Agriculture Success Story: पालकरांकडील आंब्याला मिळालेय जागेवरच मार्केट

Mango Farming Model: बुलडाण्यातील सातगाव म्हसला येथील अवचितराव पालकर यांनी केवळ सव्वा एकरात केसर व अन्य आंब्याची बाग फुलवली आहे. आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून बाजारात स्वतःचं ब्रँड तयार केलं आहे.
Mango Farming
Mango FarmingAgrowon
Published on
Updated on

Agricultural Business Story: सातगाव म्हसला (ता. जि. बुलडाणा) येथील अवचितराव पालकर यांनी आपल्या पावणेसात एकर शेतीपैकी सव्वा एकरात केसर व अन्य जातींच्या आंब्याची बाग विकसित केली आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्याला माल न देता बुलडाणासहित मराठवाड्यातील शेजारील जिल्हे व जळगावपर्यंत आपल्या गुणवत्ताप्रधान आंब्याला त्यांनी थेट ग्राहक बाजारपेठ तयार केली आहे. आंब्याबरोबरच दुग्ध व्यवसाय, ऊस व आंतरपीक पद्धतीची शेती यातूनही त्यांनी प्रयोगशीलता दाखवली आहे.

सातगाव म्हसला (ता. जि. बुलडाणा) हे विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील प्रयोगशील गाव आहे. सिंचनासाठी पुरेशे पाणी आणि सुपीक जमिनीची साथ गावाला मिळाली आहे. गावातील अवचितराव पालकर हे प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. पारंपरिक शेतीत नावीन्य आणून मेहनतीच्या जोरावर त्यांनी शेतीचा चांगल्या प्रकारे विकास साधला आहे. पालकर यांची पावणेसात एकर शेती आहे.

Mango Farming
Kesar Mango Farming: केसर आंब्याच्या आकारवाढीसह दर्जा राखण्यावर भर

त्यातील सुमारे चार एकरांवर ऊस असतो. उसात हरभरा, कोबी आदी विविध पिके ते घेतात. पालकर यांच्या शेतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सव्वा एकरात विकसित केलेली आंबाबाग. विदर्भात आंबा हे तसे तुलनेने नवे पीक. गावरान जातीच्या आंब्याची झाडे अनेकांच्या शेतांमध्ये वर्षानुवर्षे दिसून येतात. परंतु पालकर यांनी सघन पद्धतीने बाग लावण्याचे धारिष्ट्य २०१३ च्या दरम्यान केले. अनेकांनी त्यांच्या या प्रयोगाविषयी शंकाही व्यक्त केल्या. काहींनी प्रेरणाही दिली. मात्र बुलडाणा कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत पालकर यांनी बागेचे व्यवस्थापन सुरू केले.

...अशी विकसित केली आंबा बाग

लागवडीनंतर सुमारे पाच वर्षांनी पालकरांची बाग व्यावसायिक उत्पादन देऊ लागली आहे. सव्वा एकराच्या या बागेत केसर या मुख्य वाणाच्या लागवडीसह पायरी, बदाम, दशहरी, गावरान आदी जातींच्याही काही झाडांची लागवड केली आहे. दहा बाय सहा फूट अंतरावरील लागवड असून कोय- कलम पद्धतीचा वापर करून झाडे विकसित केली आहेत. बागेत सर्व मिळून साडेसातशेहून अधिक झाडे आहेत. बाग नवी असताना तीन वर्षे त्यात पीकेएम-१ या वाणाच्या शेवग्याचे आंतरपीक घेतले.

या आंतरपिकाने मोठी साथ देताना तीन वर्षांमध्ये खर्च वजा जाता सात लाख रुपये निव्वळ नफा मिळवून दिला. शेवग्याची नागपूर, अकोला, बुलडाणा, शेगाव, खामगाव आणि जयपूर येथील बाजारात यशस्वी विक्री केली.

थेट ग्राहक बाजारपेठ केली विकसित

फळांची विक्री व्यापाऱ्यांना करण्याची कोणताही गरज पालकर यांना भासत नाही. बुलडाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यातील ग्राहक थेट बागेत येऊन आंबा घेऊन जातात. अशा प्रकारे ७० टक्के विक्री होते. शिवाय बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातही त्यांचे कायमस्वरूपी ग्राहक तयार झाले आहेत. पालकर यांच्या गावाजवळ धार हे गाव आहे. या ठिकाणी सराफी दुकाने आहेत.

