चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाशचे व्यवस्थापन

अमोनिअम सल्फेट, अमोनिअम फॉस्फेटसारख्या खताचा वापर चुनखडीयुक्त जमिनीत (Lomy Soil) केला तर नत्राचा जास्त ऱ्हास होतो. स्फुरदयुक्त खते (Phosphorous Fertilizers) दिल्यानंतर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये एकानंतर एक अशी संयुगे तयार होतात त्यामुळे उपलब्धता कमी होते. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सध्या पालाशची कमतरता दिसत आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon

डॉ.अर्चना पवार, धीरज साठे

नत्राचे व्यवस्थापन :

१) चुनखडीयुक्त जमिनी (Lomy Soil) अल्कलीधर्मी असल्यामुळे नत्राचे रूपांतर होण्याच्या गतीवर अनिष्ट परिणाम होतो. नत्राची (Nitrogen) उपलब्धता कमी होऊन पिकांच्या नत्र उपयोगितेवर विपरीत परिणाम होतो. या प्रक्रियेमध्ये नायट्रिफिकेशन (Nitrification Process) क्रिया मंदावते.

२) नायट्रिफिकेशन क्रियेमध्ये नत्र हे अमोनिया स्वरूपातून नायट्रेट स्वरूपात रूपांतरित होते. या कामी जमिनीतील जिवाणू मदत करतात. नायट्रेट स्वरूपातील नत्र पिके शोषून घेतात, म्हणून ही क्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. नायट्रोसोमोनस, नायट्रोबॅक्टरसारख्या जिवाणूंमुळे हे रूपांतर घडते.

३) नायट्रिफिकेशन ही क्रिया जमिनीचा सामू सात ते आठच्या दरम्यान असल्यास जास्त गतीने होते. जमिनीचा सामू जर ५ ते ७.५ च्या दरम्यान असेल, तर अमोनिअमयुक्त नत्र खताचा वापर फायदेशीर ठरतो. कारण नायट्रिफिकेशनच्या क्रियेमध्ये हायड्रोजनचे अणू सोडले जाऊन जमीन आम्लधर्मी होण्यासाठी याचा उपयोग होतो, परंतु जमिनीमध्ये जर कार्बोनेटचे प्रमाण जास्त असेल तर वर उल्लेख केल्याप्रमाणे अमोनिअम खताचा परिणाम दिसून येत नाही. उलटपक्षी नुकसान होते.

४) नत्राचा ऱ्हास अमोनिअम संयुगाचे अमोनिया वायूमध्ये रूपांतर झाल्याने होते, अमोनिअमयुक्त खते चुनखडीयुक्त जमिनीत वापरली, तर अमोनिअम संयुगाचे अमोनियामध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण वाढते.

५) खतातील अमोनिअम, जमिनीतील कॅल्शिअम कार्बोनेटसोबत क्रिया करून अमोनिअम कार्बोनेट तयार करते. त्यातील अमोनिअम कार्बोनेटचे रूपांतर अमोनिया वायू, पाणी आणि कर्बवायूमध्ये होते आणि नत्राचा ऱ्हास होतो.

६) अमोनिअम सल्फेट, अमोनिअम फॉस्फेटसारख्या खताचा वापर जर चुनखडीयुक्त जमिनीत केला तर नत्राचा जास्त ऱ्हास होतो. त्याऐवजी अमोनिअम नायट्रेट, अमोनिअम क्लोराइडयुक्त खतामधून नत्राचा ऱ्हास कमी होतो. क्लोराइडचे जमिनीतील प्रमाण तपासूनच या खताचा वापर करावा.

७) चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लोहाची कमतरता असल्याने मुळांच्या वाढीमध्ये लेग हिमोग्लोबीन पदार्थ कमी तयार होतात. या लेग हिमोग्लोबिनमुळेच हवेतील नत्र मुळावरील गाठीमध्ये साठविले जाते. लेग हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते.

