Kesar Mango Cultivation : सघन पद्धतीने केसर आंबा लागवडीचे तंत्र

Kesar Mango :महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने १० मीटर बाय १० मीटर अंतरावर आंबा लागवडीची शिफारस आहे. मात्र ५ × ५ किंवा ५ × ६ मीटर अंतरावर सघन लागवड करणे शक्य आहे.
Kesar Mango Cultivation
Kesar Mango CultivationAgrowon
Published on
Updated on

प्रवीण मांजरे, डॉ. एम. बी. पाटील
------------------------
Intensive Kesar Mango Cultivation : महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने १० मीटर बाय १० मीटर अंतरावर आंबा लागवडीची शिफारस आहे. मात्र ५ × ५ किंवा ५ × ६ मीटर अंतरावर सघन लागवड करणे शक्य आहे. यात झाडाची संख्या चारपटीने वाढते. छाटणीसह अन्य कामे थोडी वाढली तरी अधिक उत्पादन मिळू शकते.

आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन उपयुक्त ठरते. जमिनीचा सामू ६.५ ते ८.० इतका असावा. मात्र चुनखडीचे प्रमाण जर १० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असल्यास तिथे आंबा लागवड टाळावी.

आंबा लागवडीसाठी १० x १० मीटर अंतरावर शिफारस आहे. मात्र सघन पद्धतीने ५ × ५ किंवा ५ × ६ मीटर अंतरावर आंब्याची लागवड करता येते. यात एकरी झाडांची संख्या चार पटीने वाढते. परिणामी ४ ते ५ वर्षांत एकरी ३ ते ४ टन उत्पादन शक्य होते. आठ वर्षांच्या बागेपासून हेच उत्पादन ६ ते ७ टनांपर्यंत पोचते.


सघन लागवड करतेवेळी चौरस पद्धतीऐवजी आयताकृती पद्धतीनेच करावी. सूर्यप्रकाश जास्तीत जास्त कलमांमध्ये सर्वत्र पोहोचण्यासाठी दोन कलमांतील अंतर उत्तर-दक्षिण व दोन ओळींतील अंतर पूर्व-पश्‍चिम ठेवावे. कलमांचा सांगाडा तयार झाल्यानंतर तिसऱ्या वर्षांच्या सुरवातीला कलमांची चांगली वाढ होऊन भरपूर मोहोर येतो. त्यामुळे आपणास या बागेतून २.५ ते ४ पट उत्पादन मिळते.

इजिप्त आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेक ठिकाणी ३ x १ मीटर इतकी कमी अंतरावर अतिघन लागवडही यशस्वी झाली आहे. त्यात हेक्‍टरी ३३३३ झाडे बसतात.

गेल्या पाच वर्षांत आपल्याकडेही २ x ४ मीटर, २ x ५ मीटर, ३ x ५ मीटरवर आंबा लागवड केली जाऊ लागली आहे. सघन लागवडीमध्ये झाडाचा घेर नियंत्रित ठेवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने छाटणी तसेच वाढरोधकांचा वापर करणे अत्यंत गरजेचे असते.

सघन लागवडीचे फायदे :
१) कमी क्षेत्रात योग्य व्यवस्थापनातून अधिक उत्पादन घेता येते.
२) झाडे लहान राखल्यामुळे फळांची विरळणी, फवारणी, छाटणी, वाहतूक इ. गोष्टी करणे सोपे होते.
३) आंबा फळांची काढणी, खुडणी व झेला न वापरता हाताने करणे शक्‍य होते.
४) खतांचा व अन्नद्रव्यांचा योग्य व काटेकोर वापर होतो.

Kesar Mango Cultivation
Kesar Mango : यंदा केसर आंबा लवकर

लागवडीची पद्धत :
पारंपारिक आंबा लागवडीसाठी साधारणतः १ x १ x १ मीटरच्या खड्ड्यांची शिफारस असते. सघन लागवडीमध्ये दोन झाडांतील अंतर मुळातच कमी ठेवले जात असल्यामुळे खोदयंत्राच्या साह्याने एक मीटर रुंद व एक मीटर खोल अशी चारी/नाली खोदून घ्यावी. किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने एकाच ओळीत दोनदा मोठा चर खोदावा. म्हणजे किमान दीड फूट खोल चर होईल. त्यानंतर लागवडीच्या अंतरावर अजून एक ते दीड फूट खोल खड्डा करून घ्यावा.


खड्डा भरताना त्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि शिफारशीत कीडनाशक पावडर मिसळून तयार केलेले मिश्रण थोडी शीग येईल इतके भरावे. जमीन भारी असल्यास त्यात ३० टक्के चांगला मुरूम मिसळावा. मात्र हलकी असेल, तर त्यात ६० टक्‍क्‍यांपर्यंत गाळ मिसळावा. चांगला पाऊस पडून किंवा पाणी देऊन भरलेली मोकळी माती दबल्यानंतर कलमांची किंवा इनसिटू पद्धतीने लागवड करावी.

