Indian Culture : महिला : कुटुंबाचे सौभाग्य

नारीजन्म हा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. आपल्या संस्कृतीच्या केंद्रस्थानी स्त्री आहे. आपण महिलांना वंदनीय मानतो,
Indian culture
Indian cultureAgrowon

रामदास वाघ

नारीजन्म हा भारतीय संस्कृतीचा (Indian culture) अनमोल ठेवा आहे. आपल्या संस्कृतीच्या केंद्रस्थानी स्त्री आहे. आपण महिलांना वंदनीय मानतो, त्यांचा आदर करतो. जीवनाचा प्रवास स्त्रीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. स्त्री आहे म्हणून घराला घरपण आहे. ती प्रत्येक घराच्या सौभाग्याचा अलंकार आहे. तिचं अस्तित्व घरातून वजा करा; घराला स्मशान अवकळा प्राप्त होईल. घर उदास होईल, ती आहे म्हणून घरात आनंद वास करतो.

शांती सुखाने नांदते आणि चिमणीबाळं जीवनाची मौज लुटतात. जीवनाचे गीत आहे, स्त्री म्हणजे. जीवनातील संगीत आहे स्त्री म्हणजे. ती प्रत्येक घरातील प्राणवायू आहे. ती आहे म्हणून श्‍वास आहे. आपल्या जिवात जीव आहे. आई दोन दिवस गावाला गेली, तर मुलांची दयनीय अवस्था होते. पत्नी सणासुदीला माहेरी गेली, तर पती जीवनातील गती हरवून बसतो.

Indian culture
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

आजी तीर्थयात्रेला गेली, तर नातवंडे जीवनातील सौंदर्य हरवून बसतात. लेक सासरी गेली, तर आईचे काळीज तीळतीळ तुटते. स्त्री आहे म्हणून प्रेम आहे, वात्सल्य आहे, दयाभाव आहे, कारुण्य आणि क्षमाशीलता आहे. स्त्री नसती तर इतिहास पोरका झाला असता; संस्कृती ऱ्हास पावली असती. स्त्रियांनी आपल्या असीम त्यागाने संस्कृतीचे रक्षण केले. त्यांनी आपल्या उदात्त विचारांनी, धीरोदात्त बाण्याने, अथक परिश्रमाने आणि अभूतपूर्व शौर्याने

इतिहासाला सन्मानाच्या गौरी शंकरावर विराजमान केले.

जिजाईने शिवबा घडवला. पांडुरंगाच्या आईने श्याम घडवला. अहिल्याबाईने स्त्री सन्मानाचा तुरा माथी लावला. लक्ष्मीबाईने झाशीला अजरामर केले. मदर टेरेसाने वात्सल्याला क्षितिजापर्यंत नेले. सिंधुताईने निराधारांचा विश्‍वास जागवला. स्त्री काय नाही करू शकत? ती माणसाला महात्मा बनविते. संत, योद्धा, कुशल राजकारणी अथवा प्रशासक बनविते.

ती संस्कृतीची कथा आहे, गाथा आहे. ती संस्कृतीची अखंड तेवणारी नंदादीपाची ज्योत आहे. तिच्या प्रकाशाने जीवनातील सारा अंधार दूर होतो. सर्वत्र प्रकाश किरणांचे साम्राज्य पसरलेले दिसते. अहो, स्त्री म्हणजे प्रकाशाची देवता. हा प्रकाश तिच्या त्यागाचा, कष्टाचा आणि संयमाचा आहे. तिचे वागणे, जगणे हा पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.

