
Dharashiv News : राज्य सरकारने कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या धोरणाचा लाभ जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यातूनच गुरुवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
यात येत्या एक ऑक्टोबरपासून ऊस उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा व त्यासाठी शेतकऱ्यांच्या निवडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा लाभ देण्यात येणार आहे. तंत्रज्ञानासाठी हेक्टरी पंचवीस हजार रुपये खर्च येणार असला, तरी यापैकी केवळ नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आयोजित बैठकीला रांजणीच्या (ता. कळंबर) नॅचरल शुगरचे बी. बी. ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव रवींद्र माने, जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे यांच्यासह जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक आणि शेतकी अधिकारी उपस्थित होते. पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) निश्चित प्रकल्पाबाबतच्या धोरणानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानासाठी प्रति हेक्टरी पंचेवीस हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
व्हीएसआयच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात एक लाख शेतकऱ्यांना याचा तंत्रज्ञानाचा लाभ देण्यात येणार आहे. यातील नऊ हजार २५० रुपये व्हीएसआय, सहा हजार ७५० रुपये साखर कारखाने व नऊ हजार रुपये शेतकऱ्यांचा रुपयांचा हिस्सा असणार आहे. या योजनेसाठी ‘जो आधी अर्ज करेल त्याला पहिले प्राधान्य’ या तत्त्वावर शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
सभासद शेतकऱ्यांनी त्यासाठी कारखान्यांकडे तत्काळ करारनाम्याची प्रत सादर करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान एक ऑक्टोबरपासून लागू होणार असल्याने साखर कारखान्यांना शेतकरी आणि गावांच्या निवडीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
या प्रकल्पात उसाचे क्षेत्र जास्त असलेल्या गावांतील ठिबक सिंचनाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य आहे. किमान २५ ते ४० शेतकऱ्यांचा एक समूह या उद्देशाने शेतकऱ्यांची निवड केली जाईल. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या मातीचा नमुना तपासून घेणे आवश्यक आहे.
एकाच प्रकारची जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे क्षेत्र एकत्रित असेल, तर त्यांना एक हवामान केंद्र आणि दोन मातीमधील सेन्सरसाठी नऊ हजार रुपये भरावे लागतील. उर्वरित सर्व रक्कम साखर कारखाने आणि व्हीएसआयच्या माध्यमातून बातमीतीच्या कृषी विज्ञान केंद्राला देण्यात येणार असल्याचे श्री. माने यांनी या वेळी सांगितले.
उत्पादनात चाळीस टक्के वाढ
जिल्ह्यात उसाचे क्षेत्र ५५ हजार हेक्टरहून अधिक असले तरी सध्याची उसाची उत्पादकता वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे, पाण्याची बचत करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, हे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने उसातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे प्रयोग यशस्वीरीत्या सुरू आहेत.
या प्रयोगामुळे उत्पादनात चाळीस टक्क्यापर्यंत वाढ, पाणीवापरात तीस टक्क्या पर्यंत बचत, उत्पादन खर्चात २५ ते टक्क्यापर्यंत बचत, पारंपरिक पद्धतीपेक्षा ५० ते ७० टक्के अधिक नफा आणि संभाव्य कीड व रोगांची आगाऊ माहिती असे विविध फायदे शेतकऱ्यांना मिळतात. या तंत्रज्ञानामध्ये हवामान केंद्रे आणि मातीमधील सेन्सरचा वापर करून शेतकऱ्यांना पिकांबाबत अचूक माहिती दिली जात असल्याचे श्री. ठोंबरे यांनी सांगितले.
प्रत्येक कारखान्याला अडीचशे शेतकरी
तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाणी किती प्रमाणात द्यावे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कसा ओळखावा, अन्नद्रव्यांचे प्रमाण कसे ठेवावे आदींची माहिती मिळणार असून, त्यामुळे उसाची उत्पादकता वाढवण्यास मदत होईल. जिल्ह्यात काही शेतकरी एकरी शंभर टनांपर्यंत उत्पादन घेत आहेत.
या शेतकऱ्यांची संख्या वाढवण्याचा हेतू या प्रकल्पामागे आहे. जिल्ह्याच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) प्राथमिक क्षेत्राचा वाटा वाढविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असून प्रत्येक साखर कारखान्याला किमान अडीचशे शेतकरी आणि वीस क्षेत्र म्हणजेच वीस हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र या तंत्रज्ञानाखाली आणण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पुजार यांनी या वेळी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.