उपाययोजना ः

१) नत्र खतांचा वापर काळजीपूर्वक करावा. नत्र खतांचे रूपांतर अमोनिया वायूमध्ये होऊ नये, म्हणून खते जमिनीच्या पृष्ठभागावर न राहता ताबडतोब मातीत मिसळली गेली पाहिजेत. त्यासाठी जमिनीत योग्य ओलावा असणे, अथवा खते दिल्यावर जमिनीस पाणी देणे महत्त्वाचे ठरते.

२) अमोनियाद्वारे होणारा नत्राचा ऱ्हास टाळण्यासाठी युरिया हा म्युरेट ऑफ पोटॅश, कॅल्शिअम क्लोराइड किंवा ट्रिपल सुपर फॉस्फेट खतासोबत मिसळून द्यावा.

३) दाणेदार युरिया, गंधकाचे आवरण असलेला युरियाच्या वापराने नत्र खताची उपयोगिता वाढविता येते.

स्फुरदाचे व्यवस्थापन :

१) चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी असते. जमिनीतील स्फुरद किंवा खताद्वारे दिलेल्या स्फुरदाची उपलब्धता जमिनीचा सामू सहा ते ७.५ दरम्यान असेल, तर जास्त असते.

२) चुनखडीयुक्त जमिनीचा सामू ७.५ पेक्षा जास्त असल्याने पिकांना पुरेसा स्फुरद उपलब्ध होत नाही. स्फुरदाचे रूपांतर कॅल्शिअम फॉस्फेट, मॅग्नेशिअम फॉस्फेट या संयुगांमध्ये होते. ही संयुगे अत्यंत कमी विद्राव्य असतात. स्फुरदयुक्त खते दिल्यानंतर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये एकानंतर एक अशी संयुगे तयार होतात आणि पिकांना स्फुरदाची उपलब्धता कमी होत जाते. यालाच स्फुरदाचे स्थिरीकरण म्हणतात.

३) यामध्ये फॉस्फेट संयुग पोयट्याच्या कणांवर किंवा चुन्याच्या कणांवर बसते. त्याचा डाय कॅल्शिअम फॉस्फेट, ऑक्टॅकॅल्शिअम फॉस्फेट संयुगाच्या रूपाने साका तयार होतो. ज्या प्रमाणात जमिनीचा सामू वाढत जातो, त्या प्रमाणात संयुगे होण्याची क्रिया वाढत जाते आणि स्फुरद पिकांना उपलब्ध होत नाही; त्यासाठी स्फुरद खतांची मात्रा वाढविणे आणि जमिनीस स्फुरद विद्राव्य जिवाणूंचा पुरवठा करणे हा पर्याय आहे.

Fertilizer
खतं महागल्यामुळे सरकारला सेंद्रिय शेतीची ओढ

उपाययोजना ः

१) सुपर फॉस्फेट, डायअमोनिअम फॉस्फेट यांसारख्या स्फुरद विद्राव्य खतांचा वापर हितावह असतो. रॉक फॉस्फेटसारख्या खतातून स्फुरद देणे योग्य नाही, कारण त्यांची विद्राव्यक्षमता ही अत्यंत कमी असते. उलट त्यांचे स्थिरीकरण जास्त होते. स्फुरदाच्या कमतरतेमुळे पिकांचे योग्य उत्पादन मिळत नाहीत.

२) चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरद खते बॅण्ड प्लेसमेंट आणि दाणेदार स्वरूपात दिल्याने खतांची उपयोगिता वाढते. यामुळे खतांचा जमिनीतील कणांशी कमी संयोग होतो, अविद्राव्यता कमी होतो.

Fertilizer
Bogus Fertilizer : बोगस खत विक्रीत टोळ्यांचा सुळसुळाट

उपाययोजना ः

१) पिकांच्या मुळांची वाढ जेव्हा झपाट्याने होत असते, अशा वेळी स्फुरदाचा योग्य पुरवठा असणे आवश्यक आहे. त्यासाठी खते देण्याची वेळ महत्त्वाची आहे.

२) संत्रा, मोसंबीसारखी पिके जर चुनखडीयुक्त जमिनीत घेतली असतील, तर या पिकांना दर वर्षी नियमितपणे स्फुरद खत देणे आवश्यक आहे. झाडे पक्व झाल्यानंतर स्फुरदाची मात्रा दर वर्षी दिली नाही तरी चालते.

