
Wildlife Engineering : गोष्ट आहे चेक प्रजासत्ताकाच्या ब्रडी प्रदेशातील. या प्रदेशातील व्हाल्टोवा नदी खोऱ्यातील एका तलावाची... या प्रदेशात देशाच्या संरक्षण खात्याच्या ताब्यात काही वन जमिनींचे मोठे क्षेत्र आहे. त्यात एक मोठा नैसर्गिक तलाव आहे. गेली अनेक शतके या तलावातील पाणी जमिनीत मोठ्या प्रमाणात मुरणे सुरू होते. त्यामुळे तलावापासून दूरदूरपर्यंत भूजल पातळी चांगली वर होती.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी संरक्षण खात्याला या तलावापासून काही अंतरावर आजूबाजूला बांधकामे करायची होती. त्यासाठी जमिनीतील पाण्याचा निचरा होणे आवश्यक होते, कारण या पाण्याचा इमारतींच्या पायाला मोठा धोका होता. त्यामुळे तलावातून नैसर्गिकरीत्या बाहेर पडणाऱ्या प्रवाहाव्यतिरिक्त संरक्षण खात्याने विविध ठिकाणी चर खोदून या तलावातील पाणी कृत्रिमरीत्या बाहेर काढण्यास सुरुवात केली.
याचा त्यांना निश्चितच फायदा झाला. जमिनीतील पाण्याचा निचरा झाला. त्यामुळे इमारती बांधताना पायाच्या बांधकामाला अडचण आली नाही, तसेच पुढचा धोका राहिला नाही. पण यामुळे एक गोष्ट मात्र घडली, ती म्हणजे तलावात पावसाचे भरपूर पाण्याची आवक झाली, तरी पुढे पाणी वेगाने कमी होत जायचे.
यातून तळ्याचा बराचसा भाग कोरडा पडायचा. यामुळे तळ्यातील जैवविविधतेबरोबरच आजूबाजूच्या निसर्गाचे विविध प्रकारे नुकसान झाल्याचे निदर्शनास येऊ लागले. पुढे सरकारने यावर उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या अभ्यास गटांनी २०१६ मध्ये सल्ला दिला, की तळ्याबाहेर वाहून जाणाऱ्या प्रवाहाच्या वाटेवर छोटी धरणे आणि बांध बांधणे गरजेचे आहे.
संबंधित विभागाने २०१८ मध्ये या प्रकल्पाला मान्यता देऊन दहा कोटी रुपये खर्च येईल असेही सांगितले. खर्चाचा आकडा ही मान्य झाला. काम लवकरच सुरू व्हायला हवे होते. पण पुढे हा प्रकल्प लाल फितीच्या कचाट्यात अडकला. विविध विभागांच्या मंजुरी रखडल्या. त्या बांधकामासाठी पैशाची तरतूद वगैरे या बाबींवर फक्त चर्चाच सुरू राहिली गेली. मात्र जानेवारी २०२५ मध्ये बीव्हर प्राण्याच्या वस्तीमुळे तलावातील पाणी साठा वाढू लागल्याचे दिसून आले.
बीव्हरचे स्थापत्य कौशल्य
बीव्हर प्राणी हा सस्तन प्राणी, उभयचर, शाकाहारी आहे. बीव्हर प्रामुख्याने निशाचर असतात आणि दिवसा ते त्यांच्या आश्रयस्थानात लपून राहतात. हा प्राणी एक अतिशय कुशल धरण अभियंता आहे. विशेष म्हणजे घर बांधण्याचे कौशल्य त्याला त्याच्या पालकांकडून शिकविण्याची गरज न पडता हे त्याला जन्मजातच आहे. उत्क्रांतीवादी आणि अभ्यासकांना आजपर्यंत या अंतःप्रेरणेच्या उदयाचे थोडेसेही स्पष्टीकरण देता आलेले नाही.
बीव्हर हा नद्या, नाले आणि तलाव यासारख्या गोड्या पाण्यातील परिसंस्थांमध्ये राहतात. पाणी हे बीव्हरच्या अधिवासाचा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे; ते त्यात पोहतात, बुडी मारतात आणि त्यांची घरटी त्यांना जमिनीवरील आणि पाण्यामधील भक्षकांपासून आश्रय देतात.
घरटी करण्यासाठी बीव्हर हळूवार वाहणारे प्रवाह पसंत करतात. बीव्हर पाण्याच्या मध्यभागी असलेल्या एका बीळ वजा घरात राहतो, ज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी आणि हवेशीर करण्यासाठी अनेक मीटर लांबीचे भूमिगत बोगदे असतात.
आपल्या पिलांना भक्षकांपासून वाचविण्यासाठी आणि हे घर स्थिर राहण्यासाठी, ते साचलेल्या पाण्यावर बांधले पाहिजे हेही तो जाणतो. घर बांधण्यापूर्वी, बीव्हर नदी किंवा जलस्रोताचा शोध घेतो आणि पाणी वाहणे थांबवून मागे थोप तयार होण्यासाठी त्यात एक धरण वजा बोगदा बांधतो.
