधान मानतो.
पण बहिणीची इच्छा पूर्ण झाली याचा मला आनंद होता. कारण तिचं वय आता ऐंशी वर्षे आहे. रांगेत उभं राहून तिला दर्शन घ्यावं लागणं हे तिच्यासाठी जरा अवघडच होतं. ती आता पुन्हा कधी येण्याची शक्यता नसल्यामुळे तिच्या मनासारखं दर्शन व्हावं ही इच्छा होती. ते अशोक यांच्यामुळे झालं.आम्ही बाहेर आल्यावर जोशी बुवांसोबत आमची छायाचित्रे काढली आणि त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. अशोक आणि मी थोडे बाजूला उभे राहिलो. बाईला अजान वृक्षाकडं आणि आणखी कुठं कुठं जाऊन दर्शन घ्यायचं तिथं संतोष आणि बाईला जाऊन यायला सांगितलं.
तोपर्यंत अशोक आणि मी तिथल्या पुस्तकाच्या दुकानात गेलो. ज्ञानेश्वरांविषयी काही नवं मिळतं का ते पाहिलं. पण तसं नवं काही तिथं दिसलं नाही. फक्त 'रिंगण'सारखा एक अंक दिसला. तो मी लगेच घेतला. अर्थातच तो वारी विशेषांक होता. वारीविषयीचे सगळे लेख त्यात एकत्र करण्यात आलेले होते. रिंगणसारखा तो कुठल्याही एका संतावर केंद्रित असलेला अंक नव्हता. अंकाचं नाव होतं 'वारी चैतन्याची' आणि संपादक होते, श्रीकांत बोरावके. २०२२ च्या आषाढी वारीनिमित्तानं केलेला हा अंक होता. पण तो पुस्तकासारखाच असल्यामुळे संग्राह्य वाटला म्हणून मी तो घेऊन टाकला.
भेटलेल्या प्रत्येक माणसाला अशोक माझा सविस्तर परिचय करून देत होतेच. त्यामुळे मला काही बोलण्याची गरज पडत नव्हती. मग मी मुळीक महाराजांकडं इतर काही ग्रंथांची चौकशी केली. वारकरी शिक्षण संस्थेने पूर्वी काढलेले काही ग्रंथ आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत का ? असे विचारलं. तर मामासाहेब दांडेकरांचं वै. ह. भ. प. स. के. नेऊरगावकरांनी लिहिलेलं साडेपाचशे पानांचं सविस्तर चरित्र उपलब्ध आहे, असं त्यांनी मला सांगितलं. वै. प्रा. डॉ. यशवंत पाठक यांनी लिहिलेल्या आणि ग्रंथालीनं प्रकाशित केलेल्या मामासाहेबांच्या चरित्राचा विषय निघाला तेव्हा मुळीक महाराज म्हणाले, त्यापेक्षा हे नेऊरगावकरांचं चरित्र जास्त चांगलं आहे.
शिवाय मामासाहेब दांडेकरांचे ' संत ज्ञानेश्वर आणि प्लेटो' व 'ज्ञानेश्वरांचे जीवन विषयक तत्त्वज्ञान' हेही ग्रंथ उपलब्ध होते. हे सगळे ग्रंथ मात्र मला विकत द्या, असं मी त्यांना म्हणालो. कारण मामासाहेब दांडेकरांची ज्ञानेश्वरीला लिहिलेली दीर्घ प्रस्तावना स्वतंत्र पुस्तक रुपात कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने काढलेली आहेच. ती अडीचशे पानाची प्रस्तावना असलेला स्वतंत्र ग्रंथ मी आधीच घेऊन ठेवलेला आहे. पण मामासाहेब दांडेकरांचे हे दोन ग्रंथ वारकरी शिक्षण संस्थेने प्रकाशित केल्यामुळे बाहेर उपलब्ध नव्हते. ते इथं मिळाले याचा मला खूप आनंद वाटला.
