Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Dryland Farming: तोट्याच्या कोरडवाहू शेतीचेही अफाट फायदे

Indian Agriculture: ज्यांच्याकडं उत्पन्नाचे इतर मार्ग आहेत व ज्यांना शेती आहे, अशा सर्वांनी शेती एक जीवनमार्ग म्हणून स्वीकारला तर त्यांना आणि शेतीलाही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. शेती असतानाही निवृत्तीनंतरचं आयुष्य निरर्थकपणे घालवत असलेले कितीतरी लोक माझ्या पाहण्यात आहेत.
Published on

Farming Lifestyle: मला आजपर्यंत किमान शंभर लोकांनी तरी प्रश्‍न विचारला असेल, की लातुरातील सुखवस्तू प्रकाशन व्यवसाय, पत्रकारिता सोडून शेतीत का आलात? मी निसर्गासोबत, निवांत जगायला आलोय. लातुरातलं जगणं विशिष्ट हेतू ठेवून होतं. त्यात करियर, पैसा, कौटुंबिक गरजा अशा अनेक गोष्टी होत्या. त्यातल्या त्यात मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करू शकलो, ही समाधानाची बाब. बहुतांश लोक केवळ आर्थिक गरज म्हणून त्यांना आवड नसलेल्या क्षेत्रात आयुष्य घालवतात. केवळ पैसा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून जगलेलं आयुष्य जगण्याचा निर्भेळ आनंद देऊ शकत नाही. आजची सगळी सामाजिक, राजकीय परिस्थिती बघितली तर समाधानाने अर्थपूर्ण आयुष्य घालविण्यासाठी शेतीसारखी दुसरी जागा नाही.

कोरडवाहू शेती ही तोट्याची आहे. काहीही झालं, तरी अशी शेती करणारा माणूस आयुष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकत नाही. तो कुटुंबाचं भलं करू शकत नाही. त्यामुळे मी कोणालाच फक्त शेती करा असा सल्ला देत नाही. शेती हा कायम दुय्यम व्यवसाय असला पाहिजे. तुमचं पोट शेतीवर अवलंबून असायला नको. तरच तुम्ही काही प्रमाणात का होईना शेतीत आनंद घेऊ शकता.

देशात सध्या सुमारे ८५ टक्के शेतकरी अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक आहेत. हे शेतकरी नेमके कोण आहेत? त्यातील केवळ नावावर शेती असलेले किती आहेत? शेतीवर पोट असलेल्या शेतकऱ्यांची संख्या किती? याची कसलीच अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. याचं कारण असं काही सर्व्हेक्षण झालेलं नाही. जोपर्यंत केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची खरी संख्या समोर येत नाही, तोपर्यंत रोगावर इलाज करणं शक्य नाही. सरकारची सगळी धोरणं शेतकरीविरोधी आहेत, ते शेतीमालाला चांगला भाव मिळू नये यासाठी प्रयत्न करतं, हे वास्तव आपण सतत मांडत असतो.

Indian Agriculture
Dryland Farming : कोरडवाहू शेती विकासाशिवाय देशाचा विकास अशक्य

पण या चर्चेमुळे सरकारला काही फरक पडत नाही. सरकारच्या या धोरणांविरुद्ध रस्त्यावर येऊन कोणी लढायला तयार नाही. याचं कारण केवळ शेतीवर अवलंबून अस़णाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. हाच शेतकरी सर्वाधिक अडचणीत आहे. आत्महत्या करणारे बहुतांश शेतकरी याच वर्गातले असतात. याच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे. पण मतांच्या राजकारणासाठी सरसकटीकरण केलं जातं. सहा हजारांची भीक जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिली जाते.

शेतीमालाचा योग्य भाव मिळत नसतानाही शेतीमालाचं उत्पादन वाढत आहे. उत्पादन वाढविण्यासाठी खर्चही वाढतोय. हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही. उत्पादन कमी झालं तरच शेतीमालाला भाव मिळतो. हे उत्पादन वाढवणारे बहुतेक शेतकरी असे आहेत, ज्यांचं पोट शेतीवर नाही. त्यांना पगार, पेन्शन आहे. पैसे येण्याचे अन्य मार्ग त्यांच्याकडं आहेत. ते लोक शेतीत भरपूर पैसे खर्च करून उत्पादन वाढवत आहेत. यामुळे त्यांची शेती फायद्यात आहे असं नाही. ती तोट्यातच आहे. हा तोटा सहन करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. फक्त मी एवढं उत्पादन काढलं, हा त्यांच्या कौतुकाचा विषय आहे. त्यांच्यामुळे ज्यांचं पोट शेतीवर आहे ते लोक भरडले चाललेत. त्यांच्याही शेतीमालाला भाव मिळत नाही. त्यांची शेती अधिक तोट्यात चालली आहे.

