Mango Pickle Market: घरगुती लोणच्याची तयार केली बाजारपेठ

Agro Processing Industry: जयसिंगपूरच्या मुक्‍ता कुलकर्णी यांनी घरगुती चवीच्या कैरी, टोमॅटो, मिरची आणि लिंबू लोणच्याच्या उत्पादनातून सोशल मीडियाचा वापर करून बाजारपेठ वाढवली आहे.
Mukta Kulkarni
Mukta KulkarniAgrowon
Published on
Updated on

Success Story: जयसिंगपूर (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील मुक्‍ता संजय कुलकर्णी यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन घरगुती चवीचे कैरी, टोमॅटो, मिरची, लिंबू लोणचे निर्मितीला सुरुवात केली. लोणच्याची गुणवत्ता, वेगळेपणा आणि खुमासदार लेखनातून सोशल मीडियावरूनच त्यांनी उत्पादनांची जाहिरात करत बाजारपेठ विकसित केली आहे. दरवर्षी लोणचे आणि दिवाळी खाद्यपदार्थांच्या निर्मितीतून त्यांनी प्रक्रिया उद्योगाचा चांगल्या प्रकारे विस्तार केला आहे.

जयसिंगपूर (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील मुक्‍ता संजय कुलकर्णी या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. लग्‍नानंतर त्यांनी नऊ वर्षे एका खासगी संस्थेत विक्री समन्वयक म्हणून काम केले. पण काही कारणाने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांच्या सासूबाई कै. सुनीता कुलकर्णी यांनी मुक्‍ताताईंना पाककला शिकविली. याचबरोबर त्यांना माहेरकडूनही प्रक्रिया उद्योगासाठी मदत झाली. यातून आत्मविश्‍वास वाढला. बाजारपेठेतील मागणीचा विचार करून त्यांनी घरगुती चवीच्या कैरी लोणचे निर्मितीची कल्पना सुचली.

टिकवण क्षमता वाढविण्यासाठी कोणताही रासायनिक घटकांच्या त्या वापर करत नाहीत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी लोणचे निर्मितीला सुरुवात केली. परिसरातील लोकांना लोणच्याचे सॅंपल दिले. ग्राहकांना घरगुती चवीचे लोणचे पसंत आल्यानंतर टप्प्याटप्प्याने दरवर्षी २०० किलोवरून आता १००० किलो लोणचे निर्मिती आणि विक्रीचा टप्पा त्यांनी गाठला आहे. कोणतीही यंत्रणा न वापरता पूर्ण घरगुती पद्धतीने तयार केलेले कैरी, टोमॅटो, मिरची आणि लिंबू लोणचे निर्मितीतून त्यांची वेगळी ओळख तयार झाली आहे.

Mukta Kulkarni
Agriculture Success Story: पालकरांकडील आंब्याला मिळालेय जागेवरच मार्केट

शेतकऱ्यांकडून कैरी खरेदी

लोणचे निर्मितीसाठी कैऱ्यांची खरेदी करताना विशेष दक्षता घेतली जाते. मुक्ताताई जयसिंगपूर परिसराच्या दहा गावांतील शेतकऱ्यांकडून कैऱ्यांची खरेदी करतात. विशेष करून टिकावू कैरी खरेदी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. जर शेतकऱ्यांकडे एक, दोन झाडे असतील तर त्यावरील कैऱ्यांची खरेदी बाजारभावाप्रमाणे केली जाते. जेवढी लोणचे निर्मिती करायची आहे तेवढीच कैरी खरेदी केली जाते. जुन्या काळामध्ये वळवाचा पाऊस झाला, की घरगुती लोणचे करण्याचा चांगला काळ समजला जायचा.

