Success Story of INORA : समृद्ध माती, शाश्‍वत शेती याच ध्यासाने कार्यरत ‘इनोरा’

Agriculture Company : समृद्ध माती, शाश्‍वत शेती हाच ध्यास घेऊन पुणे येथील इनोरा संस्था तीस वर्षांपासून अखंड कार्यरत आहे. त्या अनुषंगाने कंपोस्टिंग तंत्रज्ञान, मृदा आरोग्य, पर्यावरणीय शेतीत सातत्यपूर्ण संशोधन व उत्पादने निर्मिती केली.
Inora
Inora Agrowon
Published on
Updated on

Institute of Natural Organic Agriculture : पुणे शहरापासून काही किलोमीटरवरील दारवली (ता. मुळशी) येथे इनोरा (इन्स्टिट्यूट फॉर नॅचरल ऑरगॅनिक ॲग्रिकल्चरल) या संस्थेचा कार्यक्षेत्र परिसर आहे. मुख्यालय बावधन या उपनगरात आहे. समृद्ध माती, शाश्‍वत शेती, सुंदर व आरोग्यदायी पर्यावरण, कचरा व्यवस्थापन (कंपोस्टिंग टेक्नॉलॉजी) आदी क्षेत्रांत तीस वर्षे अव्याहतपणे कार्यरत राहून इनोरा संस्थेने मानाचे स्थान निर्माण केले आहे.

महाराष्ट्रातील गावे- खेडी, शेतकरी गट, ग्रामपंचायती, पुण्यासह विविध शहरांमध्ये संस्थेच्या कार्याचा प्रसार झाला आहे. उत्कृष्ट संशोधन- तंत्रज्ञान निर्मिती, त्यासाठीच्या वैज्ञानिक सुविधा, उत्पादनांची गुणवत्ता, विश्‍वासार्हता, संशोधक- तंत्रज्ञांचा कुशल स्टाफ, काळानुरूप संशोधनाची दिशा या बाबींच्या बळावर संस्थेची आत्मविश्‍वासपूर्वक वाटचाल सुरू आहे.

संस्थेची जडणघडण

सन १९९२ च्या आसपासचा काळ. मिश्रखतांच्या संकल्पनेवर कार्य करणारे मुंबईचे उद्योजक डॉ. आर. टी. दवे यांनी नो हाऊ फाउंडेशन संस्था स्थापन केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. एम.आर. भिडे त्यांच्या संपर्कात आले. त्यातूनच ‘इनोरा’ नावाने विभाग सुरू झाला.

आज याच नावाने संस्था नावारूपाला आली आहे. मंजुश्री तडवळकर संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्‍वस्त आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून प्राणिशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी
घेतलेल्या तडवळकर यांनी गांडूळ, त्यातील जैवतंत्रज्ञान, कंपोस्टिंग या विषयावर सखोल संशोधन केले आहे.

सुरुवातीच्या काळात पुणे येथे कीडनाशकांच्या विषारीपणावर संशोधन करणाऱ्या संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी कार्य केले. रसायनांच्या अमर्याद वापरामुळे प्रतिकूल घटना घडल्याची जगभरातील उदाहरणे त्यांनी अभ्यासली. मनावर कुठेतरी त्याचा खोल परिणाम झाला. या रसायनांना जैविकच्या माध्यमातून सुरक्षित पर्याय देण्याविषयी अभ्यास त्यांनी सुरू केला.

इथे संशोधनाला वेगळी वाट मिळाली. मग नैसर्गिक शेतीतील पितामह कै. भास्कर सावे, सुभाष शर्मा, अन्य शेतकऱ्यांचे नैसर्गिक, सेंद्रिय शेतीचे प्रयोग प्रत्यक्ष शेतावर जाऊन अनुभवले. त्यातून अभ्यास, तत्वज्ञानाची बैठक पक्की होत गेली. त्याच दिशेने संस्थेचीही वाटचाल राहिली. संस्थेकडे आज कृषी, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, रसायने, समाजशास्त्र आदी विषयातील तंत्रज्ञ- संशोधकांचे मोठे पाठबळ आहे. वृंदा पन्हाळकर, नूतन भाजेकर, सुवर्णा जाधव, दत्तात्रेय बुके, आभा तडवळकर ही त्यातील काही नावे आहेत.

