Indian Agriculture : सामान्य शेतकऱ्यांनी गुंफली यशमाला

मिझोराम हा कष्टाळू आदिवासी शेतकऱ्यांचा प्रांत आहे. इथे शेतीमध्ये महिला आघाडीवर आहेत, म्हणूनच या राज्याच्या यशोगाथांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. अनेक सामान्य शेतकरी पुढे येऊन यशमाला गुंफत आहेत.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on
Updated on

शेतकरी कन्याच करतील वातावरण बदलविरोधी लढ्याचे नेतृत्व

हमांगईहझुअली (Hmangaihzuali) ही एका गरीब अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी. तिने आपल्या वडिलांना वातावरण बदलाचे संकट समजावून सांगितले. आसपासच्या शेतकऱ्यांनाही प्रशिक्षित केले. ‘जूम’ पद्धतीमुळे वातावरणावर कसे परिणाम (Climate Change) होतात, हे समजावले. आहारातील भाजीपाल्याचे महत्त्व (Importance Of Vegetable In Diet) समजावितानाच उत्पादन घेण्याची कलाही शिकवली. जंगलामधील रान भाज्यांचे संवर्धन (Wild Vegetable Conservation) करतानाच घराशेजारीच पारंपरिक भाज्यांचे नवीन वाण लावण्यास प्रोत्साहित केले. त्यातून कुटुंबाना शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला. करून दिला. थिंगसूल (Thingsul) सारख्या दुर्गम भागातही नवे भाजीपाला बियाणे पोहोचवले. गावामध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या भाज्यांची लागवड केली. पुढे एकमेकांमध्ये त्यांची देवाणघेवाण केली जाते. त्यामुळे सर्वांच्या आहारात बहुतांश सर्व भाज्या येतात. प्रत्येकाला बऱ्यापैकी उत्पन्नही मिळते.

बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एशियन युनिव्हर्सिटी फॉर विमेनमध्ये प्रवेश आणि शिष्यवृत्तीसाठी सिजेंटा कंपनीतर्फे जगभरामधून पाच मुलींची निवड होते. त्यामध्ये हिचा समावेश झाला. हमांगईहझुअली हिला पदवीच्या अभ्यासासाठी तब्बल दोन कोटी ८० लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

१) सिजेंटा कंपनीचे भारतातील मुख्य प्रतिनिधी रॅफेल डेल रियो (Rafael Del Rio) म्हणतात, ‘‘महिला वर्गाला कृषी क्षेत्रात प्रोत्साहन देणे, हेच शिष्यवृत्तीचे मुख्य उद्दिष्ट आहे. कारण महिलाच खऱ्या निसर्गावर प्रेम करतात. त्याच निसर्ग नियमानुसार शेती करतानाच पर्यावरणाचे रक्षण करू शकतात. भविष्यामधील वातावरण बदलाच्या लढाईमध्ये आघाडीवर राहतील. त्यामुळेच सिजेंटातर्फे शेतकरी कन्येच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच कृषी क्षेत्रातील नेतृत्वगुणांची पारख केल्यानंतरच ही शिष्यवृत्ती दिली जाते.

Indian Agriculture
मिझोराम राबवतेय नवा कार्यक्रम

२) आशिया विभागाच्या प्रमुख डॉ. पामेला गोन्झालेझ (Pamela Gonzalez) म्हणतात, की शेतकरी वर्गात पुरुषापेक्षा महिलांवरच अधिक ताण तणाव आहे. शेती आणि कुटुंबाशी जोडलेल्या आर्थिक समस्येचे मूळ वातावरण बदलामध्ये आहे. हे थोडे समजावले तरी स्त्रियांना समजू शकते. कुटुंबाचा कणा असलेल्या या मुली महिलांना अधिक बळकटी देण्याची गरज आहे. सांभाळून या बदलास सामोर जात असतात, म्हणूनच महिला वर्गास जास्त बळकटी देणे गरजेचे आहे. हिमांगी तिझवालीसारखी एखादी आदिवासी मुलगी उद्या लाखो स्त्रियांचे नेतृत्व तेवढ्याच ताकदीने करेल, हे निश्‍चित.’’

