Sustainable Farming: चीनमधील ग्रामीण, शाश्वत शेती विकासाचे धोरण

China Smart Agriculture: चीन सरकारने ग्रामीण विकास करताना आधुनिकता, पारंपरिक वारसा आणि शाश्वत शेती यांचा समतोल साधून कृषी पर्यटनाला चालना दिली आहे. येथील सरकारने स्थानिक उत्पादनांना शहरी बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon
Published on
Updated on

डॉ.विवेक भोईटे

Rural Development: चीन देशातील सरकारी विभागांनी भविष्यातील संधी लक्षात घेऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित शेतीमालाची विक्री करण्यासाठी एक मजबूत पायाभूत व्यवस्था तयार केली आहे. यासाठी १५ गावांचा समूह तयार करून, त्यांना उच्च गुणवत्ता असलेला भाजीपाला, फळे, दूध, नैसर्गिक उत्पादने, तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ विक्रीसाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीवर पीक उत्पादन वाढवून आणि त्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल थेट बाजारपेठेपर्यंत पोहोच करण्यावर भर दिला आहे.

यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला आणि स्थानिक शेती उत्पादनांना प्रोत्साहन मिळाले. या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे शहरी भागाशी जोडणारे रस्ते आणि वाहतूक सुविधा सुधारण्याचे काम येथील सरकारने प्राधान्याने केले आहे. नवीन महामार्ग, पूल आणि स्वच्छ पर्यावरणास मदत करणाऱ्या उपाययोजना केल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत योगदान मिळाले आहे.

पारंपरिक वारशाचे जतन :

चीन देशातील ग्रामीण भागात प्राचीन घरे आणि पारंपरिक वास्तुशिल्प जतन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने योजना आखली आहे. जुन्या घरांचे नूतनीकरण करून त्यांना आकर्षक स्वरूप देण्यात आले. याचा वापर पर्यटकांना राहण्यासाठी केला जातो. वाढत्या पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्रामीण भागातील जुन्या घरांना नवीन रंग देण्यात आला. सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी लोकसहभागातून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक जागांमध्ये वाचनालय, कला केंद्र, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विविध गावांमध्ये विभागनिहाय शेती संबंधित प्रदर्शन केंद्र आणि कृषी पर्यटनासाठी सुविधा उपलब्धकरून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमांमुळे गावांना ऐतिहासिक वारसा आणि आधुनिकतेचा संगम साधता आला आहे. गावस्तरावरील विविध उपक्रमामुळे जगभरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत.

Rural Development
Smart Dairy Technology: गोठे होताहेत ‘आयओटी’ स्मार्ट

आधुनिक शहरीकरणातून पर्यटनाचा विस्तार :

चीन देशातील काही शहरी भागांमध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण विचारांच्या आधारे ग्रामीण पर्यटन आणि कृषी व्यवसाय यांचा संगम साधला गेला आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे शांघायमधील ओरिएंटल पर्ल रेडिओ आणि टीव्ही टॉवर. शहरी आणि ग्रामीण भाग जोडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

यातून शहर तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी तयार झाल्या आहेत. शहरी भागातही पर्यटन आधारित आर्थिक विकासाचे मॉडेल विकसित झाले आहे. यामुळे शहरीकरण आणि शेती क्षेत्राचे संतुलन साधले गेल्याने स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा झाल्या आहेत. थेट विक्री केंद्राद्वारे शहरी ग्राहकांपर्यंत शेतीमालाचा पुरवठा केला जातो.

Rural Development
Agriculture Technology Center : कर्जत येथे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र

पर्यटकांचे आकर्षण :

१) शांघाय शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ओरिएंटल पर्ल रेडिओ टॉवर हा आधुनिक वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. हा टॉवर ३५१ मीटर उंच असून पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

२) २६३ मीटर उंचीवरून ‘स्काय वॉक’ करताना शांघाय शहराचे अद्भुत दृश्य दिसते.

३) २५९ मीटर उंचीवर असलेल्या काचेच्या मजल्यावरून खाली पाहताना हृदयाचा ठोका चुकतो.

४) यांगत्सी नदीवरील सफारीतून ऐतिहासिक आणि आधुनिक इमारतींच्या प्रकाशयोजनेचे अप्रतिम दृश्य दिसते.

शाश्वत शेती, पर्यावरण संरक्षण धोरण :

चीनने शाश्वत शेतीला प्राधान्य दिले आहे. पर्यावरण संतुलनासाठी जैविक शेती, सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर आणि जमिनीच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रोत्साहन दिले जाते. सेंद्रिय शेती पद्धतीवर भर दिला आहे. याबरोबरीने जलसंधारण आणि पुनर्वापर तंत्रज्ञानाचा अवलंब मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. कृषी अवशेष पुनर्वापर आणि हरित तंत्रज्ञानाचा विकासावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यामुळे शेती उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत झाली, प्रदूषण कमी झाले आणि दीर्घकालीन आर्थिक फायद्याचा पाया घातला गेला आहे. स्थानिक प्रशासनाने शहरी तसेच ग्रामीण भागात नद्यांचे शुद्धीकरण, प्लॅस्टिक बंदी, कचऱ्याचे पुनर्वापरावर भर दिला आहे.