श्री तुकाराम रामचंद्र मुळीक महाराज देखील नव्या जाणिवेचे वाटले. त्यांचं वय तसं खूप कमी आहे, पण अभ्यास चांगला वाटला. ते म्हणाले, 'वारकरी शिक्षण संस्थेने सत्तर वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायाचा इतिहास प्रकाशित केला होता. त्याची नवी आवृत्ती करायची आहे. पण मागच्या सत्तर वर्षांच्या इतिहासाचा समावेश त्यात करावा असं ठरतंय. त्यासाठी मी काही विद्वानांना भेटलो. सदानंद मोरे यांनाही भेटलो. ते काम आता होत आलेलं आहे. तो अद्ययावत झालेला इतिहास वारकरी शिक्षण संस्था प्रकाशित करणार आहे. मुळीक महाराजांशी झालेल्या या वाङ्मयीन चर्चेने मला खूप समाधान दिलं. तोपर्यंत कुरेकर बाबा भक्तांच्या गराड्यातून वर आपल्या मठीत गेलेले होते. तसा निरोप आल्यावर मुळीक महाराज म्हणाले, 'चला, आता वर कोण असणार नाही. आपण महाराजांना निवांत भेटू'
आम्ही एका निमुळत्या जिन्याने वर गेलो. मी म्हटलं महाराज याच जिन्यानं वर गेले काय ? ते म्हणाले हो. ९५ वर्षे वय, अतिशय चढता, निमुळता जिना आणि या वयात महाराज कोणालाही हाताला धरू न देता स्वतः चढून वर आले, हे ऐकल्यावर मला आश्चर्यच वाटलं. प्रत्यक्ष महाराजांना पाहिलं तर शुभ्र वेष परिधान केलेली त्यांची ती काटक, सात्विक मूर्ती, फार पवित्र वाटली मला. हीच त्यांची कायमची खोली. महाराज येथे निःसंग वृत्तीने राहतात. या खोलीतल्या वस्तू तेवढीच महाराजांची प्रॉपर्टी. आणि तीही इतकी कमी होती की रोजच्या आवश्यक लागणाऱ्या वस्त्रांशिवाय तिथं काहीही नव्हतं. त्यांनी विवाह केलेला नाही. कुठल्याही वस्तूंचा संग्रह नाही. कमीत कमी वस्तूमध्ये आपलं जीवन भागवायचं, असं त्यांनी ठरवलेलं आह
वारकरी शिक्षण संस्थेत कुठल्याही विद्यार्थ्यांकडून कसलिही फीस घेतली जात नाही. शासनाकडून कुठलेही अनुदान मिळत नाही, मागितलेही जात नाही. शिक्षकही कुठला पगार घेत नाहीत. त्यामुळे जुन्या गुरुकुल पद्धतीनं चालणारी ही एक आदर्श शिक्षण संस्था आहे. कुरेकर बाबा स्वतः सकाळी दोन तास ज्ञानेश्वरी शिकवतात. संध्याकाळी दोन तास गाथा शिकवतात. त्या मोबदल्यात काहीही घेत नाहीत. महाराजांच्या हस्ते आम्हाला त्या स्मरणिका देण्यात आल्या. खरंतर या स्मरणिका म्हणजे हार्डबाउंड असलेले अविस्मरणीय संग्राह्य ग्रंथच आहेत. काही फोटो काढण्यात आले.
मी म्हटलं महाराजांच्या पायाशी बसून आम्ही एक फोटो काढतो. अशोक म्हणाले, मलाही तेच वाटत होतं. महाराज पलंगावर बसलेले होते. त्यांच्याजवळ आम्ही खाली जमिनीवर बसलो आणि काही फोटो काढले. मला खूप समाधान वाटलं, कुरेकर बाबांना भेटल्याचं. ज्ञानेश्वर माऊली तर जिवंत नाहीत. पण तसाच व्रतस्थ असलेला एक वारकरी पाहायला, ऐकायला भेटणं ही काही कमी भाग्याची गोष्ट आहे काय ? अर्थातच अशोक यांच्यामुळे हे सगळं घडून आलं.
आळंदीत फिरताना मला ज्ञानदेवांवरचा जनाबाईचा अभंग आठवत होता, 'मरोनिया जावे, त्वाबा माझ्या पोटी यावे' एकनाथांचा अभंग आठवत होता, 'कैवल्याचा पुतळा, प्रगटला भुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा' सोबतच मला तुकोबांचा अभंग आठवत होता, 'ज्ञानियांचा राजा, गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव, तुम्हा ऐसे' नामदेवांनी तर ज्ञानदेवांचं चरित्रच लिहिलेलं आहे. त्यात ज्ञानदेवांविषयी कितीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत. 'काय सांगू देवा, ज्ञानोबाची खाती, वेद म्हैशामुखी, बोलविला' असं एका अभंगात नामदेव म्हणाले होते. पण मला सगळ्यात जास्त आवडला तो नामदेवांचा पुढील अभंग,
ज्ञानराज माझी । योग्यांची माऊली ।
जेणे निगमपल्ली । प्रगट केली ॥
गीता अलंकार । नाम ज्ञानेश्वरी ।
ब्रह्मानंद लहरी । प्रगट केली ॥
अध्यात्म विद्येचे । दाविलेसे रूप ।
चैतन्याचा दीप । उजळीला ॥
छपन्न भाषेचा । केलासे गौरव ।
भवार्णवी नाव । उभारिली ॥
श्रवणाचे निषे । बैसावे येऊनि ।
साम्राज्य भूवनी । सुखी नांदे ॥
नामा म्हणे ग्रंथ । श्रेष्ठ ज्ञानदेवी ।
एकतरी ओवी । अनुभवावी ॥
संत नामदेवांपासून अरुण कोलटकरांपर्यंत आठशे वर्षातल्या कितीतरी श्रेष्ठ मराठी कवींनी ज्ञानदेवांवर कविता लिहिलेल्या आहेत. ज्ञानदेवांवर माझीही एक दीर्घकविता 'भूमीनिष्ठांची मांदियाळी' या माझ्या संग्रहात सुरुवातीलाच आहे. आळंदीत झालेल्या पहिल्या पसायदान साहित्य संमेलनात मी ती म्हटली तेव्हा इथल्या वारकरी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी ती डोक्यावर घेतली होती. आम्हा प्रत्येक मराठी कवींना ज्ञानदेव हा आमचा कवितेतला बाप वाटतो. त्याच्याविषयी विलक्षण जवळीक वाटते. आणि ज्याचा वावर आणि कायमची वस्ती आळंदीत आहे, ती आळंदी म्हणजे आम्हाला आमचं माहेर वाटतं. आज आळंदीला जाऊन आलो, मला माझ्या माहेराला जाऊन आल्यासारखं वाटलं. आम्हा कवींनाच काय सगळ्याच मराठी माणसांना ज्ञानदेव आपली माऊली वाटत असते आणि आळंदी आपलं माहेर वाटत असतं.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.