

History Making Geography : भूगोल हा इतिहास घडवत असतो व अन्न हे त्याचे मूळ आहे, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. काही शतकांपूर्वी संपर्काची आधुनिक साधने नव्हती, तेव्हाचे जग कसे असेल? जगभरातील माणसे एकमेकांशी संवाद कसा साधत असतील? आजच्या ग्लोबल विश्वात, जेथे ज्याचे उत्पादन आहे तेथे ज्याची कमी आहे तिकडे देवाण-घेवाण सहज होते.
‘गुगल बाबा’, ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ याद्वारे क्षणात आपण कोणत्याही देशातील, कोणत्याही ठिकाणाची माहिती मिळवू शकतो. परंतु अगदी पूर्वी अशी शक्यता नसल्यामुळे संवादासाठी भरपूर परिश्रम घ्यावे लागत. त्यासाठी विविध देशातील प्रवासी कधी पायी तर कधी जहाजाने अनेक महिने, अनेक वर्षे प्रवास करत. अशाच एका प्रवासावर निघालेला वास्को-द-गामा शोधत निघाला होता भारतात येण्याचा मार्ग. कारण होते मसाल्यांची गरज.
युरोपात अतिथंड हवामानामुळे वर्षांतील काही महिने शेती पिकत नव्हती. अन्नधान्याचा तुटवडा भागवण्यासाठी मांस खाणे अपरिहार्य होतेच. परंतु हे मांस अनेक महिने बर्फात ठेऊन खावे लागे. असे ठेवणीतले, भाजून खाल्लेले मांस साहजिकच बेचव लागत असणार! म्हणून भारतात पिकणाऱ्या मिरी, दालचिनी व इतर मसाल्याच्या पदार्थांची येथे मोठी मागणी व आवश्यकता होती.
आणि तेच नेण्यासाठी, व्यापाराचा मार्ग शोधायला वास्को द गामा आला. इथली समृद्धी अशी की, कालिकतच्या राजाने जाताना दिलेल्या भेटवस्तुंनी दोन जहाजे भरली. तो समृध्द भारत पाहून डच, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश सर्वांनी भारतावर आक्रमणे केली व पुढे काही शतके भारतावर राज्य केले.
भारताच्या समृद्ध भौगोलिकतेमुळे इथे सुबत्ता व अन्नाची विपुलता नेहमीच राहिली आहे. इथली मूळ संस्कृती , आदिम परंपरागत ज्ञान, कलांचा व भाषेचा विकास यामुळे आपण आघाडीवर होतो. जगातल्या जिवंत आदिम भाषेमध्ये सर्वात जुनी व आजही मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी तमीळ भाषा आहे. या भाषेतून अनेक शब्द इंग्रजी, हिंदी व इतर भाषांत गेलेले आपल्याला पहावयास मिळते. भारताचा विचार करता, सर्वात प्रभावी प्राचीन भाषा म्हणजे तमीळ, मुंडा व संस्कृत. त्यामुळे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनेक शब्दांची देवाण-घेवाण झालेली आहे. सूप, पुलाव हे शब्द मूळ भारतीय भाषांतले आहेत.
जशी शब्दांची देवाण-घेवाण झाली तशीच वनस्पती व पिकांची देखील झाली. म्हणजे नागली, ज्वारी अशी अनेक पिके आफ्रिकेतील युगांडा येथून आले व येथेच स्थिरावले. मिरची बाहेरून आली. त्याआधी तिखटासाठी मिरी, गोडासाठी मध वगैरे वापरत होते. उसापासून साखर बनवण्याची कला खूप आधीपासून भारतीयांना माहीत होती व नंतर चीनला ती आपणच शिकवली, असे उल्लेख सापडतात.
भारतातील मूळ पीक कोणते हे शोधले तर ते सापडते ‘भात’. जगातले सर्वात प्रथम चित्र हे २५००० वर्षापूर्वीचे तेही अन्नाचा शोध घेतानाचे आहे तर ३५०० वर्षांपूर्वी भारतात आढळलेले मानवी आकृत्यांच्या चित्रांत महिला निवडणे, पाखडणे आदी विविध कामे करताना दिसतात. भाषा, कला, संस्कृती या सर्वांत अन्न हेच प्राधान्याने दिसून येते. म्हणून अन्नालाच देव मानण्याची प्रथा देखील दिसते. (सर्व संदर्भ – Indian Food Historical companion by Acharya) .
ब्रिटिशांचे भारतात येणे व साम्राज्यवादाचा विस्तार करणे, मसाले, चहा, कॉफी, कापूस व कापड यांचा व्यापार करणे, चहासारखे पेय सर्वदूर प्रसिद्ध होत जाणे यामागेही अन्नाची गरज व उपयुक्तता या गोष्टी सहजी दिसून येतात. आज चहा हा खास भारतीय पेय बनले आहे. जुने लोक सांगतात की, चहा हा भारतात आणला तो युरोपियन लोकांनी, पण मूळचा तो चीनमधला.
