
के. एम. मोहने, राजेश तिवारी
Biodynamic Compost : गेल्या काही वर्षांमध्ये शेतीसाठी सातत्याने रासायनिक खतांचा वापर केला जात आहे. कुटुंबातील जनावरांचे प्रमाण कमी होत गेल्यामुळे शेणखतही उपलब्ध नाही. ते विकत घेऊन शेतीमध्ये वापरणेही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर चालले आहे.
सेंद्रिय खतांच्या अभावामुळे जमिनीची सुपीकताच धोक्यात येत आहे. कारण सेंद्रिय पदार्थ हेच जमिनीमधील उपयुक्त जिवाणूंचे मुख्य अन्न आहे. जिवाणूच्या अभावामुळे रासायनिक खतांच्या दिलेल्या मात्रांनाही प्रतिसाद मिळत नाही.
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे जमिनीची सुपीकता दर्शवते. ते किमान १ टक्क्यापेक्षा अधिक असले पाहिजे. बहुतांश शेतातील माती तपासणी अहवालामध्ये हे प्रमाण ०.२० पेक्षा कमी आढळते. हे प्रमाण जर वाढविण्यासाठी आपल्या शेतातच उपलब्ध होणाऱ्या सर्व प्रकारच्या सेंद्रिय पदार्थांचे कंपोस्ट करावे लागणार आहे.
शेतकऱ्यांकडे सोयाबीन कुटार/काड, कापूस वेचणीनंतर पऱ्हाट्या, उडीद मुगाचे कुटार, उसाचे पाचट, भाजीपाला इ. पिकांचे काढणी पश्चात अवशेष आणि शेतातील तण हे सेंद्रिय घटक दर काही काळानंतर उपलब्ध होत असतात. त्यांचे कंपोस्टिंग व पुनर्चक्रीकरण करण्यासाठी १९२४ मध्ये ऑस्ट्रियन विचारवंत रूडॉल्फ स्टेनर यांनी मांडलेली बायोडायनॅमिक कंपोस्टिंग पद्धत उपयुक्त ठरते.
मात्र ही पद्धत आपल्या भारतीय शेतकऱ्यांना वापरण्याइतकी सोपी करण्यासोबतच तिचा प्रचार, प्रसार करण्याचे काम सर्ग विकास समिती सातत्याने करत आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे ‘बायोडायनॅमिक कंपोस्टिंग’ ही पद्धत अल्प खर्चात व कमी काळात शेतकऱ्यांना सेंद्रिय खत उपलब्ध करते.
बायोडायनॅमिक कंपोस्ट करण्याची पद्धत
मुख्य पीक काढणीनंतर पीक अवशेष न जाळता शेतात झाडांच्या सावलीला जमा करावे.
कापणीनंतर पीक अवशेष ओलसर असताना पूर्ण सुकले असतील तर ते ३ ते ४ दिवस हलके हलके पाणी मारत भिजवून घ्यावे.
शेतातच उंचवट्याच्या ठिकाणी १५ फूट लांब व ५ फूट रुंद जागा आखून घ्यावी. या जागेत ओलसर पीक अवशेषांचा १ फुटाचा थर रचावा.
त्यावर गाईच्या शेणापासून तयार करण्यात येणारे कंपोस्ट कल्चर (बायोडायनॅमिक सी.पी.पी.) १ किलो या प्रमाणात पाण्यात मिसळून ते पाणी शिंपडावे. हे द्रावण तयार करण्यासाठी एका बादलीमध्ये १३ लिटर पाणी घेऊन, त्यात १ किलो कल्चर मिसळावे.
ते चांगल्या पद्धतीने मिसळले जाण्यासाठी सुमारे १ तास सरळ-उलट भोवरा पडेल इतक्या वेगाने फिरवावे. हे द्रावण १०० लिटर पाण्यात मिसळून ते वाढवून घ्यावे. हे द्रावण आपल्याला प्रत्येक थरावर शेणकाल्यात मिसळून १० ते १५ लिटर या प्रमाणात शिंपडायचे आहे.
पुढे पहिल्या थरावर एक फुटाचा ताज्या हिरव्या पाल्याचा थर रचावा. त्यावर आपल्याच शेतातील ६ ते ७ घमेले माती पसरवून घ्यावी. त्यावर सी.पी.पी. युक्त शेणकाला १० ते १५ लिटर शिंपडावा. हिरव्या पाल्यामुळे पीक अवशेषांचे कर्ब व नत्र गुणोत्तर सुधारून कुजण्याची प्रक्रिया सोपी होते.
अशा प्रकारे ४ ते ५ फूट उंचीपर्यंत एकावर एक थर रचून घ्यावेत.
तयार झालेला संपूर्ण ढीग सर्व बाजूंनी शेण काल्याने लिंपून घ्यावा.
पुढे या लिंपलेल्या ढिगास तडे पडू शकतात. ते शेण काल्याने वेळोवेळी बंद करावे.
एक महिन्यानंतर ५० टक्क्यांपर्यंत पीक अवशेष व हिरवे पाले कुजतात. या प्रक्रियेत ढिगाचा आकारसुद्धा कमी होतो.
त्यानंतर ढिगाची उकरी करून सरमिसळ करून घ्यावी. त्यावर पुरेसे पाणी टाकून ढीग पुन्हा आकारून लिंपून घ्यावा. या वेळी पुन्हा कंपोस्टिंग कल्वर सी.पी.पी. वापरण्याची आवश्यकता नाही.
पुढील ४० ते ४५ दिवसांत सर्व पदार्थ कुजून दर्जेदार कंपोस्ट मिळेल.
एक एकरामधील पीक अवशेषांचे या प्रकारे दीड ते दोन ढीग (डेपो) लागतील.
...असा होतो फायदा
कृषी विद्यापीठांमध्ये करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार, या बायोडायनॅमिक पद्धतीने तयार केलेल्या कंपोस्टमध्ये ४० टक्के सेंद्रिय कर्ब, नत्र २.२७ टक्के, सल्फर १ टक्का, पालाश १ टक्का व मॅंगेनीज सारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात.
यामुळे एक एकरातील पीक अवशेषांचे कंपोस्ट वापरल्यास पिकासाठी लागणारी काही अन्नद्रव्य मात्रा यातून मिळते. मात्र सेंद्रिय खतांची पूर्ण गरज यातून भागू शकते. या पद्धतीने पदार्थ संपूर्ण कुजल्यामुळे तणांचे बी आणि किडींचे कोष याचाही बंदोबस्त होतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.