
समीर गायकवाड
Rural Life Story : गावाकडून येणाऱ्या एसटी बसच्या खिडकीला दुधाचे कॅण्ड, जेवणाचे डबे लावलेले असत. गावातून आणलेल्या दुधाच्या वरव्यांचे वाटप करताना गावातल्या पोरांना डबे पोहोच करण्याचे काम होई, शहरातल्या खाणावळीतलं अन्न गोड लागत नसायचं, अशातली गोष्ट नव्हती. मात्र त्यात मायेचा तो ओलावा नसायचा जो गावाकडून येणाऱ्या डब्यात असायचा. पहाटे उठून आईने करून दिलेल्या भाकऱ्या दुपारी फडकं सोडेपर्यंत वाळून खडंग झालेल्या असत;
पण त्या भाकऱ्यांना तिचा मुलायम हात लागल्याच्या मखमली जाणिवेपुढे त्याचं काहीच वाटत नव्हतं. त्या भाकरीचा घास अमृतानुभवी व्हायचा. जठराग्नी तृप्त व्हायचा. जेवण आटोपताना बोटे चाखून झाल्यावर फडकं झटकून पुन्हा डब्यात ठेवून दिलं जायचं तेव्हा दंड घातलेली आईची साडी नजरेसमोर तरळून जायची. डबा धुताना तिचा सुरकुतलेला हात आपल्या हातावरून फिरत असल्याचा भास व्हायचा. धुऊन स्वच्छ केलेला रिकामा डबा दिवस मावळण्याआधी एसटी स्टॅण्डवर पोहोच केला जायचा.
रोजच्या जीवनातली अनेक कामे कंटाळवाणी वाटत, पण त्या डब्याची ओढ कधी कमी झाली नाही, ते कधी काम वाटलं नाही. कारण त्या डब्यासोबत आईचा स्पर्श यायचा, गावाकडच्या मातीचा गंध यायचा, डबा घेऊन येणाऱ्या निरोप्यासोबत तिथल्या माणसांचा दरवळ यायचा, त्या अन्नात तिथल्या कोवळ्या कंच अंकुरांचा अंश यायचा, गावकुसाच्या खुशालीचा निःशब्द सांगावा कानी पडायचा. या डब्याची ओढ केवळ अन्नासाठी कधीच नसायची, ही ओढ असण्याचं मुख्य कारण म्हणजे गावाची, आपल्या माणसांची आणि मातीची ओढ !
जी माणसं गावाकडच्या मातीत केवळ काही दिवस, काही महिने जगतात त्यांना ही ओढ केवळ बेचैन करते, असे नव्हे तर ती जगण्याच्या लढाईत सतत साथसोबत देखील करते. वेळप्रसंगी हिंमत देते. बदलत्या जीवनशैलीत आणि भौतिक सुखांच्या अकराळविकराळ परिघात आकसत चाललेल्या जीवनात या ओढीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘फुफाट्याचे दिवस’ने अनेकांची ही ओढ अधिक तीव्र केली, टोकदार केली. आज या जाणिवेचा समारोप करताना भारावून गेलोय.
गेली दोन वर्षे या सदरातून आपल्या सगळ्यांचं गावच आपल्या समोर येत राहिलं. त्याला ‘अॅग्रोवन’च्या विविध वर्गांतील वाचकांनी भरभरून प्रेम दिलं. सातासमुद्रापार गेलेल्या माणसांनी देखील दाद दिली. कोकणच्या लाल मातीतल्या झावळ्यांनी शाकारलेल्या झोपडीतूनही मायेचे हात पुढे आले, कौलारू घरांतून प्रेमाचा वर्षाव झाला. मराठवाड्यातील वाचकांनी विशेष प्रेम दिलं, कारण इथली माणसं सर्वाधिक विस्थापित झालेली.
विदर्भातून आलेल्या प्रतिक्रिया अचंबित करणाऱ्या होत्या, ‘हे राज्य तोडून हवंय’ असं काही राजकारणी आणि त्यांचे समर्थक म्हणत असतील, पण मला तर तिथल्या वाचकांच्या काळजातही तोच गाव दिसला; जो सह्याद्रीच्या कुशीतल्या माणसांच्या डोळ्यात वसला होता. खानदेशी, माणदेशी वाचकांनी त्यांच्या ग्रामीण साधनसामग्रीचा ऱ्हास असह्य होत असल्याचं सांगितलं तेव्हा गावकुसाची ही ओढ सर्वत्र समांतर असल्याचं अधोरेखित झालं.
