Agricultuere Technology: रासायनिक अवशेषमुक्त शेतीसाठी उद्योजकांची हिरवी क्रांती!

Entrepreneurs' Opinions: जमीन सुपीकतेसोबत रासायनिक अवशेषमुक्त शेतीमाल उत्पादनासाठी शेतकऱ्यांच्या बरोबरीने निविष्ठा उत्पादकही तितकेच प्रयत्नशील आहेत. तेही काळाची गरज ओळखून पर्यावरणपूरक, नावीन्यपूर्ण निविष्ठा निर्मिती करत आहेत. या उद्योजकांनी शाश्वत शेती आणि आरोग्यदायी अन्नधान्य उत्पादनाबाबत मांडलेली मते...
Soil
SoilAgrowon
Published on
Updated on

जमीन सुपीकता, नवीन तंत्रज्ञानावर भर

कापूस उत्पादकांच्या उपजीविकेचे बळकटीकरण आणि दीर्घकालीन कृषी उत्पादकता सुनिश्‍चित करण्यासाठी शाश्‍वत शेती अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रासाठी कापूस हे महत्त्वाचे पीक आहे. गेल्या काही वर्षांत या पिकातील उत्पादकता मर्यादित झाली आहे. तणांची समस्या वाढली आहे. तणांच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे उत्पादन सुमारे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घटू शकते, तसेच मजुरीवरील अवलंबित्व आणि उत्पादन खर्च वाढतो. परिणामी, नफा आणि शाश्‍वततेवर परिणाम होताना दिसत आहे.

या समस्यांवर मात करण्यासाठी शाश्‍वत शेती पद्धतींकडे वळण्याची गरज आहे, विशेषतः कार्यक्षम आणि वैज्ञानिक पद्धतीने तण व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक आहे. अशी पद्धत अमलात आणल्यास शेतकऱ्यांना उत्पादनातील अडथळे दूर करता येतील, संसाधनांचा योग्य वापर करता येईल, मजुरीवरील अवलंबित्व कमी होईल आणि खर्चात बचत होईल. या उपाययोजनांमुळे केवळ तात्कालिक अडचणींचे निराकरण होणार नाही, तर मातीचे आरोग्य सुधारण्यास आणि संसाधने जपण्यास मदत होईल, ज्यामुळे दीर्घकालीन कृषी स्थैर्याचा पाया रचला जाईल.

महाराष्ट्रभर पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतींचे एकत्रित उपयोग करून, शाश्‍वतता आणि आर्थिक व्यवहार्यतेचा समतोल राखण्याची गरज आहे. वैज्ञानिक पद्धतींची ओळख करून दिली गेली असली, तरी तिचा व्यापक स्वीकार अद्याप कमी आहे. सामुदायिक माहितीची देवाणघेवाण, प्रशिक्षण कार्यक्रम आणि शाश्‍वत शेतीसाठी लागणाऱ्या साधनांची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन घेणे शक्य आहे. येत्या कापूस पेरणी हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर, शाश्‍वतता आणि स्थैर्यावर भर देणाऱ्या सर्वसमावेशक उपाययोजनांना प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. शाश्‍वत शेतीच्या दिशेने आपले प्रयत्न आवश्यक आहेत. सर्वांच्या प्रयत्नातून पीक उत्पादन वाढवू शकतो तसेच समृद्ध, पर्यावरणपूरक भविष्य सुरक्षित करू शकतो.

- एन. के. राजवेलू, (सीईओ (पीक संरक्षण व्यवसाय)गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड, मुंबई)

जमीन सुपीकतेतून उत्पादन वाढ शक्य

शाश्‍वत व अवशेषमुक्त शेती ही पर्यावरणपूरक असून, नैसर्गिक संसाधनांचा समतोल वापर व जैवविविधतेचे रक्षण करते. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होऊन जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता वाढते. मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव व गांडुळे सक्रिय राहून जलधारण क्षमता वाढते. जैविक उत्पादनांमुळे प्रदूषण कमी होऊन नैसर्गिक संतुलन व जैवविविधता टिकून राहते. सेंद्रिय अन्न रसायनमुक्त व पौष्टिक असल्याने आरोग्यदायी असते. महाबीजमार्फत जैविक बुरशीनाशक व सूत्रकृमीनाशक (ट्रायकोडर्मा), द्रवरुप जैविक खते (रायझोबिअम, ॲझोटोबॅक्टर, पीएसबी व केएमबी), तसेच शेतकऱ्यांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेले द्रवरुप जिवाणू खतांचे संघ ‘महाजैविक’ व ‘पीके’ उपलब्ध आहेत.