संस्थेची कार्यक्षेत्रे, पद्धती

१) उत्पादने निर्मिती-

सुसज्ज सुविधाप्राप्त प्रयोगशाळेत किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी मित्रबुरशी व जिवाणूंवर आधारित जैविक उत्पादनांची निर्मिती. मेटॅरायझियम, बिव्हेरिया, ट्रायकोडर्मा, ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, रायझोबियम, ‘झिंक सोल्यूबल बॅक्टेरिया’, मायकोरायझा अशी उत्पादनांची विस्तृत श्रेणी.

मूल्यवर्धित गांडूळ खत


-संस्थेने कंपोस्ट खत व बायोचार (जैव कोळसा) यांचे प्रमाणीकरण (स्टॅंडर्डायझेशन) केले
आहे.
-गांडूळ शेती, त्यातील जैवतंत्रज्ञान, विविध प्रकारचे कंपोस्ट तंत्रज्ञान, त्यासाठी विविध गांडूळ कल्चर्स यात संस्थेचा सखोल अभ्यास.
-विविध घटकांचा समावेश करून मूल्य व पोषणवर्धित गांडूळ खत निर्मिती.
-सर्व उत्पादने ‘इनोरा बायोटेक’ नावाने आणि सेंद्रिय प्रमाणित.

बायोचार

बायोचारच्या वापरातून जमिनीची सच्छिद्रता, जलशोषणक्षमता व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढते. संस्थेच्या फार्मवर त्याची निर्मिती व वापराचे यांत्रिक प्रात्यक्षिक पाहता येते. पंचवीस वर्षांपासून संस्थेसोबत जोडलेले पर्यावरण अभियंते अनय जोशी यांनी यंत्राचे ‘मॉडिफाइड व्हर्जन’ तयार केले आहे. शहरातील टाकाऊ पदार्थांपासून ‘बायोचार’ तयार केला जातो. जमिनीत योग्य प्रकारे कार्य करण्याच्या दृष्टीने संस्थेने पावडर स्वरूपातही बायोचार उपलब्ध केला आहे.

Inora
Agriculture Success Story : प्रयोगशीलता जपत शेतीतून साधली प्रगती

२) मातीचे आरोग्य, सेंद्रिय शेती

समृद्ध व आरोग्यदायी माती हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. विश्‍वस्त मंजुश्री तडवळकर म्हणतात, की
स्पंज ज्याप्रमाणे पाणी, हवा व पोषणद्रव्ये धरून ठेवतो तशी स्पंजासारखी माती व्हायला हवी.
सेंद्रिय कर्बाचे महत्त्व सातत्याने पटवून देण्याची गरज आहे. आपण माती पोषणद्रव्यांनी जोपर्यंत भरपूर करणार नाही तोपर्यंत काही होणार नाही.

सन १९७० च्या काळात एक सफरचंद खाऊन आपल्याला जेवढी आवश्‍यक पोषणद्रव्ये मिळायची ती आता पाच सफरचंदे खाऊनही मिळत नाहीत. एवढी ‘फूड डेन्सिटी’ आपल्या अन्नातील कमी झाली आहे. स्थानिक हवामान व नैसर्गिक स्रोतांच्या आधारे त्या त्या भागातील मातीतील सूक्ष्मजीव कसे कार्यरत ठेवता येतील, त्यातून मातीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब कसा वाढवता येईल यावर संस्था संशोधन व प्रात्यक्षिके घेते.