चीनमध्ये त्याला वेगवेगळ्या भागात चा (cha), ता किंवा टा (Ta), टी (te), ज़ो (zo) असे वेगवेगळे शब्द आहेत. हिंदीत ‘चा’ चा ‘चाय’, मराठीत ‘चहा’, तर इंग्रजीत ‘टी’ (Tea) झाला.तर हा चहा आपल्याकडे सुरवातीला आला तेव्हा भारतीय लोकांना त्याची सवय नव्हती. तर ही सवय लागावी म्हणून खेडोपाडी भरणाऱ्या बाजार-हाट मध्ये तो विनामूल्य वितरित केला जायचा. हळूहळू लोकांना याची सवय लागली. आणि आज चहा हे भारताचे अघोषित राष्ट्रीय पेय बनले.
आदिम माणसांचे कंदमुळे- बिया- मांस ते शेती व स्थिरता आणि संस्कृती या प्रवासाचा भाग हा काही लाख वर्षांचा आहे. कंद-मुळे-फळे हे माणसाचे प्रथम अन्न. जसजसे हत्यारे बनवता येऊ लागली तसतसे शिकार करणे सोपे होऊ लागले. शाकाहारी व मांसाहारी हे दोन्हीही पदार्थ खाण्यासाठी वापरले जात. आदिमानवाला कच्चे मांस खाण्यासाठी भरपूर वेळ व भरपूर ऊर्जेची आवश्यकता लागे.
आताच्या २१ व्या शतकात अन्नधान्याची सुबत्ता मिळवण्याइतके आपण प्रगत झालो आहोत. अन्न शिजवून खाणे, आवडत्या अन्नाची निवड करणे इथपर्यंत बदल झाले आहेत. आता याही पुढे अन्नाच्या शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा विकास मधल्या काळात होत गेला, यामागेही भौगोलिकता व त्यातून निर्माण होणारी गरज दिसून येत. उदा. थंड, उष्ण, खारट जमीन अशा ठिकाणी शेतीसाठी वेगवेगळे प्रयोग हजारो वर्षे माणसाने केले.
साधारणपणे साडे अकरा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला. त्यानंतर निवड करत व वातावरणाशी समायोजन करू शकतील, अशी बियाणे विकसित होत गेली. खारवट जमिनीत येणारा काळा भात, दलदलीत, पाण्याखाली गेला तरी वर उठणारा सकवार, कमी पावसात पेरून केला जाणारा व हमखास उत्पन्न देणारा ढउळ भात किंवा कोरडवाहू भागात वातावरणात असलेल्या आर्द्रतेवर येणारे कडू वाल, बोडखा गहू, हरभरा, काळा वाटाणा ही काही पिके आजही सह्याद्रीतील जुन्या इतिहासाची साक्ष देत आहेत.
स्वयंपाकाच्या विविध पद्धती कालानुरूप विकसित होत गेल्या. धान्यापासून मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा साठा मिळतो व अतिश्रम असल्यामुळे ते आवश्यक देखील होते. धान्यापासून विविध भाकरी (ब्रेड्स) बनवण्याचा शोध, त्याबरोबर भाज्यांचा-कालवणाचा शोध हे खूप रोचक आहेत. कच्चे ते भाजलेले अन्न, त्यानंतर उकडवणे, शिजवणे, किण्वन करणे, आंबवणे, बेक करणे, फ्राय करणे अशा अनेक शास्त्रीय पद्धतींचा शोध आपल्या पूर्वजांनी लावला.
कोणता पदार्थ कशा पद्धतीने खाल्ला तर त्याचे पोषण मूल्य शरीराला लागू पडते, हे त्यांना माहीत झाले होते. म्हणून आजही अनेक भागांत बटाटे, रताळे व इतर कंद आहारात किंवा पेटलेल्या कोळशात भाजून खाले जातात. चूल, एलपीजी, स्टीमर, कुकर, ओवन ते अगदी आताचे एअर फ्रायर अशा अनेक साधनांचा वापर अन्न शिजवण्यासाठी केला जाऊ लागला. चूल हा अगदी १०० वर्षापर्यंत आपल्याकडे एकमेव वापरला गेलेला पर्याय. नंतर केरोसिनचे स्टोव्ह आले व गायब देखील झाले. आताचा काळ तर इलेक्ट्रिक साधनांचा आहे.
बनवलेले पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी परिसरात उपलब्ध असलेल्या वनस्पतींचा व त्याच्या विविध भागांचा वापर केला जाऊ लागला. हाच मसाल्यांचा शोध भारताच्या श्रीमंतीचे व पारतंत्र्याचे कारण बनला असावा का?
मसाल्यांच्या शोधात आलेले युरोपियन नंतर भारतावर आक्रमणे करून इथली लुट करायला आले. अन्नप्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक मसाले. हे मसाले कसे वापरात आले, ते कोठे प्रथम वापरले गेले, कोणत्या मसाल्याने कसला फ्लेवर मिळतो व त्याचा आपल्या आरोग्यासाठी फायदा कसा होतो, हे पुढच्या भागात पाहणे रोचक असणार आहे.
ranvanvala@gmail.com
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.