ज्यांच्याकडं उत्पन्नाचे इतर मार्ग आहेत व ज्यांना शेती आहे, अशा सर्वांनी शेती एक जीवनमार्ग म्हणून स्वीकारला तर त्यांना आणि शेतीलाही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. शेती असतानाही निवृत्तीनंतरचं आयुष्य निरर्थकपणे घालवत असलेले कितीतरी लोक माझ्या पाहण्यात आहेत. सोशल मीडिया, टी.व्ही. यातच त्यांचा वेळ जातो. अनेकजण व्हॉट्सॲपवर आलेले मेसेज फॉरवर्ड करणे यालाच काम समजतात. त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थितीही फारशी चांगली नाही. अनेकांचं वागणं मनोरुग्णांसारखं झालं आहे. सतत टी.व्ही. बघण्याचा त्यांच्या मेंदूवर, मनावर वाईट परिणाम झाला आहे.

चांगली, विचार करणारी माणसं कट्टर धार्मिक बनलीत. अनेक वर्षे माझ्या संपर्कात असलेला चांगला शिक्षक एका धर्माचा द्वेष्टा बनल्याचं बघून मी हादरून गेलो. मी त्याला म्हटलं, की तुझी वडिलोपार्जित शेती आहे. तू शेतीत येऊन का राहत नाहीस? तुझं डोकं तरी ताळ्यावर येईल? तो बोलला, की शेती तर तोट्याची आहे, असं तुझं म्हणतोस की? मी म्हटलं, की ते खरंय. ती तोट्याची शेती कर,असंच मी म्हणतोय. तुला भरपूर पेन्शन मिळतेय. त्यातले बरेच पैसे दवाखान्यात जातात, हॉटेलिंगमध्ये जातात.

Indian Agriculture
Dryland Farming : कोरडवाहू शेती विकासाचे मूलमंत्र

संपूर्ण दिवसभरात सांगण्यासारखी अशी एक तरी गोष्ट करतोस का? तो बोलला, शेतात जाऊन काय करू? मी म्हटलं, तू शेती करण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी म्हणून शेतात जाऊ नको. फक्त एक छंद म्हणून जा. एकदा तिथं राहायला गेलास, की तिथं काय करू हा प्रश्‍नच राहणार नाही. शेत तुला काम सांगत राहील. तू करत राहशील आणि बघता बघता तुझी तब्येत सुधारेल. तुझं आयुष्य काही वर्षांनी वाढेल. याचं मोल तू किती पैशात करशील? आणि नाही तरी पैशाचं करणार काय? तुला सहा प्रकारच्या गोळ्या चालू आहेत, तू कसली मजा करणार? यावर त्याला काही बोलता आलं नाही.

ज्यांचं पोट शेतीवर नाही, ज्यांच्याकडं खर्चायला पैसे आहेत, त्यांच्यासाठी शेती हा लाइफस्टाइल म्हणून सर्वोत्तम मार्ग आहे. शेतीत आल्यामुळं आपोआप निसर्गाची सोबत लाभते. शुद्ध हवा हा मोठा फायदा आहे. शहरात कितीही पैसे मोजले तरी अशी हवा मिळणार नाही. प्रदूषित हवा हे अनेक रोगांचे मूळ आहे. क्षणाक्षणाला बदलणारा निसर्ग अनुभवणं, याच्यासारखा दुसरा आनंद नाही. यात रिकामपण शिल्लक राहणार नाही. शेतीत आलं म्हणजे रात्रं-दिवस शारीरिक कष्ट केले पाहिजेत, त्रास सहन केला पाहिजे, असं समजण्याचं काहीच कारण नाही. शेतीत विविध प्रकारची दहा-वीस झाडं जोपासली तरी त्यात भरपूर वेळ जाऊ शकतो. आपल्या आवडीची फळं शेतात सहज उपलब्ध करून घेऊ शकतो. शेती आपल्या आयुष्याला एक वेगळा अर्थ प्राप्त करून देते.