त्यांच्या संपर्कातून जळगाव येथील सराफी व्यावसायिकांपर्यंत पालकर यांनी आपला गुणवत्ताप्रधान आंबा पोहोचवला आहे. आठवड्यातून दोन दिवस वाहनाद्वारे आंबा बुलडाण्यात विक्रीला नेतात. तेथे निश्‍चित जागा तयार केली आहे. तेथून ग्राहकांना थेट विक्री करतात. शिवाय आता सोशल मीडियाचाही वापर होतो. ग्राहकांचे आगाऊ बुकिंग घेण्यात येते. फळे नैसर्गिकरीत्या गवतातच पिकवली जातात. कच्च्या आंब्याची किलोला १२० रुपये दराने विक्री होते. एकरी सहा ते सात टन उत्पादन देणारी ही बाग वर्षाला आता काही लाखांचे उत्पन्नही देऊ लागली आहे.

Mango Farming
Mango Farming Management : गुणवत्तापूर्ण हापूस उत्पादनासाठी काटेकोर व्यवस्थापनावर भर

दुग्ध व्यवसाय व ऊसशेती

आंबा बागेला घरच्या शेणखताचा अधिकाधिक वापर होतो. काही गीर व उर्वरित संकरित मिळून सुमारे २० ते २५ गाई आहेत. वर्षाला २० ते २५ ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. दररोज ४५ ते ६० लिटर दूध संकलन होते. दोन गुंठ्यांत गावरान कुक्कुटपालन होते. जनावरांची संख्या लक्षात घेता मका व अन्य घटकांचा वापर करून वर्षाला सुमारे ५० टनांपर्यंत मुरघास तयार केला जातो. त्यातून पशुखाद्यावरील भार बराच कमी झाला आहे.

विदर्भात उसशेतीचा तुलनेने तेवढा विकास झालेला नाही. मात्र पालकर यांनी आंतरपीक पद्धतीतून उसाची यशस्वी शेती केली आहे. त्यात हरभरा व कोबीचे आंतरपीक घेऊन खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. अन्य शेतकऱ्यांसोबत विचारांचे आदानप्रदान करून शेतीत प्रयोग करण्याविषयी पालकर यांची धडपड सुरू असते. पालकर यांना मोठा मुलगा संदीप व धाकटा दीपक यांची शेती व दुग्ध व्यवसायात मोठी साथ आहे.

एका मुलाने पशुवैद्यक विषयात पदविका घेतली असून, दुसरा मुलगा सिव्हिल इंजिनिअरिंग विषयातील शिक्षण घेत आहे. शेतीत यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. फवारणीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्राचा वापर केला जातो. रासायनिक पद्धतीचा वापर बराच कमी केला आहे. सेंद्रिय, जैविक घटकांचा वापर अधिक होतो. आंबा बागेचा संपूर्ण खर्च ६६ हजारांपेक्षा जास्त राहात नाही.

सातगाव परिसर आणि गारपिटीचा धोका

आंब्याची बाग उत्पादन देऊ लागली तेव्हापासून एक वर्षाआड सातगाव म्हसला परिसराला गारपिटीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आजवर तीन वर्षे गारपिटीने पालकर यांच्या आंबा बागेला जोरदार तडाखा दिला. यंदा मार्चच्या शेवटी व एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या नैसर्गिक आपत्तीत आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळाला. फळांनाही इजा पोहोचली. त्याच उत्पादकतेवर निश्‍चित परिणाम होत आहे. मात्र नैसर्गिक संकटांशी सामना करीत हिमतीने उभे राहत पालकर यांनी शेती यशस्वी केली आहे.

- अवचितराव पालकर ८९७५८०३८६०

पालकर प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी आंबा, भाजीपाला, ऊस याबरोबरच दुग्ध व्यवसायही आकारास आणला आहे. एकात्मिक पद्धतीने कुटुंबाचे अर्थकारण सुधारले आहे. कृषी विज्ञान केंद्रासोबत (केव्हीके) सातत्याने संपर्कात राहत ते सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहेत. त्यातूनच उत्पादन व उत्पन्नवाढीस चालना मिळाली आहे. केव्हीकेच्या पुढाकाराने होणाऱ्या आंबा महोत्सवात पालकर यांच्या बागेतील फळे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहेत.
डॉ. अनिल तारू, फळबाग तज्ज्ञ, केव्हीके, बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com