Mangrove Conservation : लोकसहभागातून साधले कांदळवनांचे संवर्धन

Mangrove Ecosystem : समुद्र किनाऱ्यांच्या परिसरात वाढणारी कांदळवने ही समृद्ध परिसंस्था आहे. गेल्या काही दशकांमध्ये तिचा वेगाने ऱ्हास होत आहे. तो रोखण्यासाठी स्थानिक लोकांना सहभागी करून काही कार्यक्रम राबविण्यात आले. त्याला यश येऊ लागले आहे.
Mangrove Conservation
Mangrove ConservationAgrowon
Published on
Updated on

Maharashtra Costal Protection : महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. किनाऱ्यावरील मुंबई,  पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा जिल्ह्यांत २०२१ च्या भारतीय वन सर्व्हेक्षणानुसार सुमारे ३२४ चौरस किलोमीटर क्षेत्र कांदळवनांनी व्यापले आहे. जगामध्ये आढळणाऱ्या कांदळ वृक्षाच्या ७२ प्रजातींपैकी भारतात एकूण ४६ प्रजाती आढळतात. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कांदळवनांमध्ये १८ प्रजाती आढळतात.

कांदळवनांचे निसर्गाला फायदे

कांदळवनांमुळे किनारपट्टी परिसराचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण होते.

पावसाळ्यात जमिनीची धूप होऊन जमिनीवरचा गाळ थेट समुद्रात जाण्यापासून वाचतो. तो या झाडांच्या मुळांमुळे कांदळवनातच साठतो.

महत्त्वाचे म्हणजे पाण्याबरोबर वाहून आलेल्या सर्व सेंद्रिय पदार्थांना अडवण्याचे काम केले जाते. त्यातील अगदी जटिल सेंद्रिय पदार्थांचे पूर्ण विघटन करण्याची व पुन्हा निसर्गात मिसळण्याची प्रक्रिया कांदळवनामध्येच होते. याच अर्थाने समुद्रासाठी ती मोठी गाळणी ठरते.

समुद्रकिनाऱ्यावर आदळणाऱ्या वादळांना अंगावर झेलण्याचे काम ही कांदळवने करतात. त्यामुळे वाऱ्याची शक्ती व वेग कमी होऊन पुढील आपत्तीचे प्रमाण कमी राहते.

सुनामी व तत्सम आपत्तीमध्ये उसळणाऱ्या समुद्राच्या मोठ्या लाटांपासूनही कांदळवनामुळेच किनारपट्टीचे रक्षण होते.

कांदळवने कार्बन स्थिरीकरणामध्ये मोलाची भूमिका निभावतात. हवेतील कर्ब वायू शोषून कार्बन जमिनीत स्थिर करण्याची कांदळवनांची क्षमता जमिनीवरील वनांच्या सहा पट जास्त आहे.

कांदळवन परिसंस्थेमध्ये जैवविविधतेची समृद्धताही मोठी आहे.

संशोधकांच्या मते, कांदळवन परिसंस्था पुरवत असलेल्या पर्यावरणीय सेवेचे आर्थिक मूल्य काढले तर ते दर हेक्टरी १.९४ लाख डॉलर म्हणजेच एक कोटी ६१ लाख रुपये इतके होते.

मानव समाजाला फायदे

किनारपट्टीवर येणाऱ्या वादळे, लाटा व जमिनीची धूप यांच्यापासून संरक्षण मिळते. यामुळे मनुष्य व मालमत्तेची हानी टळते.

इंधनासाठी लाकूड व जहाज बांधणीसाठीचे लाकूड मिळते.

कांदळवनातून उपलब्ध होणारी नैसर्गिक औषधे विविध त्वचा विकार, पचन संस्थांचे विकार, इथपासून ते कर्करोग व उच्च रक्तदाबापर्यंत उपयोगी ठरतात.

खाडीतील विविध कालवं, खेकडे, मासे खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात.

भारतातील ४० टक्क्यांपेक्षा ही अधिक लोकांचे अन्न सागरी जीवनावर अवलंबून आहे.

जवळजवळ सर्व सागरी जिवांचे जन्मस्थान व संगोपन स्थान हे दोन्हीही कांदळवनातच आहे.