महिला सक्षमीकरणाचा होतो गुणाकार

गुगल कंपनीने केलेल्या एका अभ्यासानुसार, महिला उद्योजकतेमुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळू शकते. त्यांच्या स्वतःच्या आर्थिक प्रगतीसोबतच आणखी १५० ते १७० दशलक्ष नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता त्यात आहे. ‘ॲग्रोवन’मध्येही दर आठवड्याला एक महिलांची यशकथा आपण वाचतो. त्यातही ती स्वतः आत्मनिर्भर तर होतच,पण आसपासच्या किमान २०-२५ महिलांनाही पायावर उभी करते.

मिझोराममधील लैसेनझो (जि. चंपाई) येथील लल्थामुआनी (Lalthmuani) या वय २२ वर्षीय महिला उद्योजिकेची. भाज्यांची लागवड करून घरोघर विकणाऱ्या स्त्रीची ही मुलगी. खडतर परिस्थितीमध्ये आईला मदत करत करत स्वतः ‘बीबीए’पर्यंत शिक्षण घेतले. २०१८ मध्ये पदवी मिळाल्यानंतर आपल्या लहानशा गावातच स्थानिक उपलब्ध चहा जातीची लागवड केली. त्यातून तब्बल ३०० महिला शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला.

Indian Agriculture
Agriculture : शेतीशी निगडित उद्योगांच्या समस्या जाणून घेऊ : कृषिमंत्री

तिला मिझोराम शासनाचा युवा उद्योजक हा पुरस्कारही मिळाला. वातावरण बदलाचा आपल्या गावावर, राज्यावर झालेला प्रभाव तिच्या लक्षात आला. त्यातून मार्ग काढण्यासाठी पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्या सुशोभित करून विकू लागली. त्यातून परिसरातील स्त्रियांशी संवाद वाढला. लल्थामुआनीच्या लक्षात आले की बहुतांश स्त्रिया घरगुती वापराइतका चहा पिकवतात किंवा जंगलातून आणतात. तिच्या आईच्या भाजीच्या टोपलीतही जंगलातून मिळणाऱ्या लाल चहाची पाने असत. त्यातून तिला एक कल्पना सुचली. सर्व स्त्रियांना एकत्रित करून त्यांचे चहा उत्पादन खरेदी करायला सुरू केले. मळ्यापेक्षाही जंगलातील चहा एकमेवाद्वितीय असल्याची तिची आजी म्हणत असते. याच चहाची ‘इको फार’ (Eco Far) ही इस्टेट स्थापन केली. आज तिचा चहा ‘जंगल रेड टी’ म्हणून प्रसिद्ध आहे. हाताने तयार केलेल्या या चहाला मागणी फार आणि उत्पादन कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे चहा हातोहात खपतो. अलीकडेच ती ग्रीन टी आणि व्हाइट टी मध्येही उतरली आहे. भारत सरकारचे आदिवासी मंत्रालय हे तिचे मुख्य ग्राहक आहे. मिझोराममधील चहामळ्यावर वातावरण बदलाचे अनिष्ट परिणाम झाले असले तरी जंगलातील चहा अबाधित आहे. आज ३०० महिला आपल्या चहाचे उत्पादन ‘इको फार’ ला देतात. त्यांची भरभराट ‘इको फार’ सोबत होत आहे.

