
Rural Lifestyle: कोलकाता इंटरनॅशनल बुकफेअरला निघताना मी ठरवलं होतं, की प.बंगालमधील एका खेड्यात एक दिवस मुक्काम करायचा. माझा बिहारचा पत्रकार मित्र पुष्पराज शांता शास्त्री याच्याशी तसं बोलणंही झालं होतं. कोलकाता येथील प्रकाशक मित्र संजय भारती यांच्या माध्यमातून आम्हाला सावरापूर येथील निताई माल या शेतकऱ्याचं नाव मिळालं. त्यांनी फोनवर बोलणंही करून दिलं.
पुस्तक मेळा अनुभवल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेल्वेने आम्ही शांतिनिकेतनला पोहोचलो. टमटमने बस स्थानक गाठलं. तिथून लाभपूरला जाणाऱ्या बसमध्ये चढलो. लाभपूरहून टमटमने काँदवी माझी पाडावरून दुपारी तीनच्या सुमारास सावरापूरला पोहोचलो. प.बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील हे एक छोटसं गाव. कोलकात्यापासून सुमारे १७५ कि.मी. अंतरावरचं. अद्याप या गावाचं शहरीकरण झालेलं नाही. मला असंच गाव हवं होतं.
निताई माल या शेतकऱ्याच्या घराच्या रस्त्यावर टमटमचालकाने सोडलं. आम्ही..निताई भाईका घर..असं विचारताच एका मुलाने...वो आश्रम क्या? असं म्हणत घरात नेलं. निताईभाईंनी सुहास्यवदनाने आमचं स्वागत केलं. निताई हे केवळ शेतकरी नाहीत, तर सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी २०१८मध्ये हसुली कृषी संस्कृती पाठशाळा नावाने एक संस्था स्थापन केली. घरातील चौघे सदस्य. बाकी समविचारी मित्र जुडलेले. संस्थेच्या नावाने ते काम करीत असले, तरी ही संस्था नोंदणीकृत नाही.
सरकारचा, राजकीय कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप नको म्हणून तिची नोंदणी करायची नाही,असाही निर्णय त्यांनी केलाय. त्यांची मदत नको आणि अडथळाही नको, ही भूमिका. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच, देशी बियाण्याचं संकलनही ते करतात. त्यांचं शेती-मातीवर निस्सीम प्रेम आहे. शेती हा त्यांचा सर्वांत आवडता विषय. रासायनिक खते, कीटकनाशकांमुळं होणारं मातीचं, माणसांचं नुकसान टाळायला हवं, ही त्यांची मनापासूनची तळमळ. त्यांना हिंदी नीट येत नसलं तरी आमचा संवाद होत होता. ते जी भूमिका मांडत होते ती मातीशी नातं सांगणारी होती.
त्यांची स्वत:ची जमीन तीन बिघे. तेवढीच इतरांची जमीन ते पैशाने करतात. ‘वर्षभर खायला लागणारा तांदूळ, डाळी, भाज्या यातून निघतात; आणखी जास्त कशाला हवं,’ असा प्रश्न त्यांनीच मला विचारला. निताई, त्यांची बायको, मुलगी आणि जावई असे चौघे जणही शेती करतात. ती करीतच सेंद्रिय शेतीचा प्रचार करतात. शेतकऱ्यांना एकत्र करून चर्चा घडवून आणतात. स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम करतात. या सगळ्यांचा दुवा म्हणून ते कार्यरत असतात.
आमची चर्चा चालू असतानाच स्थानिक चुरमुरे, पौष्टिक जंगली मुळं आणि काळा चहा आला. बहुतेक हा नाश्ता असावा. तो खाऊन आम्ही बाहेर पडलो. घरालगतच बटाटे लावले होते. तुरीचं एक उंच झाड शेंगांनी लगडून गेलं होतं. शेंगा लागण्याची ही तिसरी वेळ असल्याचं त्यांनी सांगितलं. जमिनीचे चित्र-विचित्र तुकडे. कुठं भात लावणी झालेली, कुठं चाललेली, कुठं चिखल पाण्यात ट्रॅक्टर वखारणी करीत असलेले... नजर जाईल तिकडे हिरवाई.
