Green Tourism : पाणथळ जागांतून हरित पर्यटनाकडे वाटचाल

Wetland Documentation : स्थानिक अधिकाऱ्यांसह स्यमंतक संस्था, अन्य तज्ज्ञ, प्राध्यापक मंडळी आणि लोकसहभागातून हे काम तडीस नेण्याचा प्रयत्न केला. त्यातून हरित पर्यटनाचा मार्ग खुला झाला.
 youth In Conservation
youth In ConservationAgrowon
Published on
Updated on

Konkan eco-Tourism : पाणथळ जागांच्या सर्व्हेक्षणात तिथे आढळणाऱ्या वनस्पती, प्राणी आणि एकूण जैवविविधतेचा अभ्यास व नोंदी करणे गरजेचे होते. त्यासाठी त्या त्या विषयातील प्राध्यापकांची व त्यांच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली. त्यात प्रा. डाॅ. बाळकृष्ण गावडे, प्रा. हसन खान, प्रा. योगेश कोळी, प्रा. डाॅ. धनश्री पाटील यांचा समावेश होता. या प्राध्यापकांनी सर्वप्रथम आपापल्या कॉलेजमधील वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे गट बनवले. या सर्व गटांना उपक्रमाचे महत्त्व समजावून सांगितले. यात तुमचा प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष काय फायदा होणार आहे, हेही सांगितले.

या उपक्रमातून आर्थिक मानधन देणे शक्य नव्हते. मात्र या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रकल्पांच्या सर्व्हेक्षणातून ज्ञान आणि अनुभव हाच सर्वांत मोठा फायदा होणार होता. मग सुरू झाले वेगवेगळे ओरिएंटेशन आणि प्रशिक्षण. पहिल्यांदा प्राणी व वनस्पतींच्या स्थानिक नावांप्रमाणेच त्यांची शास्त्रीय नावांबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. वनस्पतींचे निरीक्षण कसे करायचे, त्याची माहिती कशी नोंदवायची याचे प्रशिक्षण देण्यात आले.

या माहिती नोंदविण्यासाठी योग्य तो मसुदा (फॉरमॅट) तयार केला. वनस्पतींचे फोटो कसे घ्यावयाचे, प्रत्येक फोटोचे लोकेशन व दिनांक, वेळ नोंदविण्यासाठी कोणते अॅप व ते कसे वापरायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. या सर्व्हेक्षणाच्या कामामध्ये स्थानिकांची मदत कशी घ्यायची, त्यासाठी त्यांच्या सुसंवाद व समन्वय कसा साधायचा, या बाबी समजावण्यात आल्या.

प्रत्येक विद्यार्थी गटासोबत सुरुवातीचे काही दिवस स्वतः प्राध्यापक मंडळीही जात असत. त्यातून विद्यार्थ्यांच्या निरीक्षणामध्ये अचूकता आणण्यात आली. पाणथळ जागी असलेली झाडे, झुडपे, कीटक, पक्षी, फुले, फळे, गवत या सर्वांचे फोटो व त्यांची शास्त्रीय नावे, माहिती गोळा करू लागली. दर महिन्याला वा ऋतूत होणाऱ्या बदलानुसार प्राणी, पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये होणारे बदलही नोंदविण्यात आले.

अनेक महिने खपून हे सर्व तपशील गोळा केले. पहिल्या काही अनुभवानंतर एक दोन महिन्यांतच ही मुलेही या विषयात चांगलीच पारंगत झाली. या सर्व कामात सचिन देसाई, सचिन राणे यासारख्या अनेक पर्यावरण अभ्यासकांनी आपला खारीचा वाटा उचलला. हा जमा केलेला (डाटा) तपशील एका वेबसाइटवर अपलोड केला असून, तो सर्वांसाठी मोफत खुला केला आहे.

या कामासाठी प्रत्येक गावचे तलाठी, ग्रामसेवक यासह तहसीलदार यांच्याही कार्यशाळा स्यमंतक संस्थेच्या सहकार्यातून घेण्यात आल्या. परिसरातील शाळा, त्यांचे शिक्षक आणि शालेय विद्यार्थ्यांचाही या कार्यक्रमात सहभाग मिळवण्यात आला. यात सहभागी झालेल्या सर्व व्यक्तींना पर्यावरणाची जाणिव, सजगता आणि उत्तम अनुभव मिळाला. त्यातून स्थानिकांमध्ये पाणथळ जागा, तेथील प्रत्येक झाड, वनस्पती आणि सजीवांप्रति जागृती आणि आपुलकी निर्माण झाली. ही बाब सर्वांत महत्त्वाची होती, कारण स्थानिकांनाच त्यांचे महत्त्व समजले तर पुढील देखभाल सोपी होते.

 youth In Conservation
Wetland Conservation : लोकसहभागातून धामापूर तलावाचे संरक्षण

मुलांना काय मिळाले?

