Agriculture Practices : खुद को कर बुलंद इतना...

शेतीपुढे सतत काहीनाकाही संकटांची मालिका चालू असते. शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र सतत बिघडत राहते. कोणतेही सरकार आले तरी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर ५० टक्के भाव अगर हमीभाव देऊ शकणार नाही.
Agriculture Practices
Agriculture PracticesAgrowon
Published on
Updated on

शेतीपुढे सतत काहीनाकाही संकटांची (Crisis In Agriculture) मालिका चालू असते. शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र (Farmer's Economy) सतत बिघडत राहते. कोणतेही सरकार आले तरी स्वामिनाथन आयोगाच्या (Swaminathan Commision) शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर ५० टक्के भाव अगर हमीभाव (Minimum Support Price) देऊ शकणार नाही. कर्जमाफीही इतक्या सहजासहजी मिळू शकत नाही. त्यावर वरिष्ठ पातळीवर खूप अभ्यास केला जातो. लोकशाहीत अशा सुविधा देण्याचा संबंध निवडणूका व मताशी असतो.

Agriculture Practices
Indian Tourism : कोरोना साथीनंतर पर्यटन ‘रुळा’वर

एखादा माल ज्यावेळी मंदीत जातो, त्यावेळी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. आपल्याला असे वाटत असते, की व्यापाऱ्यांचे काहीच नुकसान होत नाही. वास्तविक व्यापारीही मंदीवर नाखूषच असतात. त्यांनाही तेजीच पाहिजे असते. शेतकरी शेतमाल उत्पादन करतो, पण त्याचा दर ठरविण्याचा अधिकार त्याला नाही, असं बऱ्याचदा बोललं जातं. ते खरंच आहे.परंतु शेतमालाचा दर जसा शेतकरी ठरवू शकत नाही तसा तो व्यापारीही ठरवू शकत नाही. दर हे अर्थशास्त्राच्या नियमानुसार मागणी व पुरवठा यावर ठरत असतात. परंतु त्यात सरकार निर्यात बंदी, आयातीला परवानगी असे निर्णय घेऊन हस्तक्षेप करत असते. ते बहुतांश वेळा ग्राहकांच्या बाजूने आणि शेतकऱ्यांची माती करणारे असतात.

मंदीत सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही तर तेजी येताच संघटीत शहरी मतदारांना दुखावण्यास तयार नसते. शेतकरी समाज ६० टक्क्यांच्या जवळपास आहे. लोकसभेत अगर विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचे अधिक्य असते. तरीही १९५० च्या प्रजासत्ताक दिनानंतर गेले ६०-६५ वर्षांत शेतकरी हिताचा फारसा विचार झालेला नाही. इतिहास अगर इतिहास पूर्व साहित्याचा आढावा घेतल्यास राजेशाही, संस्थानी, मोगल अगर इंग्रज काळातही यापेक्षा वेगळे धोरण राबविले गेल्याचे संदर्भ सापडत नाहीत.

Agriculture Practices
Indian : स्वतः भारतीय म्हणून शाबूत राहू !

मी स्वतः गेले ४७ वर्षे शेती करीत आहे. उत्तम प्रतीच्या जमिनी, बागायतीची हमखास व उत्तम सोय आदी सुविधा असूनही सर्व प्रकारच्या संकटाशी भरपूर मुकाबला करावा लागला आहे. कृषी पदवीधर आहे, सतत ज्ञानोपासना, नवनवीन प्रयोगशीलता चालू आहे. तरीही या सर्जनशीलतेमुळे अनेक संकटे स्वतःच्या हाताने ओढवून घेतली आहेत. तरीही मी म्हणतो, शेतीसारखा आनंद देणारा धंदा नाही. अनेकांना इतक्या चांगल्या सुविधा नाहीत. राज्यातली ८२ शेती तर कोरडवाहू आहे. त्यांचीही शेती आनंददायी, प्रसंगी दुःखाची तीव्रता कमी करणारी होणे गरजेचे आहे.

