Sericulture Business: शेड निर्जंतुकीकरण, तुती बाग व्यवस्थापनावर भर

Silk Farming Success: श्रीकांत भारत पवार यांच्या सहा एकर शेतीत पारंपरिक पिकांसोबत फळबाग लागवड होती. उत्पन्नात नफा मिळत नसल्यामुळे त्यांनी २०१९ मध्ये रेशीम उद्योग सुरू केला, आणि योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतर रेशीमशेतीतून त्यांना स्थैर्य मिळवता आले.
Sericulture Farming
Sericulture FarmingAgrowon
Published on
Updated on

Economic Stability Through Sericulture:

शेतकरी नियोजन । रेशीमशेती

शेतकरी : श्रीकांत भारत पवार

गाव : बोरकाव (काळे), ता. जि. लातूर

एकूण शेती : सहा एकर

तुती लागवड : एक एकर

बोरगावपासून शिराळा ते गाधवड रस्त्यावर श्रीकांत भारत पवार यांची वडिलोपार्जित सहा एकर शेती आहे. शेतीत पारंपरिक पिकांसह फळबाग लागवड आहे. शेतीमधून अपेक्षित उत्पन्न हाती येत नसल्याने त्यांनी २०१९ मध्ये रेशीम उद्योग करण्याचे ठरविले. प्रत्यक्ष व्यवसायास सुरुवात करण्यापूर्वी प्रशिक्षण घेतले. त्यातून रेशीमशेतीमधील बारकावे लक्षात आले. हळूहळू रेशीमशेतीमध्ये चांगला जम बसला. रेशीमशेतीमुळे स्थैर्य मिळाल्याचे श्रीकांत पवार यांनी सांगितले.

सध्या पाण्याच्या उपलब्धता नसल्याने बॅच घेण्यात आल्या नाहीत. मात्र पुढील काळात नवीन बॅच घेण्यासाठी नियोजन चालू आहे. त्यानुसार तुती बागेत छाटणी, खत व्यवस्थापन, संगोपनगृह स्वच्छता, निर्जंतुकीकरण, चॉकी उपलब्धता आदी कामांचे नियोजन चालू आहे. रेशीम शेतीसह शेतीकामांमध्ये वडील भारत, आई उषा, पत्नी प्रियांका व भाऊ रमाकांत यांची मदत श्रीकांत पवार यांना मिळते.

Sericulture Farming
Silk Farming : रेशीम संगोपनगृहातील तापमान कमी करण्यासाठी उपायांवर भर

रेशीम शेतीस सुरुवात

शेतीच्या बांधावर नारळाची ५०, आंब्याची ६० तसेच चिक्कू, केळी आदी फळझाडे आहेत. सिंचनासाठी विहीर व बोअरवेलमधील उपलब्ध पाण्याचा वापर केला जातो. मात्र पारंपरिक शेतीतून घरप्रपंच कसाबसा भागत होता. मात्र आर्थिक प्रगती होत नव्हती. शेतीला रेशीम उद्योगाची जोड देऊन अनेक शेतकऱ्यांनी प्रगती साधल्याची माहिती मिळाली. त्यानंतर निपाणी (ता. कळंब) येथे रेशीमशेतीचा प्रयोग प्रत्यक्ष पाहिला. रेशीमशेती सुरुवात करण्यापूर्वी लातूर जिल्हा रेशीम कार्यालयाद्वारे आयोजित सात दिवसांचे रेशीमशेतीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणामध्ये रेशीम कीटकांचे संगोपन, चॉकी निर्मिती आदी बाबींविषयी माहिती मिळाली. रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी लोखंडी संगोपनगृहाची उभारणी केली. रेशीम कीटकांना दर्जेदार पाल्याची उपलब्धता होण्यासाठी दीड एकरावर तुती लागवड केली.

संगोपनगृहाची उभारणी

पोकरा व नरेगातून मिळालेल्या अनुदानातून १२० फूट लांबीचे आणि ३० फूट रुंदीचे शेड उभारले. या संगोपनगृहाची क्षमता सुमारे ४०० अंडीपुंज इतकी आहे. रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी लोखंडी रॅकची उभारणी केली. हंगामनिहाय व्यवस्थापन पद्धतीमध्ये बदल करत गेले. रेशीम कीटकांना दर्जेदार पाला उपलब्ध करण्यासाठी तुती बाग व्यवस्थापनाच्या कामांवर भर दिला.

साधारणपणे दोनशे अंडीपुंजांपासून रेशीमकोष उत्पादन घेण्यास सुरुवात केली. २०१९ मध्ये १०० अंडीपुंजाची पहिली बॅच घेतली. या बॅचमधून १०५ किलो रेशीमकोषाचे उत्पादन मिळाले. त्यानंतर रेशीमकोष उत्पादनातील चॉकी व अन्य खर्च कमी करून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

तुती लागवड

सुरुवातीच्या काळात दीड एकरावर केलेली तुती लागवड संगोपनगृहापासून लांब असल्याने ती मोडली. त्यानंतर वडील आणि भावाच्या नावावरील शेतजमिनीवर प्रत्येकी एक एकरांत नवीन तुती लागवड केली. सुरवातीची काही वर्षे चांगले उत्पादन मिळाले. रेशीम कीटकांच्या वर्षातून चार ते पाच बॅच घेतल्या जात. मात्र प्रति बॅचमधून अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. त्यामुळे तुती लागवड कमी करून केवळ एक एकरांत तुती बाग ठेवली. उर्वरित काढून टाकली.