प्रत्यक्ष लागवड करताना पिशवीच्या आकाराचा लहानसा गोलाकार खड्डा खणून त्यामध्ये ५०० ग्रॅम लिंबोळी पेंड, २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरिडी, २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम रायझोबिअम जिवाणूसंवर्धक मिसळून कलम लागवड करावी.

Kesar Mango Cultivation
Kesar Mango Market : केसर आंब्यांचे दर टिकून

कलमांची निवड आणि निगा ः
-रोपवाटिकेतून अधिक उंचीची कलमे घेत असताना पिशवीत मुळांची गुंडाळी झालेली नाही, याची खात्री करावी.
-एक वर्ष वयाची १० × १४ इंच आकाराच्या पिशवीत वाढलेली कलमे लावावीत.
-कलमाला आधारासाठी बांबूची काठी पिशवीतील कलमाच्या मातीच्या गड्ड्याशेजारी लावावी. कलम या काठीला बांधून घ्यावे.
वाऱ्यापासून कलमाचे संरक्षण होईल.

- पाऊसमान पाहून सप्टेंबरच्या पहिल्या – दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस संपताच प्रत्येक खड्ड्यावर काडी-कचऱ्याचे किंवा उसाच्या पाचटाचे वीतभर उंचीचे रोपाभोवती आच्छादन करावे. त्यावर थोडी माती टाकावी. आच्छादन करताना त्यात थोडी दाणेदार कीडनाशकाची भुकटी मिसळावी.
-कलमे केल्यानंतर किंवा तयार कलमे लावल्यानंतर गावठी रोपावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकणे गरजेचे असते.

- पावसाचा अंदाज पाहून पावसाळ्यात व जरुरीप्रमाणे वर्षभर कलमास पाणी द्यावे.
- साधारणपणे पहिले वर्षभर दर २० दिवसांच्या अंतराने १० ग्रॅम युरिया आळ्यातील मातीत मिसळून द्यावा. कलमांच्या वाढीला मदत मिळते.
-कलमांचे भटक्‍या जनावरांपासून संरक्षण करावे.
- उन्हाळ्यात कलमांना सावली करावी.
- कलमी फांद्यांवरील मोहर वेळोवेळी काढावा.
- आळ्यातील तण वेळोवेळी काढीत जावे.

दुसऱ्या वर्षी पाऊस पडताच शिफारशीप्रमाणे शेणखत व रासायनिक खत द्यावे. या प्रमाणे तीन ते चार वर्षांपर्यंत झाडांची चांगली वाढ होऊ द्यावी.
- जमिनीपासून सुमारे अडीच ते तीन फूट उंचीपर्यंत कलमांवरील बाजूच्या फांद्या काढून टाकाव्यात.
- कलम लागवड केल्यानंतर दरवर्षी पावसाळ्यानंतर १ टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी. तसेच बुंध्याला ५० सें.मी. पर्यंत बोर्डोमिश्रणाचा लेप लावावा. त्यामुळे रोगाचे प्रमाण कमी होते.
- वेळोवेळी नवीन फुटीवर येणाऱ्या रोग व किडींपासून संरक्षण करावे.

सिंचन व्यवस्थापन ः
फळ बागेस पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करावी. बागेला सुरुवातीपासून ठिबकद्वारे पाणी द्यावे. त्यासाठी बुंध्यात एक व उत्तर- दक्षिण बाजूला १ फूट अंतरावर ८ लिटर प्रति तास क्षमतेचे ड्रीपर लावावेत. कालांतराने उत्पादन सुरू झाल्यावर कलमाचा विस्तार उत्तर-दक्षिण वाढण्याच्या दृष्टीने उत्तर-दक्षिण असे झाडाच्या बुंध्यापासून पूर्वेला व पश्‍चिमेला पाणी देण्याची सोय करावी.

सुरुवातीच्या कालावधीत १५ ते १६ लिटर पाणी प्रति दिवस द्यावे. पहिली दोन वर्षे कलमांना दररोज पाणी देण्याऐवजी दोन-तीन दिवसाआड पाणी द्यावे. म्हणजे मुळ्या खोलवर जातील. उत्पादन सुरू झाल्यावर ६० ते ७० लिटर पाणी प्रति दिवस ठिबक पद्धतीने द्यावे. आंबा फळे काढणीपूर्वी १५ दिवस पाणी देणे बंद करावे.

खत व्यवस्थापन :
लागवडीनंतर पहिल्या वर्षी एक टोपले शेणखत, २५०-३०० ग्रॅम युरिया, २५०-३०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ५०-१०० ग्रॅम एमओपी व ०.५ किलो निंबोळी पेंड ही खताची मात्रा द्यावी. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी खतांच्या मात्रा त्याच प्रमाणात वाढवून द्याव्या.