सर्व काही मायबाप सरकार पाहून घेईल असे म्हणून चालणार नाही. काळ बदलला तसे शेती करण्याच्या तंत्रात आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. आपल्या हातात काहीच नाही असे समजण्याचे कारण नाही. आपल्या हातात भरपूर गोष्टी आहेत. आपण त्याचा वापर करीत नाही, कारण प्रत्येक अडचणीवर मार्ग काढणारी नवीन तंत्रे विकसित करण्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. आज हे काम मोठ्या प्रमाणावर व्यापारी संस्था करीत आहेत. हे काम स्वतः शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे, तर त्याचा संपूर्ण फायदा फक्त शेतकऱ्यांना मिळेल.

Agriculture Practices
Indian Agriculture : आपल्याला तारणारी शेती पद्धती

जमीन सुपिकतेकडे दुर्लक्ष

शेतीमध्ये आज केवळ उच्चांकी अगर जास्तीत जास्त उत्पादन मिळविणे या एकच उदिष्ठामागे शेतकरी धावत चालला आहे. परंतु, चांगले उत्पादन येण्यासाठी ज्या माध्यमावर शेतीचा संपूर्ण डोलारा उभा आहे, त्या जमीनबाबीवर लक्ष देण्यास कोणास सवड नाही. पूर्वी नैसर्गिकरित्या जमीन चांगली असल्याने उत्पादन चांगले मिळत असे. आता जमिनीची परिस्थिती तशी राहिलेली नाही. जमिनी खराब झाल्या म्हणजे नेमके काय झाले?

जमिनी परत पूर्वपदावर नेण्यासाठी काय करावे लागेल? त्यासाठी जे मार्ग आपण अनुसरणार आहोत, ते कमीत-कमी खर्चाचे अगर बिनखर्चाचे असणे हे बदलत्या परिस्थितीत सर्वांत महत्त्वाचे आहे. मंदी येणार आहे आणि मंदीतही शेती किफायतशीर झाली पाहिजे असे उद्दिष्ट ठेऊनच शेती करावयाला शेतकऱ्यांनी शिकले पाहिजे. शेतीत उत्पादन खर्च कमीत कमी ठेवणे, उत्पादन किफायतशीर व उत्पादनाचा दर्जा उत्तम असे सूत्र कसे ठेवता येईल यावर गेले २५ वर्षे मी अभ्यास करीत आहे. हा अभ्यास पुस्तकात, मेंदूत व शेतात असा सर्वत्र होणे गरजेचे आहे.

Agriculture Practices
Indian Culture : महिला : कुटुंबाचे सौभाग्य

शेतीत खर्च कमी करण्याचे सर्व मार्ग जमिनीच्या सुपिकतेशी संबंधित आहेत. जमिनीची सुपिकता प्रामुख्याने सेंद्रिय कर्बाशी संबंधित आहे. त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे व्यवस्थापन हा विषय सर्वांत महत्त्वाचा ठरतो. हा विषय आज चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट वापरातच अडकूनच पडला आहे. मी म्हणतो, शेणखत व कंपोस्टचा वापर करून जमिनीची सुपिकता हे तंत्र कालबाह्य झाले आहे. आपल्याला जर उत्पादन खर्च मर्यादित ठेवायचा असेल तर पशुपालनाची शेतीला जोड अगर शेणखत कंपोस्ट हे विषय सोडून द्यावे लागतील व त्याला स्वस्त पर्यायाचा शोध घ्यावा लागेल.

याबाबत माझी मते प्रचलित मताच्या पूर्णपणे वेगळी आहेत. प्रत्येक जमिनीचे क्षेत्र सेंद्रिय खताबाबत स्वयंपूर्ण करणे, चार बांधाच्या बाहेरून चिमुटभरही सेंद्रिय खत आणून न टाकता जमीन सुपीक करणे याबद्दल मी आग्रही आहे. चार बांधाच्या आत फुकटात मिळणाऱ्या पदार्थातून जमीन उत्तमरित्या सुपीक करता येते. मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष व चालू पिकात दोन ओळीमध्ये उगविणाऱ्या तणांचा युक्तीने वापर केल्यास जमीन फुकटात सुपीक करता येते. जसे एखादे चांगले पीक मिळविण्यासाठी आपण भरपूर काम करतो, तसे जमिनीला सेंद्रिय खत मिळवून देण्यासाठी मुद्दाम शेतीत काही नवीन कामे व तंत्रे निर्माण करणे गरजेचे आहे. याची गरज लक्षात येण्यासाठी एक संदर्भ आपल्यापुढे ठेवितो.