जैविक बुरशीनाशक व सूत्रकृमीनाशक ट्रायकोडर्मा हानिकारक बुरशींची वाढ नियंत्रित करून त्यांचा नायनाट करते. ट्रायकोडर्माच्या बीजप्रक्रियेमुळे बियाण्याची उगवणशक्ती सुधारून पिकाचा जोम वाढण्यास मदत होते. द्रवरूप जैविक खतांमधील रायझोबिअम जिवाणू डाळवर्गीय पिकांच्या मुळांवरील गाठींवर सहजिवी पद्धतीने नत्र स्थिर करतात. ॲझोटोबॅक्टर जिवाणू हवेतील नत्र शोषून पिकांना उपलब्ध करतात. पीएसबी जिवाणू जमिनीतील स्फुरद विरघळवून पिकांना उपलब्ध करतात. केएमबी जिवाणू जमिनीत स्थिर झालेला पालाश पिकांना उपलब्ध करतात. ‘महाजैविक’ आणि ‘पीके’ या जिवाणू संघामध्ये स्फुरद विरघळविणारे व पालाश उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंचा समावेश आहे.

अशा प्रकारे एकत्र सूक्ष्मजीव संघ उपलब्ध केल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन हाताळणी सुलभ झाली आहे. महाबीजच्या या गुणवत्तापूर्ण जैविक उत्पादनांच्या प्रसारासाठी कंपनीच्या पैलपाडा (जि. अकोला) प्रक्षेत्रावर शिवार फेरी आयोजित केली जाते. ‘महाबीज वार्ता’ या त्रैमासिकातून यशकथा प्रकाशित केल्या जातात. भविष्यात शेतकऱ्यांसाठी मायकोरायझा, सुडोमोनास, द्रवरूप ट्रायकोडर्मा, गोमूत्र व निंबोळी आधारित कीटकनाशके आणि जैविक नॅनो कॅप्सूलसारखी उत्पादने उपलब्धतेसाठी संशोधन सुरू आहे.

- योगेश कुंभेजकर, (भाप्रसे), व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला

Soil
Sustainable Farming: शाश्‍वत शेती हीच पुढची दिशा

आरोग्यदायी उत्पादनांना ग्राहकांची मागणी

नैसर्गिक साधन संपत्तीची कमीतकमी हानी आणि जैविक घटकांचा अधिकाधिक वापर हे नैसर्गिक, सेंद्रिय शेतीचे मूलतत्त्व आहे. जमिनीतील विविध जीव-जीवाणू,गोवंशाच्या मलमूत्रासह इतर प्राणिजन्य घटक,पिकांचे अवशेष,पीक संरक्षणासाठी जैविक उपाय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे. रासायनिक अवशेषमुक्त अन्नधान्य व फळे भाजीपाला आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. आमची उत्पादनांचे प्रमुख कार्य हवा, पाणी आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्याचे आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, अशी उत्पादने बाजारपेठेत उपलब्ध करून दिली आहेत. त्यांची निर्मिती आणि वापर करताना शेतकऱ्यांच्या आरोग्यावर कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाते.

आम्ही प्रामुख्याने सेंद्रिय शेतीसाठी पूरक उत्पादने उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैव उत्तेजके, वनस्पती वाढ संजीवके, जमीन तसेच फवारणीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक उत्पादने आणि जैविक खतांचा समावेश आहेत. नजीकच्या काळात जैविक खतांवर अधिक संशोधन करून सूक्ष्मजीवाणूंवर आधारित उत्पादने बाजारात उपलब्ध करण्याचा मानस आहे. आता जैविक खतांवर लक्ष केंद्रित करीत आहोत. ही खते पर्यावरणासाठी हानिकारक नसतील आणि जमिनीची गुणवत्ताही सुधारतील.