त्यासाठी लाकूड, खडी, माती हे आणि असे बांधकाम साहित्य आश्चर्यकारक पद्धतीने गोळा करण्यात महिने घालवतो. विविध साहित्यांतून तो अद्वितीय पद्धतीचे घर दोन ते तीन दिवसांत बांधतो. त्याने बांधलेल्या धरणातून पाणीही वाहत असते. बीव्हरच्या घराची लांबी गरजेप्रमाणे एक मीटर ते शंभर मीटर असते. हे घर वा धरण कोसळण्याची शक्यता वाटताच बीव्हर ताबडतोब गळती दुरुस्त करण्यासाठी धावतो.
आपण बीव्हरच्या शारीरिक बाजूकडे दुर्लक्ष करू शकत नाही; कारण त्याचा जबडा खूप जाड आणि तीक्ष्ण दातांनी युक्त आहे. फांद्या कापण्यासाठी आणि माती खणण्यासाठी सुताराच्या छिन्नीच्या आकाराचे सुळे आणि मजबूत जबड्याचे स्नायू, या वैशिष्ट्यांबरोबरच त्याचे अंग पोहण्यासाठी सोईस्कर आहे. थंड पाण्याचा प्रतिकार करण्यासाठी त्याचे शरीर वंगणाच्या जाड थराने झाकलेले आहे.
कान, डोळे आणि नाक एका स्तरावर बनवले गेले आणि ते उंच असते, जेणेकरून त्याला पोहणे सोपे जाते. भक्षकावर नजर ठेवण्यासाठी त्याचे डोळे पाण्याच्या वर ठेवत आपले शरीर लपवू शकेल आणि उत्खननाच्या कामासाठी किंवा क्रॉसिंगसाठी पुरेसा वेळ असताना तो पंधरा मिनिटे आपला श्वास रोखू शकेल ही वैशिष्ट्येसुद्धा निसर्गाने या प्राण्याला बहाल केली आहेत.
बीव्हरची शिकार त्यांचे फर, मांस आणि कॅस्टोरियमसाठी केली जाते. कॅस्टोरियमचा वापर औषध, परफ्यूम आणि अन्नाच्या चवीसाठी केला जातो. कातडे आणि फरचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतो.
१९ व्या आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला हा प्राणी संरक्षित सूचीत येण्यापूर्वीच अतिशिकारीमुळे याच्या दोन्ही जाती जवळ जवळ नष्ट झाल्या होत्या. पण संरक्षित केल्यानंतर त्यांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे. मानवी संस्कृती आणि बांधकामाच्या संदर्भात बीव्हर हा मेहनतीचे प्रतीक आहे. हा कॅनडाचा राष्ट्रीय प्राणी आहे.
बीव्हरची दृष्टी तुलनेने कमी असते; बीव्हरची नजर पाण्याखाली चांगली नाही, पण बीव्हरना वास घेण्याची चांगली जाण असते.
बीव्हरला ‘इकोसिस्टिम इंजिनिअर’ असे संबोधतात; कारण त्याच्या क्रियाकलापांचा एखाद्या क्षेत्राच्या भूसदृश आणि जैवविविधतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. मानवांव्यतिरिक्त बिव्हरसारखे काही प्राणी त्यांच्या पर्यावरणाला आकार देण्यासाठी जास्त काम करताना दिसतात. धरणे बांधताना, बीव्हर नाले आणि नद्यांचे मार्ग बदलतात, ज्यामुळे विस्तृत पाणथळ जागा निर्माण होतात.
एका अभ्यासात, बीव्हर खुल्या पाण्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याशी संबंधित आहेत. जेव्हा बीव्हर ज्या प्रदेशात परतले तेथे आधीच्या दुष्काळाच्या वर्षांपेक्षा १६० टक्के जास्त खुले पाणी उपलब्ध होते, जेव्हा ते अनुपस्थित होते. बीव्हर धरणांमुळे पाणथळ जागांमध्ये पाण्याचे प्रमाण वाढते. त्यांनी बनवलेली ही छोटी धरणे सतत बदलणाऱ्या पाण्याच्या पातळीला स्थिर करतात, ज्यामुळे कार्बन साठवणूकही जास्त होते.
एका अभ्यासात असे आढळून आले, की बीव्हर अभियांत्रिकीमुळे पाण्याच्या काठावर असलेल्या वनौषधी वनस्पती विविधतेत ३३ टक्क्यांहून अधिक वाढ होते. अर्धशुष्क पूर्व ओरेगॉनमधील आणखी एका अभ्यासात असे आढळून आले, की प्रवाहाचे काठ तसेच नदीकाठच्या वनस्पतींची रुंदी अनेक पटीने वाढली आहे, कारण बीव्हर धरणे ही प्रवाहाला लागून असलेल्या पूर्वीच्या कोरड्या असलेल्या भागाला पाणी पुरवतात.
