AI Sprayer Technology: कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रावर आधारित फवारणी यंत्र

Indian Farming Technology: श्रीनगर (काश्मीर) येथील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील अभियांत्रिकी विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. शौकत रसूल यांनी सफरचंदाच्या सघन बागेत फवारणीसाठी अत्याधुनिक यंत्र विकसित केले आहे.
Dr. Shaukat Rasool, a scientist from the Department of Engineering at Sher-e-Kashmir University
Dr. Shaukat Rasool, a scientist from the Department of Engineering at Sher-e-Kashmir UniversityAgrowon
Published on
Updated on

Smart Agriculture Spraying Machine: श्रीनगर (काश्मीर) येथील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील अभियांत्रिकी विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. शौकत रसूल यांनी सफरचंदाच्या सघन बागेत फवारणीसाठी अत्याधुनिक यंत्र विकसित केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित या यंत्राद्वारे अचूक, काटेकोर व योग्य मात्रेत फवारणी होऊन वेळ, मजुरी खर्चासह कीडनाशकांच्या वापरात बचत करणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. भारत सरकारचे पेटंटही या यंत्रास मिळाले आहे.

सफरचंद हे हिमाचल प्रदेशातील मुख्य फळपीक आहे. अलीकडील काळात सुधारित पद्धतीने अति व मध्यम सघन पद्धतीने सफरचंद लागवड केली जात आहे. पारंपरिक पद्धतीने बागेत फवारण्या करताना अनेक अडचणी येतात. वेळ, श्रम व खर्चही अधिक येतो. पाणी व कीडनाशकांचा अपव्ययदेखील होण्याचा धोका असतो. कीडनाशक व यंत्राचा अनियंत्रित वापर झाल्यास पर्यावरण व जैवविविधता धोक्यात येऊ शकते.

या सर्व बाजूंचा विचार करून श्रीनगर (काश्‍मीर) येथील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील डॉ.शौकत रसूल यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित सफरचंदाच्या बागेत उपयोगी ठरणारे फवारणी यंत्र विकसित केले आहे. डॉ. रसूल विद्यापीठाच्या ‘फार्म मशिनरी ॲण्ड पॉवर इंजिनिअरिंग’ विभागाचे साहाय्यक प्राध्यापक आहेत. तसेच ‘सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग’ विभागाचे प्रभारी शास्त्रज्ञ देखील आहेत. त्यांना या संशोधनात वरिष्ठ संशोधक हारिस नबी यांचेही योगदान मिळाले आहे.

Dr. Shaukat Rasool, a scientist from the Department of Engineering at Sher-e-Kashmir University
Agriculture Sprayer Technology : इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर तंत्रज्ञानाची गरज

संशोधनातील महत्त्वाचे पाऊल

साधारण चार वर्षांपासून या यंत्राची संशोधन प्रक्रिया सुरू झाली. सुरवातीला संशोधनासाठी अपेक्षित निधी उपलब्ध नव्हता. मात्र भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडे निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. उपकरण विकास कार्यक्रमांतर्गत निधीस मंजुरी मिळाल्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये संशोधनाला गती आली. तर २०२४ मध्ये यंत्र प्रत्यक्ष साकारण्यास मदत झाली. हिमालयीन प्रदेशात शाश्वत आणि तंत्रज्ञान-चलित फलोत्पादनाच्या दिशेने या निमित्ताने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे.

फवारणी यंत्राची कार्यपद्धती

फवारणी करण्याच्या दृष्टीने दोन पर्याय दिले आहेत त्यानुसार बागेची स्थिती कशी आहे याची माहिती घेण्यासह मॅपिंग करण्यासाठी डिजिटल डॅशबोर्ड दिला आहे. त्यामध्ये गुगलमॅप व मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून फवारणीचा मार्ग निश्चित करता येतो. दुसरा पर्याय म्हणजे यंत्र नियंत्रित करण्यासाठी रिमोट कंट्रोल देण्यात आला आहे. त्याची ‘रेंज’ एक किलोमीटरपर्यंत आहे. यंत्राच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी ४ असे दोन्ही मिळून आठ नोझल्स बसवण्यात आले आहेत. प्रत्येक नोझलमध्ये सुमारे ४० सेंमी अंतर आहे.

अति सघन सफरचंद लागवडीमध्ये दोन ओळींतील अंतर तीन मीटर तर दोन झाडांमधील अंतर एक मीटर असते. यंत्राद्वारे बागांमधील झाडांचे स्कॅनिंग होते. ‘कॅनोपी’ पाहून त्या अनुषंगाने कीडनाशक फवारणीच्या (व्हेरिएबल रेट स्प्रेइंग-VRS) मात्रा नियंत्रित केल्या जातात. दाट कॅनोपी असल्यास यंत्र स्वयंचलित पद्धतीने प्रवाह वाढवते. कॅनोपी नसल्यास फवारे बंद होतात. प्रवाह चालू व बंद होण्याची प्रक्रिया अल्पकाळात होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक नियंत्रित सोल्यूनाईड व्हॉल्व बसविण्यात आला आहे.