Agriculture Practices
Indian Agriculture : सामान्य शेतकऱ्यांनी गुंफली यशमाला

सूक्ष्मजीवांची भूमिका

पीक वाढीविषयक सर्व कामे जमिनीतील सूक्ष्मजीवाकडूनच पार पाडली जातात. त्यांच्या सहभागाशिवाय पिकाची वाढ केवळ अशक्य! आता हे काम जर त्यांच्याकडून व्यवस्थित व्हायचे असेल तर त्यांच्या पोटापाण्याची सोय करणे हे शेतकऱ्यांचे प्रथम कर्तव्य ठरते. त्यांच्या पोटापाण्याची सोय म्हणजेच सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन. आज अनेक कारणाने या विषयाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे समाधानकारक उत्पादन मिळत नाही व शेती मंदीत अगर कोणत्याही प्रकारच्या संकटात धोक्यात येते. आता हे सूक्ष्मजीव अगर ते पार पाडीत असलेले कार्य आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, ही सर्वांत मोठी अडचण आहे. त्या संबंधित सर्व माहिती इंग्रजी पुस्तकात आहे व त्याची एक स्वतंत्र तांत्रिक भाषा असते, ती इंग्रजी वाचू शकणाऱ्यांनाही न समजणारी आहे.

ज्यांनी हे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे अपेक्षित आहे, तेथेच याबाबत अनास्था आहे. मी अपघाताने ह्या विषयाकडे वळलो. हा अभ्यास शेतकऱ्यांसाठी खूप मदत करणारा आहे हे लक्षात आल्यावर मराठीमध्ये ह्यावर भरपूर लेखन केले. भाषणातून प्रबोधन केले. तरीही शेतकरी फारसा या विषयाकडे वळलेला नाही. शेतकरी ज्यावेळी अडचणीत येतो, त्यावेळीच थोडेफार नवीन शिकू शकेल. चालू हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. त्यांना या अभ्यासातून थोडाफार प्रकाश भेटेल असे वाटते.

प्रस्तुत लेख लिहिण्याचे काम पुढे सरकेपर्यंत शेतकऱ्यांचा एक आठवड्याचा संप पार पडला. संपाच्या पुढील मार्गावर शेतकरी व सरकारी पातळीवर चर्चा सुरू आहेत. गरजूंना कर्जमाफी की सार्वत्रिक यावर काहीही निर्णय झाला तरी तोंडावर आलेला खरीप बंद करून पेरा न करता शेती पड टाकून चालणार नाही. शेती आपल्याला आयुष्यभर करावीच लागणार आहे. परंतु, भावी काळात ती किफायतशीर करण्यासाठी त्याला अभ्यासाची जोड द्यावी लागणार आहे. अभ्यास म्हणजे नेमके काय ते आता पाहू. सर्वप्रथम जमिनीची सुपिकता सतत वाढत नेणारे शेतीचे तंत्र विकसित करणे गरजेचे आहे.

शेणखताचा मार्ग कालबाह्य

या कामात काही नवीन गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील. आजपर्यंत याबाबतची सर्व भिस्त शेणखत, कंपोष्ट खतावर आहे. इथे सर्वप्रथम शेण कसे तयार होते ते पाहू. आपण पाळलेली जनावरे (गाय, म्हैस, बैल) कोणतातरी वनस्पतीजन्य भाग वैरण म्हणून खातात. ते पोटात गेल्यानंतर त्यातील स्वतःचे उपयोगी भाग घेऊन बाकी आपल्याला शेण ह्या त्याज्य पदार्थाच्या स्वरुपात मिळतो. त्याने न खाल्लेला गदाळा व शेण कुजल्यानंतर आपल्याला शेणखत अगर कंपोस्ट मिळते. म्हणजे शेणाचे मूळ वनस्पती आहे. कोणतीही वनस्पती अगर प्राण्यांनी तयार केलेला पदार्थ कुजून त्याचे खत होऊ शकते. त्यासाठी तो जनावरांच्या पोटात जाऊन शेण रुपाने बाहेर पडणे गरजेचे आहे असे नव्हे.

