
Dryland Agriculture Development : राज्यातील ७५ टक्क्यांहून अधिक भाग व्यापलेल्या कोरडवाहू शेतीकडे दुर्दैवाने दुर्लक्ष झाले असल्याची खंत एका राज्यस्तरीय संवाद कार्यक्रमामध्ये कोरडवाहू शेतीत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली आहे. देशातील ५५ टक्के, तर राज्यातील ८२ टक्क्यांहून अधिक शेती क्षेत्र कोरडवाहू आहे.
मुख्य म्हणजे कोरडवाहू शेतीवरच खऱ्या अर्थाने देशाची अन्नसुरक्षा अवलंबून आहे. असे असताना देश असो वा राज्य कोरडवाहू शेती आणि अशी शेती कसणारे शेतकरी यांची अवस्था अत्यंत बिकट, दयनीय आहे.
केंद्र-राज्य सरकारने कोरडवाहू शेतीसाठी आतापर्यंत अनेक योजना, उपक्रम, कार्यक्रम राबविले. परंतु त्यात कोरडवाहू शेती विकासाचा सर्वसमावेशक विचार केला गेला नाही. बहुतांश योजना, उपक्रम कागदावरच राहिले. त्यामुळे त्याचे अपेक्षित परिणाम समोर आलेले दिसत नाहीत. कोरडवाहू शेतीच्या समस्या अनेक आहेत. कोरडवाहू शेती कसणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांची जमीन धारणा अधिक आहेत. मजूरटंचाईच्या काळात अशी शेती कसणे शेतकऱ्यांना खूपच कठीण जात आहे.
कोरडवाहू शेतीत सेंद्रिय खतांच्या कमी वापरामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाले आहे. अशा जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणात होते. कोरडवाहू शेतीत घेतल्या जाणाऱ्या पारंपरिक पिकांची उत्पादकता कमी आहे. शिवाय कापूस, सोयाबीन या नगदी पिकांसह इतरही शेतीमालास योग्य भाव मिळताना दिसत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी सातत्याने तोट्यात चाललेली कोरडवाहू शेती विकून उपजीविकेचे दुसरे मार्ग शोधत आहेत. कोरडवाहू शेतीवर वेळीच लक्ष केंद्रित केले नाही तर भविष्यात याचे अजून भयावह परिमाण समोर येतील.
कोरडवाहू शेतीला बारमाही बागायती करण्यासाठीची सिंचन व्यवस्था उभी करणे म्हणजे कोरडवाहू शेतीचा विकास, अशा चुकीच्या व्याख्येत सरकारी धोरणे अजूनही आखली जातात, हे अधिक दुर्दैवी आहे. त्यातून मोठे सिंचन प्रकल्प उभे करण्यासह नदी जोड, वॉटर ग्रीड सारख्या महाकाय योजना आखल्या जातात.
असे प्रकल्प, योजना सद्यःपरिस्थितीत आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीत, शिवाय त्यात तांत्रिक अडसरही अनेक आहेत. त्यामुळे मुलस्थानी जल संधारण हा कोरडवाहू शेती विकासाचा मूलमंत्र आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. शेतात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब शेतातच अडविला, जिरविला पाहिजे.
शिवाय कोरडवाहू शेतीला एक-दोन संरक्षित सिंचनाची सोय झाली तरी पिकांची उत्पादकता आणि पर्यायाने उत्पादन वाढेल. उत्पादकता वाढविण्यासाठी संरक्षित सिंचनाबरोबर कोरडवाहू शेतीची मशागत पद्धत, वाण-बियाणे निवड, लागवड, व्यवस्थापन पद्धती यामध्येही संशोधनातून व्यापक बदल करावे लागतील. अलीकडे कोरडवाहू शेतीत शून्य मशागत आणि रुंद वरंबा सरी (बीबीएफ) लागवड पद्धती उपयुक्त ठरत असताना या पद्धतींचा प्रसार प्रचार झपाट्याने करावा लागेल.
एकात्मिक शेतीचा अवलंब हा कोरडवाहू शेती विकासाचा दुसरा मूलमंत्र आहे. आपल्या शेती क्षेत्रात एक-दोन पिकांऐवजी विविध पिकांचा अवलंब करायला हवा. त्यातही आंतरपीक तसेच मिश्र पीक पद्धतीचा वापर वाढवावा लागेल. हंगामी पिकांबरोबर कोरडवाहू फळपिके तसेच बांधावर वन पिकांची लागवड करावी लागेल.
असे केल्याने कोरडवाहू शेतीतील जोखीम कमी होईल, उत्पन्न वाढीस हातभार लागेल. वाढत्या नैसर्गिक आपत्तीत कोरडवाहू शेतीला भक्कम पीकविम्याचा आधार द्यावा लागेल. हे करीत असताना शेतकऱ्यांनी इतर उत्पन्नांचे स्रोत निर्माण करायला हवेत. त्यात शेती जोडव्यवसाय, पूरक व्यवसाय यांचा विचार होऊ शकतो. या करिता शेतकऱ्यांचे प्रबोधन वाढवावे लागेल. त्यासाठी प्रशिक्षणाचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करावे लागतील. या सर्व बाबींचा विचार करून कोरडवाहू शेती विकासाचे सर्वसमावेशक धोरण ठरवावे लागेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.