शुष्क भागात नदीकाठच्या परिसंस्थांमध्ये बीव्हर धरणे असताना वनस्पतींचे जीवन अधिक टिकून राहते असे दिसते. वणव्याच्या वेळी नदीकाठच्या वनस्पतींसाठी बीव्हर तलाव आश्रयस्थान म्हणून काम करतात आणि अशा आगींना तोंड देण्यासाठी त्यांना पुरेसा ओलावा प्रदान करतात.
मात्र काही ठिकाणी हेच बीव्हर नकारात्मक परिणाम दाखवतात. टिएरा डेल फुएगो येथे आणलेले बीव्हर स्थानिक जंगल नष्ट करण्यास जबाबदार ठरले आहेत. उत्तर अमेरिकेतील झाडांप्रमाणे, दक्षिण अमेरिकेतील अनेक झाडे तोडल्यानंतर पुन्हा वाढू शकत नाहीत, त्यामुळे या जंगलांचा ऱ्हास झाला.
बीव्हरच्या उपस्थितीमुळे जंगली सॅल्मन, ट्राउट माशांची संख्या आणि या माशांचा सरासरी आकार वाढू शकतो हे निरीक्षण आहे. या प्रजाती अंडी उबविण्यासाठी, जास्त हिवाळा घालविण्यासाठी, खाद्य देण्यासाठी आणि पाण्याच्या प्रवाहातील बदलांपासून आश्रयस्थान म्हणून बीव्हरचे अधिवास वापरतात. माशांवर बीव्हर धरणांचे सकारात्मक परिणाम स्थलांतर रोखण्यासारख्या नकारात्मक परिणामांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते.
बेडकांच्या संख्येसाठी बीव्हर तलाव फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे; कारण ते उबदार पाण्यात अळ्या परिपक्व होण्यासाठी क्षेत्रांचे संरक्षण करतात. बीव्हर तलावांचे स्थिर पाणी गोड्या पाण्यातील कासवांसाठी आदर्श अधिवास देखील प्रदान करते.
तलावात वाढला पाणीसाठा
मागील आठ वर्षांत तलाव अधिकाधिक कोरडा पडत चालला होता. सर्व काही ठप्प असतानाच दरम्यान अचानक जानेवारी २०२५ च्या एकेदिवशी तलावासंबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आले, की पाण्याची पातळी बरीच वर येत आहे. हे कसे काय झाले असावे? याविषयी तज्ज्ञांनी तलावाचे निरीक्षण सुरू केले.
तज्ज्ञांनी तलाव आणि भोवतालचे सर्व्हेक्षण सुरू ठेवले आणि त्यांना या सगळ्या गोष्टींचे कारण सापडले. बीव्हर (जंगली उंदरासारखा दिसणारा प्राणी) कळप या तलावाच्या आश्रयाला आला आहे. त्यांनी सर्वांनी मिळून पाणी वाहून जाणाऱ्या घळ्यांमध्ये छोटी बोगद्यासारखी घरटी बांधली होती.
बोगदारूपी घरटी प्रवाहाला आडवी बांधल्यामुळे ती छोट्या बंधाऱ्यासारखी काम करत होती. त्यामुळे सर्व घळ्यांतून पुढे निघून जाणारे पाणी आडले होते. त्यामुळे तलावातील पाणी वाढत चालले होते. ही घरटी त्यांनी फक्त दोन किंवा तीन दिवसांमध्ये बांधून पूर्ण केली होती, असेही लक्षात आले.
कोणताही खर्च न होता आणि कोणतेही श्रम न होता ही छोटी छोटी धरणे उभी राहिली. पाणी आडवले गेले. तलाव पुन्हा पूर्वीसारखा भरून राहू लागला आहे. त्यामुळे या पुढील काळात हळूहळू त्यातील जैवविविधता वाढत जाणार आहे. यातून सरकारचे बंधारे बांधण्याचा बारा लाख डॉलर्सचा (भारतीय रुपयांमध्ये साडेदहा कोटी रुपये) खर्च वाचला.
या घटनेने जगातील अनेक लोकांचे निसर्गाच्या नवलाईकडे लक्ष वेधले गेले आहे. निसर्गातील कितीतरी घटक आणि त्यांची बुद्धिमत्ता, कौशल्ये, आपल्याला अजून माहिती होणे बाकी आहे, याची जाणीव होते. त्याचा निसर्ग आणि मानवी जीवनाला होणारा उपयोग, फायदा अजून अज्ञात आहे. त्यामुळे निसर्ग, अन्नसाखळ्या, अधिवास यांचा सर्व समाज घटकांनी आदर करावा आणि निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबवावा, हे निसर्गप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांचे म्हणणे किती योग्य आहे हे कळते.
- सतीश खाडे ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.