अगदी तशीच वेळ आणि प्रक्रिया पद्धत आजही लोणचे निर्मितीसाठी वापरली जाते. साधारणतः एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून कैरी खरेदी सुरू होते. खरेदीनंतर कैरी फोडून एक दिवस कडक उन्हात वाळवली जाते. त्या अगोदर खात्रीशीर व्‍यापाऱ्यांकडून लोणच्यासाठी विविध मसाल्यांची खरेदी केले जातात. हे मसाले आणताना त्‍याचा दर्जेदारपणा बारकाईने तपासला जातो. मसाला आणल्‍यानंतर एक दिवस पूर्ण वाळवून त्‍यातील ओलावा काढला जातो. त्यानंतर डंकावर मसाल्याचे मिश्रण केले जाते. फोडींच्या प्रमाणानुसार मसाला मिसळून लोणचे तयार केले जाते. लोणचे टिकण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची असते. यामुळे ते तयार करताना गोल्‍व्ह्‍‍जचा वापर तसेच आदी दक्षता घेतली जाते.

Mukta Kulkarni
Agriculture Success Story: पडीक माळरानावर झेंडू-भाजीपाल्याचा यशस्वी प्रयोग

लोणच्याला मिळाली घरगुती चव

बहुतांशी ठिकाणी कैरीच्या फोडीवर मसाले पसरून लोणचे तयार केले जाते. मुक्‍ताताई मात्र अशी पद्धत न वापरता मसाल्यामध्ये कैरी फोडी मिसळून त्या एकजीव करण्यावर भर देतात. प्रत्येक फोडीला पूर्ण मसाला लागल्यामुळे लोणच्याला चांगली चव येते. फोडणी गार झाली की मिश्रण करून लोणचे तयार केले जाते. ही प्रक्रिया मुक्ताताई स्वतः करतात. लोणचे तयार करताना घरगुती पद्धतीने केले जाते.

कोणतेही संरक्षक रसायन वापरले जात नाही. विक्री कमी झाली तरी चालेल पण कोणत्‍याही परिस्थितीत कमी दर्जाचे पदार्थ वापरून लोणचे निर्मिती करणार नाही असा मुक्ताताईंचा निश्‍चय आहे. यामुळे तेल किंवा अन्य कोणतेही मसाले कमी किमतीत मिळत असतील आणि दर्जा चांगला नसेल तर ते घेतले जात नाहीत. दर्जा आणि चव टिकविल्यामुळेच लोणच्याची मागणी सातत्याने वाढत आहे. लोणचे तयार झाल्यानंतर पाव किलो, अर्धा किलो या प्रमाणात पॅकिंग केले जाते. प्रति किलो ४५० रुपये या दराने ग्राहकांना लोणच्याची विक्री केली जाते.

सध्या साठवणुकीची सोय नसल्याने ग्राहकांच्या मागणीचा अंदाज घेऊन लोणचे तयार केले जाते. साधारणतः एका हंगामात एक हजार किलोपर्यंतचे लोणचे तयार केले जाते. कैरी लोणचे निर्मितीबरोबरीने टोमॅटो, लिंबू, मिरची निर्मितीला त्यांनी चालना दिली. प्रक्रिया उद्योगाचे त्यांनी प्रमाणपत्र देखील घेतले आहे. या प्रक्रिया उद्योगात मुक्ताताईंनी दोन महिलांना रोजगार देखील दिला आहे.

जपली सामाजिक बांधिलकी

प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रम म्हणून मुक्ताताई त्यांच्या प्रक्रिया उद्योगाच्या वर्धापनदिनी दुर्धर आजाराने ग्रस्त बालकांचे संगोपन करणाऱ्या संस्‍थांना पौष्टिक लाडू देऊन मुलांच्या आरोग्याची काळजी घेतात. जयसिंगपूर हे मुक्‍ताताईंचे सासर आणि माहेर असल्याने मोठा मित्र परिवार आहे. अनेक मित्र मैत्रिणीही त्यांना कच्च्या मालाची खरेदी, विक्रीबाबत मदत करतात. परिसरातील अनेक सामाजिक उपक्रमात मुक्ताताईंचा चांगला सहभागी आहे.