ऱ्हास रोखण्यासाठी लोकसहभाग

भरपूर पर्यावरणीय फायदे असूनही सामाजिक पातळीवर अनास्थेमुळे कांदळवनांचा ऱ्हास होत आहे. भारतातील किनारपट्टीच्या गुजरात ते केरळ आणि तामिळनाडू ते ओडिशापर्यंतच्या राज्यात किनारपट्टीवरील कांदळवनांचे एकूण क्षेत्र ४९७५ चौ. किलोमीटर आहे. कायद्याने या वनांचा समावेश राखीव वनात केला आहे. मात्र शहरांच्या वाढत्या हद्दी आणि अतिक्रमणामुळे त्यांचा वेगाने ऱ्हास होत आहे. हे टाळण्यासाठी अनेक ठिकाणी कांदळवनांतून स्थानिकांना उत्पन्नाची साधने विकसित केली जात आहेत. त्यातून लोकसहभाग वाढवला जात आहे.

Mangrove Conservation
Mangrove Conservation : कांदळवनासह जैवविविधतेत वाढ

कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान

राज्यातील कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने २०१२ मध्ये राज्याच्या वन विभागांतर्गत कांदळवन कक्षाची निर्मिती करण्यात आली. या कक्षाने कांदळवनांचे पुनर्जीवन आणि तटीय क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी शाश्‍वत उपजीविका निर्माण करण्याच्या दृष्टीने काही पथदर्शी कार्यक्रमांना सुरुवात केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१२ ते २०१८ या कालावधीत UNDP-GEF तर रत्नागिरी जिल्ह्यात GIZ अशा आंतरराष्ट्रीय संस्थांकडून या कामांसाठी निधी मिळाला. त्यातून दोन्ही जिल्ह्यांत प्रकल्प राबवले. या कामांचा विस्तार वाढविण्याच्या दृष्टीने २०१५ मध्ये कांदळवन प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. २०१९ पासून ‘ग्रीन क्लायमेट फंड’ आणि यूएनडीपी यांच्या कडून मिळालेल्या निधीमधून या क्षेत्रात संपूर्ण किनारपट्टीवर प्रकल्प राबवला जात आहे.

कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान यांनी लोकसहभागातून कांदळवन संवर्धनासाठी आखलेल्या योजनेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे...

खासगी, शासकीय व सामूहिक कांदळवन क्षेत्रांचे नियोजनबद्ध संरक्षण व संवर्धन करणे.

वनविभाग व स्थानिक जनता यांच्यामधील संवाद वाढवणे. शासनाच्या विविध विभागांच्या योजनेतील तरतुदींची सांगड घालून कांदळवनांवर अवलंबित ग्रामस्थांचे समूह तयार करून कांदळवन सह व्यवस्थापन समिती गठित करणे.

स्थानिक संस्थांशी करारनामे करून सदर क्षेत्राचा सूक्ष्म व्यवस्थापन आराखडा तयार करणे. समूहांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे.

योजनेच्या माध्यमातून तयार होणारे उत्पन्न वनसंवर्धन व समूहाच्या विकासासाठी वापरणे.

कांदळवन सह व्यवस्थापन समितीची कर्तव्ये

गावातील कांदळवन क्षेत्रासाठी सूक्ष्म आराखडा तयार करणे.

कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करणे.

कांदळवन क्षेत्रांचे सीमांकन करणे, आवश्यकता असल्यास कांदळवनांना कुंपण उभारणे.

कांदळवन रोपवन व नैसर्गिक पुनर्निर्मितीबाबत कामे करणे.

कांदळवनावर ऊर्जेसाठी अवलंबून असल्या कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस व सौर उत्पादने यांचा पुरवठा करणे.

लोकसहभागासाठी केलेले प्रयत्न

सामान्यतः लोक त्यांच्या उपजीविकेसाठी आणि जीवनासाठी आवश्यक कामांसाठी कांदळवनांची तोड करतात. त्याऐवजी झाडांची तोड किंवा नाश न करता त्यापासून कशा प्रकारे अर्थार्जन करता येईल, यावर भर देण्यात आला.

कल्पकतेने विविध उत्पन्नांची साधने विकसित करण्यामध्ये कांदळवन कक्षाने खूप मेहनत घेतली आहे. त्यासाठी स्थानिक लोकांचे संघटन, प्रबोधन, प्रशिक्षण व निधी उपलब्धता, सोई सवलती अशा विविध घटकांवर काम करण्यात आले. त्याचे खूप सकारात्मक परिणाम गेल्या दहा, बारा वर्षांत वाढत असलेल्या लोक सहभागातून दिसून येत आहेत.