Indian culture
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

पुरुष व्यवहार सांभाळतो, स्त्री घर सांभाळते. व्यवहारातील पावित्र्य त्याचे चातुर्य वाढविते. स्त्रीचे सामंजस्य कुटुंबाला सावरते. पुरुष प्रामाणिकपणाने व्यापार उदीम, नोकरी, शेती अथवा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मुलाबाळांचे संगोपन, संवर्धन करतो. पण घरातील टापटीप, स्वच्छता, स्वयंपाक, राहणीमान, मुलाबाळांचे संस्कार या गोष्टी स्त्रीला सांभाळाव्या लागतात. वागणे, बोलणे, मानमर्यादा पाळणे, डोक्यावर पदर घेणे, भडक रंगाचे कपडे न वापरणे, जास्त अलंकाराची हाव न बाळगणे ही पथ्ये ती पाळते.

सौंदर्य साध्या राहणीत अधिक खुलून दिसते, हे ती जाणून असते. माहेर व सासरचे नाव उज्ज्वल करण्यासाठी मनावर ताबा ठेवून अनेक प्रकारचे मोह ती टाळते. घरंदाज स्त्री घराला घरपण देण्यात गुंतलेली असते. घरातील गोतावळा पाहुणे -रावळे यांची मने सांभाळण्यात, त्यांची सेवा करण्यात ती धन्यता मानते.

अतिथी देवो भव हा मंत्र प्रत्यक्ष जीवनात अनुभवते. अतिथींची सेवा करते, त्यांना सुग्रास भोजनाचा पाहुणचार करते. त्यांचा आत्मा शांत करते. ते तृप्त होतात. कुटुंबाला आशीर्वाद देतात. केवळ गृहलक्ष्मीमुळे कुटुंबाचा गौरव होतो. कुटुंबाची पतप्रतिष्ठा सांभाळणे गृहिणीच्या हातात असते. पत्नीमुळे पुरुषाच्या लौकिकाला झळाळी येते. ज्याची पत्नी सुशील, समंजस त्याचा संसार तेजस्वी होतो.

Indian culture
Crop Damage Compensation : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीअभावी मदतच मिळेना

दिव्याची वात आणि स्त्रीचे जीवन यात किती साम्य आहे! वात जळते, प्रकाश देते. जळता जळता सरते. स्त्रीसुद्धा मानव जातीसाठी आयुष्य समर्पित करते. आयुष्य पणाला लावण्यासाठीच तर असतो ना स्त्रीचा जन्म. तिच्या आयुष्यात आराम नावाचा थांबा नसतो. ती आळसाला लाथ मारते. सदैव कष्ट करीत राहणे हा तिचा जीवनधर्म असतो. कामात राम हीच तिच्या जीवनाची श्रद्धा असते. ती कोणत्याही क्षेत्रात असो, कष्ट तिच्या पाचवीला पुजलेले असतात. ती घरी असो वा कार्यालयात, राजकारणात असो वा समाजकारणात सदैव कार्यमग्न असते.

शेतात ती पुरुषांच्या बरोबरीने काम करते. वेळप्रसंगी बैलाच्या जागी मानेवर जू ठेवून ती औत ओढते. मजूर असलेली स्त्री खड्डा खोदते, खडी फोडते, खाणीत काम करते. प्रत्येक क्षेत्रात ती सर्वार्थाने स्वतःला झोकून देते. तिच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते. मग सांगा ती अबला कशी? ती हाती बंदूक धरते, बॉक्सिंग गाजवते, कुस्ती खेळते, क्रिकेट खेळते, गिर्यारोहण करते, आकाशात झेप घेते.

ती रणभूमीत लढते, कुटुंब सावरते, समाज घडवते. ती राष्ट्र उभे करते. भावी पिढ्यांसाठी आदर्श असते तिचे जीवन. त्यासाठी झिजावे लागते कस्तुरबासारखे. सोसावे लागते दुःख आयुष्यभर कुंतीसारखे. भोगावा लागतो वनवास सीतामाईसारखा. जळावे लागते उर्मिले सारखे. त्याग करावा लागतो वैभवाचा तारामतीसारखा. त्रास सहन करावा लागतो क्रांतिज्योती सावित्रीमाईंसारखा!

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com