कोकणात विशेषतः धामापूर मध्ये भारतभरातून संशोधक, अभ्यासक येत असतात. त्यांना आवश्यक त्या मदतीसाठी हीच मुले पुढाकार घेतात. स्थानिक मुलांना गाइड म्हणून रोजगाराची उपलब्धता झाली आहे. स्थानिक मुलांसाठी स्यमंतक संस्थेने ‘गाइड ट्रेनिंग प्रोग्रॅम’ तयार केला आहे. यासोबत स्थानिक मुलांमध्ये वाइल्ड फोटोग्राफी व संगणकासंबंधीची कौशल्ये विकसित झाली. कांदळवन व वेटलँड संवर्धनासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्गात कार्यरत असलेल्या मँग्रुव्ह फाउंडेशन सारख्या संस्थांमध्ये मुलांना नोकऱ्या मिळू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन व संवर्धन वृत्ती वाढीला लागली.

अनेक विद्यार्थ्यांनी स्वतः निरीक्षणे, नोंदी घेत अनेक संशोधन निबंधही लिहिले. ते विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मांडले गेले. म्हणजे एका छोट्या प्रकल्पातून केवळ जागरूकताच वाढली असे नाही, तर स्थानिकांमध्ये संशोधन, संवर्धनाला चालना आणि बळ मिळाले आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाला (इको टुरिझम) सुरुवात झाली आहे. ‘मॅंग्रुव्ह टुरिझम’ने चांगलेच मूळ धरले आहे. बचत गटाच्या महिला तो व्यवसाय सांभाळतात. अनेक ठिकाणी व्यवस्थापक आणि गाइड म्हणून हीच मुले दिसतात.

निसर्गाची जपणूक हा मूलभूत विषय स्थानिकांच्या अग्रक्रमावर आला, हा झाला सर्वांत महत्त्वाचा अप्रत्यक्ष फायदा. स्थानिकांना अनेक औषधी वनस्पती, अन्नसाखळ्या व त्यांचे महत्त्व समजले. त्यामुळे शेती आणि पाणथळ जागांकडे बघण्याची दृष्टी बदलली. आता स्थानिक शेतकरी कीटकनाशके व रासायनिक खतांचा अनावश्यक वापर टाळू लागले आहेत.

आमच्या जगण्याशी काय संबंध?

एका बाजूला प्राध्यापक, महाविद्यालयीन विद्यार्थी यासह प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या या प्रकल्पाचे महत्त्व सामान्यांना कळत नव्हते. धामापूरचे सामान्य ग्रामस्थ सम्यंतक संस्थेच्या कार्यकर्त्यांना आणि सचिन देसाईंना विचारू लागले की यात आमचा काय संबंध? तलावातील बांधकाम पाडणे, तलावातील व भोवतालची जैवविविधता राखणे यांच्या आमच्या जगण्याची काय संबंध? उलट स्कायवाॅक व बोटींगमुळे पर्यटन वाढले असते. त्यातून आम्हाला चार पैसे मिळाले असते. तुम्ही ते का बंद पाडता, त्यात तुमचा काय फायदा? अशा बऱ्याच शंका लोकांना पडत होत्या. त्यांची उत्तरे सार्वजनिक सभा व छोट्या छोट्या बैठकांतून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आपल्या गावची सर्व प्रकारची निसर्गसंपत्ती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. तलाव, त्या भोवतालचे जंगल, जंगलातील वनस्पती, झाडेझुडपे, कीटकांपासून मोठ्या प्राण्यांची जीवनसाखळी, त्यांचे महत्त्व सांगण्यात आले. ही सर्व वैशिष्ट्यांची माहिती हेच आपले भांडवल. पर्यटकांना त्यांची माहिती दिली तर ते आपोआप येतील.

उदा. स्थलांतरित पक्षी जगभरातून इथेच का येतात? तिथे कोणते स्थानिक पक्षी, प्राणी आहेत? त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे सौंदर्य, कुठली झाडे जगात क्वचित सापडतात? पाणमांजरांबद्दल सांगू, इथल्या फुलपाखरांचे प्रकार, त्यांच्या झुंडीच्या झुंडी आपल्याला दाखवता येईल. अशा जैवविविधतेच्या अनेक सौंदर्यपूर्ण व चमत्कारिक गोष्टी पाहायला दर्दी निसर्गप्रेमी नक्कीच येणार. वरवरच्या उथळ पर्यटकांपेक्षाही जास्त सजगतेने येतील, ते पैसेही जास्त खर्चायला तयार होतील. म्हणजे निसर्गावर आधारीत पर्यटन व्यवसाय अधिक शाश्‍वत ठरू शकेल. उदा. एक सुरंगीचे झाड वर्षासाठी हजारो रुपये देऊन जाते. कांदळवनात सहली करता येतील.

 youth In Conservation
Wetland Maharashtra : पाणथळ प्रदेशांच्या आकड्यावर तुमचे मत काय?