दहाव्या वर्षी प्रति झाड १० टोपली शेणखत, तीन किलो युरिया, तीन किलो एसएसपी, एक किलो एमओपी व १० किलो लिंबोळी पेंड एवढी खताची मात्रा द्यावी. त्यानंतर पुढील वर्षी हीच मात्रा वापरावी. खतमात्रा कलमाच्या विस्ताराच्या थोडीशी आत सुमारे ४५ ते ६० सें.मी. रुंद आणि १५ सें.मी. खोल वर्तुळाकार चर खणून द्यावी.

या सोबतच २०० ग्रॅम अ‍ॅझोटोबॅक्टर व २०० ग्रॅम पीएसबी द्यावे. ठिबक सिंचनातून शिफारशीनुसार विद्राव्य खते द्यावीत. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर देखील करणे आवश्यक आहे त्यामुळे शिफारशीप्रमाणे वापर करावा.

छाटणी तंत्र ः
वाढ मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने सघन लागवडीमध्ये छाटणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलम दीड ते दोन फूट उंचीचे होईपर्यंत एकच खोड राहू द्यावे. नंतर शेंडा मारावा. त्या ठिकाणाहून ३ ते ४ फांद्या निघतील. त्यातील चांगल्या व भरघोस वाढलेल्या चारही दिशेने वाढतील अशा तीन-चार फांद्या ठेवाव्यात. परत या फांद्यांचा दोन ते तीन पेरानंतर पुन्हा एकदा शेंडा मारावा. अशाप्रकारे कलमांचा सांगाडा तयार करून घ्यावा.

वेड्यावाकड्या वाढलेल्या तसेच कमजोर फांद्या काढून टाकाव्यात. जमिनीपासून दीड ते दोन फूट अतिरिक्त फुटलेला फुटवा काढावा. सांगाडा तयार झाल्यानंतर तिसऱ्या वर्षाच्या सुरवातीला कलमांची चांगली वाढ होऊन भरपूर मोहोर येतो. छाटणी केलेल्या कलमांची वाढ होत असताना पहिली दोन ते तीन वर्षे उत्पादन घेऊ नये. आलेला मोहोर काढून टाकावा. हा काळ कलमांचा सांगाडा अधिक भक्कम करण्यासाठी उपयोगी ठरेल. योग्य खत व पाणी व्‍यवस्‍थापन केल्‍यास तिसऱ्या- चौथ्या वर्षापासून उत्पादन घेण्यास सुरुवात करावी.

वाढ रोधकाचा वापर ः
आंब्यापासून दरवर्षी उत्पादन मिळण्यासाठी पॅक्लोब्युट्राझॉल या वनस्पती वाढ नियंत्रकाचा वापर करावा. वर्षातून एकदा १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान पूर्ण वाढलेल्या झाडाच्या पूर्व -पश्‍चिम व उत्तर- दक्षिण विस्तार मीटरमध्ये मोजून प्रति मीटर व्यासास पॅक्लोब्युट्राझॉल (२३ टक्के) ३ मि.लि.

प्रति ३ ते ६ लिटर पाण्यात मिसळून बुंध्याभोवती झाडाच्या विस्ताराच्या निम्म्या अंतरावर खणतीने १० ते १२ सें.मी. खोल असे २५ ते ३० खड्डे मारून जमिनीत ओलावा असताना समप्रमाणात ओतावे. नंतर हे खड्डे बुजवून टाकावेत. हे द्रावण मोठ्या पावसात किंवा जास्त पाणी साचलेले असताना देऊ नये. द्रावण देण्यापूर्वी बुंध्याजवळील तण काढून टाकावे.

अन्य व्यवस्थापन ः
- पावसाळा संपल्यावर ते फळवाढीच्या अवस्थेपर्यंत एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा.


- आंब्यास मोहोर येऊन फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती आकाराची असताना पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्के) च्या तीन वेळा फवारण्या कराव्यात. यामुळे फळगळ कमी होते, फळांचे वजन व आकार वाढून फळांची प्रत वाढते. साखर : आम्लता याचे प्रमाण योग्य होते. फळाला बाहेरून व आतील गराला आकर्षक केशरी रंग येतो. फळाचा टिकाऊपणा वाढून साक्याचे प्रमाण कमी होते.


- कलमांचा आकार छोटा असल्यामुळे अनावश्यक फांद्याची छाटणी किंवा काढणीनंतर विस्तार मर्यादित ठेवण्यासाठी छाटणी गरजेची आहे.

प्रवीण मांजरे (आचार्य पदवी विद्यार्थी), ८८८८३४८०५०
(प्रवीण मांजरे हे आचार्य पदवी विद्यार्थी असून, डॉ. एम. बी. पाटील हे उद्यानविद्या महाविद्यालय अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे सहयोगी अधिष्ठाता आहेत. )

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com