Indian Agriculture
Dryland Agriculture Research : कोरडवाहू शेती संशोधनाची चौकट बदलावी लागेल ; डॉ. सुरेशकुमार चौधरी

मी लिहिलेली, प्रकाशित केलेली पुस्तकं वाचून कोणात काही परिवर्तन झाल्याचं उदाहरण मला माहीत नाही. मात्र शेतीत मी केलेल्या कामाचे परिणाम मला लगेच दिसतात. माझी कोरडवाहू शेती भलेही तोट्याची असेल मात्र मला शेतात राहण्याचे झालेले फायदे अफाट आहेत. माझी प्रकृती निरोगी बनली. माझं मनही निरोगी राहिलं. इथं राहिल्यामुळं माझ्या मनात कोणाविषयी द्वेषभावना निर्माण झाली नाही. राग, लोभ, मोह, मत्सर आपोआप कमी झाला. शहरात माझं जगणं माझ्या कुटुंबापुरतं मर्यादित होतं.

शेतात आल्यानंतर माझ्या कुटुंबाचा विस्तार झाला. पशु-पक्ष्यांसोबतच झाडं, झुडपं, वेलीही माझ्या परिवाराचे भाग बनले. मी छोटीशीच बाग जोपासतोय. वर्षभर ही बाग मला काही ना काही फळं खायला देते. केवळ आम्हीच नाही तर शेकडो पशू-पक्षी या बागेवर जगतात. मी रोपं लावली. त्यांना पाणी, खत दिलं. माझ्यासमोर ती वाढली आणि ती फळं देऊ लागली, हा निर्मितीचा आनंद कल्पनातीत आहे. हा अनुभव फक्त शेतीतच घेता येतो. आपण केलेल्या कामाची प्रत्यक्ष अनुभूती इथं मिळू शकते. खर्चाचा विचार केला तर शहराच्या तुलनेत वीस टक्केही पैसे इथं लागत नाहीत. इथं समाजापासून अंतर ठेवून मनासारखं जगू शकतो.

निवृत्त नोकरदार शेतीत येतात ते पैसे कमावण्यासाठी. त्यांची पैशाची हाव काही कमी होत नाही. शेतीत पैसे मिळत नाहीत, हे कळण्यासाठी त्यांना बरेच पैसे मातीत घालावे लागतात. त्यानंतर ते शेतीला शिव्या घालत बाहेर पडतात. या लोकांचं मातीशी कसलीच नातं नसतं. त्यांना जमीन हे पैसे कमावण्याचं साधन वाटतं आणि इथंच ते फसतात.

आपल्या गरजेपुरतंच पिकवा, हा शेतकरी नेते शरद जोशी यांनी सांगितलेला मार्ग, शेतीवर पोट नसलेल्या शेतकऱ्यांना, अमलात आणणे सहज शक्य आहे. हा मार्ग शेतीवर अवलंबून असलेल्या छोट्या शेतकऱ्यांना बळ देणारा ठरू शकतो. मात्र त्यासाठी शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची, शेती हा जीवनमार्ग म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. असं घडलं तर कुठलंही आंदोलन न करताही शेतीला बरे देऊ दिवस येऊ शकतात.

माझी ही मांडणी कविकल्पना किंवा भावनिक नाही. मी गेल्या दहा वर्षांपासून या आनंददायी जगण्याचा अनुभव घेतोय. मी इथं येऊन काय केलं, याची भलीमोठी यादी देऊ शकतो. ज्या निसर्गाने मला वाढवलं, जगवलं त्याची परतफेड मी झाडं जोपासून करतोय. मी पर्यावरण ऱ्हासात, प्रदूषणात भर घातली नाही. मी पृथ्वीचं नुकसान केलं नाही, हे अभिमानाने सांगू शकतो. मी नसल्यानंतरही ही शेकडो झाडं माझं अस्तित्व जिवंत ठेवणार आहेत. शेतीत राहिल्यामुळेच खऱ्या अर्थाने मी जगण्याचा अर्थ, प्रयोजन समजू शकलो. या जगण्यातून मिळणाऱ्या समाधानाची इतर कशाशीही तुलना करता येत नाही. अर्थात असं जगण्यासाठी एक पूर्वअट आहे. तुमचं मातीशी नातं असावं लागतं. तुमची मातीशी नाळ जुळलेली असावी लागते.

९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९,

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com