Mukta Kulkarni
FPC Success Story : शेतकरी कंपनीने उभारली कोल्ड स्टोअरेज यंत्रणा

वेगळेपणा जपणारे टोमॅटो लोणचे

मुक्ताताई कैरी लोणच्याबरोबर गेल्या वर्षीपासून पिकलेल्या टोमॅटोचे लोणचे तयार करतात. महाराष्ट्रात टोमॅटो लोणचे ही संकल्पना फारशी प्रचलित नाही. मुक्‍ताताईंचे सासरे विठ्ठल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही कल्पना पुढे आली. ते रेल्वेमधून स्टेशन मास्तर म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. दक्षिणेत सेवा करताना त्यांनी टोमॅटो लोणचे पाहिले होते. याबाबत त्यांनी मुक्ताताईंना कल्पना दिली. दोन वर्षांपूर्वी त्यांनी टोमॅटो लोणचे निर्मितीबाबत तांत्रिक माहिती घेऊन निर्मितीला सुरुवात केली.

जयसिंगपूर बाजारात सौद्यातून माफक दरात सुमारे शंभर किलो पिकलेले टोमॅटो घेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते. टोमॅटोचे छोटे काप करून ते वाळवले जातात. त्यापासून लोणचे तयार केले जाते. कैरीच्या तुलनेत ते कमी टिकाऊ असले तरी सहा महिन्यांपर्यंत टिकवणक्षमता आहे. टोमॅटो लोणचे देखील ग्राहकांच्या पसंतीस पडले आहे. सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या वतीने आयोजित प्रशिक्षणांमध्येही मुक्ताताईंनी लोणचे निर्मितीचे प्रशिक्षण घेतले आहे. भविष्यात थेट शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करून लोणचे निर्मितीला उद्योगाची वाढ करण्याचे त्यांनी नियोजन केले आहे.

सोशल मीडियावर विक्री

थेट ग्राहकांना लोणचे विक्री हे धोरण मुक्ताताईंनी ठेवले आहे. त्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. लोणचे निर्मितीबरोबर त्या सोशल मीडियावर खुमासदार शैलीत लिखाण करत असल्याने त्यांचा एक फॅन फॉलोअर आहे. याचा उपयोग लोणचे विक्रीसाठी होतो. लोणचे तयार करण्याच्या सर्व प्रक्रिया त्या सोशल मीडियावर टाकतात. त्यामुळे राज्‍यभरातून त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. मागणीनुसार कुरिअरने त्या ग्राहकांना लोणचे पाठवतात.

लोणचे निर्मितीचे सर्व काम घरगुती पद्धतीने होते. कोणत्‍याही यंत्रांचा वापर केला जात नाही यामुळे मागणी प्रमाणे लोणचे पाठविण्याला मर्यादा येत असल्याचे त्या सांगतात. बाजारभाव आणि कैऱ्यांच्या किमतीनुसार लोणच्याचा दर ठरविला जातो. साधारणपणे लोणचे विक्रीतून ३५ टक्क्यांपर्यंत नफा मिळतो. मुक्ताताईंनी प्रक्रिया उद्योगाला ‘कुलकर्णीज प्रियम होम मेड’ हे नाव दिले आहे.

स्थानिक नातेवाइकांकडून राज्यभराबरोबर परदेशातही कैरी, टोमॅटो लोणचे पाठवले जाते. ग्राहक एकाच वेळी दोन, तीन किंवा त्याहून जास्त प्रमाणात लोणच्यांची खरेदी करतात. प्रत्येक वर्षी लोणचे खरेदी करणारे ग्राहक आता तयार झाले आहे. सोशल मीडियावरून लोणचे निर्मितीची पोस्ट टाकली, की ग्राहकांची मागणी सुरू होते. एप्रिल ते जून महिन्यापर्यंत लोणचे निर्मितीची अखंड प्रक्रिया सुरू असते.

लाडू, दिवाळी फराळाची निर्मिती

मुक्ताताई लोणचे निर्मितीबरोबर अन्य कालावधीत ग्राहकांच्या मागणीनुसार विविध प्रकारचे लाडू, दिवाळी फराळ करून देतात. विविध प्रकारचे ड्रायफ्रूट, शुगर फ्री, मेथीचे लाडू आदि विविध प्रकारचे लाडू त्या बनवतात. दिवाळीच्या काळात फराळ तयार केला जातो. मात्र लोणचे निर्मिती हा त्यांचा मुख्य आर्थिक स्रोत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com