३) टोमॅटोमध्ये बॅण्ड पद्धतीने पोटॅशिअम डायहायड्रोजन आर्थोफॉस्फेट हे खत जमिनीत दिल्याने स्फुरदाची कमतरता पिकांमध्ये दिसत नाही

पालाश, मॅग्नेशिअमचे व्यवस्थापन ः

१) चुनखडीयुक्त जमिनीमध्ये उपलब्ध पालाश आणि मॅग्नेशिअम पुरेशा प्रमाणात दिसतो, कारण या जमिनी तयार होत असताना खनिजांची झीज होऊन विनिमयक्षम पालाश आणि मॅग्नेशिअमची भर पडते. कमी पावसामुळे पाण्याद्वारे ही अन्नद्रव्ये वाहून जात नाहीत. परंतु मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि पालाश या अन्नद्रव्यांमध्ये असमतोल होऊन मॅग्नेशिअम व पालाशची कमतरता पिकांमध्ये दिसून येऊ शकते. याचे प्रमुख कारण जमिनीमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण पालाश व मॅग्नेशिअमपेक्षा जवळपास ८० टक्के जास्त असल्यामुळे आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण अंदाजे फक्त चार टक्के असल्याने, मॅग्नेशिअम व पालाशचे शोषण कॅल्शिअमच्या तुलनेत कमी होते आणि पिकांमध्ये या मूलद्रव्याची कमतरता दिसून येते.

२) द्राक्षपिकामध्ये पालाश आणि कॅल्शिअम एकमेकांच्या विरुद्ध कार्य करतात. यामध्ये पालाशचे शोषण कमी होते. द्राक्षमण्यांना पालाशचा पुरवठा कमी झाल्याने द्राक्षमणी जास्त आम्लधर्मी होतात, म्हणून जमिनीमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असेल, तर अशा जमिनींना मॅग्नेशिअम आणि पालाशच्या शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त मात्रा द्यावी.

३) चुनखडीयुक्त जमिनीमध्ये पालाशचे प्रमाण सर्वसाधारणपणे जास्त असते, तरीही पालाश अन्नद्रव्याची कमतरता सद्यःस्थितीमध्ये दिसून येत आहे. धूप झालेल्या जमिनी, वालुकामय जमिनी व सतत पीक पद्धतीमुळे पालाशचे प्रमाण कमी होत असून, पालाश अन्नद्रव्यांच्या वापरास पीक प्रतिसाद देते.

४) इतर मॅग्नेशिअमयुक्त खते देऊन पानांतील मॅग्नेशिअमचे प्रमाण चुनखडीयुक्त जमिनीमध्ये वाढवता येत नाही, त्यासाठी मॅग्नेशिअम सल्फेटसारखी विद्राव्य खते वापरणे जास्त हितावह आहे. काही वेळा मॅग्नेशिअम सल्फेटसारखी खतेसुद्धा जास्त उपयोगी पडत नाहीत. कारण जमिनीचा सामू जास्त अल्कलीधर्मी असतो (सामू आठपेक्षा जास्त). अशा वेळी फवारणीद्वारे मॅग्नेशिअम, पालाश देणे एवढाच उपाय असतो. त्यासाठी मॅग्नेशिअम नायट्रेट, पोटॅशिअम नायट्रेटसारखी विद्राव्य खते फवारणीसाठी वापरावीत.

५) तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार संत्रावर्गीय पिकांमध्ये २५ ग्रॅम मॅग्नेशिअम नायट्रेट एक लिटर पाण्याद्वारे फवारल्यास पानांतील पालाशचे प्रमाण वाढते. वर्षातून चार ते पाच वेळा फवारणी करावी. या खतामध्ये नत्र असल्याने, नत्राच्या व्यवस्थापनामध्ये याचा विचार करावा.

----------------------------------

संपर्क ः डॉ. अर्चना पवार, ७५८८०४७८५९

(विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com