जमिनीतील सूक्ष्मजीवांचे महत्त्व लक्षात घेऊन जमिनीत स्थिर होणाऱ्या घटकांना, जसे की नायट्रोजन,फॉस्फरस, पोटॅश तसेच सूक्ष्मअन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेले जिवाणू आणि बुरशी यांच्या वाढीसाठी उपयुक्त असणारी ही उत्पादने असतील. जैव-तंत्रज्ञान तसेच जनुकीय अभियांत्रिकीद्वारे पिकांमध्ये रोग आणि कीड प्रतिरोधक गुणधर्म विकसित करणे प्रस्तावित आहे. याकरिता आवश्यक असणारी सुसज्ज प्रयोगशाळा, तंत्रज्ञान तसेच आधुनिक उपकरणांचा वापर करण्याचा आमचा मनोदय आहे. शाश्‍वत शेतीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे आणि या माध्यमातून त्यांचा आर्थिक स्तर, जीवनमान उंचावणे हे आमचे कृषी निविष्ठा निर्मितीचे धोरण आहे.

- संजय पवार (कार्यकारी संचालक,पूर्वा केमटेक प्रा.लि., नाशिक)

कमी करूया शेतीखर्च

सध्या जमीन, पाणी व हवासुद्धा प्रदूषित होऊन मानव, पशुपक्षी आणि वनस्पती यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम झाला आहे. हे लक्षात घेऊन जमिनीचे आरोग्य सेंद्रिय घटकांचा वापर करून सुधारले पाहिजे. पाणी, हवेचे प्रदूषण थांबवले पाहिजे. सर्वांनी मिळून शाश्‍वत शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. आम्ही पहिल्यापासून जमिनीच्या आरोग्यावर भर दिला आहे. ॲग्रोसील, कार्बोसील ही खते सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी उपयुक्त ठरली आहेत.

ग्रीनसिल, केओलिन हे उष्णतेमुळे पिकावर येणारे ताणतणाव कमी करण्यासाठी, नीम ऊर्जा फळांची गुणवत्ता व वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरले आहे. पर्यावरण पूरक उत्पादनांच्या वापरामुळे रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशकांचा खर्च १५ ते २० टक्क्यांनी कमी करणे शक्य आहे. रसायन अवशेषमुक्त शेती ही काळाची गरज आहे. शाश्‍वत शेती तंत्राने पीक उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ शक्य आहे.

- डॉ. शिवाजी थोरात (सदस्य, इंटरनॅशनल सोसायटी फॉर सिलिकॉन इन अॅग्रिकल्चर, अमेरिका)

Soil
Sustainable Farming: शाश्‍वत शेतीकडे वाटचाल हवी: डॉ. आदिनाथ चव्हाण

दर्जेदार उत्पादनाचे ध्येय ठेवूया

रासायनिक कीडनाशकांच्या अनियंत्रित वापराचे परिणाम सध्या दिसून येत आहेत. कीड, रोग नियंत्रणासाठी रसायनांचा एकात्मिक पद्धतीने संतुलित वापर रसायन अवशेषमुक्त उत्पादन घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. अज्ञानात अचानक कोणत्याही शेती पद्धतीचा स्वीकार घातक ठरू शकतो. रासायनिक कीटकनाशकाचा संतुलित व एकात्मिक पद्धतीने वापर केल्यास योग्य गुणवत्तेच्या पीक उत्पादनासाठी योग्य ठरते.