सेंद्रिय शेती

-सेंद्रिय तसेच ‘रेसिड्यू फ्री’ शेतीसाठी शेतकऱ्यांसोबत कार्यरत राहून त्यांची क्षमता बांधणी विकसित होण्यासाठी साह्य.
-संस्था शेतीची परिसंस्था (ॲग्रो इकोसिस्टिम) विकसित करून देते. स्थानिक कृषी हवामान, पर्यावरण, एकात्मिक शेती व बहुपीक पद्धती, पक्षिथांबे, पशुसंगोपन, अन्य पूरक उद्योग, कृषी वानिकी, चारापिके, टिंबर, सौरऊर्जा, जलस्रोत व अन्नद्रव्यांचा काटेकोर वापर असे त्याचे मॉडेल आहे.

शेतकरी कंपन्यांसोबत कार्य

शासानाच्या डॉ. पंजाबराव देशमुख जैविक, नैसर्गिक शेती मिशन अंमलबजावणीत ‘इनोरा’ सहभागी आहे. राज्यभरात संस्थेच्या मदतीने साडेतीनहजार एकरांवर सेंद्रिय शेती विकसित करण्यात येत आहे. पैकी साडेबाराशे एकरांचे सेंद्रिय प्रमाणीकरण झाले आहे. उर्वरित प्रक्रियावस्थेत व काही ‘रेसिड्यू फ्री’आहे. वर्धा येथे संस्थेचे विभागीय केंद्र असून, या जिल्ह्यात तीन शेतकरी कंपन्या संस्थेने स्थापन केल्या आहेत. सेंद्रिय कापसाला बाजारपेठेशी जोडून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. ग्राहकांकडून येथील सेंद्रिय तुरीला चांगली मागणी आहे. गावे, ग्रामपंचायतींसाठी कचरा व्यवस्थापनासाठी ‘कंपोस्टिंग’ प्रकल्प संस्था राबविते. मुळशी (पुणे) भागातही संस्थेचे शेतकरी ‘नेटवर्क’ आहे. त्यात भात, अन्नधान्ये, फळे व भाजीपाला उत्पादकांचा समावेश आहे.

३) शहरी शेती व कंपोस्टिंग

माझा कचरा, माझी जबाबदारी. बागेतील असो की स्वयंपाकघरातला, आपला कचरा आपणच जिरवायचा. (कंपोस्टिंग) हे संस्थेचे ध्येय आहे. त्या आधारे शहरातील निवासी सोसायटींच्या बागा, उद्याने, ‘टेरेस गार्डनिंग’ संस्थेने विकसित केली आहेत. पुणे शहरात साडेपाचशे गृहसंकुलांसोबत संस्था कार्यरत आहे. तब्बल अडीच लाख नागरिकांपर्यंत तर ३० स्वयंसेवी संस्थांपर्यंत ‘इनोरा’ पोहोचली आहे. .

४) औद्योगिक ‘वेस्ट मॅनेजमेंट’

पुण्यासारख्या मोठ्या शहरांतील औद्योगिक कंपन्यांकडे दररोज मोठ्या प्रमाणात ‘कॅंटीन- किचन वेस्ट, ‘गार्डन वेस्ट’ (पालापाचोळा) तयार होते. त्याचे ‘कंपोस्टिंग’ करून देण्यात येते. कारखान्यांमधून तयार

होणाऱ्या ‘स्लज’ या टाकाऊ उपपदार्थाची विल्हेवाट लावण्यासाठी कंपन्यांना महिन्याला ४० ते ४५ हजार रुपये खर्च येतो. या स्लजचे पृथक्करण करून त्यात हानिकारक घटक, जड धातू नाहीत हे तपासून त्याचे खत तयार करून देण्यात येते. सुमारे २७ औद्योगिक कंपन्यांसोबत संस्था कार्य करते.

५) प्रकल्प उभारणी

-‘लॅंडस्केपिंग’, गार्डन फॉरेस्ट्री, इडिबल गार्डन (हर्बजसहित), कृषी वानिकी (ॲग्रो फॉरेस्ट्री), बांबू लागवड आदींची सेवाही देण्यात येते.