बघतच राहावा असा निसर्ग. ६०-७० फुटांचा बोअरवेल घेतला, की भरपूर पाणी. त्यामुळे सगळीकडं पाणीच पाणी. पाइपने छोट्या-छोट्या दांडातून जमिनीच्या तुकड्या-तुकड्यांतून पाणी फिरत असलेलं. काही ठिकाणी सौर ऊर्जा, विद्युतपंप तर तीन ठिकाणी डिझेल इंजिनही पाणी उपसण्याचं काम करीत होते. छोट्याशा बंधाऱ्यावरून तोल सांभाळत आम्ही नदीकडं चाललो होतो.
मी निताईंना विचारलं, इथं शेतकऱ्यांकडं किती जमिनी आहेत? ते बोलले, अगदी पाव बिघापासून ते चार-पाच बिघापर्यंत. गावात सर्वांत मोठा शेतकरी १५ बिघेवाला. तो एकमेव. बाकी सगळ्यांकडं छोटे छोटे तुकडे. बहुतेकांच्या उपजीविकेचं साधन म्हणजे हा जमिनीचा तुकडा आणि गावातच शेतीत मिळणारी मजुरी. तांदूळ, गहू, मोहरी, बटाटे व इतर भाज्या खाण्यापुरत्या पिकवतात. लोकांच्या फारशा अपेक्षाच नाहीत. त्यामुळं ते खूष आहेत. याचं मला कौतुक वाटलं.
बोलत बोलत आम्ही कोपाय नदीवर आलो. पाणी कमी झालेलं. मातकुट रंगाचं. मी या पाण्यात फिरून आलो. निताई सांगत होते, की पावसाळ्यात या नदीला मोठा पूर येतो. ते पाणी अगदी गावालगत येतं. आम्ही ही नदी ओलांडून वर गेलो. तिथं निताई यांनी तिघांकडून भाडेतत्त्वावर कसायला जमीन घेतलीय. ती पडीक असल्याने अद्याप तिची मशागत व्हायची होती. मात्र बाजूच्या अर्ध्या बिघात त्यांनी बटाटे लागवड केलीय.
ते चांगले जोपासल्याचं दिसत होतं. तिथून पाच मिनिटं चालत पुढे गेल्यावर आणखी एक नदी लागली. तिचं नाव बोकेसर. या नदीचा प्रवाह हळूहळू कोपाय नदीच्या बाजूने सरकतोय. भविष्यात ही नदी नैसर्गिकरीत्या कोपायला मिळेल, असं निताई यांचं म्हणणं होतं. रस्त्यात बांधावर ठिकठिकाणी खजुराची झाडं दिसत होती.
मोहरीची लागवडही बरीच दिसली. तासभर फिरून घरी आलो. समोर गरमागरम भात, मिक्स भाजी, फिकं वरणं, कारल्याचं लोणचं असं जेवण तयार होतं. जेवणात भरपूर भाज्या. सगळ्यांनी जेवण केलं. पाच वाजले होते. आम्ही आराम करावं, असं निताई यांनी सुचवलं. दोघांची दोन छोट्याशा रूममध्ये सोय केली होती. पुष्पराज रूमकडं गेला. निताई यांचा पंचविशीतील जावई सौरभ आमच्यासोबतच होता. मी त्याला म्हटलं, की मला सगळं गाव आणि परिसरातील शेती बघायचीय. तो तयार झाला. आम्ही दोघं बाहेर पडलो.
खजुराचा गूळ
निताई यांच्या तुलनेत सौरभला हिंदी चांगली येत होती. जेवताना खजुराच्या गुळाचा विषय निघाला होता. तो बोलला ‘‘समोरच्या गावात त्याचे एक नातेवाईक खजुराचा गूळ करतात. ते असतील तर बघू.’’ पं. बंगालमध्ये गावांना जोडणारे आणि अंतर्गत रस्ते चकाचक असल्याचा अनुभव येत होता. रस्त्याच्या दुतर्फा नजर जाईल तिथपर्यंत पाण्यात डोलणारी साळीची पिकं दिसत होती.