अति सघन आणि मध्यम घनता असलेल्या बागांमध्ये केलेल्या चाचण्यांमध्ये पारंपरिक फवारणी पद्धतींच्या तुलनेत अनुक्रमे ३० आणि ३७ टक्के कीडनाशकांची बचत दिसून आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पाण्याचा प्रत्येक थेंब आणि कीटकनाशक वापर नियंत्रणात वापर करणे त्यातून शक्य झाले आहे.

Dr. Shaukat Rasool, a scientist from the Department of Engineering at Sher-e-Kashmir University
Agriculture Sprayer Technology : एअर असिस्टेड स्प्रेअर

यंत्रांची रचना व वैशिष्ट्ये

रोबोटिक ग्राउंड व्हेईकल प्रकारातील फवारणी यंत्र. रिअल-टाइम किनेमॅटिक (RTK) जीपीएस, टू डी लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग (LiDAR) सेन्सर आणि मायक्रो कंट्रोलर-आधारित ‘एम्बेडेड सिस्टम’ द्वारा बनविण्यात आले आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोवर फॉर ऑर्चर्ड स्प्रेईंग (AIROS) अशी ओळख.

नोझल्सच्या माध्यमातून अडीच मीटर पर्यंत फवाऱ्याची क्षमता.

लिथियम आयन बॅटरीवर इलेक्ट्रिक ऑपरेटेड अशी यंत्राची संरचना

२३० लिटर द्रावण साठवणूक क्षमता. दोन्ही बाजूने फवारणी

यंत्र चालवण्यासाठी चार चाकांचा वापर, वळविण्यासाठी चारही चाकांना फोर व्हील ड्राईव्ह पद्धतीने प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने मोटरद्वारे पॉवर.

‘ग्राउंड क्लिअरन्स’ १७ सेंटीमीटर.

यंत्राची लांबी १. ७५ मीटर तर रुंदी एक मीटर.

यंत्राचे वजन १०० किलो (द्रावणाविना)

जीपीएस व सेन्सरच्या साह्याने बागेच्या ओळींमधून ते स्वयंचलित पद्धतीने पुढे जाते. त्यातून अपेक्षित फवारणी कव्हरेज मिळते.

रसायनांचा अपव्यय टळतो. आणि कीडनाशकाची कार्यक्षमता उपयोगात येऊन प्रभावी नियंत्रण मिळते.

झाडाच्या उंचीनुसार यंत्राच्या नोझलची उंची व अंतर ‘ॲडजस्ट’ करण्याची सोय.

प्रामुख्याने झाडाचे वयोमान, दाट पाने त्यानुसार फवारणीचा दर निश्चित करता येतो.

फवारणी सूक्ष्म, मध्यम व तीव्र पद्धतीने करण्याची रचना.

यंत्र चालण्याची गती कमी जास्त करता येते.

शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने वापर करता येतो.

संशोधनास पेटंट

संशोधनाचे कार्य जवळपास २०२४ मध्ये पूर्ण झाले. त्यांनंतर २२ एप्रिल, २०२४ रोजी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडे अर्ज करण्यात आला. त्यानंतर आवश्‍यक प्रक्रिया होऊन १४ जानेवारी, २०२५ रोजी त्यास पेटंट मिळाले आहे. या माध्यमातून फळबाग शेतीमध्ये फवारणीच्या अनुषंगाने क्रांती शक्य आहे असा विश्वास डॉ. शौकत यांनी व्यक्त केला आहे. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यंत्राच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यंत्रनिर्मितीसाठी तीन लाखांपर्यंत खर्च आला आहे. व्यावसायिकदृष्ट्या निर्मिती झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी ते चार लाखांपर्यंत उपलब्ध होणार आहे. यंत्राच्या व्यापारीकरणासाठी प्रकल्पात सहभागी असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्टार्टअपची नोंदणी करण्यात आली आहे. त्या माध्यमातून व्यावसायिक दृष्ट्या यंत्र उपलब्ध होण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

चाचण्या व प्रकल्प सादरीकरण

शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नजीर अहमद गनाई यांचे मार्गदर्शन डॉ. शौकत यांना मिळाले आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्र मणी मिश्रा प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक होते. तर मंत्रालयाचे शास्त्रज्ञ डॉ.अखिलेश मिश्रा प्रकल्प समन्वयक होते. भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा.अजय कुमार सूद, ‘इक्रिसॅट’चे महासंचालक डॉ.हिमांशू पाठक, माजी महासंचालक त्रिलोचन मोहपात्रा यांच्यासमोर क्षेत्रीय चाचण्या व प्रकल्प सादरीकरण करण्यात आले आहे. सोल्युबल फर्टिलायझर इंडस्ट्री असोसिएशनद्वारे आयोजित ‘सोम्स-२०२५’परिषदेत यंत्रासंबंधी सादरीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय पातळीवर या संशोधनास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

डॉ. शौकत रसूल ९९३२००१५२७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com