रेशीम कीटकांना दर्जेदार तुती पाला उपलब्ध होण्यासाठी आणि तुती बागेची चांगली वाढ होण्यासाठी तुती बागेत नियोजनपूर्वक कामांवर भर दिला जातो. बैलजोडीच्या साह्याने मशागत केली जाते.

पहिल्या छाटणीनंतर साधारणपणे ४५ दिवसांत तुती झाडांची चांगली वाढ होते. छाटणी आणि मशागत केल्यानंतर शेणखत आणि रासायनिक खताच्या मात्रा दिल्या जातात. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी

असल्याने या काळात बॅच घेतल्या जात नाहीत. त्यापूर्वीच्या लॉटमधील १०० अंडीपुंजांपासून ६० किलो रेशीमकोषाचे उत्पादन घेतले आहे. उत्पादित रेशीमकोषाची विक्री बंगळूर मार्केटसह स्थानिक बाजारपेठेत करण्यात आली.

Sericulture Farming
Silk Farming : शेतकरी नियोजन : रेशीमशेती

मागील बॅचमधील कामकाज :

साधारणपणे २५ फेब्रुवारीला १२५ अंडीपुंज (चॉकी) आणून बॅच घेण्यात आली.

संगोपनगृहावर चॉकी आणण्यापूर्वी एक मोल्ट पास झाला होता. त्यानंतर उर्वरित मोल्ट शेडवर पास झाले.

संगोपनगृहामध्ये आणल्यानंतर तीन दिवसांनी तिसरा मोल्ट, त्यानंतर सात दिवसांनी चौथा मोल्ट पास झाला.

दरम्यानच्या काळात रेशीम कीटकांना दर्जेदार तुती पाला देण्यात आला. कीटकांची वाढ होईल तसे पाला देण्याचे प्रमाण वाढविण्यात आले.

या दरम्यान उन्हाळी वातावरणाने असल्याने रोगांचा प्रादुर्भाव जाणवला नाही. मात्र फॉर्मेलीनची नियमितपणे फवारणी करण्यात आली.

चंद्रिका टाकल्यानंतर चार दिवसांनी रेशीमकोष उत्पादनास सुरुवात झाली. १९ मार्चला रेशीम कोषाची काढणी करण्यात आली. काढणीनंतर उत्पादित कोषाची प्रतवारी करण्यात आली. असे साधारण ६० किलो चांगले, तर साडेचार किलो तुलनेने कमी दर्जाचे कोष उत्पादन मिळाले. उत्पादित कोषाची अरजखेडा येथील मार्केटमध्ये विक्री करण्यात आली.

आगामी नियोजन

सध्या उन्हाळी स्थितीमुळे शेडमध्ये बॅच घेण्यात आली नाही. मात्र आगामी बॅच नियोजनानुसार नवीन बॅचमधील कीटकांना पाला उपलब्ध होण्यासाठी १५ ते २० मे च्या दरम्यान तुतीची बागेची छाटणी करण्यात येणार आहे. पावसाचा अंदाज घेऊन छाटणीचा कालावधी थोडा मागे पुढे होऊ शकतो.

जून महिन्यात ही बॅच सुरू करून जुलैच्या पहिल्या आठवड्यात रेशीमकोष उत्पादन सुरू होईल, या पद्धतीने नियोजन केले जाईल. पुढील बॅच दोनशे अंडीपुंजाची घेतली जाईल.

चॉकी शेडवर आणण्यापूर्वी संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता केली जाईल. कारण पावसाळी स्थितीमुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्याचा रेशीम उत्पादनावर थेट परिणाम होतो. त्यासाठी दर्जेदार तुती पाला उपलब्धता, संगोपनगृहाचे व्यवस्थापनावर आदी कामांचे योग्य नियोजन केले जाईल.

अनुभवातून घेतला धडा

दर्जेदार तुती पाला उपलब्धतेसाठी शिफारशीत रासायनिक घटकांची फवारणी केली जाते. मात्र रेशीम अळ्यांना रासायनिक कीटकनाशक आणि घटकांचा उग्र वास सहन होत नाही. त्यामुळे पाला छाटणी करण्यापूर्वी काही दिवस आधी रासायनिक फवारणी टाळली जाते. तसेच छाटणी काळात तुती बागेजवळील शेतामध्ये देखील रासायनिक फवारणी केली जात नाही. यामागे मोठा अनुभव आहे. पोकरा योजनेअंतर्गत शेडनेट उभारणी केली आहे. त्यात दोडका, फ्लॉवर लागवड होती.

या शेडमध्ये पिकांवर घेतलेल्या रासायनिक फवारणीचा फटका जवळील रेशीम संगोपनगृहातील रेशीम कीटकांवर दिसून आला. हळूहळू विषबाधा होऊन कीटकांच्या कोष निर्मितीवर परिणाम झाला. अळ्या मेल्या नाहीत, मात्र त्यांनी रेशीमकोष तयार केले नाहीत. त्यामुळे संपूर्ण एक वर्षातील बॅच फेल गेल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर रासायनिक फवारणीचे योग्य नियोजन करून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. हा अनुभवातून घेतलेला धडा असल्याचे श्रीकांत सांगतात.

श्रीकांत पवार, ९९६०७३९४८८

(शब्दांकन : विकास गाढवे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com