गडचिरोलीतून देखील अभिप्राय कळवताना एका वाचकाने लिहिलं, की ‘फुफाट्याचे दिवस’ने मला माझी माणसं परत मिळवून दिली, त्यांच्या काळजातला वणवा थंड करण्याचं काम यातून झालं. कित्येकांनी पाणावल्या डोळ्यांनी आपल्या मनातलं आभाळ रितं केलं. प्रत्येक लेखाची वाट पाहणाऱ्या अनेक वाचकांनी न चुकता आपले अभिप्राय कळवले. डोळ्यांची दृष्टी कमी झाल्याने वाचायला लिहायला अडथळे येऊ लागल्याने काही पिकल्या पानांनी त्यांच्या घरातल्या कोवळ्या कोंबांना हाताशी धरून ऑडिओ मेसेज पाठवले तेव्हा माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहिले.
वाचकांचे हे प्रेम माझ्यासाठी न संपणारी शिदोरी बनून सोबत राहील. ज्यांनी उभ्या आयुष्यात गावजीवन अनुभवलं नाही अशा वाचकांनीही भरघोस प्रतिसाद दिला.कित्येक शतकांपूर्वी नगरे स्थापन होण्याआधी आपण सगळे जण गावजीवनाचे साक्षीदार होतो. काळाच्या ओघात अनेकांनी गावांची साथ सोडली तर काही गावांचे नगरात रूपांतर झाले, काही नगरांचे महानगर झाले. इथल्या माणसांची पाळंमुळं शोधत गेलं की ती कुठल्या तरी वेशीपाशी जाऊन पोहोचतात.
मग ही कथित शहरी माणसं आपल्या दिवाणखान्यात गप्पांचा फड रंगला, की अभिमानाने सांगतात, ‘‘आमची कुठली शेतीवाडी बाबा ! आम्ही शहरी मंडळी. मात्र कधीकाळी आमच्या बापजाद्यांची अमक्या तमक्या गावात इतकी शेती होती, इतका जमीन जुमला होता, वाडे होते, नोकर चाकर होते, वावरात विहिरी होत्या, विहिरींवर मोटी होत्या, मोट हाकणारी सर्जाराजाची जोडी होती, धान्याची कणगी होती, कडब्याची गंज होती, गायी- म्हशींनी भरलेले गोठे होते, हिरव्यागार चाऱ्याने भरलेली दावण होती,
बक्कळ दूधदुभतं होतं, अर्धा डझन सालदार गडी होते, काळ्या आईच्या कुशीतून सोनं पिकत होतं, जुंधळ्यात लगडलेलं चांदणं आजी, पणजीच्या डोळ्यातून तुलसी वृंदावनातल्या दिव्याच्या ज्योतीत उतरायचं आणि तिथून ते आभाळात जायचं’’ असं काही सांगताना त्या पोक्त चेहऱ्यावर अद्भुत समाधान विलसतं, जोडीनेच नकळत भरून आलेले डोळे पुसण्यासाठी चष्म्याच्या काचा साफ करण्याचा बहाणा कामाला येतो.
‘फुफाट्याचे दिवस’मधल्या गोष्टीतली काही माणसं वेगवेगळ्या ठिकाणी मला भेटत गेली. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी हे माझं गाव. या गावाच्या पंचक्रोशीतली माणसं, यांच्याकडून ऐकलेल्या काही गावगोष्टी, वेगवेगळ्या प्रवासात विविध टप्प्यांवर घडलेल्या काही घटना हे सगळं मनाच्या कप्प्यात साठत राहिलं. शेतशिवारात सोसाट्याचं वारं येतं, झाडांना गदागदा हलवून जातं, झाडे पडत नाहीत मात्र हिरवीपिवळी पानेदेखील पिकल्या पानासोबत पडून जातात. त्याच पानांचं खत होतं, झाडांच्या मुळाशी जातं आणि झाडाच्या शेंड्याला नव्या पानाच्या रूपाने पुन्हा दिमाखात फडफडू लागतं.