सामुहिक प्रयत्नांना यश :

चीन सरकारने दुर्गम डोंगराळ भागांमध्ये कृषी पर्यटनाला चांगल्या प्रकारे गती दिली आहे. झेजियांग प्रांतातील दाझूयान आणि अंजी जिल्ह्यांमधील डोंगराळ भागात कृषी पर्यटनाचा प्रभावी प्रकल्प राबवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी वाहतूक आणि इतर सेवा अपुऱ्या प्रमाणात होत्या याठिकाणी स्थानिक गावकऱ्यांना एकत्र करून विविध पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला. यातून विविध पातळीवर विकासाला दिशा मिळाली आहे.

Rural Development
Agriculture Technology: मळणी यंत्राच्या विविध यंत्रणा

सरकारने पायाभूत विकास करताना मुख्य रस्त्यांचे नूतनीकरण केले. तसेच गरजेनुसार वाहतुकीला सुलभ होईल या पद्धतीने पुलांचे बांधकाम केले. शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री सुलभ होण्यासाठी तसेच पर्यटकांना विविध गोष्टींची खरेदी सहजपणे करता यावी,यासाठी स्थानिक कृषी उत्पादने आणि सेंद्रिय शेतीमाल विक्री केंद्रांची विविध गावांमध्ये उभारणी करण्यात आली. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शेती आणि निसर्ग पर्यटनाला चालना दिली आहे. सरकारी विभाग तसेच गावकऱ्यांच्या सामुहिक प्रयत्नातून शेतकरी तसेच स्थानिक कारागिरांचे उत्पन्न वाढले. शेतकऱ्यांना उद्योगवाढीसाठी संधी तयार झाल्या यातून गावपातळीवर रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे.

शिक्षण, व्यवसाय कौशल्य विकास कार्यक्रम :

भविष्यातील गरज लक्षात घेऊन येथील सरकारने शिक्षण आणि कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे. लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते. त्यादृष्टीने शिक्षण धोरणात महत्त्वाचे बदल करण्यात झाले आहेत. विद्यार्थ्यांना प्रकल्प आधारित शिक्षण उपलब्ध आहे. शेतकरी आणि तरुणांसाठी कृषी तंत्रज्ञान आणि नवसंशोधनाबाबत विशेष भर दिला असून स्वतःच्या व्यवसायासाठी नवीन संधी शोधण्यास प्रेरणा दिली जाते. यामुळे कौशल्यवाढीस मदत झाली असून ग्रामीण भागातील तरुणांना आर्थिक स्वावलंबनाच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

एमबीए आणि इंजिनिअरिंगच्या महाविद्यालयांमध्ये शिस्तबद्ध आणि देशप्रेमी वातावरण आहे.विद्यार्थांना नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी स्वतः उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. ९० टक्के विद्यार्थी सायकलचा वापर करतात, सार्वजनिक वाहतूक स्वच्छ आणि शिस्तबद्ध आहे. पोलिस व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी हॉर्नच्या आवाजाची गोंधळ नाही.

ग्रामीण भागात पर्यावरणपूरक कृषी पर्यटन :

चीन सरकारने ग्रामीण भागाच्या विकासासाठी स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करण्यावर भर दिला आहे. यासाठी पर्यावरण संवर्धन आणि कृषी पर्यटनावर भर दिला आहे. या धोरणामुळे ग्रामीण भागात पर्यटन वाढले, उत्पन्नाचा स्रोत तयार झाला. कृषी आणि पर्यटन क्षेत्रामध्ये समतोल विकास घडून आला.

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढ मिळाली. स्थानिक रोजगार संधी वाढवून जीवनशैली उंचावली आहे. ग्रामीण विकास धोरणामध्ये आधुनिकता, शाश्वत शेती आणि कृषी पर्यटन यांचा प्रभावी समन्वय साधल्याने स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ मिळाली. शेतीच्या परिसरात शेतकऱ्यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केले आहेत. याठिकाणी पर्यटकांच्या जेवणाची सोय केली जाते. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि उत्पन्न मिळत असून, ग्रामीण पर्यटनामुळे कोट्यवधींची उलाढाल होत आहे.

स्थानिक शेतकऱ्यांना कंपनीत नोकरी करण्याऐवजी स्वतःच्या शेतातून दर्जेदार आणि रसायन अवशेषमुक्त भाजीपाला, फळे, दूध, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि नैसर्गिक पेय निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले जाते. ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार संधी वाढल्या. तसेच पर्यावरणपूरक आणि जैविक शेतीला प्रोत्साहन मिळाले. हे मॉडेल आपल्या देशासाठी दिशादर्शक आहे. कारण यामध्ये शाश्वतता आणि आर्थिक विकास यांचा योग्य समतोल साधलेला आहे.

संपर्क : डॉ.विवेक भोईटे, ७७२००८९१७७

(कृषी विज्ञान केंद्र, बारामती,जि.पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com