हे पाणी कुठून येतं, ते रानात कसं फिरवलं जातं, धान लावण्यापूर्वी त्याची मशागत कशी केली जाते हे समजून घेण्याची माझी इच्छा होती. भातशेतीच्या बांधांवरून फिरवत फिरवत त्यानं मला हे सगळं दाखवलं. प्रत्यक्ष लावणी सुरू असलेलीही बघितली. हे सगळं बघताना मला व्हिएतनाम दौऱ्याची आठवण झाली. अगदी असंच तिथं बांधांवरून तोल सांभाळत आम्ही फिरलो होतो. वातावरणही अगदी तसंच. मला व्हिएतनाममध्ये फिरत असल्याचा भास होत होता. अर्धा-पाऊण तास तरी शेतं तुडवत आम्ही फिरलो.
वाटेत एका ठिकाणी ऊस होता. अंगठ्याएवढ्या जाडीचा. मनात विचार आला, की हा कसला ऊस? कसा खाणार? पण सौरभने लगेच एक ऊस मोडून दिला. सोलून एक घास चघळल्याबरोबर चकित होण्याची वेळ माझ्यावर आली. गोडचिट्ट होता. मला ऊस आवडतो, हे सौरभला माहिती नव्हतं आणि तो मिळेल अशी अपेक्षाही मी केली नव्हती. पण अगदी सहजपणे ऊस माझ्या हातात आला. तो खात खात शेजारच्या गावालगत पोहोचलो.
रस्त्यालगतच्या एका शेतात मला थांबवून सौरभ बाजूच्या गल्लीत गेला. पाचच मिनिटांत तो एका वयस्कर व्यक्तीला घेऊन आला. ते शेत त्याचं होतं. समोर तीन गायी बांधलेल्या. विविध प्रकारचा भाजीपाला. बाजूलाच मोठा साठवण तलाव. पाणी भरलेलं. इथली पांढरी मातीच अशी आहे, की खड्डा केला की पाणी साचून राहतं. तळ्याच्या चारही बाजूंनी खजुराची व इतर झाडं गर्दी करून असलेली. सध्या गूळ काढणं बंद होतं. बाजूला छोटसं गुळवण, रस उकळायची कडई, झारा असं सामान होतं.
उसाच्या रसापासून जसा गूळ काढतात, तसाच खजुराच्या रसापासून गूळ तयार होतो, अशी माहिती सौरभच्या नातेवाइकाने दिली. खजुराच्या झाडातून कसा रस काढतात, हे पाहण्याची माझी इच्छा होती. माझ्याविषयी त्याने काय सांगितलं ते कळलं नाही; पण तो तयार झाला. हातात लाकडी शिडी, लोखंडी हत्यार, छोटं बकेट घेऊन आम्ही खजुराच्या झाडाजवळ गेलो. शिडी लावून तो झाडाच्या शेंड्यापर्यंत पोहोचला.
तिथला भाग हत्याराने छिलून गाभ्यापर्यंत नेला. मऊ गाभ्यामध्ये त्याने लाकडी नळी घुसवली व समोर बकेट लटकावून तो खाली उतरला. उद्या सकाळपर्यंत अर्ध्यापेक्षा अधिक बकेट रसाने भरेल, असं तो बोलला. मी याचे फोटो, व्हिडिओ काढले. मीही त्या शिडीवरून झाडाच्या शेंड्याजवळ गेलो. झाडातून थेंब थेंब खजुराचा रस बकेटात पडत असल्याचं बघितलं. याआधी शिंदीच्या झाडातील गाडग्यात पडणारा रस बघितला होता. हा माझ्यासाठी आगळावेगळा अनुभव होता.
ते गाव बघून चालत आम्ही सावरापूरला आलो. गावात फेरफटका मारून सौरभसोबत ग्राम रचनेबाबत चर्चा केली. गावात कुठंच गप्पा मारत बसलेली माणसं दिसली नाहीत. वयस्क माणसंही शेतीच्या कामात दिसली. अंधारून आल्याने आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. पुष्पराज आणि निताई माझी जेवणासाठी वाट बघत होते. मी जेवणार नव्हतोच. ते जेवले. मी ग्लासभर काळी कॉफी बनवून घेतली.