सेंद्रिय शेती पद्धतीने अनेक जण पीक उत्पादन घेत आहेत. त्याची स्पष्ट नियमावली तयार करणे आवश्यक झाले आहे. अचानक सेंद्रिय शेतीकडे वळल्यानंतर श्रीलंकेत काय स्थिती निर्माण झाली, याचा अनुभव आपल्यासमोर आहे. अज्ञानात कुठल्याही शेती पद्धतीचा स्वीकार देशासाठी घातक ठरू शकतो. विविध प्रकारचा भाजीपाला, मका बियाणे निर्मितीमध्ये आम्ही काम करत आहोत. एलोरा सीड्स कंपनी बुरशीनाशक, तणनाशक आणि कीटकनाशक यांचा अभ्यासपूर्ण वापर करून रसायन अवशेषमुक्त बियाणे निर्मिती करण्यावर भर देत आहे. देशातील २५ राज्यात एलोरा कंपनीचे बियाणे वितरित होते.

कंपनीच्या उत्पादित बियाण्यांपैकी कांदा, भेंडी आणि मका बियाण्यास चांगली मागणी आहे. उत्तर भारतात मुळा, गाजर, पालक बियाण्यात कंपनीचे मोठे काम आहे. कंपनीने संशोधन केंद्र, शेतकरी संवाद केंद्र तयार केले आहे. बियाणे उत्पादन करणारे सुमारे १० ते १५ हजार शेतकरी तसेच उत्पादित बियाणे खरेदी करणारे सुमारे १० ते १५ लाख ग्राहक शेतकरी कंपनीशी जोडले गेले आहेत. कंपनीचे चेअरमन डॉ.बी.बी.ठोंबरे आणि आम्हा सर्वजणांचा शेतकऱ्यांना शुद्ध व दर्जेदार बियाणे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. चांगले काम आणि कामाप्रति आत्मीयता असल्यास शेतकरी चांगला प्रतिसाद देतात.

- किशोर वीर (व्यवस्थापकीय संचालक, एलोरा सीड्स)

अन्नद्रव्य व्यवस्थापन हाच दर्जेदार उत्पादनाचा पाया

अन्नद्रव्यांच्या असमतोल वापरामुळे पिकाची वाढ तसेच उत्पादनावर परिणाम दिसून येतो. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे विविध समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पिकांना समतोल प्रमाण अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्याने सशक्त होतात. कीड, रोग प्रतिकारशक्ती वाढते. हे लक्षात घेऊन रसायन अवशेषमुक्त शेतीसाठी ‘वीगर ॲग्रीटेक’ने आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेली विविध अन्नद्रव्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहेत. अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा असेल तर पीक सशक्त राहते. त्याची प्रतिकारक्षमता वाढते. हेच आम्ही शेतकऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतो.

स्फुरदयुक्त खते ही शिफारशीपेक्षा फार जास्त वापरली जातात. त्याचे मूळ कारण म्हणजे स्फुरदयुक्त खतांची केवळ १५ ते २५ टक्के कार्यक्षमता. याच्या अतिवापराचेही पिकावर परिणाम दिसून येतात.हे लक्षात घेऊन आम्ही आयपीई तंत्रज्ञानाचा वापर केलेली सर्वाधिक कार्यक्षमता असलेली स्फुरद खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहेत. ही खते कमी प्रमाणात लागतात, त्यांची उच्च कार्यक्षमता आहे.

शेतकऱ्यांनी अन्नद्रव्यांचा असमतोल टाळला पाहिजे. कंपनीने युरिया खताला झिंक कोटिंगची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यातून युरियाच्या अतिवापरामुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळली जाते. अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी माती, पाणी परिक्षण तसेच पान,देठ तपासणी महत्त्वाची आहे. यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृतीचे काम आम्ही करतो. या अहवालानुसारच शेतकऱ्यांनी जर अन्नद्रव्यांचा वापर केला तर निश्‍चितपणे जमिनीची सुपीकता जपली जाईल. याबरोबरीने जैविक पद्धतीने कीड नियंत्रण महत्त्वाचे आहे. सेंद्रिय खतांचा पुरेपूर वापरातून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्याची आवश्यकता आहे.

- नीलेश वसेकर,

(संचालक, वीगर ॲग्रीटेक सोल्यूशन्स, पुणे)

शब्दांकन : गोपाल हागे, मनोज कापडे, संदीप नवले, संतोष मुंढे, अभिजित डाके, मुकुंद पिंगळे, गणेश कोरे, सुदर्शन सुतार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com