Mangrove Conservation
Mangrove Conservation : सेझच्या शेतजमिनीवर वाढले कांदळवन

उपजीविकेसाठी मत्स्य व्यवसायाची पर्यायी साधने

मत्स्यपालनाच्या सुधारित पद्धती

मच्छीमारांना पारंपरिक मासेमारी पद्धतीमधील काही चांगल्या बाबींसोबत आधुनिक मासेमारीचे ज्ञान दिले गेले. पिंजऱ्यातील मासेमारीचे प्रशिक्षणे आयोजित करण्यात आली. त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांसाठी भांडवल उपलब्ध करून दिले. ट्राॅलरच्या मासे पकडण्याच्या पूर्वीच्या जाळीच्या छिद्रांचा आकारामुळे खूप छोटे मासे, पिलेही जाळ्यात अडकत. त्यांचा खाण्यासाठी उपयोग होत नाही, त्यामुळे दरही मिळत नाही. पण त्याचा परिणाम म्हणून मोठ्या माशांनाही अन्नाची उपलब्धता कमी होते.

या जाळीच्या छिद्रांचा आकार व साइज बदलण्याचा नियम केला. त्याचे सक्तीने पालन होईल, याकडे लक्ष पुरवले. त्यामुळे माशांची पिले त्या जाळीतून निसटून जाऊ लागली. त्यांची वाढ होऊन माशांची संख्या बऱ्यापैकी वाढली. माशांचा दुष्काळ पडणे रोखले गेले.

आधुनिक मत्स्य शेती प्रत्यक्ष पाहण्यासाठी सुरुवातीला सिंधुदुर्ग आणि नंतर कोकणातील सर्वच तालुक्यातून प्रत्येकी १४ ते १५ लोकांना तामिळनाडू, केरळ, ओडिशा येथील मत्स्यपालन केंद्रांना भेट देण्यासाठी सहली आयोजित केल्या. त्यातून लोकांना बराच आत्मविश्‍वास वाटू लागला. पुढे लवकरच प्रत्येक तालुक्यात असे पथदर्शी उपक्रम सुरू केले गेले.

तिथे लोकांच्या भेटी, सहली आयोजित करण्यासोबत प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध केले. त्यांना कार्यशाळांची जोड दिली गेली. त्यातून पिंजऱ्यातील मत्स्यपालन हे उत्पन्नाचे साधन म्हणून रूढ झाले. मत्स्य विभागाकडे विविध योजनांमध्ये पिंजऱ्यातील मत्स्यपालन अंतर्भूत करण्यात आले आहे. या साऱ्या प्रयत्नांतून हळूहळू ही पद्धती स्थिरावत आहे.

खेकडापालन

कांदळवनाच्या परिसरात असलेल्या दलदलीत विविध प्रजातीचे खेकडे सापडतात. आकाराने मोठ्या आणि चविष्ट असलेल्या या खेकड्यांना परदेशातही चांगली मागणी आहे. या खेकड्यांच्या प्रजाती कांदळवनातच वाढतात. त्यांच्या विषयी शास्त्रीय प्रशिक्षण, संगोपन, पकडणे आणि विक्री व्यवस्थेसाठी कांदळवन कक्षाने मदत केली आहे. त्यातून अनेक स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

शोभिवंत माशांचे पालन :

रंगीत शोभिवंत माशांचे मत्स्यबीज पुरवून त्यांची वाढ आणि विक्री यातून रोजगार निर्मिती केली जात आहे.

मत्स्यबीज निर्मिती केंद्र :

पिंजऱ्यातील मासेमारीसाठी मत्स्यबीज इतर राज्यातून आणावे लागते. आपल्याकडे विशेषतः ते आंध्र प्रदेशातून येते. इतक्या दूरवरून मत्स्यबीज येताना त्यात मरतूक वाढते. वाहतुकीचा खर्चही बराच अधिक होतो. पावसाचे दिवस कोकणात जून ते ऑगस्ट आणि आंध्र प्रदेशामध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात असतात.

त्यामुळे त्यांच्याकडून उपलब्ध होणारे मत्स्यबीज नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांमध्ये उपलब्ध होतात. यावर उपाय म्हणून सिंधुदुर्ग येथेच मत्स्यबीज निर्मिती केंद्र (हॅचरीज) लवकरच सुरू करण्यात येत आहे. त्यात मत्स्यबीजाबरोबरच खेकडा बीज निर्मितीही केली जाणार आहे. त्याचा फायदा आपल्या कोकणातील लोकांना होऊ शकेल.

- सतीश खाडे , ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com