चार तासांच्या सहवासात माझ्या लक्षात आलं, की निताई व त्याच्या कुटुंबीयांचं बरं चाललंय. मात्र आमच्या सारख्या बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करावी, अशी त्यांची स्थिती नव्हती. संस्था नोंदणीकृत नसल्याने व या कामाचा फारसा प्रचार नसल्याने बाहेरून मदत मिळण्याची शक्यता नव्हती. सौरभचा फोन नंबर मी घेतला होताच. सहज बघितलं त्यावर फोन पेची सुविधा होती. मी दहा रुपये पाठवले. तो बाहेर गेला होता. त्याचा फोन आला, सरजी आपने दस रुपये क्यों भेजे है? त्याला उत्तर न देता मी पाच हजार रुपये पाठवले. व त्याचा स्क्रीन शॉट पुष्पराजला व्हॉट्सॲपवर टाकला. तो खूष झाला. बाहेरून आल्यानंतर सौरभने निताईंना सांगितलं. कुछ जरूरत नही थी सर.. या त्याच्या म्हणण्यावर, कोलकाता मे लॉज का किराया इससे जादा लगता है...म्हणत मी विषय थांबवला.
बाउल गाण्यांचा आनंद
खरं तर इथं किमान दोन दिवस मुक्काम करावा अशी माझी इच्छा होती. मात्र पुष्पराजला एका लग्नासाठी पाटण्याला पोहोचणं गरजेचं होतं. निताईंनी विचारलं, की बाउल गाणं ऐकण्याची इच्छा आहे का? आम्ही दोघांनीही होकार दिला. शिशीर बागदी, तपन बागदी व त्यांच्या सोबत एक जण असे तिघे जण आले. घुमटाकार खोलीत सारंगीच्या सोबतीने बाउलगाणं सुरू झालं. खणखणीत आवाजात नेहमीच्या कपड्यांमध्ये नृत्य करीत हे गाणं सुरू होतं. तीन-चार गाणी झाल्यावर मी त्यांना एक हजार रुपये बक्षीस दिले. तेव्हा निताईंनी त्यांना बाउल गीत गाण्यासाठीचा पेहराव घालून यायला सांगितलं.
पंधरा-वीस मिनिटांत दोघे जण मरून रंगाचे कपडे, कपाळावर मोठा रुमाल बांधून आले. तासभर त्यांनी विविध बाउल गाणी ऐकवली. प्रत्येक गाण्याचा अर्थ मी विचारून घेतला. बहुतांश गाणी नदी व निसर्गाचं गुणगान करणारी होती. गाण्यांचा अर्थ कळत नसला, तरी कानांना ऐकायला ती गोड वाटत होती. यानिमित्ताने बंगाली संगीताच्या मैफलीचा आनंद आम्ही घेतला. हा अनुभव माझ्यासाठी अनपेक्षित असाच होता. बहुतेक गाण्यांचं मी व्हिडिओ चित्रीकरण केलं.
झोपायला जाताना मी सौरभला सकाळी सहाच्या आत यायला सांगितलं. समोरच्या गावात जाऊन ताजा खजूरचा रस घेऊन यायचं ठरलं होतं. सहा वाजता सगळे गेलो. त्या शेतकऱ्याची परवानगी घेऊन ते बकेट खाली उतरवलं. ते ७० टक्के भरलं होतं. हा रस म्हणजे आरोग्यदायी नीरा. काळ्या चहाला सुट्टी देऊन, मी सहा ग्लास नीरा प्यायली. पुष्पराजनेही पोटभर घेतली. निताईंनी त्यांच्याकडील भाजीपाला व तुरीचे बियाणे मला दिले. सामूहिक फोटो काढले आणि टमटमने थेट शांतिनिकेतनकडं निघालो.
निताई आणि त्याचे कुटुंबीयच नाही तर हे संपूर्ण गाव मातीशी एकरूप असलेलं दिसलं. मातीतून जे मिळेल त्यावर समाधान मानून जगणारं एक गाव मला पाहायला मिळालं. देशातील आजच्या गावांची अवस्था बघितली तर सावरापूर हे स्वप्नच वाटतं..!
९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९,
(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.