मिरचीचा तिखटपणा वाढला

अशीच एक यशोगाथा आहे थिंगसाई जिल्ह्यातील एका लहान आदिवासी गावाची. वातावरण बदलावर मात करत शेतीत बदल करतानाच या गावाने ‘मिरचीचे गाव’ अशी ओळख निर्माण केली आहे. येथील ९० शेतकरी अतिशय तिखट अशा जंगली मिरची वाणांची शेती करतात. या गावात अंदाजे १७६ क्विंटल लाल मिरची उत्पादन होते. ३०० रुपये प्रति किलो प्रमाणे वर्षाला ५० लाख रुपये गावात येतात. ८४ वर्षांचे वृद्ध आदिवासी झाटीनुमा (zatinuma) म्हणतात, ‘‘वातावरण बदलामुळे आमची शेती वाहून गेली. अशा वातावरणामध्ये ही स्थानिक जंगली मिरची फक्त टिकलीच नाही, तर तिचा तिखटपणासुद्धा वाढला.’’ या शेतकऱ्याने स्वतः २४ क्विंटल मिरची उत्पादन घेतले आहे. गावामध्ये लाल तिखट तयार केले जाते. २०१७ मध्ये या गावाने ४०० क्विंटल मिरची पावडर तयार करून १ कोटी रुपये कमावले.

विज्ञान सांगते, की वातावरण बदलामध्ये वनस्पतींना, पिकांना अतिशय तणावामधून वाटचाल करावी लागते. यामध्ये परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्थानिक पिके विशेष रसायने तयार करतात आणि टिकून राहतात. मिरचीचा तिखटपणा वाढला तो याचमुळे. याचाच फायदा या शेतकऱ्यांना मिळाला. मुबलक पाणी आणि रासायनिक खतावर जगणारी पिके वातावरण बदलात टिकू शकत नाहीत.

स्ट्रॉबेरी शेतीची प्रेरणा ः

ऐझवाल या राजधानीपासून ४०० किमीवर व म्यानमार सीमेलगत असलेला सैहा (Saiha) हा जिल्हा अतिशय मागासलेला म्हणून ओळखला जातो. येथील केएम स्वाम (KM Sawm) या गावामध्ये जूम शेतीला पर्याय म्हणून स्ट्रॉबेरीची नावीन्यपूर्ण शेती केली जाते. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञांनी जोनाथन या शेतकऱ्यास ‘जूम’ च्या जागेवर आणि तेवढ्याच क्षेत्रफळावर जंगलाच्या उतारत्या मोकळ्या जागी स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रशिक्षण दिले. लहानशा हरितगृहामध्ये स्ट्रॉबेरीची रोपेही तयार केली. या दोन्ही प्रयोगातून २ हेक्टर क्षेत्रामध्ये जोनाथन यांना तब्बल ४ लाख रु. नफा झाला. या यशातून प्रेरणा घेत आता अनेक शेतकरी जूम शेती सोडून पूर्ण वर्ष स्ट्रॉबेरी शेतीकडे वळले आहेत.

नवी जूम पद्धती ः

बिलकाव्हथलिर या गावामधील एच. रोकुंगा हे शेतकरी घनदाट जंगलात जूम पद्धतीने भात शेती करत. कमी उत्पादनामुळे कुटुंबांची उपजीविका करण्यात अडचणी येत. त्यांनी मिझोरामच्या कृषी विभागाने विकसित केलेली नवीन जूम पद्धती स्वीकारली. यात डोंगर उतारावर लाकडाचे ओंडके टाकून बंडींग केली जाते. त्यामुळे पाणी अडवले जाऊन भूगर्भात मुरते. शासनातर्फे भाताचे नवीन वाण, खते दिली जातात. त्यामुळे उत्पादनही अनेक पटीने वाढते. रोकुंगा यांना पूर्वी जूम पद्धतीत दोन क्विंटलपेक्षा जास्त भात उत्पादन मिळाले नाही, मात्र नव्या पद्धतीमध्ये ते १० ते १५ क्विंटल उत्पादन घेतात. ओलावा टिकून राहत असल्याने सोबत भाजीपालाही घेतात. डोंगर उतारावरील या नव्या जूम पद्धतीचा अनेक शेतकऱ्यांनी स्वीकार केला आहे. त्यामुळे जंगलाचे व पर्यावरणाचे रक्षण होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com