
Buldana News : शासकीय मदतीसाठी वारंवार ई-केवायसी प्रक्रिया राबवली जाते. यासाठी याद्या प्रसिद्ध करून शेतकऱ्यांना, नागरिकांना कागदपत्रे जोडावी लागतात. आता गेल्या वर्षात झालेल्या अतिवृष्टीची मदत देण्यासाठी महसूल प्रशासनाने याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.
यानुसार शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यास सांगण्यात आले. मात्र काही ठिकाणी नावाच्या विपर्यासाचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. जळगाव जामोद तालुक्यात दोन शेतकरी भावांच्या नावांचा इंग्रजीत विपर्यास झाला आहे. याचा मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षात झालेल्या अतिवृष्टीची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी प्रशासनाने मदतीच्या याद्या तयार करून ई-केवायसी करण्यासाठी स्थानिक पातळीवर पाठवल्या आहेत. यानुसार शेतकरी याद्यांमध्ये नावे तपासून कागदपत्रे सादर करीत आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील वाघ कुटुंबातील दोघांची नावे इंग्रजीत लिहिताना प्रत्यक्ष अनुवादित वापरल्याने मोठा घोळ झाला आहे.
किशोर समाधान वाघ, अनंत समाधान वाघ यांची नावे यादीत चुकीची आल्याने त्यांची पळापळ होत आहे. २०२४ च्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी सरकारकडून मदत म्हणून अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
त्यासाठी गावनिहाय याद्या संगणकीय पद्धतीने तयार करण्यात आल्या. सीएससी केंद्रचालकांनी यादीतील लाभार्थ्यांची ई-केवायसी करून तसेच ई-केवायसी करीत असताना संबंधित खातेदाराची सर्व माहिती पोर्टलवर बरोबर आहे का हे खातेदारांना दाखवूनच ई-केवायसी करावी, अशा सूचना तहसीलदारांनी तलाठी, ग्रामसेवकांना दिल्या आहेत.
त्यानुसार वडशिंगी येथील अनंत समाधान वाघ आणि किशोर समाधान वाघ हे दोन्ही शेतकरी ई-केवायसी करण्यासाठी जवळच्या सीएससी केंद्रावर गेले असता त्यांना आपली नावे यादीत दिसत नव्हती. त्यांनी आधार कार्ड नंबरद्वारे यादीत नाव शोधले असता किशोर समाधान वाघ या नावाऐवजी त्या ठिकाणी Teen Solution Tiger असे, तर अनंत समाधान वाघ यांच्या नावाऐवजी Infinite Satisfaction Tiger असे करण्यात आल्याचे दिसून आले.
यामुळे दोन्ही शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या आनंदापेक्षा मनस्तापच जास्त सहन करावा लागला. नेमकी ही चूक कुणाकडून झाली हे या शेतकऱ्यांना कळू शकले नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.