Kesar Mango : ऑक्टोबरच्या सुरुवातीसच केसर आंब्याला मोहर

Mango Farming : यंदा निसर्गाची अनुकूलता म्हणा की आणखी काही, पण मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात केसर आंब्याला ऑक्टोबरच्या सुरुवातीसच बऱ्याच ठिकाणी मोहर आला आहे.
Kesar Mango
Kesar MangoAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar News : यंदा निसर्गाची अनुकूलता म्हणा की आणखी काही, पण मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात केसर आंब्याला ऑक्टोबरच्या सुरुवातीसच बऱ्याच ठिकाणी मोहर आला आहे. मोहर येण्याचे प्रमाण वाढत असून, बागा अपेक्षेच्या आधी मोहरल्यास हापूसच्या बरोबरीने केसर बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादकांना चांगला दर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे म्हणाले, ‘‘केसर आंब्याला कोकणाव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात नियमित मोहर येण्याचा कालावधी म्हणजे डिसेंबर, जानेवारी. याची फळे १५ ते २० मे दरम्यान काढायला सुरुवात होऊन १५-२० जूनपर्यंत चालतात. मात्र आता कल्टार देण्याचे तंत्र विकसित झाले.

Kesar Mango
Kesar Mango : सातपुड्याच्या पायथ्याशी केसर आंब्याची विक्री

हे कल्टार जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये दिल्यास केसर आंब्यास नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात हमखास मोहर येतो. याची फळे मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच काढणीस येतात. ही काढणी अगदी १५-२० मेपर्यंत सुरू राहते. नुकतेच बऱ्याच बागांना भेटी दिल्या. त्या वेळी काही बागांमध्ये डोळे फुगलेले आहेत. त्यातूनही मोहर येतो की नवती, हे सध्याच सांगणे कठीण आहे.

Kesar Mango
Miyazaki Mangoes : शेतकऱ्यानं कमालच केली, जगातला सगळ्यात महाग आंबा भारतात पिकवला

आंब्याला मोहर येण्यासाठी मेच्या शेवटी छाटणी केल्यास जूनमध्ये मोठ्या प्रमाणावर पालवी येते. ही पालवी कीड रोगापासून संरक्षण करून ०: ५२ :३४ च्या फवारण्या करून पक्व करून घेतली जाते. ज्यावर परत ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीस पालवी येते. मधल्या काळात जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये कल्टार दिलेले असते

तेव्हा अशा आलेल्या पालवीला परत पक्व करून घेतल्यास नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात हमखास मोहर येतो, हे आता सिद्ध झाले आहे.’’ मोहोर दिसायला लागलेल्या बागांमध्ये संदीप जाधव (रा. रानवडगाव, ता. निफाड), सागर गांवधरे (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) आणि विठ्ठल चौधरी (पार्डी, ता. वाशी, जि. धाराशिव) यांचा समावेश असल्याचे डॉ. कापसे म्हणाले.

...यामुळे आला असावा मोहर

‘‘या वर्षी एक-दीड महिना लवकर काही बागांमध्ये अगदी १५ ते २० टक्क्यांपर्यंत मोहर आला. कारण या वर्षीचा पावसाळा हा अतिशय कमी-जास्त राहिला आणि त्यात कल्टार दिलेले. नंतर जी फूट यायला पाहिजे होती ती आली नाही. कारण मध्ये पाऊसच नव्हता. मग त्याऐवजी जूनमधील काही काडी पक्व झाली असावी आणि त्यावर आता मोहर आलेला असावा,’’ असे डॉ. कापसे म्हणाले.

Kesar Mango
Mango Cultivation : अत्याधुनिक अतिघन आंबा लागवड

डॉ. भगवानराव कापसे यांचा सल्ला...

- ज्या बागायतदारांनी कल्टारचा वापर केला आहे, त्यांनी अशा पालवीवर ० : ५२ : ३४ चा ७ ग्रॅम प्रतिलिटर प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. ऑक्टोबरच्या शेवटी एक फवारणी १३ : ० : ४५ ची ८ ग्रॅम प्रतिलिटर प्रमाणे घ्यावी. जेणेकरून, नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात चांगल्यापैकी मोहर येऊ शकेल.

- ज्यांनी कल्टार दिलेले आहे, त्या बागेत आता किमान ७५ टक्के मोहर येईपर्यंत पाणी देऊ नये, असा नियम आहे. परंतु पाऊसच पडला नाही आणि बाग पूर्ण सप्टेंबरपासून बिनापाण्याची आहे. जमीन हलकी आहे, अशा बागायतदारांनी मात्र हलके एखादे पाणी द्यावे.

- ज्यांनी कल्टारही दिलेले आहे आणि पाण्याची सुद्धा गॅरंटी नाही, अशा शेतकऱ्यांनी बागेमध्ये लगेच अच्छादन करावे. त्यात दोन्हीही काडी, कचरा आणि प्लॅस्टिक आच्छादन करावे. फारच ताण पडण्याची शक्यता असल्यास बागेत मोहरही घेणे टाळावे, जेणेकरून बागेला शॉक बसणार नाही. अशा बागायतदारांनी वेळोवेळी लाइफ सेविंग तंत्र वापरून बाग शॉक घेणार नाही, याची काळजी घ्यावी.

या दिवसात फक्त हापूस आंब्याला कोकणात काही प्रमाणात मोहर येतो. बारामासी या वाणास तर वर्षभर मोहर येतो. मात्र हा वाण व्यापारीदृष्ट्या तेवढा महत्त्वाचा नाही. केसरला आता आलेल्या मोहराची फेब्रुवारीमध्ये फळ काढणीस येऊ शकतात. ज्याला हापूस सारखाच प्रीमियम भाव मिळू शकतो.
- डॉ. भगवानराव कापसे, उपाध्यक्ष, महाकेसर आंबा बागायतदार संघ
यंदा परतीचा पाऊस नाही. हापूसच्या भागात तो नसतो. तो आला तर मोहर कमी येतो. आता बागेत २ ते ३ टक्के मोहर दिसत आहे. येत्या पंधरवड्यात आमच्या बहुतांश बागेत मोहर येईल.
- सागर गांवधरे, भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले. शिवाय, आपण कंटाळाचीही प्रॅक्टिस केली होती. त्यामुळे आमच्या जुन्या बागेतील दहा ते पंधरा झाडांना तसेच नव्या बागेतील काही झाडांना मोहर आला आहे.
- संदीप जाधव, रानवडगाव, ता. निफाड, जि. नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com