आपण निर्माण करीत असलेल्या पिकाबाबत विचार केल्यास धान्य, कडधान्य अगर उसासारख्या पिकातून वैरणीची निर्मिती होते. त्या पिकांचेही सर्व भाग वैरण म्हणून वापरले जात नाहीत. वैरणमूल्य नसलेला जैवभार खूप मोठा आहे. त्याकडे आजपर्यंत सेंद्रिय खत करण्यास उपयुक्त पदार्थ म्हणून आपण कधी पाहिलेच नाही. या सर्व पदार्थांचा खत करण्यासाठी कच्चामाल असा विचार केल्यास इतका प्रचंड साठा आपणास उपलब्ध होतो, की सेंद्रिय खत हा प्रश्नच शेतीत संपून जाऊ शकतो. आता प्रत्येक शेतकऱ्याने तो पिकवित असलेल्या पिकाचा अभ्यास करावा.

पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर शिल्लक अवशेष खत रुपात जमिनीला परत कसे देता येतील यावर चिंतन करावे. पिकवार, विभागवार प्रत्येक वेगवेगळ्या परिस्थितीसाठी वेगवेगळी तंत्रे विकसित करणे गरजेचे आहे. हेच खरे कौशल्याचे काम आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी उच्च पातळीवर सतत राखणे हाच शेतीतील कळीचा मुद्दा आहे. जगभरातील शास्त्रज्ञांना या प्रश्नाने ग्रासले आहे.

पर्यायी तंत्र

मी १९९० सालपर्यंत परंपरागत मार्गाने वाटचाल केल्यानंतर पर्यायी मार्ग शोधत नवीन तंत्र विकसित केले आहे. सेंद्रिय कर्बाची पातळी राखत असताना, च्यावर शेतकऱ्याला एक पैसाही खर्च करावा न लागता उलट शेतकऱ्यालाच चार पैसे यातून मिळाले पाहिजेत, हे या तंत्राचे वैशिष्ट्य. माझ्या शेती करण्याच्या पध्दतीचे सूत्र पाहिले त ते कसे शक्य आहे ते लक्षात येईलः

१) शून्य मशागत अगर गरजेपुरती मशागत.

२) मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष (बुडखा व मुळांचे जाळे) हेच पुढील पिकासाठी सेंद्रिय खत. पिकाच्या दोन ओळीत युक्तीने तण वाढविणे व तणनाशकाने ते जसे आहे तसेच मारून टाकून जागेलाच त्यापासून कुजवून खत करणे.

३) चार बांधाच्या बाहेरून चिमुटभरही सेंद्रिय खत आणून न टाकता जमिनीत उच्च पातळीवर सेंद्रिय कर्ब सतत राखणे.

४) सेंद्रिय कर्ब उच्च पातळीवर म्हणजे कमी पाणी, कमी रासायनिक खत, कमी रोगराई, कमी औषध फवारण्या, चांगले (विक्रमी नव्हे) उत्पादन, चांगल्या दर्जाचे उत्पादन, चांगला दर, चांगले उत्पन्न.

५) संकट काळात कमीत कमी नुकसान, कमी जोखीम.

६) नको बैल, ट्रॅक्टर, पॉवर टीलर, पशुपालन.

७) कमीत कमी मनुष्यबळाचा वापर (जो भावी काळासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.)

८) बागायतीबरोबर कोरडवाहू शेतीतही उपयोगी.

९) गरिबापासून श्रीमंतापर्यंत कोणीही सहज वापरेल असे तंत्र.

प्रत्यक्ष काम करू लागल्यानंतरच ह्या तंत्रातील अनेक बारकावे लक्षात येऊ शकतात. पायाभूत नियम सारखेच, प्रत्येक पिकासाठी थोडाफार फरक करून स्वतंत्र तंत्र विकसित करण्यासाठी आपली बुध्दी आणि अनुभव पणाला लावावा लागेल. शेतकरी ते निश्चित करू शकतात, असा मला ठाम विश्वास आहे.

------

(लेखक प्रयोगशील शेतकरी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com