Inora
Agriculture Success Story : कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेला फळ पिकांचे बळ

अडीचशे टन अवशेषांवर काम

तडवळकर सांगतात, की विकेंद्रित (डिसेंट्रलाइज्ड) पद्धतीने गावे, छोटी शहरे, ग्रामपंचायती, शेती व कारखान्यांमधील सेंद्रिय अवशेषांचे आम्ही रिसायकलिंग करतो. ज्या योगे स्थानिक मातीसाठीच त्याचे खत उपलब्ध होते. दररोज तब्बल अडीचशे टन कचरा जिरवण्याचं कार्य आम्ही यशस्वी केलं आहे. या कामासाठी महानगरपालिकेला एक टन कचरा उचलून नेणे व जिरवणे यासाठी चार हजार रुपये प्रति टन खर्च येतो.

त्या हिशेबाने अडीचशे टन कचऱ्याच्या अर्थकारणाची कल्पना करता येते. पुणे शहरातील प्रसिद्ध ‘केके मार्केट’मध्ये आम्ही कचरा व्यवस्थापन प्रकल्प यशस्वी केला. कोल्हापूर जिल्ह्यात आमच्या सहकार्याने मलकापूर परिषदेने स्वच्छता व कत्तलखान्यातील टाकाऊ घटक व्यवस्थापनाचा आदर्श प्रकल्प राबवला. त्यास राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भाजीपाला बागा

तडवळकर सांगतात, की केवळ लॉन तयार करण्यापेक्षा विविध भाजीपाला उत्पादित करून ‘इडिबल गार्डन’ करणे फायदेशीर ठरते. संस्थेने पुणे शहरात तब्बल साडेआठ हजार एकरांवर अशी छोटी उद्याने विकसित केली आहेत. त्यांचा पोषण आधार पीक अवशेष हाच आहे. अशी उद्याने आम्ही विकसित करूनही देतो.

आम्ही कंपोस्ट प्लॅंटर तयार केले आहेत. शहरांसह प्रत्येक गावी प्रत्येकाच्या दारात ते असावेत असा प्रयत्न आहे. एक कंपोस्टर प्लॅंटर वर्षाला २५ ते ३० किलो भाजी देण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. साडेसात ते आठ हजार कंपोस्टर प्लॅंटर्स आम्ही ग्रामपंचायतींमध्ये उभारून दिले आहेत. यात रोहा, महाड (रायगड), पुण्यातील हडपसर, शिरवळ, मुळशी आदींचा समावेश आहे.

संस्थेकडील प्रशिक्षणा सुविधा

-गांडूळ खत निर्मिती, त्यांचे शरीरशास्त्र, परिस्थितिकी

-शहरी शेती, टेरेस फार्मिंग

-‘डिसेंट्रलाइज्ड वेस्ट मॅनेजमेंट’- (कचऱ्याच्या प्लॅस्टिक, ई.- कचरा, ‘गार्डन वेस्ट’ आदी विविध प्रकारांचे व्यवस्थापन. दुर्गंध विरहित, आरोग्यदायी प्रकल्प).

-‘ॲग्रो इकोसिस्टिम’ (परिसंस्था) कशी विकसित करावी?

-सेंद्रिय प्रमाणीकरण महत्त्व, कागदपत्रे, (डॉक्युमेंटेशन), परीक्षा तयारी.

-जैविक कीडनाशके व खते निर्मिती- स्थानिक स्तरावर निर्मितीसाठी शेतकरी कंपन्या, गट, महिला बचत गट यांना प्रशिक्षण.

पुढील काळात ‘ॲग्रो इको सिस्टिम’ हाच शेतीचा आधार राहील. त्यादृष्टीने सुरक्षित अन्न कसे देता येईल हा प्रयत्न आहे. प्रयोगशाळेत लाभदायक सूक्ष्मजीवांचे अधिकाधिक उत्तम प्रकार ( स्ट्रेन्स), त्यांची बॅक, मित्रकीटक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, मातीतील हानिकारक सूत्रकृमींचे नियंत्रण यावर संशोधन

ही संस्थेची भविष्यातील उद्दिष्टे आहेत.

संपर्क : मंजुश्री तडवळकर, ८९५६२२०३४० (व्यवस्थापकीय विश्‍वस्त, इनोरा)

सुवर्णा जाधव, ९१७५७९३२०३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com