घनदाट कांदळवनात छोट्या बोटीने फिरण्याचा अनुभव पर्यटकांना देऊ. विविध फुलांपासून अत्तरे, तर काहींच्या फुलांच्या पाकळ्यांचा चहा तर काहींचे सरबत बनवता येईल. फणसाच्या आठळ्यांचे कटलेट, कुळिथाची भेळ, लाडू, फणसाचे आइस्क्रीम, बेलफळाच्या गराचे आइस्क्रीम असे खास धामापुरी पदार्थ विकता येतील. याबरोबरच घरातीलच साध्या खोल्यांचे पर्यटन निवासात (होमस्टे) रूपांतर करता येईल.

त्यातून रोजगाराच्या नव्या संधी तयार होतील. धामापूर गावातील ऐतिहासिक वारसा (हेरिटेज वॉक) आणि मौखिक इतिहास सांगणारे गाइड स्थानिकातून तयार करता येतील. असे एक ना अनेक पर्याय त्यांच्यासमोर खुले करण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला पूर्वजांनी जपलेला हा वारसा आपल्यालाही टिकवून पुढील पिढ्यांच्या ताब्यात द्यायचा, हे त्यांना पटविण्यात आले.

आज इतक्या वर्षांनंतर मागे वळून पाहताना त्या परिसरात यातील अनेक बाबी ठरल्याप्रमाणे सुरू झाल्या आहेत. गावकऱ्यांनी चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या आहेत. गाव हळूहळू आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करू लागले. निसर्ग, सिंचन, कातळशिल्प, खाडी, समुद्र, वनस्पती, प्राणी यांचा अभ्यास व कुतूहल असणारी तज्ज्ञ आणि पर्यटक मंडळींची रेलचेल सुरू झाली. आयुर्वेदाचे अभ्यासक, आर्किटेक्चर कॉलेजचे विद्यार्थी, सागरी जिवांचे अभ्यासक, निसर्ग सौंदर्याचे उपासक, वाइल्ड लाइफ फोटोग्राफर, पक्षी निरीक्षक, मानववंश शास्त्राचे विद्यार्थीही येथे येऊ लागले आहेत. (कारण काही महिन्यापूर्वी तिथे अश्मयुगात मानवाने शिकारीसाठी वापरलेली दगडांची हत्यारे सापडली.) आता गावात लवकरच कारागीर आणि पर्यावरण यावर आधारित संग्रहालय ही उभे राहणार आहे. म्हणूनच धामापुरच्या पर्यटनास उच्च दर्जाचे किंवा शहाणपणाचे पर्यटन (Wise Tourism) म्हणता येईल.

कोकणभर पसरली मोहीम

कोकणात भरपूर पाऊस, डोंगरदऱ्या अशा प्रकारचे भूभागामुळे पाणथळ जागा भरपूर आहेत. या जागा शासकीय नकाशावर नोंदविलेल्या आहेत. पण नकाशावर नसलेल्या व आकाराने लहान असलेली हजारो पाणथळ स्थळे शोधून त्यांच्या संवर्धनाचे काम सुरू झाले. यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६७ पाणथळ जागांचे (वेटलँड) तपशील व त्याचे दस्तऐवजीकरण पूर्ण झाले आहे. असे दस्तऐवजीकरण पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा भारतातील पहिला आणि एकमेव जिल्हा ठरला. लोकसहभागातून, त्यातही मुख्यत्वे युवक, युवतींच्या सहभागातून ५७ पाणथळ जागांची दस्तऐवजीकरण केले गेले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्याने वेग पकडल्यानंतर कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्याधिकाऱ्यांनीही पुढाकार घेतला. त्यांच्याकडून स्यमंतक संस्थेला मदतीला घेत कामाला सुरुवात झाली. या जिल्ह्यांमध्येही विविध विषयांचे प्राध्यापक, स्थानिक पर्यावरण मित्र व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदतीने पाणथळ जागांचे दस्तऐवजीकरण केले गेले. शिक्षणक्षेत्र, प्रशासन व सामान्य माणसे एकत्र आली तर एखादे विधायक काम किती व्यापकतेने, गुणवत्तापूर्वक करता येऊ शकते, याचे हे उत्कृष्ट व आदर्श उदाहरण म्हणावे लागेल.

- सतीश खाडे , ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com