तसं ‘फुफाट्याचे दिवस’मधल्या माणसांचं, घटनांचं, स्थळांचं आहे. काळाच्या माऱ्याने हे सगळे वाहून गेले; पण आठवणींच्या, गप्पाष्टकांच्या रूपाने पुन्हा पुन्हा तजेलदार होत राहिले. ही प्रक्रिया हरेक गावकुसात घडलेली आहे, त्यामुळे अपरिचितांनाही ‘फुफाट्याचे दिवस’मधली माणसं, घटना, स्थळ सगळं परिचयाचं वाटतं. ‘खपली’मधली शांताबाई, ‘गुलमोहर’मधले कामिनी आणि दत्तू, ‘नाळ’मधले नारायणकाका, ‘फेरा’मधली गंगूबाई, ‘वर्तुळ’मधले अंबादास गवळी, ‘अंधार’मधला वसूनाना, ‘हक्क’मधल्या सिंधू सुगंधा, ‘ऋण’मधले मारुतीबाप्पा घुले,
‘ओलावा’मधले दौलत भोसले, ‘पश्चात्ताप’मधील गोदूबाई, ‘गहिवर’मधील लक्ष्मणआबा, ‘भास’मधली सरूबाई, ‘धग’मधला सायबू राठोड ही सगळी माणसं हाडामासाची वाटतात. यांच्याशिवाय अक्काबाई, अन्याबा, भाऊसाहेब, गोकुळनाथ, ज्ञानू सुतार, सर्जा, मालनबाई. दत्तू पाणक्या, मकबूलचाचा, नाग्याचा सुदामा, तान्हीबाई, धडे मास्तर, जगन्नाथ वाणी, इरण्णा, कलावती, गुलाबबाई, भानातात्या ही सगळी मंडळी आणि त्यांच्या जीवनाचा परीघ आपल्याला जगण्याची नवी व्याख्या देतो.
या सदरातील लेखन गावाकडच्या जुन्या आठवणींचे चित्रण होते. या चित्राच्या आत एक अख्खं गाव दिसेल. गजबजलेल्या वेशी, पोराबाळांनी भरलेल्या गल्ल्या, म्हाताऱ्या कोताऱ्यांनी व्यापलेली देवळं, समग्र गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेला दर्गा, गप्पात बुडालेला पार, आशाळभूत चावडी दिसेल. जाड्याभरड्या कपड्यातली साधीसुधी माणसं दिसतील. त्यांच्या जुन्या परंपरा, त्यांचे हेवेदावे, रुसवेफुगवे दिसतील. हिरवीगार शेते दिसतील, झाडांच्या सावल्यांतले बांध दिसतील, भिरभिरणारी पाखरं दिसतील, घराघरांतले देव्हारे दिसतील, सुरकुतलेले चेहरे दिसतील आणि भेगाळेलेले हातही दिसतील.
कष्टाने व्यापलेलं गावजीवन दिसेल आणि तरीही त्या लोकांच्या डोळ्यांत चमक दिसेल. यामुळेच ‘फुफाट्याचे दिवस’ला एक करुण, दुःखद झालर लाभलीय. मात्र हे केवळ आठवणींचे रुदन नाही, हा केवळ गतकाळातील माणसांचा जत्था नाही, हे केवळ लोप पावलेल्या गावजीवनाचे ललित वर्णन नाही, ही एक गावसंस्कृती आहे. त्या गावसंस्कृतीचं अक्षरलेणं पुढच्या पिढीस कळायला हवं, त्याशिवाय नव्या पिढीला आपल्या गतपिढीने सोसलेल्या घावांची वेदना कळणार नाही.
आजचं जीवन जरी भौतिक सुखांनी काठोकाठ भरलेलं असलं तरी गावसंस्कृतीच्या दरवळाने नव्या पिढीला खुणावलं पाहिजे. नव्या पिढीने दिलेली दाद पाहून ही धडपड सार्थ ठरली. या सफरीमध्ये मला साथसोबत देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या ‘अॅग्रोवन’च्या टीमचा आणि वाचकांचा ऋणी राहीन. ‘फुफाट्याचे दिवस’मधलं गावसंस्कृतीचं अक्षरलेणं तुमच्या हाती सोपवून भरल्या डोळ्यांनी आणि तृप्त मनाने तुम्हा सर्वांची रजा घेतो.
- समीर गायकवाड,
८३८०९७३९७७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.